वयम मासिक - राणी रासमणी (रशमोनी)- शौर्यकथा

 १८४० साली इंग्रजांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या बंगालमध्ये घडलेला एक ऐतिहासिक प्रसंग! वर्षानुवर्षांपासून गंगेच्या पाण्यावर मासेमारीचा व्यवसाय चालत आलेला होता. शेकडो कोळी कुटुंबांची उपजीविका त्यावर चालत असे.  तरीही या मासेमाऱ्यांमुळे मालाची ने-आण करणाऱ्या  जहाजांना मोठा अडथळा निर्माण होतो हे कारण पुढे करून इंग्रज अधिकाऱ्यांनी हुगळी नदीमध्ये मासेमारी करण्यावर मोठा कर लावला. हुगळी म्हणजे गंगेची उपनदी!  इंग्रजांच्या या धोरणाविरुद्ध दाद मागत कोळी बांधव  जमीनदार असलेल्या राणी रशमोनीकडे गेले. इंग्रजांची धूर्त चाल राणीने चांगलीच ओळखली.पुढे ज्या चातुर्याने तिने त्यांना काटशह दिला, ते अवाक् करणारं होतं!तिच्या चातुर्यात तिचं शौर्य प्रकटलेलं होतं!  

राणीने हुगळी नदीतला १० किलोमीटर्स लांब प्रवाहाचा पट्टा ईस्ट इंडिया कंपनीकडून भाड्याने घेतला. तसा करार करून झाल्यावर तिने प्रचंड मोठ्या साखळ्या दोन्ही  बाजूंनी लावल्या. इथे नदीचा प्रवाह धनुष्याकार झालेला होता. याठिकाणी तिने तिची खाजगी मालमत्ता जाहीर करत मासेमाऱ्यांना काम सुरू करण्यासाठी सांगितलं. तिथे हळुहळू त्यांची गर्दी झाली, त्यामुळे नदीवरची इतर रहदारी ठप्प झाली. केवढं हे राणीचं धाडस! यामुळे इंग्रज संतापले आणि  त्यांनी राणीला स्पष्टीकरण मागणारी कायदेशीर नोटिस बजावली. तरीही राणी डगमगली नाही. तिने उत्तर दिलं, “ही जागा मी ईस्ट इंडिया कंपनीकडून भाड्याने घेतलेली आहे. त्यामुळे स्वतःच्या मालमत्तेतून होणाऱ्या उत्पन्नाचं रक्षण करण्याचा अधिकार मला खुद्द कंपनीचाच कायदा देतो! हे मान्य नसेल तर तुम्ही न्यायालयात रीतसर दावा दाखल करू शकता. जोपर्यंत तिथे न्यायनिवाडा होत नाही, तोपर्यंत या साखळ्या काढल्या जाणार नाहीत आणि मासेमारी सुरूच राहील.” राणी राशमोनीने अशा प्रकारे नाक बंद करून इंग्रजांचं तोंड उघडलं! त्यांनी मासेमारीवर लावलेला कर रद्द केला! गंगा सर्वांसाठी खुली झाली. कोळी बांधवांचा आनंद गगनात मावेना! या घटनेचा एवढा मोठा परिणाम होता की गंगेच्या पाण्याला ‘राणी राशमोनी जल’ असं नाव पडलं! वेळोवेळी असं धाडस दाखवणारी ‘लोकमाता’ राणी रशमोनी म्हणजे फार धाडसी वीरांगना!

१७९३ साली कलकत्त्याजवळच्या कोना नावाच्या एका छोट्या गावात रशमोनीचा जन्म झाला. तिला २ भावंड होती. परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांचं बालपण अतिशय खडतर होतं. त्यात रशमोनी अवघी सात वर्षांची असताना तिची आई हे जग सोडून गेली. त्याकाळच्या प्रथेनुसार किशोरी वयातच तिचं लग्नं राजचंद्र दास नावाच्या तरुण जमीनदाराशी झालं. राणी आता अतिशय मोठ्या, सधन कुटुंबात आली. राजचंद्र दास हा बुद्धिमान व्यापारी तर होताच परंतु वृत्तीने स्वतंत्र होता. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाने तो सुधारणावादी झाला होता. त्याने रशमोनीला कधीही चार भिंतींच्या आड रहाण्याची सक्ती केली नाही,उलट तिच्यावर जवाबदारी टाकत तिला सक्षम केलं. अनेक गोष्टी शिकवल्या. त्यामुळे ती व्यवहारात तरबेज झाली, तिला समाजकारण देखील समजू लागलं.  जनबाजार इथे बांधलेली त्यांची हवेली आजही आपल्याला बघता येते.

राणीने लोककल्याणाचा वसा घेतला होता. गंगेच्या किनारी अनेक वृद्ध, रोगी येऊन रहात. त्यांच्या  सोयीसाठी तिथे तिने घाट बांधून घेतले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरसुद्धा नियुक्त केले. १८२३ साली गंगा नदीला मोठा पूर आला त्यावेळी अत्यंत ममतेनं तिने लोकांना आश्रय दिला, त्यांना अन्न धान्य पुरवलं.     

१८३३ साली लागू झालेला सनदी कायदा अर्थात् The Charter Act जमीनदारीचं स्वरूप बदलून गेला. जमीनदारांचे अनेक अधिकार संपुष्टात आले. यामागोमाग १८३६ मध्ये राजचंद्र दास याचं निधन झालं. त्याकाळी बंगालमध्ये विधवांवर खूप बंधनं होती. परंतु स्वतः त्यात न अडकण्याचं मोठं धाडस दाखवत रशमोनी खंबीरपणे प्रचंड मोठी जहागीर सांभाळण्यासाठी सिद्ध झाली. तिची जहागीरी बळकावण्यासाठी आलेल्या कित्येक जणांना धडा शिकवून तिने परत पाठवलं. मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांकडे थकलेली कर्जाची रक्कम तिने वसूल केली. चोरी, दरोडा घालणाऱ्या कितीतरी हातांना तिने काम दिलं आणि त्यांची कुटुंब वसवली! पुढे ३० वर्षं तिने ती जहागीर सांभाळली. तिच्यासाठी ती जहागीर म्हणजे लोककल्याणाचं आणि समाज सुधारणेचं एक माध्यम होतं! पारतंत्र्यात असलेल्या व्यथित समाजाला तिने पंखांखाली घेतलं, त्यांच्यासाठी रस्ते, नाले, पाणी,घरं अशा अनेक मूलभूत सुविधा उभ्या केल्या. ग्रंथालयं, शिक्षण संस्था यांना मोठी आर्थिक मदत तिने केल्याचे दाखले इतिहासात मिळतात. शिवाय बहुपत्नीकत्व, जरठ विवाह हे थांबवण्यासाठी ती बंगालमधल्या कार्यात सहभागी झाली. विधवा पुनर्विवाहासाठी तिने प्रयत्न केले.  

बंगालमध्ये दिवसेंदिवस वाढतच जाणारे इंग्रजांचे अत्याचार पाहून राणीने त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारलं. दुर्गा उत्सवात मिरवणूक काढली म्हणून इंग्रजांनी राणीला  ५०० रुपये एवढा दंड ठोठावला. तिने तो भरला,मात्र तिच्या जहागिरीत मोडणारा जनबाजाराकडे जाणारा मोठा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद केला. प्रचंड संख्येने भारतीय राणीच्या बाजूने उभे राहिले. तिने इंग्रज अधिकाऱ्यांना अगदी पेचात टाकलं. त्यांना तिचा दंड मागे घ्यावा लागलाच शिवाय तो रस्ता उघडण्यासाठी विनंती करणारं पत्रं त्यांना लिहावं लागलं!

तिच्या हवेलीवर हल्ला करून तोडफोड करणाऱ्या इंग्रज सैन्यासमोर तलवार घेऊन उभी असलेली कालिका रुपातली राशमोनी पुढे खरोखर कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध कालीमंदिराची निर्माती झाली! तिला झालेल्या दृष्टांताप्रमाणे तिने मंदिर बांधायला घेतलं, पण तेव्हाच्या वर्णव्यवस्थेनुसार शूद्र वर्णातमोडणाऱ्या या राणीला कुणीही जागा देईना. परंतु निराश न होता मोठ्या संघर्षातून वाट काढत ती चालत राहिली. तिने मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण केला.  तिथे पूजा करायला तयार झालेल्या पुजाऱ्याचा धाकटा भाऊ गदाधर म्हणजे आध्यात्मिक शक्तीचे उपासक श्री रामकृष्ण परमहंस!सगळे भेद मागे सारून श्री रामकृष्ण आणि राणी राशमोनी यांचं गुरू –शिष्याचं नातं दृढ होत गेलं. यास्तव तिने आयुष्य समर्पित केलं.   

राणी राशमोनीच्या स्मरणार्थ १९९४ साली काढलेलं पोस्टाचं तिकिट, कलकत्त्याजवळ उभारलेले तिचे पुतळे, तिच्या नावे बांधलेला घाट, एवढंच काय पण २०१८ साली भारतीय तटरक्षक दलाने IPV तंत्रज्ञानाच्या नौकेला दिलेलं तिचं नाव, तिच्यावरचा चित्रपट, मालिका या स्वरूपांत तिचं काम पुन्हा पुन्हा आठवलं जातं. तिच्या स्वरूपात समजकल्याणासाठी समर्पित, आध्यात्मिक साधनेच्या बरोबर परिवर्तनशील समाजाचा पाया रचणारी एक धाडसी वीरांगना बंगालने अनुभवली. जन्माने नव्हे तर कर्माने माणूस श्रेष्ठ होतो ही तिने सिद्ध केलं. तिच्या या अलौकिक कार्यामुळे भारताच्या इतिहासाची पानं सदैव प्रकाशमान रहातील!

-           मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

 

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही