जय हिंद सर - श्रद्धांजली...!
अकॅडेमीमधलं ट्रेनिंग संपवून आम्ही पुढच्या तयारीत गुंतलो होतो. दीक्षांत समारोह अर्थात् पासिंग आऊट परेड दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. त्यासाठी विशेष निमंत्रित असणारे आम्हा सर्वांचे पालक अकॅडेमीमध्ये दाखल होत होते. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव, दुसरीकडे विविध गणवेश आणि बुटांची तयारी, त्यात आईबाबा आल्यावर त्यांना हे दाखवू की ते दाखवू याकडे ओढ घेणारं मन...अशी प्रचंड गडबड सुरू होती. तेवढ्यात घामाघुम होऊन एक कोर्समेट पळत आली आणि मला म्हणाली, “कुछ कांड किया क्या गार्गी तूने? सिद्धा अॅडजुटंटसे बुलावा आया है!जा भाग जल्दी|” अॅडजुटंट म्हणजे ‘दंडपाल’, जो संपूर्ण अकॅडेमीचं प्रशासन बघतो! आजवर एकाच कारणासाठी तिथून बोलावणं येत असे, ते म्हणजे ‘पनिश्मेन्ट’! आधी अनेकदा माझी वर्णी लागली होती तिथे पण आता अगदी दोनच दिवस राहिले असताना सुद्धा शिक्षा.. म्हणजे अतीच झालं असा विचार करत मी तडक त्यांचं ऑफिस गाठलं. सल्युट करून उभी राहिले.
त्यांनी ‘विश्राम’ आज्ञा देत बोलायला सुरुवात केली. “परवाच्या पासिंग आऊट परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत लेफ्टनंट जनरल श्रीनिवास पट्टाभिरामन – Vice chief of army staff! ते आर्मीच्या इंजिनियर विभागातल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा एका बॉम्बे सॅपर्स युनिटचे आहेत.” (आता हे सगळं मला का ऐकवत आहात असं मनातलं जराही चेहऱ्यावर न आणता मी ऐकत होते. Sir..sir..एवढाच शब्द फुटत होता). ते पुढे बोलू लागले, “योगायोगाने तू सुद्धा त्यांच्याच युनिटमध्ये कमिशन होत आहेस. तुझ्याविषयी पट्टाभिरामन सरांना कळलं तेव्हा त्यांनी तुझं piping out (खांद्यावर तारे लावण्याची)इच्छा व्यक्त केली. मॅडम सुद्धा असतील बरोबर.”
हे ऐकताचमाझा चेहरा झरकन् पडला. खरंतर हा मान आईबाबांचा. प्रत्येक कॅडेट त्या एका क्षणाची किती आतुरतेने वाट पहात असतो! म्हणून मी अस्वस्थ झाले. सगळं बळ एकवटून मी म्हणाले, “but..sir…my parents have come all the way to Chennai for the piping out ceremony.” त्यांनी तो भाव ओळखला. ते लगेच उत्तरले, “हो हो.. मी समजू शकतो. तू तुझ्या पालकांना सुद्धा तिथे घेऊन ये.” असं आहे की इतर सगळे कॅडेट्स खाली पटांगणावर त्यांच्या पालकांकडून piping out करवून घेतील. पण तू मात्र उंच व्यासपीठावर मध्यभागी उभं राहायचं आहेस. सगळे प्रमुख अतिथी तिथेच असतील. जनरल पट्टाभिरामन ,मिसेस लक्ष्मी आणि तुझे पालक असे मिळून तुझ्या खांद्यावर तारे चमकवतील. आता ठीक ना?” माझा जीव भांड्यात पडला. मी आनंदाने किंचित स्मित करून ‘thanks a lot sir’ म्हणत त्यांना सल्युट करून पसार झाले. अजूनही त्या गोष्टीचं गांभीर्य मला कळलं नव्हतं!
PoP(परेड)ची पहाट उजाडली. रात्री खरं तर झोपलोच नव्हतो आम्ही! नखशिखांत तयार झालो. पहाटेच्या त्या अंधारातच शस्त्रागारातून आपापली रायफल उचलून ‘परमेश्वरन्’ ड्रिलमैदानाकडे धावलो. बुटांना खालून मारलेले खिळे आज अधिकच कडक आवाज करत होते. कार्यक्रम सुरू झाला. प्रचंड मोठा दरवाजा उघडला, आम्ही मैदानावर प्रवेश केला. समोर आम्हाला बघण्यासाठी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल पट्टाभिरामन एका ओपन जीपमध्ये उभे राहिले होते. संपूर्ण मैदानावर त्यांची गाडी शिस्तीत फिरत होती. केवढं रुबाबदार व्यक्तिमत्त्व! त्याउलट आम्ही मुलं मुली मात्र ट्रेनिंगमुळे अतिशय बारीक आणि खुद्द आमच्या पालकांनाही ओळखायला न येण्याइतके वेगळे दिसत होतो!
आमची परेड शानदार झाली! ‘अंतिम पग’ म्हणजे शेवटचं पाऊल टाकत मैदानाबाहेर पडण्याचा क्षण- प्रत्येकासाठी खूपच हळवा! तो होताच सुसाट पळत सुटलो, रायफल परत केली. केबिनमध्ये जाऊन आम्हाला दिला गेलेला ‘खरा’ युनिफॉर्म घातला आणि piping out साठी मला सांगितलेल्या ठिकाणी मी पोहोचले. आई बाबाही तिथे आले,टेंशन होतंच त्यांनाही जरा.नेमकं काय करायचं ते समजणं कठीण होतं. माझं हृदय प्रचंड धडधडत होतं. साक्षात् जनरलना आता भेटणार होते मी!
लेफ्ट. जनरल पट्टाभिरामन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिसेस लक्ष्मी तिथे आल्या. किती साध्या होत्या त्या! आईशी त्या प्रेमाने बोलल्या. तिला मोठाच धीर मिळाला. सरांनी बाबांना आनंदाने shake hand केलं आणि आईला नम्रपणे अभिवादन केलं! काय क्षण होता तो! सैन्याचा एक तेजस्वी जनरल किती नम्र,प्रेमळ असू शकतो! एकीकडे ते आणि बाबा तर दुसरीकडे आई आणि लक्ष्मी मॅडम असे उभे राहिले आणि चौघांच्या हातून माझ्या खांद्यावरचे तारे प्रकाशित झाले! टाळ्यांचा आवाज झाला. एका सैन्याधिकाऱ्याचं करावं तसंच – अगदी कडक शेक हँड करून – अत्यंत मानाने - सरांनी माझं अभिनंदन केलं! आईबाबांचंही अभिनंदन केलं. ते दोघांना म्हणाले, “ही आता आपल्या प्रतिष्ठित युनिटची ऑफिसर झाली आहे! आज तिचं स्वागत करतांना मला खूप आनंद होत आहे.” ते आणि मी आता एका कुटुंबाचा भाग झालो हा विचारच प्रचंड अभिमानास्पद होता! हेच तर वर्दीचं वैशिष्ट्य!
एक जनरल आणि त्यांची पत्नी एवढ्या साधेपणाने आमच्याशी बोलत होते यावर विश्वास बसत नव्हता!आईचे डोळे सारखे पाणावत होते. तिला काहीही बोलायचं सुचत नव्हतं. धाकटा भाऊ रामानंद हे सगळं कॅमेऱ्यात टिपून घेत होता. सभोवती इतर VIPs, मीडिया...आणि सगळ्यांच्या नजरा आमच्यावर! त्यावेळी मला काय वाटत होतं ही सांगण्याची नव्हेच, केवळ अनुभवण्याचीच गोष्ट! OTA म्हणजे आमच्या अकॅडमीच्या स्मरणपत्रिकेत सुद्धा माझा असा फोटो छापण्यात आला नंतर. I was the luckiest one! हे भारावलेले क्षण कायमचे हृदयावर कोरले गेले.
मी युनिटमध्ये रुजू झाल्यावर काही दिवसातच लेफ्ट. जनरल पट्टाभिरामन सर आणि मॅडम यांची एका मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेट झाली. त्यांच्याबरोबर बसून जेवण्याचाही सुंदर योग आला. केवळ अविस्मरणीय!
आधी भारतीय लष्कराच्या सगळ्यात मोठ्या म्हणजे पश्चिम कमांडचे कमांडरपद भूषवणारे, तसंच बॉम्बे सॅपर्सच्या नेतृत्त्वपदी विराजमान असणारे सर Vice chief of army staff, या उपमुख्यपदापर्यंत पोहोचले होते! या पदापर्यंत पोहोचणारे इंजिनियर विभागाचे ते पहिलेच अधिकारी होते. ते ‘आमचे’ आहेत हा केवढा अभिमान आम्हाला!त्यावर्षीच म्हणजे डिसेंबर २००६ मध्ये सर निवृत्त झाले तरी त्यांच्याविषयी एकेक भूषणास्पद बातमी कानावर पडत राहिली. अशा एकेक धुरंधर अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि मीही सैन्याच्या विश्वात रुळले! लवकरच आमचा ‘मिशन काश्मीर’ हा अध्याय सुरू झाला. पुढची तीन वर्षं माझ्यासाठी अथक मेहनतीची,मला leader म्हणून घडवणारी आणि आयुष्यभराची शिकवण देणारी ठरली!
लेफ्टनंट जनरल पट्टाभिरामन यांनी दूरदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेत भारतीय सैन्याचं भविष्य घडवलं. नेत्रदीपक अशा त्यांच्या एकूण कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेल्या पराक्रमासाठी आणि अद्वितीय नेतृत्वासाठी त्यांना ‘परम विशिष्ट सेवा मेडल’, ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’, ‘सेना मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ अशा चार मुख्य आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
निवृत्तीनंतर सरांनी लष्करी सशस्त्र सेना न्यायाधीकरणात मोलाचं योगदान दिलं. विचारांची स्पष्टता, परखड मत मांडणारी वाणी तरीही संवेदनशील स्वभाव! निवृत्त अधिकाऱ्यांना,सैनिकांना मार्गदर्शन असो वा कोणतीही मदत करण्यासाठी – हा आमचा नेता सगळ्यांसाठी सदैव, सहज उपलब्ध होता!
आज या आठवणी लिहिण्याचं कारण म्हणजे नुकताच, २६ एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी विलिंग्टन इथे लेफ्टनंट जनरल पट्टाभिरामन सरांनी शेवटचा श्वास घेतला. ‘a soldier by heart and a leader by soul’ याचं मूर्तिमंत उदाहरण असलेला हा पराक्रमी नेता भारताच्या लष्करी इतिहासात खरोखर ‘soldiers’ General’ म्हणून आपला कायमचा ठसा उमटवून गेला. खंबीर नेतृत्त्व, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्याप्रती अत्युच्च कोटीतल्या समर्पणाचा वारसा मागे ठेऊन सर तुम्ही मार्गस्थ झालात!तुमच्या अत्यंत प्रेरक भेटी,आठवणी आमची वाट सदैव उजळत रहातील. आमचा माथा सदैव उन्नत ठेवतील.
तिरंग्यात लपेटलेला तुमचा देह बघून काय वाटलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.ते काम डोळे करत होते. घरातल्या वडील माणसाला द्यावा अगदी तसाच युनिटच्या आम्ही सगळ्यांनी आणि संपूर्ण भारतीय सेनेने तुम्हाला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप दिला. तुम्हाला सद्गती लाभो अशी प्रार्थना मनापासून केली पण त्याच वेळी आम्हाला हेही वाटून गेलं की पुढचा जन्म मिळालाच तर तो भारतीय सैन्याची वर्दी घालण्यासाठी मिळो आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचाच हात डोक्यावरती लाभो! नेहमीसारखा तुम्हाला कडक सल्युट!जय हिंद सर!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)



Comments
Post a Comment