निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही
Every
next level of life will demand a different version you....याचा
अनेकदा प्रत्यय येतो. जीवन म्हणजे एकाच मार्गाने पुढे जाणारं चाकोरीबद्ध यंत्र
नसून, अनेक गोष्टींना कवेत घेत, सहस्त्रधारांनी पुढे जाणारा तो चैतन्यदायी, खळाळता प्रवाह आहे! हे अनुभवण्यासाठी आपण निराशेची कात
टाकत, प्रत्येक टप्प्यावर नित्यनूतन होऊन
त्याला सामोरं गेलं तर जगण्यातली मजा
वाढते! आपल्या आयुष्याचा आलेख समजून घेत,त्यात नव्याने झालेल्या बदलांची नोंद घेत,
त्या त्या आव्हानांसाठी मोकळेपणाने स्वतःची तयारी करत पुढे गेलो तर आयुष्य बरंच
सोपं,सहज आणि सुंदर होत जातं असा माझा अनुभव आहे. मग तो मातृत्त्वाचा टप्पा असो वा
शरीराच्या दुखापती जिद्दीने भरून काढण्याचा, डोळसपणे त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न
खूपकाही देऊन गेला, मुख्य म्हणजे आत्मविश्वास! आज इतर विषय सोडून अचानक हे
तत्त्वज्ञान आठवण्याचं किंवा स्वतःविषयी काही सांगण्याचं कारण म्हणजे ‘निरामय
आरोग्यवर्धिनी’ जीवनशैलीचा नुकताच झालेला परीसस्पर्श!
‘Age is just a number’ असं कितीही म्हंटलं, तरी
त्या त्या वयाच्या टप्प्यावर शरीर त्याच्याकडे लक्षं द्यायला आपल्याला भाग पाडतं.
वैभव आणि मी दोघंही, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये फिरत,कधी एकत्र तर कधी वेगळं
रहात, दोन मुलींना वाढवत,आपापलं काम करत असताना प्रत्येक जागी वेगळं हवामान, भिन्न
भाषा आणि खानपान, लोकांची वेगळी मानसिकता यांच्याशी सहज जुळवून घेत आलो आहोत. मी
आर्मीमधून बाहेर पडल्यानंतरची आव्हानं तशी कठीणच होती. तरी जरा विचारपूर्वक life
re-compass केल्याने प्राधान्यक्रम बऱ्यापैकी स्पष्ट
होत गेला. मागच्या वर्षी पुन्हा शिफ्टिंग आणि पुन्हा नवीन सुरुवात झाली! वैभवसाठी
मुंबईमधली लांबच लांब अंतरं, भारत आणि भारताबाहेर
वाढलेला प्रवास, माझं ‘पसरत’ चाललेलं काम (आणि distractions
सुद्धा!),वाढत्या मुलींमागे सुरू असलेली रोजची धावपळ, हे सगळं करताना, या वळणावर आपल्या जीवनशैलीत नेमके कोणत्या
सुधारणा कराव्यात असा मुद्दा वारंवार मनात येऊ लागला. त्यातच उत्सुकता म्हणून
फेसबुक मित्र असलेल्या राहुल करूरकर सरांचं
‘निरामय आरोग्यवर्धिनी’ हे पुस्तक मागवून
ते वाचलं. पुस्तक मनापासून आवडलं आणि आम्ही दोघांनी होईल तेवढं
प्रामाणिकपणे त्यांचा online कोर्स करायचं ठरवलं.
कालावधीच्या दृष्टीने छोट्या, सोप्या पण मोठा परिणाम साधणाऱ्या या प्रवासाविषयी इथे
काही शेअर करावं असं मनापासून वाटलं.
‘शरीराच्या वजनापलिकडील आरोग्य’ अशा
संकल्पनेवर आधारित, मानवी जीवनाच्या सगळ्या बाजूंना स्पर्श करणारं हे लेखन आणि हा
कोर्स आहे. त्यात मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य.
मानसिक बदलांशिवाय कोणत्याही शारीरिक सुधारणा घडवून आणणं शक्य नाही. आहार
म्हणजे केवळ पोट भरण्याचं साधन, डाएट म्हणजे प्रोटीन्सचा प्रचंड भडिमार किंवा व्यायाम
म्हणजे केवळ वजन कमी करण्याचं माध्यम असं मानलं तर त्या गोष्टींचा परिणाम खोलवर
आणि चिरस्थायी होत नाही. बऱ्याचदा त्या गोष्टी निष्फळ ठरतात. म्हणून आहार,व्यायाम,झोप
अशा एकेका गोष्टीवर विचार करून त्याच्याशी आपलं व्यक्तिमत्त्व, कामाचं स्वरूप,आपल्या
गरजा आणि आपली आयुष्यातली उद्दिष्टही जोडता आली पाहिजेत, याची जाणीव झाली.
व्यायामाच्या नावाखाली आपण वर्षानुवर्षे त्याच त्या गोष्टी अवलंबत आहोत का,
त्याच्यात वैविध्य असावं का? हवं असेल तर ते नेमकं कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या
पद्धतीने? त्यात मनाची नेमकी भूमिका काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना,
गुरुजींकडून समजून घेताना फार छान वाटलं. आपल्या comfort zone च्या पुढे जाण्याची नितांत गरज असते - हे कळतं, पण
वळत नाही, अशी बहुतेकांची अवस्था होते.
म्हणून सांगावंसं वाटतं की थोडं थांबा... हे सगळं जरा समजून घ्या आणि मग दुप्पट
वेगाने,एकत्र मिळून पुढे चला! जगणं सुंदर आहे!
‘निरामय आरोग्यवर्धिनी’ का कुठला ब्रॅंड
नाही किंवा व्यावसायिक पद्धतीने आखला गेलेला हा कोर्स नाही. सामान्यातली सामान्य
व्यक्ती सुद्धा याच्याशी जोडली जावी हाच हेतु आहे. आपल्या अनुभवांच्या आणि
साधनेच्या आधारे आपण वेचलेले अनुभवांचे कण इतरांच्याही ओंजळीत द्यावेत या विशुद्ध
हेतूने आणि कमालीच्या शिस्तबद्ध पद्धतीने राहुल सर हा कोर्स स्वतःघेतात... तेही
परदेशात राहून! त्यांना स्वेच्छेने मदत
करणारी टीमसुद्धा अत्यंत तत्परतेने सगळ्यांना वैयक्तिक संपर्क करून नेमाने मदत करत
असते. कोर्सच्या दरम्यान सुचवलेल्या बदलांची रीतसर नोंद ठेवली जाते,अडचणी सोडवल्या
जातात. शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी
तर हा करावाच,बऱ्याच गोळ्या कमी होतात असा अनुभव अनेक साधक व्यक्त करतात. पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की प्रत्यक्ष कोणताही
त्रास जाणवत नसताना ‘माझं छान चाललंय,’ असं वाटत असलेल्या व्यक्तींनी देखील, तो
भ्रम आहे की वास्तव हे पडताळून बघण्यासाठी हा कोर्स करावा! कारण मानसिक
अनारोग्याचे परिणाम प्रत्येकाला जाणवतातच असं नाही, मात्र ते साचत जाऊन त्याची
अवस्था गंभीर होऊ शकते. तेव्हा वेळीच त्याकडे लक्षं दिलं पाहिजे. यासाठी फार सहज
आणि सुंदर ‘tools’ या कोर्समधून
मिळाले. ‘वयानुसार शरीराला हे होणारच’, म्हणून अनेक दुखणीही गृहीत धरली जातात. तेही
कसं मिथक आहे, याचीही जाणीव कोर्समधून होते.
अनेकदा ‘हे असंच असतं,माहीत आहे’, यातून बाहेर येण्यासाठी आपण तयार नसतो. ही
विचारांची चाकोरी आपलं खूप नुकसान करते. म्हणून ती मोडणं खूप आवश्यक असतं. त्याचे
सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर, मनावर,नात्यांवर आणि एकूण आयुष्यावर प्रतिबिंबित
होतात. निरोगी अवस्था टिकवून ठेवण्यासाठी,शारीरिक तसंच मानसिक सामर्थ्य वाढवत
नेण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रेरणा लागते. गरज भासेल तेव्हा मोकळेपणाने ती मिळेल
तिथून घ्यावी आणि नंतर स्वयंप्रेरित होऊन ती इतरांना द्यावी देखील!
निरामय आरोग्यवर्धिनी कोर्समध्ये काही तज्ञांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि
सगळ्यांना त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चाही करता आली. मग तो वाढणारा बी पी असो वा बदलणाऱ्या
हार्मोन्सचं थैमान.. हृदयाची क्षमता असो वा पोखरणारा मधुमेह, वयात येणाऱ्या मुलामुलींचं
पालकत्त्वं असो स्त्री आणि पुरुष
दोघांनाही लागणारं स्वतंत्र अवकाश..अनेक वेगळे विषय सुंदर पद्धतीने,प्रेझेंटेशन
स्वरूपात समजावले गेले.माझ्यासारख्या भगवद्गीतेच्या साधकाला हा कोर्स आवडण्याचं
आणखी एक कारण म्हणजे त्याचा सखोल आणि
मूलभूत पाया. कोणत्याही सुधारणांसाठी हा महत्वाचा असतो.
एक गोष्ट इथे नमूद करते, आम्ही दोघांनी आणि इतर साधकांनी अनुभवलेले सकारात्मक परिणाम
यामागे ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ हे प्रमुख सूत्र आहे! हे कोणत्याही कोर्सला
लागू होतंच, इथे तर प्रश्नच नाही. कारण मोठी फीस भरली, आता results हवेत म्हणून अपेक्षा ठेवणं इथे लागूच
होत नाही. त्यासाठी त्याप्रती श्रद्धा,शरण्यता, कृतज्ञता तसंच मोकळ्या मनाने,
स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून स्वतःला परखडपणे सुधारण्याची तळमळ असेल तर ते
ज्ञान भरभरून घेता येतं. ही केवळ सुरुवात आहे,अजून बरंच चालायचं आहे. Miles
to go..! आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे लागणार! या
कोर्समुळे माझ्या झोपेची सुधारलेली गुणवत्ता,व्यायामात आलेलं सातत्य,कमी झालेला
स्क्रीन टाइम, आहाराविषयी सजगता अशा अनेक गोष्टी मला यातून मिळाल्या. या गोष्टी शरीराच्या वजनावर आपसुक प्रतिबिंबित होतात.
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली,सर्वस्पर्शी आणि चिरकाल टिकणाऱ्या जीवनपशैलीची ओळख
करून देणारा, भारतीय विचारसरणीच्या मूलभूत पायावर आधारलेला, नि:स्वार्थी भावनेने,
‘सशक्त कुटुंब – सशक्त समाज’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन, आपल्याला comfort zone च्या बाहेर काढत मनाचं,शरीराचं
सामर्थ्य वाढवण्यासाठी दिशा देणारा सहज-सोपा असा निरामय आरोग्यवर्धिनीचा प्रवास
प्रत्येकाने अनुभवावा असं आवाहन मी करीन. Keep growing together! त्यासाठी शुभेच्छा!
ता.क. – राहुल करूरकर म्हणजे कधी मिश्किल तर कधी सखोल अशा लेखनाच्या स्वरूपात अनुभव
सांगणारे,जवळचे एक मित्र आहेत, या गैरसमजात राहू नये. त्यापालीकडे बरंच काही आहे
बरं! कशाला फोडू उगाच..असू दे!
-
मेजर
मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त)
Comments
Post a Comment