वयम मासिक - राणी अबाक्का महादेवी - शौर्यकथा
बालमित्रांनो, भारताच्या इतिहासातली ही गोष्ट आहे सोळाव्या शतकातली! त्यावेळी आजच्या कर्नाटकातला अखंड दक्षिण कन्नड जिल्ह्याला व्यापणारा आणि त्याच्या सभोवतीचा प्रदेश ‘तुलूनाडू’ या नावानं प्रसिद्ध होता. तुलू भाषा बोलणार्या शूर आणि साहसी लोकांचा हा समृद्ध प्रदेश विजयनगर साम्राज्यात अंतर्भूत होता. इथे मुबलक प्रमाणात होणारे मसाले, कपडा, तांदूळ, औषधी अशा विविध गोष्टींना युरोप आणि इतर अनेक देशांमधे प्रचंड मागणी होती. भारताच्या समुद्र किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराची अनेक केंद्रं होती. यापैकीच एक म्हणजे मंगळुरूजवळ असलेलं उल्लाल हे छोटं बंदर! नेत्रावती आणि गुरुपूरा नद्यांच्या संगमावर वसलेलं हे बंदर लढाईच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वपूर्ण होतं! अशा या उल्लालमधली राणी अबाक्का महादेवी म्हणजे चौटा राजवंशातली शूर वीरांगना! या राणीने व्यापाराच्या आडून सत्ता काबिज करणार्या पोर्तुगिजांना ओळखलं आणि त्यांच्याबरोबर चिवटपणे लढा दिला.
पोर्तुगिजांचा भारतात प्रवेश
१४९८ साली पोर्तुगालचा वास्को-द-गामा समुद्री मार्गाने भारतात
शिरला आणि भारतीय इतिहासाने अत्यंत वेगळं वळण घेतलं! इथल्या व्यापारावर वर्चस्व
मिळवण्यासाठी पोर्तुगिजांनी बघता बघता भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा ताबा घेतला. तिथे
भरपूर किल्लेही बांधले! इथे येऊन इथल्याच लोकांसाठी पोर्तुगिजांनी स्वत:चे कायदे
केले त्यांच्या परवान्याशिवाय (permit) इतरांना समुद्रमार्गात प्रवेश बंद केला. चक्क no entry!
अब्बाक्काची जडण घडण
तिरूमल राय (तिसरा)नावाचा राजा १५१० साली उल्लाल संस्थानाच्या गादीवर बसला. त्याची बहिण हिरिया अब्बाक्का. ‘हिरिया’
म्हणजे ज्येष्ठ किंवा मोठी. या धाडसी हिरिया अब्बाक्काची पराक्रमी मुलगी म्हणजे
महादेवी अब्बाक्का! त्यावेळी त्यांच्याकडे मातृवंशीय (आलिया संथाना कट्टू) पद्धती
होती. म्हणजे वारसा हक्क राजाच्या बहिणीकडून पुढे जात असे. म्हणून आई हिरिया अब्बाक्का
आणि मामा तिरूमल राय यांच्या मार्गदर्शनाखाली अब्बाक्का महादेवी धडे गिरवू लागली. विलक्षण
धाडसी,
बुद्धिमान आणि तेजस्वी अशी ही मुलगी
युद्धनीती,
धनुर्विद्या, तलवार बाजी, नियुद्ध, साहसी खेळ अशा अनेक गोष्टी
शिकून समर्थ युवती झाली.
राणी अब्बाक्काचं प्रशासन आणि नौदलाची
उभारणी
इ. स. १५४४ साली अब्बाक्का महादेवीचा रीतसर
राज्याभिषेक सोहळा झाला! तिने प्रशासनावर आपलं लक्षं केन्द्रित करत प्रजाकल्याणाची
अनेक कामं हातात घेतली, व्यापार वृद्धिंगत केला. पोर्तुगिजांना न जुमानता, इंच इंच भूमी स्वतंत्र
ठेवण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तिच्या धाडसी निर्णयांमुळे
प्रजेकडून तिला ‘अभया राणी’ अशी उपाधी मिळाली- अशी राणी जिला भीती माहीतच नव्हती! राणी अबाक्काने मुख्यत: कोळी समाजाला संघटित
करून मोठं नौदल उभारलं.राणी अबाक्काच्या प्रशासन यंत्रणेत तसंच सैन्यात अनेक
धर्मांचे, पंथांचे
लोक समाविष्ट होते. याचप्रकारे प्रजा सुद्धा गुण्या गोविंदाने नांदत होती. प्रजेमध्ये
स्वातंत्र्याची आस जागी झाली आणि परकियांसमोर ते ताठ कण्याने जगू लागले!
अॅडमिरल सिल्वेरिया याच्याशी अब्बाक्काचा
सामना
गोवा जिंकून पोर्तुगिजांनी तिथे त्यांचं मोठं
प्रशासकीय तसंच लष्कराचं केंद्र बनवलं. भारतीय राजांकडून मोठी खंडणी वसूल करायला
सुरुवात केली. राणी अब्बाक्काने मात्र पोर्तुगिजांना खंडणी देण्यासाठी स्पष्ट नकार
दिला, त्यांचे
नियमही झुगारून लावले. आमच्या भूमीवर रहाण्यासाठी आम्ही परकियांना खंडणी द्यायची? कशासाठी? पोर्तुगिजांना याची प्रचंड चीड आली. १५५६ सालची
ही घटना. अॅडमिरल डॉम अलवारो-द-सिल्वेरिया
हा पोर्तुगीज अधिकारी मोठ्या सैन्यानिशी
तब्बल २१ युद्धनौका घेऊन राणीवर आक्रमण करण्यासाठी निघाला. या क्रूर अधिकाऱ्याने उल्लालकडे
येताना मंगळुरू शहर उध्वस्त केलं. राणीने इकडे कॅलिकत इथला राजा झामोरीन याच्याशी
युती करून आपली सैन्यशक्ती वाढवली. अखेरीस तिने उन्मत्त अशा त्या अॅडमिरलला तहाची
भाषा बोलण्यासाठी भाग पाडलं!
तालिकोटची ऐतिहासिक लढाई
१५६५ मध्ये चार
मोठ्या सुल्तानी शक्तींनी मिळून आक्रमण
करत विजयनगरचं मोठं वैभवशाली साम्राज्य लुटलं. तिथे ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रचंड
विध्वंस केला. हीच दक्षिण भारताच्या इतिहासातली प्रचंड मोठी अशी तालिकोटची लढाई! यात
राजा रामराया मारला गेला, त्यामुळे पोर्तुगिजांसारख्या परकीय शक्ती प्रबळ झाल्या. याचा
दुष्परिणाम उल्लालसारख्या अनेक राज्यांवर झाला.
पोर्तुगिजांशी कडी टक्कर
राणी अब्बाक्काचा बीमोड करण्याच्या हेतूने १५६७ मध्ये
पोर्तुगीज जनरल पिक्सोटो याने प्रचंड मोठ्या तीन शिडांच्या युद्धांनौकांचा ताफा (gallons) आणि इतर युद्धसामग्री घेऊन उल्लालवर
मोठं आक्रमण केलं. इतर कोणाचीही मदत राणीला मिळू नये याची खबरदारी त्याने
घेतली. फितुरांच्या सहाय्याने अत्यंत
बेसावध वेळी हल्ला करून त्याने थेट राणीच्या महालावर ताबा मिळवला. सतर्क असलेली राणी
चपळाईने तिथून बाहेर पडली आणि तिने एके ठिकाणी आश्रय घेतला.
रातोरात गुप्त रीतीने २०० हून अधिक सैन्य एकत्र करून सशस्त्र
राणी सैन्याचं नेतृत्त्व करत सरसावली. तिने पिक्सोटो याच्यावर जोरदार प्रतिहल्ला
चढवला. सत्तरेक पोर्तुगिजांना एका झटक्यात नामोहरम केलं! यात खुद्द पिक्सोटो आणि इतर अनेक
पोर्तुगिज अधिकारी मारले गेले! राणी अबाक्काचं रौद्ररूप पाहून पोर्तुगीज सैन्य जीव
वाचवण्यासाठी अक्षरशः पळत सुटलं. राणीने पुन्हा उल्लालवर स्वतःचं वर्चस्व
प्रस्थापित केलं.
अंतिम आक्रमण
राणी अब्बाक्काच्या अनपेक्षित प्रती हल्ल्याने संतप्त
होऊन ३००० सशस्त्र सैनिक, प्रचंड युद्धासामग्री आणि मोठ्या युद्धनौका घेऊन पोर्तुगीज व्हॉईसरॉय डॉम
अंताओ-द-नोरोन्हा गोव्यावरून निघाला. पण तो पोचण्याआधीच राणी अबाक्कानं ६,००० कोळयांच्या साथीने मंगळुरूच्या किल्ल्यावर
आक्रमण केलं, ज्यात पोर्तुगीज सैन्यासह त्यांचा अधिकारी डॉम
फ्रान्सिस्को मॅस्करेन्हास हाही मारला गेला. पोर्तुगिजांना मंगळुरूवरचा ताबा सोडावा
लागला. पोर्तुगिजांच्या बलाढ्य शक्तीला आणखीन एक मोठा हादरा राणीने दिला!आता मात्र शत्रू अक्षरशः चवताळला.
एका पहाटे देवदर्शनावरून परतणार्या राणीला
पोर्तुगिजांनी रस्त्यात गाठलं. तरी अखंड सावध असणार्या राणीने क्षणाचाही विलंब न लावता कमरेची तलवार उपसून
विजेच्या चपळाईने घोडा पळवत स्वत:ची सुटका
केली. तिने सैन्यालाही सावध केलं. राणी
आबाक्का महादेवी शर्थीने लढली.अनेक पोर्तुगीज मारले गेले. मात्र अखेरीस राणीला
पोर्तुगिजांनी पकडलं. त्यांच्याशी अथक लढतांना ही वीरांगना धारातीर्थी पडली.
राणीला मानवंदना देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलात IPV (Inshore Patrol Vessels) या तंत्रज्ञानाची एक नौका २० जानेवारी २०१२ रोजी विशाखापट्टणम बंदरात
कमिशन करण्यात आली – ICGS राणी अबाक्का! कर्नाटकात यक्षगान या नाट्यप्रकारातून, पदादना या गौरवगीतांतून, पारंपारिक नृत्यांमधून आणि इतर अनेक
कलाकृतींमधून तिची दिव्य गाथा आजही कथन केली जाते. तिचे मोठे पुतळेही आपल्याला
बंगळुरू तसंच उल्लाल मध्ये पहायला मिळतात! राणी दर्शनासाठी जिथे नित्यनेमाने जात असे
ते सोमेश्वर मंदिर आणि त्याभोवती असलेल्या राणीपुर्यात तिच्या महालाचे अवशेष आजही
आपल्याला उल्लालमध्ये बघता येतात! शौर्याची ही परंपरा इथेच थांबली नाही...! तिच्या
वंशज राण्यांनीही इथे सुशासन प्रस्थापित करत पोर्तुगिजांशी लढा सुरू ठेवला.राणी
अब्बाक्का चिरंतन प्रेरणा होऊन उल्लाल आणि भारताच्या इतिहासात अमर झाली!
-
मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)
(mohinigarge@gmail.com)
Comments
Post a Comment