एकत्र प्रवास - विवेक आणि वैराग्याचा !
३१ में १८९३ ची पहाट. SS Empress of India नावाचं भव्य जहाज जपानच्या योकोहामा बंदारातून कॅनडाच्या दिशेनं रवाना झालं. ही जहाजाची फेरी भारताचं भविष्य घडवणार्या दोन द्रष्ट्या नेत्यांच्या भेटीमुळे ऐतिहासिक ठरली. एक होता हिंदू धर्माची पताका सर्वदूर फडकवण्यासाठी निघालेला ३० वर्षांचा तरूण संन्यासी अर्थात् स्वामी विवेकानंद आणि दुसरा होता भारताच्या औद्योगिक भरभराटीची पायाभरणी करणारा मोठा उद्योगपती म्हणजेच जमशेदजी टाटा! जवळपास ७७० माणसं या जहाजात सामावली होती. पण साक्षात् वैराग्य आणि विज्ञानाला बसवून नेणार्या या जहाजाला जणू फक्त लाटा मागे सोडायच्या नव्हत्या तर मागे सोडायची होती दुर्बलता....पारतंत्र्य आणि अज्ञान! आणि उभं करायचं होतं सामर्थ्यशाली शीड ज्यात हवा भरून भारत पुन्हा एकदा सिद्ध होणार होता, त्याचा तेजस्वी ज्ञानप्रकाश विश्वभरात पसरवण्यासाठी!
तेव्हा फारसे प्रसिद्ध नसलेले विवेकानंद सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत हिंदुस्थानाचं प्रतिंनिधित्त्व करण्यासाठी मार्गस्थ झाले होते. जवळ कोणतीही भौतिक संपदा नसतांना हा भटकणारा संन्यासी अद्वितीय आत्मविश्वासानं राष्ट्रांच्या आध्यात्मिक ऐक्याचा उदात्त विचार जगासमोर मांडणार होता. तर जमशेदजी निघाले होते ख्रिस्तोफर कोलंबसाच्या ४०० व्या जयंतींनिमित्त भरवण्यांत आलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी. जपाननं विज्ञान,तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात केलेली प्रगती याकाळात भारावून टाकणारी होती. ती प्रत्यक्ष बघायला ते नेहमीच उत्सुक असत. या प्रवासासाठी १०-१२ दिवस लागणार होते. त्यामुळे जणू नियतीनंच ही भेट घडवून आणली होती. नव्या दिशांना गवसणी घालणारे, भारताच्या सशक्तीकरणासाठी आपापल्या मार्गानं अहोरात्र झटणारे दोन अस्वस्थ नेते इथेच,या जहाजावर एकमेकांना भेटले!
त्यांच्यात घडलेल्या चर्चेत स्वामी विवेकानंदांनी ठिकठिकाणी केलेला प्रवास, ब्रिटिशांकडून हिंदुस्थानात सुरू असलेली दडपशाही, नुकत्याच चीनच्या सीमेवर त्यांना सापडलेल्या संस्कृत आणि बंगाली संहिता अशा काही विषयांवर चर्चा केली. भारताच्या आध्यात्मिक शक्तीच्या जागरणाची मनीषा त्यांनी व्यक्त केली. जमशेदजींनी जपानला जाण्याच्या प्रयोजनाबरोबरच भारताच्या औद्योगिक विकासाची इच्छा प्रकर्षानं बोलून दाखवली. तेव्हा एक खूप व्यापक आणि महत्त्वाचा विचार या ठिकाणी विवेकानंदांनी मांडला – ‘आपण पश्चिमेकडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धींची भारतातली ज्ञानसाधना आणि मानवतेशी सांगड घातली तर केवढी मोठी गोष्ट साध्य होईल!’
विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वानं, त्यांच्या दूरदृष्टीनं जमशेदजी अत्यंत भारावून गेले. पुढे भगिनी निवेदितांशी संवाद साधतांना ते असंही म्हणाले की ‘स्वामी विवेकानंद आणि भगवान बुद्ध यांच्यात जाणवलेल्या साम्यामुळे जपानमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात होतं!’
अमेरिका, इंग्लंड आणि एकूण युरोपमध्ये आपल्या आध्यात्मिक विचारांचा परिमळ पसरवून स्वामी विवेकानंद १८९७ साली भारतात आले. भारतात त्यांचं मोठं स्वागत झालं. त्यांनी कलकत्त्यात रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी उंचावलेली भारताची धर्मपताका म्हणजे पुनरुत्थानाची नांदीच होती. याच काळात जमशेदजी एक मोठी विज्ञानाधिष्ठित संस्था उभारण्याची योजना आखत होते. त्याचा प्रचार करून त्यासाठी निधीही संकलित करत होते.
२३ नोव्हेंबर १८९८ रोजी जमशेदजींनी स्वामींना एक पत्र लिहिलं. अत्यंत नम्रपणे ते सुरू करतात, “ जपान मधून शिकागोला जातांनाच्या प्रवासातला एक सह-प्रवासी म्हणून मी तुम्हाला आठवत असेल असा विश्वास वाटतो. भारतात एक मोठं अनुसंधान केंद्र उभं करण्याची माझी योजना तुमच्या कानावर आलीच असेल. त्याच संदर्भात ‘भारताची वैराग्य(आध्यात्मिक) शक्ती जागी करून तिला राष्ट्रोपयोगी गोष्टींसाठी वळवलं पाहिजे’ हा तुमचा विचार मला प्रामुख्यानं आठवला. मला वाटतं आध्यात्मिक शक्तीच्या उपासकांसाठी एक जागा बांधली पाहिजे. इथे वास्तव्य करत नैसर्गिक आणि मानवतावादी विज्ञान जोपासण्याचं कार्य ते करतील. मला वाटतं हा प्रकल्प एखाद्या सक्षम नेत्यानं हाती घेतला, तर वैराग्यशक्ती, विज्ञान आणि संपूर्ण देशाच्या हितासाठी याची खूप मदत होईल. या मोहिमेचं नेतृत्त्व करण्यासाठी स्वामी विवेकानंदांशिवाय (तुमच्याशिवाय)दुसरी कोणतीही व्यक्ती मला दिसत नाही. या दृष्टीनं आपल्या प्राचीन परंपरांद्वारे जीवनात नवचैतन्य आणण्यासाठीच्या या प्रकल्पात येण्यासाठी तुमचं मत काय? या मोहिमेबद्दल लोकांना उत्साह वाटावा म्हणून आवाहन करणारं पत्रक काढून तुम्ही याची सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे.”
जमशेदजींनी त्याकाळात ३० लाख रुपये एवढी मोठी रक्कम या प्रकल्पासाठी देऊ केली होती. त्यांची सर्वत्र प्रशंसा होत होती, तरी लॉर्ड कर्झन यानं अनेक शंका दाखवून त्यात मोडता घातला. याचा समाचार घेत स्वामींनी टाटांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
स्वामी विवेकानंदांचं कार्य प्रामुख्यानं आध्यात्मिक क्षेत्रात असलं तरी भारतातलं दारिद्र्य,उपासमार थांबून तिथे आर्थिक सुबत्ता नांदावी असं त्यांनाही वाटत होतं. त्यासाठी आधुनिकतेची कास धरावी लागणार याचीही त्यांना कल्पना होती. म्हणूनच टाटांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एप्रिल १८९९ च्या ‘प्रबुद्ध भारत’ या नियत कालिकाच्या अंकात स्वामीजींचे विचार छापून आले, “श्री. टाटा यांच्या पदव्युत्तर संशोधन विद्यापीठाइतका सुयोग्य आणि दूरगामी परिणाम असलेला दुसरा प्रकल्प माझ्या ऐकिवात नाही. आपल्या राष्ट्राहिताच्या आड येणार्या महत्त्वाच्या मुद्यांवर ही मोहीम पारदर्शी दृष्टीनं काम करेल. या मोहिमेबद्दल केलेल्या घोषणेतूनच भारताच्या जनतेला दिलेल्या या अनुपम भेटीचं स्वरूप व्यक्त होतं. श्री. टाटांची ही मोहीम भारतीयांना नैसर्गिक ज्ञान (विज्ञान) प्राप्त करून देण्यासाठी नवी वाट निर्माण करेल. ७४ लाख एवढी रक्कम यासाठी लागणार असा अंदाज असल्यानं काहींच्या मते हा प्रकल्प अशक्य कोटीतला आहे. या शंकेला माझं उत्तर असं – जर एक माणूस, तो इथला सगळ्यांत श्रीमंत माणूस आहे असंही नाही, ३० लाख एवढी मोठी रक्कम देऊ या प्रकल्पासाठी देऊ शकतो तर संपूर्ण देश मिळून उरलेली रक्कम उभी करू शकत नाही?
आम्ही पुनरुच्चार करतो : अधुनिक भारतात संपूर्ण राष्ट्राच्या हितासाठी यापेक्षा अधिक परिणामकारक कल्पना दुसरी नाही. त्यामुळे त्या त्या वर्गाचं किंवा पंथाचं मर्यादित हित न बघता संपूर्ण राष्ट्रानं एक होऊन हा प्रकल्प यशस्वी करावा.” केवढा सकारात्मक प्रतिसाद स्वामी विवेकानंदांनी दिला!
या प्रेरणेतून टाटांच्या पायाभूत प्रयत्नांनी इ.स. १९११ मध्ये बंगलोर इथे ‘Indian Institute of Science’ ची स्थापना झाली. ही संस्था आणि तिचं कार्य भारतासाठी अभिमानास्पद आहे. परंतु दुर्दैवानं स्वामी विवेकानंद १९०२ साली तर जमशेदजी १९०४ साली इहलोक सोडून गेले होते. त्यांचा ध्यास, त्यांची दूरदृष्टी अलौकिक होती. भारतात यांचं योगदान कायम स्मरलं जाईल.
कुठेही तुलना करण्याचा हेतु नाही परंतु किती भारावलेली घटना आहे ही भारताच्या इतिहासातली! दोन द्रष्टे नेते एकत्र येऊन एकमेकांचे विचार जाणून घेतात...आपला मार्ग वेगळा तरी आपलं उद्दिष्ट एकच आहे हे जाणवल्यावर एकमेकांची प्रशंसा करतात…मोकळेपणानं एकमेकांना मदत करतात! परस्परातल्या क्षुद्र भेदांना कुरवाळत त्याचं उदात्तीकरण करणार्या आजच्या समाजानं हा इतिहास समजून घेतला पाहिजे. आपण चालतो त्या वाटा निरनिराळ्या असल्या, तरी त्यातले भेद न शोधता साम्य शोधून पुढे गेलं पाहिजे. कारण साध्य एकच आहे! मतभेद असले तरी परस्परांच्या योगदानाचा आदर आपल्या मनी असलाच पाहिजे. तरंच या थोर लोकांचा वारसा सांगण्याचा अधिकार आपल्याला असेल! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ©
संदर्भ – Tata stories; Harish Bhat, Penguin business,2021
Comments
Post a Comment