Longewala post
"Here we drew a line in blood across the desert. A line the enemy dare not cross." असं सांगणारी भारताची वाळवंटातली सीमारेषा बघण्यात,अनुभवण्यात आली, नुकत्याच झालेल्या जैसलमेरची ट्रीपमध्ये. राजस्थानच्या वाळवंटात जाण्याचा, तिथे रहाण्याचा अनुभव फार वेगळा आहे. या आधी तासन् तास सलग drive करून उदयपूर, चित्तोडगड, कुंभलगड,जोधपूर अशी राजस्थानमधली अनेक शहरं आणि किल्ले बघितले आहेत. पण प्रत्यक्ष वाळवंटातली ही trip विशेष होती.
खरंतर या सीमेनं इतिहासातली अनेक आक्रमणं पहिली आहेत.पण १९७१ च्या विजयाचा हा प्रदेश विशेष साक्षीदार आहे. म्हणूनच तिथे भेट दिलेल्या दोन युद्धस्मारकांबद्दल आवर्जून सांगण्यासारखं आहे. एक म्हणजे प्रत्यक्ष जैसलमर इथलं war museum. अतिशय रेखीव अशा या सुंदर संग्रहालयात आधी एक short film दाखवली गेली, त्यातून आपल्या मनात या स्थळाबद्दलची पार्श्वभूमी निश्चितच तयार होते. त्याबरोबरच पुढे अनेक models, सचित्र charts मधून भारतीय लष्कराचा इतिहास आणि विविध युद्धमोहिमांची माहिती परिणामकारक रित्या दाखवली आहे. कळस गाठणारा चित्तथरारक क्षण म्हणजे संध्याकाळी अंधार पडताच इथे मोकळ्या परिसरात खुर्च्या टाकल्या गेल्या आणि light and sound show सुरू झाला. परिसराच्या मध्यभागी स्थापन केलेलं मोठं bayonet (रायफलवर बसवलेली संगीन)प्रकाशझोत टाकल्यानं डोळ्यात भरलं आणि अचानक बोलू लागलं. आपलं मनोगत व्यक्त करत आपल्याला १९७१ च्या युद्धाची कथाच त्यानं सुरू केली. तेव्हाच्या आक्रमणाची चाहूल, अधिकाऱ्यांमधलं फोनवरचं संभाषण, बंदुकांची चकमक, पार पडलेली Army आणि Air force ची संयुक्त कारवाई आणि अखेरीस अत्यंत बिकट परिस्थितीत आपण शौर्यानं खेचून आणलेला विजय! हे सगळं डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभं राहिलं...अगदी थेट आतपर्यंत पोहोचलं. गहिवर आणणाऱ्या एकेक वीरगाथा यातून उलगडल्या गेल्या. आपल्याला इथेच जैसलमेरचं खरं माहात्म्य कळतं. शेवटी भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी भारावून टाकणारा हा अनुभव मुलांना द्यावाच!
१९७१ साली झालेल्या भारत – पाक युद्धातली अत्यंत महत्त्वाची म्हणजे लॉन्गेवाला इथे ४-५ डिसेंबर दरम्यान झालेली भीषण लढाई. अचानक झालेल्या पाकच्या आक्रमणाला अतिशय कमी संख्येनिशी मेजर कुलदीप सिंह चांदपुरी(महावीरचक्र) यांनी सैनिकांसह ज्या धैर्यानं तोंड दिलं..अथक लढत पाकिस्तानी सैन्याला पराजित केलं.या विजयाची साक्ष म्हणजे लॉन्गेवाला इथलं युद्धस्मारक! (या लढाईवरच बॉर्डर हा हिन्दी सिनेमा तयार केलेला आहे.)इथे दाखवण्यात आलेली short film, वेगवेगळी bunkers, ताब्यात घेतलेले पाकिस्तानचे खाली वळवून ठेवलेले रणगाडे, इतर models अशा अनेक गोष्टी आवर्जून बघण्यासारख्या आहेत. तेव्हाची सामरिक परिस्थिति समजावून सांगण्यासाठी अप्रतिम असे sand models तयार केलेले आहेत. पुन्हा पुन्हा salute करावा असा हा इतिहास आहे. जैसलमेरपासून साधारण एकशे पंचवीस किलोमीटर्सवर असणाऱ्या या युद्धस्थळाला भेट देऊन खरंच फार समाधान वाटतं.आपण नतमस्तक होतो.
इथून पुढे आणखी एक चित्तथरारक अनुभव म्हणजे तनोतमार्गे थेट भारत – पाक सीमेवर जाणं. BSF द्वारे तनोत माता मंदिरात तिथून सीमेवर जाण्यासाठी निवडक नागरिकांना formality पूर्ण करून passes तयार करून दिले जातात ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. लांबच लांब रस्ता, भोवती पसरलेलं अथांग वाळवंट, मुक्त विहार करणारे उंट आणि त्यांची बच्चे कंपनी, हरणं, घोरपडीसारखे मोठे प्राणी, झुंडीनं फिरणारे मुंगूस हे सगळं अफाट सुंदर आहे. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळपासून सुरू होणारी बोचरी थंडी याचं फारच वेगळं मिश्रण वाळवंटात अनुभवायला मिळतं.
याच परिवारातली असल्यानं अर्थातच अगदी थेट पुढे जाण्याची संधी मिळाली. जमा झालेली गर्दी मागे पडली आणि पुढचा निर्मनुष्य परिसर सुरू झाला, चालत जाणारे आम्ही चौघेच! वाऱ्याचा घोंगावणारा आवाज ऐकू येत होता. समोर बांधलेली सीमारेषा अधिकाधिक स्पष्ट दिसत होती. तिथला पहारेकरी सैनिक हिंदीत समजावून सांगत होता – “समोर...त्या तिथे पाकिस्तानचं तळ आहे, ती तिथे त्यांची आणखीन एक चौकी आहे...!” त्याच्या अगदी ओळखीच्या हिन्दी लकबीवरून मी बिनधास्त विचारलं, “ तुम्ही कुठले?” त्यावर तो उत्तरला “मी नाशिकचा सर!”, “मी Bombay sappers ची”, मी सांगितलं. खूपच छान वाटलं! डोळ्यात तेल घालून सीमारेषा जपणारे हे सैनिक, मोठ्या बुरुजावर अविरत फडकणारा तिरंगा, तिथला विशाल परिसर डोळ्यांत साठवून घेतला आणि त्याला धन्यवाद देत आम्ही परत फिरलो. काश्मीर, पंजाब इत्यादि सीमारेषांवर आधी मी गेले होते तरी आई म्हणून मुलींबरोबर घेतलेला हा अनुभव विलक्षण होता! “आम्ही खूप lucky आहोत, thank you so much आई!” म्हणून मोठ्या मुलीनं, रेवानं मारलेली मिठी खूप काही सांगून गेली! मित्र मैत्रिणींसाठी तिथून घेतलेली छोटी स्मृती चिन्हं न्याहाळत परतीचा लांबच लांब रस्ता सुरू झाला.
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही