गगनयान -

मी की आम्ही - महत्वाचं काय ?

भारतासाठी सर्वार्थानं ऐतिहासिक गोष्ट – गगनयान! आत्मनिर्भर भारताचं प्रतीक म्हणून ज्याच्याकडे बघता येईल एवढी मोठी ही भारताची झेप! अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि खडतर प्रशिक्षणानंतर तयार झालेले भारतीय वायुसेनेचे चार fighter pilots या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून नुकतेच घोषित केले गेले.
यासंदर्भात अनेक चर्चा दूरदर्शनवर होत आहेत. काल NDTV वर या मोहिमेसंदर्भातले शास्त्रज्ञ आणि वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर मॅडम यांचाही चर्चेत सहभाग होता. त्यांचं ऐकण्यासाठी माझे कान आतुर होते. कारण या चारही अधिकाऱ्यांची निवड तसंच प्रशिक्षणात त्यांचं योगदान आहे. त्यांना खरं तर पहिला प्रश्न ही गगनयान मोहीम आणि त्यातल्या प्रक्रियेविषयी विचारायला हवा. परंतु तसं न करता एक स्त्री अधिकारी म्हणून थेट “why no woman astronaut in this mission?” असाच प्रश्न त्यांना केला गेला. त्यावर त्यांनी जो दृष्टिकोन इथे स्पष्ट केला, तो खूपच स्तुत्य आहे.
लेफ्ट. जनरल माधुरी यांनी कडक उत्तर दिलं - पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केल्याप्रमाणे इथे केवळ हे ४ अंतराळवीर नव्हे तर १४० कोटी भारतीय अंतराळात जाणार आहेत हे तुम्ही नीट ऐकलं नाही का? इथे लिंगभेदाचा मुद्दा येतोच कुठे? मुळात त्याविषयी आपण आत्ता का विचार करत आहोत? पंतप्रधानांनी त्यावेळी हे अधोरेखित केलं की या मोहिमेत भारतीय स्त्री शक्तीचं योगदान खूप मोठं आहे. महिला शास्त्रज्ञांशिवाय अशा कोणत्याही मोहिमेची कल्पना केवळ अशक्य आहे! त्यामुळे ISRO मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व महिला वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंता यांचा विशेष उल्लेख आणि प्रशंसा त्यांनी यावेळी केली.
लेफ्ट. जनरल माधुरी यांनी पुढे थेट सवाल केला - “Is it about I going in the space or is it about we did it together?” मी की आम्ही? इथे मी नव्हे तर ‘आम्ही भारतीय’ ही भावना अतिशय महत्वाची आहे!
दुसरं म्हणजे महिला अंतराळवीर पाठवण्याची वेळही भारतात लवकरच येईल. परंतु सध्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्त्री अधिकारी वायुसेनेत fighter pilot म्हणून २०१६ पासून कार्यरत (commission) होऊ लागल्या. पण त्या अद्याप ‘fighter test pilots’ म्हणून काम करत नाहीत, जी अशा प्रकारच्या मोहिमांची आवश्यकता आहे. अर्थात् हा दिवस निश्चितच उगवणार!
गुणवत्तेच्या निकषावर आधारित व्यवस्था (meritocracy) ही काळाची गरज भारतानं ओळखली पाहिजे. त्या दिशेनं वाटचाल सुरू केली पाहिजे. तिथे इतर कोणत्याही भेदाला थारा नाही. जिथे फुटीरतावाद दिसेल तिथे तो झोडपून काढलाच पाहिजे. अर्थातच मला अभिमान वाटतो की संरक्षण दले ही सगळ्यांच्या पलीकडे आहेत, ती तशीच रहावीत.. अभेद्य!
इतिहास रचणाऱ्या या चारही अंतराळवीरांचं अभिनंदन आणि पुढे सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष कामासाठी त्यांना अनंत शुभेच्छा! ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीं पथांवर चालत मानवाच्या कल्याणासाठी भारत विश्वात अग्रेसर राहो ही राष्ट्रीय विज्ञान दिनी मन:पूर्वक सदिच्छा!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही