विश्व कृतज्ञता दिवस
World Gratitude Day
प्रसन्न चित्तानं पहाट श्वासांत भरून घ्यावी आणि व्हावं कृतज्ञ...
त्याची वाट पहात काळोख सहन करणाऱ्या रात्रीसाठीही!
या रात्रीसारखंच खूप काही सोसत आपल्यावर दृढ विश्वास ठेऊन साथ देणाऱ्या ‘आपल्या’ माणसांसाठी...
या प्रवासात क्षणभर भेटलेल्या परीसांसाठी आणि सकारात्मकतेने भारलेल्या सभोवतीच्या मनांसाठीही...
कृतज्ञता...
शहाणं आणि समृद्ध करणाऱ्या प्रत्येक विचारासाठी...
समाधानानं भरून टाकणाऱ्या कृतार्थ क्षणांसाठी...
आपल्या उन्नतीसाठी निरंतर व्यक्त होणाऱ्या प्रार्थना आणि सद्भावनांसाठी...
आशीर्वाद होऊन पाठीवर फिरणाऱ्या थरथरत्या हातांसाठी...
आपल्याला आरसा दाखवणाऱ्या सुहृदांच्या निखळ मतांसाठी...
भूतकाळातल्या रम्य स्मृती आणि भविष्याच्या सुंदर स्वप्नासाठी...!
कृतज्ञता...
खूप काही शिकवून जाणाऱ्या प्राक्तनाच्या कठोर फटक्यांसाठी...
पुन्हा पुन्हा संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करणारे हृदयांत ठसठसणारे सल आणि बोचणाऱ्या आपमानांसाठीही...
ज्यांच्यामुळे यशाचा उन्माद अनुभावायला मिळाला त्या मागे पडलेल्या अपयशी क्षणांसाठी...
रात्री डोळे मिटून हात जोडावे...
उमगलेल्या चुकांसाठी आणि दिवसभरात आपल्या झोळीत पडलेल्या अनुभवाच्या एकेका दानासाठी...!
कुठल्याही मुखवट्याला न भुलता स्वतःशी प्रामाणिक रहाणाऱ्या आपल्याच विशुद्ध जाणिवांसाठी...
माणूस म्हणून विरघळवणाऱ्या प्रत्येक हळव्या भावनेसाठी...आणि
हे जीवन ‘जिवंत’ करणाऱ्या प्रत्येक श्वास आणि ध्यासासाठी...!
ईश्वराची भक्ती या कृतज्ञतेहून वेगळी का आहे!
- मोहिनी©
Comments
Post a Comment