प्रकाशाच्या वाटेवर ...!
माणसाचं कर्तृत्त्व म्हणजे नक्की काय? कॉलेजमध्ये शिकत असतांना वाटायचं झोपडपट्टीत वाढलेला एखादा मुलगा डॉक्टर होणं, एखाद्या रिक्षा चालकाचा मुलगा कलेक्टर होणं इत्यादि म्हणजे मोठं कर्तृत्त्व! ही व्याख्या पुढे अनेकदा बदलत राहिली! पण माझ्या बाबांची पिढी जसजशी उमगू लागली तसं लक्षात आलं – बेताच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता या पिढीनं चिकाटीनं,साहसानं स्वत:चं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. त्यानंतरची तीन-साडे तीन दशकं “मध्यमवर्गीय” शिस्तीत, अत्यंत सचोटीनं नोकरी करत मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही पिढ्यांचा ते आधारस्तंभ झाले! यांच्यामुळे केवळ कौटुंबिक स्थिरताच नव्हे तर कितीतरी सामाजिक तसंच व्यावसायिक संस्था वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्या. मुख्य म्हणजे यांच्या खांद्यावर उभं राहूनच आजच्या तरूण पिढीनं आपापल्या क्षेत्रात झेंडे रोवले! याची पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणीव होण्याचं कारण म्हणजे श्री. नारायण कुडलीकर काकांनी आठवणीनं मला भेट म्हणून पाठवलेलं त्यांचं “प्रकाशाच्या वाटेवर” हे आत्मचरित्रपर पुस्तक! Narayan Kudlikar . हे काही महिन्यांपूर्वीच जनशक्ती वाचन चळवळ,औरंगाबाद यांनी प्रकाशित केलं आहे. ‘नारायण’ या नावासह “विद्युत मंडळात” कार्यरत असलेल्या अधिकार्याच्या जीवनपटासाठी याहून सार्थ नाव दुसरं कोणतं! मुखपृष्ठावरची जुनी वास्तू आणि तिला लागून जाणारी वाट जणू हेच सांगतात की भूतकाळातल्या आठवणींमधून ऊर्जा घेऊन पूर्वजांप्रमाणे आपणही प्रकाशाच्या वाटेवर निरंतर मार्गक्रमण सुरू ठेवायचं!
अविरत कष्ट करणारी आई आणि मुलांना शिक्षण मिळावं यासाठी सतत धडपडणार्या वडिलांच्या प्रयत्नांचं चीज करून मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल्या पाहिल्याच इंजिनिअरची ही गोष्ट! “मी एक सामान्य माणूस आहे याची मला जाणीव आहे” असं पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्या मनोगतात लेखकानं स्पष्ट केलं आहे. पण आपल्याला व्यक्ती आणि वृत्ती दोन्हीतलं असामान्यपण भावल्याशिवाय रहात नाही! हे सगळं व्यक्त करण्यात लेखकाचा कोणताही अभिनिवेश नाही, साहित्यिक शब्दांचा डोलारा नाही की स्वत:च्या मतांचा अट्टहास नाही. जे जसं आहे तसं लख्ख!
पाच भागांत विभागलेल्या या पुस्तकात सुरुवातीला कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातल्या संस्कृतीचा गंध दरवळतो,जिथे लेखकाचं बालपण समृद्ध झालं. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, शालेय शिक्षण, घट्ट बांधलेली कुटुंब व्यवस्था अशा अनेक गोष्टींचं वर्णन आढळतं. डबारे, वत्तल,ढोणी, भागेली असे कितीतरी नवीन शब्द मला माहित झाले. अनेक सुंदर गोष्टींबरोबरच न पटणार्या गोष्टीही लेखकानं स्पष्ट नोंदवल्या आहेत. सोवळं नेसून घरोघरी अखंड राबत असलेल्या, कडक व्रताचरण करत असलेल्या विधवा पाहून लेखकाचं हृदय पिळवटून निघत असे. अशा समस्त स्त्रियांचं ऋण लेखक आवर्जून व्यक्त करतो. पण याच काळात ऐन तारुण्यात विधवा झालेल्या लेखकाच्या आज्जीनं मात्र आजोबांचा सगळा कारभार मात्र व्यवस्थित सांभाळला! लौकिकार्थानं निरक्षर असूनही मराठी,तेलगू,कानडी,हिन्दी अशा भाषा योग्य त्या ठिकाणी चपखलपणे ती बोलत असे, तसंच घोड्यावर बसून ती वसुलीसाठी जात असे हे सगळं वाचतांना खूप कुतूहल वाटतं!घरापासून दूर राहून घेतलेलं शिक्षण आणि इंजिनिअर होईपर्यंतची वाट लेखकासाठी अत्यंत खडतर होती! स्वतःविषयी आदर्श तेच न लिहिता सिनेमा बघण्याची सवय, सुरूवातीला अभ्यासात मिळालेलं अपयश याचीही लेखकानं आवर्जून नोंद केली आहे!
लेखकाची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात सुरू झालेली नोकरी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर खेडोपाडी वीज नेतांनाचे अनुभव वाचनीय आहेत. विद्युत मंडळातल्या वरिष्ठांचे, लेखकाच्या साथीदारांचे कृतज्ञतापूर्ण उल्लेख यात आहेतच पण चुका झाल्यावर ओढवलेला वरिष्ठांचा रोष, कधी वैयक्तिक आयुष्यात सासर्यांनी अनुभवातून सुनावलेले खडे बोल हेही लेखकानं सकारात्मकतेनं स्वीकारलेले दिसून येतात. वेळोवेळी अंतर्मुख होऊन सुधारणा करत रहाणं हा फार मोठा गुण आहे! १९७२ सालचा दुष्काळ, १९७५ साली लादलेली आणीबाणी, १९८१ सालचा विद्युत मंडळातला मोठा संप अशा अनेक घटना आणि त्यांचे सामान्यांवर झालेले परिणाम,पुढे किल्लारीच्या भूकंपानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यातली आव्हानं हेही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात.
शिक्षणासाठी मागच्या पिढीतले अनेक जण शेती सोडून शहराकडे वळाले. त्यामुळे वडिल जिथे गेले ती गावातली माती कपाळाला लावणारा, गाव सोडताना भरल्या डोळ्यांनी बघणारा लेखक अशा सगळ्यांचं प्रतिंनिधित्त्व करतो असं वाटतं. जिथे समृद्धी अनुभवली नंतर तिथलीच पडझड बघणं त्यांच्यासाठी किती वेदनादायी असेल!
लेखकाच्या किरण आणि पराग या दोन मुलांच्या आयुष्यात बालपणापासून अनेक कठीण प्रसंग आले. तेव्हा लेखकामधल्या खंबीर पित्यानं मुलांनाही खंबीर केलं. दु:ख बाजूला सारून व्यंगावर,व्यथेवर मात कशी करायची याची प्रेरणा दिली! आयुष्यातल्या प्रत्येक संकटात मदतीला धाऊन येणार्यांविषयी पुस्तकात ठिकठिकाणी लेखकानं कृतज्ञता व्यक्त केलेली दिसून येते. खरंच “कृतज्ञ” असणं आणि ते व्यक्त करणं...दोन्ही किती आवश्यक आहे!
निवृत्तीनंतर आता पुन्हा काळ्या मातीकडे वळून काही नवीन काम करण्याचं स्वप्नं बघत असतांना पत्नीच्या आजारपणानं गंभीर समस्या निर्माण झाली.आयुष्य पुन्हा काटेरी वळणावर गेलं! परंतु मित्रवत भासणारी स्वत:ची तरुण मुलं, इतर गणगोत यांची साथ आणि ईश्वरी श्रद्धेच्या जोरावर अत्यंत बिकट परिस्थितीतून पत्नीला पुन्हा उभं करण्यासाठी लेखकानं बळ एकवटलं! अत्यंत हळवा करणारा हा प्रवास आहे! पुस्तकाच्या शेवटी - “तुझी वेदना मी वाटून घेऊ शकत नाही...पण या प्रवासात तुला एकटं वाटणार नाही... एवढी प्रेमाची ऊब तुझ्याबरोबर निश्चितच असेन याची मी खात्री देतो” या आशयाची Howard Thurman याची प्रसिद्ध इंग्लिश कविता आपल्याला फारच अंतर्मुख करून जाते! अशा प्रकारे जोडीदाराला सांभाळणार्या व्यक्तीला लग्नाविधितल्या मंत्रांचा अर्थ मनापासून उमगलाय असं वाटतं! विशेष म्हणजे या प्रवासात स्वत:च्या स्वभावात झालेले बदल, दोष जाणवून ते दूर करण्याविषयी प्रयत्न करण्या इतपत मोकळेपणा लेखकाच्या ठायी जाणवतो!
पुस्तकात पाझरणारी लेखकाची आत्मनिष्ठा, पारदर्शकता,कमालीची तटस्थता,वेळोवेळी मांडलेलं चिंतन आपले विचार प्रवृत्त करणारं आहे! “गुणवत्ता नसेल तर कष्ट करून यश मिळवता येतं. मात्र कष्ट करण्याची तयारी नसेल तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही” हे आणि अशी अनेक वाक्यं अगदी कायम लक्षात ठेवण्यासारखी आहेत!
निरामय दीर्घायुष्यासाठी लेखक श्री कुडलीकर काका आणि अलका काकू यांना आणि संपूर्ण परिवाराला अनंत शुभेच्छा! खरंतर या निमित्तानं आधीच्या संपूर्ण पिढीलाच मनाचा मुजरा! आजच्या तरूण पिढीसाठी त्यांनी जो पाया रचला तो जीवनमूल्यांच्या दृष्टीनं,सर्वार्थानं समर्थ आहे! अनेक कुटुंबांमध्ये जुन्या स्मृतींवर आधारित स्मरणिकाही काढल्या जातात, जे स्वागतार्ह आहे! केवळ आर्थिक मालमत्ता मागे ठेवणं म्हणजे वारसा नव्हे तर “आत्मभान” जागं ठेवत ते आपल्या पारदर्शी आचरणातून पुढच्या पिढीत रुजवणं...हाही वारशाचाच भाग होय! “मी केलं तेच बरोबर” अशा आग्रहापेक्षा “मी इथे चुकलो....तुम्ही अशी चूक करू नका” असं मोकळेपणाने केलेलं आवाहन येणार्या वाटसरूंची वाट उजळवून टाकतं!अशा पुस्तकांच्या माध्यमांतून अनुभवांची मोठी शिदोरी मिळते, जी काळाच्या मर्यादा ओलांडून उत्तम पद्धतीनं भावी पिढ्यांना आपल्या मुळांशी घट्ट बांधून ठेवते!
-मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment