अंतरंग आपराजितांचे - ३
लोकप्रशासन आणि न्यायव्यवस्था
“जर तुम्हाला न्याय म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर धोलका इथे जाऊन मालव हा तलाव पहा” असं वचन आजही गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे! यामागची घटना फार रोचक आहे. राजमाता मीनलादेवीच्या आज्ञेनुसार तज्ञांनी तलाव खोदण्याची योजना तयार केली. जमिनीची पहाणी करत असतांना मंत्री आणि सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की एका गणिकेचं घर त्या परिसरात आहे आणि ते तलावाच्या सीमेमध्येच येत आहे. या घराचा भाग तलावात समाविष्ट केल्याशिवाय तो तलाव प्रमाणबद्ध होणार नाही. ही बातमी राजमातेपर्यंत पोहोचली. प्रजेसाठी तलावाची निर्मिती तर आवश्यक होती. राजमातेने त्या घराचा मोबदला म्हणून मोठी रक्कम त्या गणिकेसाठी पाठवली. परंतु आश्चर्य म्हणजे घर विकण्यासाठी त्या गणिकेने नकार दिला. तिने राजसेवकांना उत्तर दिलं, “आता या तलावाबरोबर मी सुद्धा प्रसिद्ध होणार!” सैनिकांनी ही घटना राजमातेला सांगितली. त्या गाणिकेचं घर जप्त करण्याची आज्ञा तिला सहजपणे देता आली असती पण ती होती एक असामान्य प्रशासिका – मीनलादेवी (मयणल्लादेवी)! तिच्या आज्ञेनुसार त्या गाणिकेच्या घराला जराही धक्का न लावता तो तलाव खोदण्यात आला. हा तलाव जणू ‘सामान्य जनतेसाठी राज्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वाचं प्रतीक’ म्हणून इतिहासात नोंदवला गेला!
राणी मीनलादेवी ही मुळात गोव्याच्या कदंब घराण्यातली. ती पाटण (गुजरात)मधल्या प्रसिद्ध अशा चालुक्य वंशातल्या राजा कर्णाची पत्नी झाली. इ.स. १०९४ पासून राजा कर्णाच्या निधनानंतर मीनलादेवीने पुत्र जयसिंहाला गादीवर बसवून स्वतः पाटणचं प्रशासन हाती घेतलं.तिच्यासमोर आदर्श होता प्रत्यक्ष सासूचा - राजमाता उदयमतीचा. आज शंभरच्या नोटेवर छापली गेलेली ‘रानी की वाव’ जिने खोदून घेतली.. तीच राणी उदयमती!
स्त्रीला दुर्बल समजून ज्यांनी पाटणवर आक्रमण केलं त्यांना जन्मभराची अद्दल घडवून मीनलादेवीने परत पाठवलं. राज्याची सैन्यव्यवस्था, शस्त्रसाठा आणि मुख्य म्हणजे शत्रूची चाहूल अचूक ओळखणारी मीनलादेवीची प्रख्यात हेरव्यवस्था अतिशय चोख होती. मांडलिक राजांना एकत्र बांधून ठेवणं असो वा राज्यातल्या जैन/राजपूत अशा काही प्रबळ गटांवर नियंत्रण ठेवणं ... राजमातेचा दरारा अद्भुत होता. सगळ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करणारं ‘तुष्टीकरणाचं’ धोरण न अवलंबता तिने खंबीरपणे अंतर्गत बंडाळी मोडून काढली आणि ‘राष्ट्र सर्वतोपरी’ असा स्पष्ट संदेश दिला. राज्यात शांती आणि ऐक्य तिने कायम अबाधित राखलं.
राजमाता मीनलादेवीने जयसिंहाला एक समर्थ राजा म्हणून अशा प्रकारे घडवलं की त्याची कारकीर्द इतिहासात अमर झाली. आईने दाखवून दिलेल्या राजधर्माच्या वाटेवर तो निरंतर चालत राहिला. या राजमातेविषयी अनेक प्रेरक घटना इतिहासात नोंदवल्या गेल्या आहेत. सोमनाथ या तीर्थक्षेत्री कर द्यावा लागतो म्हणून दु:खी अंत:करणाने दर्शनाशिवायच परत येणाऱ्या साधूंना तिने पहिलं आणि ती सुद्धा पुढे दर्शनाला न जाता रस्त्यातून परत फिरली. तिने तत्काळ आपल्या पुत्राला बोलावलं, “आता मी तेव्हाच या क्षेत्री येईल जेव्हा इथला कर रद्द केला जाईल. तोपर्यंत मी अन्नदेखील ग्रहण करणार नाही!” हे ऐकून जयसिंहाने तत्काळ महसूल अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह बोलावलं आणि कर रद्द केला.
मैथिली शरणगुप्त वर्णन करतात -
गूंज उठा सोमनाथ मंदिर सुनाद से |
पाके कर –बाधा मुक्ति धनियों के साथ ही ||
दर्शन अकिञ्चनों ने पाया और गाया यो |
हर हर महादेव, जय जय राजमाता की ||
इथल्या मातृशक्तीच्या लोकप्रशासन आणि न्यायव्यवस्थेची अनेक उदाहरणं भारताच्या इतिहासात कोरलेली आहेत. याची परकीय इतिहासकार सुद्धा नोंद घेतांना दिसून येतात! पेत्रो डेला वॅले हा इटालियन इतिहासकार इ. स. १६२१-२४ या दरम्यान आपल्या पश्चिम किनारपट्टीचा प्रवास करतांना आवर्जून उल्लाल राज्यात आला. पोर्तुगीजांवर वीज होऊन बरसणाऱ्या राणी अब्बाक्का महादेवी हिची वंशज असलेली राणी अब्बाक्का चौटा या ‘राणीची’ प्रत्यक्ष भेट व्हावी अशी त्याची तीव्र इच्छा होती. तेवढ्यात बाजारपेठेतल्या रस्त्यावर तलवार घेतलेल्या सैनिकांच्या छोट्या ताफ्याबरोबर सुती साडी नेसलेली, अनवाणी चालणारी एक महिला त्याला दिसली. तीच इथली ‘राणी’ आहे हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो आश्चर्याने वेडा झाला! दुभाषाच्या मदतीने तिच्याशी साधलेल्या थेट संवादानंतर त्याने या रुबाबदार राणीविषयी खूप काही नोंदवून ठेवलं आहे. तो आवर्जून मान्य करतो, “ …..yet the queen showed her quality much more in speaking than by her presence; and she spoke like a prudent and judicious woman.” त्या दोघांचा दीर्घ संवाद फार फार सुंदर आहे, तो पूर्ण वाचण्यासारखा आहे. मुख्य म्हणजे उल्लालमधल्या वास्तव्यानंतर तो राणीच्या लोकप्रशासनाविषयी सविस्तर लिहून ठेवतो - राणी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत अखंड कामत गुंतलेली असे. तिला भेटायला आलेल्या पाहुण्यांना देखील प्रजाकल्याणार्थ सुरू असलेल्या एखाद्या प्रकल्पावर जाऊनच राणीला भेटावं लागे. तिथे ती जातीने त्या कामाचा आढावा घेई. रात्री जेवणानंतरही अत्यंत महत्वाची अशी युद्धविषयक कामं, तसंच अधिकाऱ्यांशी ती चर्चा करे. तंटयांचा न्यायनिवाडा सुध्दा अतिशय प्रभावी पद्धतीने करे.
तिचं साधं राहणीमान, आत्मसन्मान आणि देशाभिमान यांनी भारलेलं तिचं कणखर मन, तिचं औदार्य, भविष्याबद्दलची दूरदृष्टी, राज्याच्या सुरक्षेविषयीच्या स्पष्ट कल्पना, निर्भय वृत्ती,तिचं रणकौशल्य ..किती पैलू असावेत या राणीच्या व्यक्तिमत्वात! दुर्दैवाने या राणीची बहुतांश माहिती पोर्तुगीज आणि इतर पर्यटकांच्या साहित्यातून घ्यावी लागते.
राजमहालातलं सुखवस्तू आयुष्य जगत सिंहासनावर विराजमान होणं म्हणजे राजपद नव्हे तर प्रजेच्या अंत:करणात सामर्थ्याची, ऐक्याची आणि स्वातंत्र्याची आस पेटती ठेवत त्यांच्या कल्याणासाठी समर्पित जीवन जगणं म्हणजे राणी होणं..याची प्रचीती राणी अब्बाक्काच्या चरित्रातून येते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीं, पाटणची मीनलादेवी, उल्लालची राणी अब्बाक्का चौटा ,मदुराईची राणी मंगम्माळ अशा अनेक राजमातांचं आपण खूप देणं लागतो. त्यांच्यासाठी राजपद हे एखाद्या भूभागावर वर्चस्व मिळवण्यासाठी वा जास्तीत जास्त लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी नव्हतं तर प्रजेच्या कल्याणाचं ते एक साधन होतं! ज्यांच्यामुळे नवरात्रींची दीपमाळ आपल्या देव्हाऱ्यात अखंड तेवत राहिली त्या भारताच्या स्वाभिमानी, सामर्थ्यशाली मातृशक्तीसमोर नतमस्तक होऊया!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment