सृजनराम
राममंदिर ‘तिथेच’ व्हावं असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळी भारतात आनंद लहरी उसळल्याच, पण २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार या निर्णयापासून ते प्रत्यक्ष ती होईपर्यंत आणि त्यानंतरही या विषयावर जे विचारमंथन होतंय ते खूप महत्त्वाचं आहे असं जाणवतं! संपूर्ण भारतात आलेली उत्साहाची ही लाट अभूतपूर्व आहे. गेल्या महिना दीड महिन्यात जे प्रचंड लिखाण सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून झालं ते थक्क करणारं आहे. यामुळे कायदा,समाजकारण,धर्मकारण,राजकारण सगळं ढवळून निघालं आणि या सगळ्या मंथनातून राममंदिर होण्यामागची वैचारिक भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत गेली. मुळात “श्रीराम-एका काव्याचा किंवा फारतर महाकाव्याचा नायक” अशा धारणांपासून सुरू झालेला हा संघर्ष, १९७० साली झालेलं उत्खनन, समस्या सोडवण्याच्या राज्यकर्त्यांनी गमावलेल्या संधी, राममंदिर पुन्हा स्थापित करण्यासाठी संयमानं दिला गेलेला कायदेशीर लढा,त्या लढ्यातली आव्हानं आणि मिळवलेला ‘न्याय’ यातल्या अनेक गोष्टी या लेखनातून अधोरेखित झाल्या.
३७० वं कलम रद्द होण्याचा निर्णय असो वा नुकत्याच झालेल्या मूलभूत कायद्यांमधल्या सुधारणा...‘मला काय त्याचे’ असा विचार करून तटस्थपणे भारतात वावरणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांना होणाऱ्या चांगल्या बदलांमुळे मिळालेली फळं चाखायची असतात परंतु त्या आधी असलेल्या व्यवस्थेवर न टिका करायची असते न सुधारणा झाल्याबद्दल काही कृतज्ञता वाटते. त्यांना ही राममंदिराची घटना सुद्धा जर केवळ धार्मिक वा राजकारण असून ती दुर्लक्ष करण्याजोगी वाटत असेल तर त्यासारखी दुसरी बधीरता नाही. शिवाय राममंदिर ही खरंच देशाची प्राथमिकता आहे का? हे आणि असे अनेक भ्रम ज्यांच्या मनात निर्माण झाले त्यांना कसं समजावणार? त्यांनी "राजा रामचंद्र की जय’ अशी गर्जना करत जिवावर उदार होत शत्रूवर तुटून पडणारे राजपूत रायफल्सचे सैनिक किंवा ‘जय महाकाली.. आयो गुरखाली’ अशी युद्धघोषणा करत सरसावणारे गोरखा सैनिक त्यांनी पहिलेच नाहीत! गंभीर जखमी झालेला, पडलेला सैनिक तशाही अवस्थेतही पुन्हा उठून शस्त्र हातात घेतो.. . कारण तेव्हा त्याला आठवत असतो तो पूर्वजांचा पराक्रम, त्याची परमेश्वरावरची दृढ श्रद्धा! सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकाचा अंतिम जोश...म्हणजे त्याच्या या घोषणा! त्या निश्चितच पोकळ नाहीत! तेव्हा सुरक्षित देशात रहाण्याची कोणतीही किंमत न देता, अगदी अलबेल राहून ‘रामायण हे एक मिथक आहे’ अशा विषयांवर संशोधन मांडणं किती हास्यास्पद आहे! सैन्यदलांच्या श्रद्धांजलीस्थळावर या ओळी कोरलेल्या असतात -
How can man die better
Than facing fearful odds
For ashes of his father
And temples of his Gods!
केवळ भारतासाठी नव्हे तर इतर देशांसाठीही ही घटना स्फूर्तीदायक आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे बहुसंख्य लोकसंख्येच्या श्रद्धास्थानांचा अशा प्रकारे विध्वंस करण्यात आला. तलवारीच्या जोरावर त्यांच्यावर स्वतःची प्रार्थनास्थळं लादण्यात आली,शहरांची नमांतरं करण्यात आली. पण त्यातली किती श्रद्धास्थानं त्या त्या देशानं पुन्हा स्थापित केली? हा तर प्रत्येक राज्यकर्त्यांचा पॅटर्नच असतो, किंवा होऊन गेलेला इतिहास आता बदलता येणार नाही अशा धारणांमधून उरलेल्या लोकसंख्येनं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी स्वतःला त्या त्या आक्रमणांनंतरच्या वतावरणाशी, भाषेशी,अगदी जबरदस्तीनं बदललेल्या धर्माशी देखील जुळवून घेतलं. अशीच वर्षानुवर्षं लोटली. यापैकी काही आक्रमणं,काही घटना तर घडल्या की नाही अशी शंका येण्या इतपत विस्मृतीत खोल पुरल्या गेल्या! परिणामी त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं. पण भारताचं तसं झालं नाही आणि हीच वृत्ती भारताला इतर देशांपेक्षा वेगळी ठरवते!
भारत या राष्ट्रपुरुषाच्या हृदयाची स्पंदनं म्हणजे राम आणि कृष्ण! या दैवतांची जन्मस्थानं या देशाची मर्मस्थानं आहेत, श्रद्धेची,ऊर्जेची केंद्र आहेत. राष्ट्राचं मर्म ओळखून त्याला प्राधान्य देण्यात काहीही चुकीचं नाही हा मोठाच पायंडा भारतानं जगासमोर पाडला आहे. इतर राष्ट्रांनी देखील त्यांचं अस्तित्व, इथवर झालेला त्यांचा संघर्ष यांचा विसर न पडू देता मुळांचा शोध घेण्याच्या प्रयत्न करावा हा मोठाच बोध भारताकडून त्यांना मिळाला आहे. आक्रमकांच्या धर्मांधतेशी याची तुलना होऊ शकत नाही. केवळ अद्ययावत तंत्रज्ञान, सुखसोयींनी युक्त असा समाज,जागतिक अर्थकारणात अग्रस्थान वा जगावर वर्चस्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा अशी भारताची ओळख कधीच नव्हती. तर विश्वकल्याणासाठी लागणारं तेजस्वी ज्ञान, औदार्य आणि सह-अस्तित्व मान्य करणारी सहिष्णुता,त्यातून लाभलेली समृद्धता हीच मूल्यं भारताच्या संस्कृतीतून प्रवाहित होत राहिली,होत रहातील.
हा एक-दीड महिन्यांचा काळ आणखीन एका कारणासाठी चिरस्मरणात राहील त्याचं कारण म्हणजे देशभरात सृजनातून प्रकटलेला श्रीराम! हा बहर केवळ वर्णनातीत आहे! गीतकार, संगीतकार,गायक,वादक, कवी, विणकार,चित्रकार,रांगोळी कलाकार..सगळ्या कलांचा विषय एकच – श्रीराम! उत्तमोत्तम चाली देत संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली श्रीरामावरची गाणी प्रचंड viral झाली. अनेक गाण्यांवरच्या नृत्याचं सादरीकरण झालं. चित्रकारांनी काढलेली आणि AI कडून काढून घेतलेली अप्रतिम रेखाटनं बघायला मिळाली. याबरोबरच रामायणातील कथा, त्यांचा विस्तार याविषयी अनेक लेख आणि लेखमालिका लिहिल्या गेल्या. ते वाचणं म्हणजे पर्वणीच होती! प्रचंड माहिती त्यातून संगळ्यांपर्यंत पोहोचली. रामायणातल्या माहित नसलेल्या अनेक घटना आणि त्यांच्यातला परस्परसंबंध उलगडत गेला. त्यातून प्रेरणा घेऊन नंतरच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वातंत्र्यासाठी,स्वधर्मासाठी भारतीयांनी दिलेला लढा इतिहासात अमर झाला एवढं सामर्थ्य त्यात होतं!
कितीतरी दुर्मिळ,सुंदर चित्रं,जुनी गाणी या दरम्यान ऐकायला मिळाली! कुठे वस्त्रं विणली गेली तर कुठे दागिने घडवले गेले! रामललाच्या लोभस मूर्तीपासून ते या मंदिराच्या उभारणीपर्यंत भारताच्या विविध प्रांतांमधून घडवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमुळे राममंदिर ते राष्ट्रमंदिर हा प्रवास पूर्ण झाला. चिरंतन मूल्यांसाठी नवीन यंत्रणा, नवीन तंत्रज्ञान वापरणं यातून भूत आणि भविष्याला सांधणारा एक भक्कम पूल तरुण पिढीला बघायला मिळाला.
निर्गुणाची उपासना करणारा ज्ञानी असो वा सगुण मूर्तीचं पूजन करणारा भक्त या सगळ्यांना सुखावणारे ... आणि मुख्य म्हणजे या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारे हे क्षण आहेत एवढं निश्चित! ही श्रद्धा आपल्यातली दुर्बलता नाहीशी करून आपल्याला अधिकाधिक कर्मप्रवण करो!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
(छोट्या राधानं रेखाटलेला शरयू नदीच्या तटावर बागडणारा रामलला)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही