अंतरंग अपराजितांचे - ४.
युद्धनीती
तारीख ७ जुलै १७९९. आता लक्ष्य अगदी समोर दिसत होतं – लाहोर! १८ वर्षांचा पराक्रमी तरुण रणजीत सिंह सैन्यनेतृत्व करत होता आणि त्याच्या खांद्याला खांदा लाऊन स्वतः लढत, त्याला मार्गदर्शन करत होती त्याची सासू – भारताच्या इतिहासातली ‘the great military strategist’ सरदारनी सदा कौर! सुदृढ बांधा, डोक्याला पटका, कमरेला कमरकसा, त्यात छोटं किरपाण, हातात उगारलेली तलवार आणि डोळ्यात अखंड पंजाबच्या निर्मितीचा ध्यास! त्यावेळी अत्यंत विलासी अशा काही सरदारांच्या हातांमध्ये लाहोर होतं. ही अन्यायकारी राजवट लाहोरच्या जनतेच्या अगदी सहनशक्तीपलीकडे गेली होती. त्यांच्या विनंतीवरून रणजीत सिंह आणि सदा कौर आज लाहोरकडे कूच करत होते. लाहोरमध्ये मुहर्रमच्या मिरवणुकीचं निमित्त साधून दोघांनी लाहोरला वेढा दिला. योजनेनुसार विभागून रणजीत सिंहाचं सैन्य शहराच्या लाहोरी दारवाजाकडे तर सदा कौरचं सैन्य दिल्ली दरवाजाकडे निघालं.
दोघांचं ते रौद्ररूप पाहून अनेक सरदार पळून गेले मात्र चेतसिंह चवताळून सदा कौरवर चालून आला. जोरदार लढाई झाली. इथे तिने चेतसिंहाला थोपवून धरल्याने रणजीत सिंह दुसरीकडून लाहोर शहरात प्रवेश करू शकला. या प्रचंड आक्रमणाला बघून सरदार चेतसिंह किल्ल्यात घुसला आणि तिथून लढू लागला. दोन्हीकडून धुवांधार गोळीबार! अत्यंत चिवट अशी ही लढाई पुढचे २० तास सुरू राहिली! रणजीत सिंहाने प्रस्ताव मांडला की आता तोफांचा भडिमार करू आणि पाठोपाठ आक्रमण!किल्ला ताब्यात येईल. मात्र मातब्बर रणनीतिज्ञ सदा कौर लगेच उत्तरली, “तो जिथून लढत आहे, तिथे अत्यावश्यक साधनं तसंच अन्नधान्य, शस्त्रास्त्रं असा कोणताही साठा नाही. बाहेरून किल्ल्यात जाणारे रस्ते आपण बंद केले आहेत.अशा परिस्थितीत शत्रू किती काळ तग धरून राहील?थोड्या वेळात तो शरण येईल, त्याला पर्याय उरलेला नाही. त्यासाठी आपली सामरिक शक्ती खर्च करण्याची आवश्यकता नाही.” आणि झालंही असंच! चेतसिंहचा संदेश आला. त्याला सुरक्षित बाहेर निघून जाण्याची हमी हवी होती! लाहोरचा किल्ला ताब्यात आला. लवकरच लाहोर पंजाबची राजधानी म्हणून नावारूपाला आली. किती वर्षांची तपश्चर्या होती ही!
१७८५ साली गटबाजीतून पतीचा मृत्यू ओढवला त्यावेळी सदा कौर अवघी २२ वर्षांची होती! पदरात एक लहानशी मुलगी. त्याचवेळी सगळी शीख वतनं/घराणी(मिस्ल) सुसंघटित करून एकसंध पंजाबी राज्य निर्माण केलं पाहिजे या ध्यासाने ती झपाटून गेली. तिचे सासरे जयसिंह यांनी तिला उत्तराधिकारी म्हणून सगळे अधिकार दिले. कन्हैया घराण्याचं नेतृत्व तिच्याकडे आलं. सगळे भेद विसरून तिने आपल्या मुलीचं रणजीत सिंहाशी लग्नं लावलं. दोघेही बालवयात होते. दुर्दैवाने सरदार मानसिंह, रणजीत सिंहाचे पिता गेले तेव्हा तो अवघा १० वर्षांचा होता. तो एका डोळ्याने अधू होता. आपल्या या जावयाला सदा कौर हिने भक्कम साथ दिली, संस्कार दिले. अखंड पंजाबचं स्वप्नं त्याच्या मनात रुजवलं. मुख्य म्हणजे त्याच्या शौर्याला दिशा आणि गुरू गोविंदांच्या भक्तीची जोड दिली!
एकीकडे अन्याय, अस्थिरता, हिंसा यामुळे होरपळलेल्या पंजाबमध्ये सुशासनाची अत्यंत आवश्यकता होती. तर दुसरीकडे व्यापाराच्या आडून सत्ता बळकवू पहाणारे इंग्रज पुढे सरकत होते. अशा परिस्थितीत सैन्याची पुनर्बांधणी करणं अत्यंत महत्वाचं आहे हे तिने रणजीतसिंहाच्या मनावर बिंबवलं. अनेक सरदारांना तिने एकत्र केलं. प्रत्येक आक्रमकाशी एक होऊन कडा मुकाबला केला. तिच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं. १२ एप्रिल १८०१ रोजी रणजीत सिंहाचा राज्याभिषेक झाला. स्वतः सिंहासनावर न बसता गुरू ग्रंथ साहेब त्यावर ठेवणारा रणजीत सिंह पुढे प्रचंड मोठ्या पंजाबी साम्राज्याचा सत्ताधीश झाला! सदा कौरच्या तलवारीला मात्र जराही उसंत नव्हती. कांगडा, नुरपूर अशा कितीतरी लढाया तिने केल्या. स्वतंत्रपणे अनेक प्रदेश सुरक्षित केले. महत्वाचं म्हणजे १८०२ साली सदा कौरच्या भक्कम साथीमुळे रणजीत सिंहाने अमृतसर जिंकून घेतलं! ते पंजाबचं मोठं आध्यात्मिक केंद्र झालं. तिने अनेक बंडखोर देखील सरळ केले. फितुरांना पकडून कठोर शिक्षा केली. १८२० साली फतेह सिंह अहलुवालिया याच्या साथीने तिने अनेक विद्रोही सरदारांशी केलेला मोठा रणसंग्राम याचीच साक्ष देतो!
अनेक इतिहासकारांकडून सरदारनी सदा कौर हिच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची नोंद घेतली गेली, “Sada Kaur was by all accounts a woman of extraordinary ability and her considerable talents now enabled her to play a prominent part in Ranjit Singh’s affairs. In fact she became the leading personality in Ranjit’s councils and the most powerful instrument of is early triumphs!” अशा या रणधुरंधर वीरांगनेचं विस्मरण होणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे!
नावापुढे लावलेलं ‘कौर’ शब्दशः जगत स्वातंत्र्य आणि स्वधर्मासाठी शत्रूशी प्राणपणाने लढणाऱ्या वाघिणींची मोठी यादीच आपल्या इतिहासात आहे. कारण शौर्य हा भारतीयांच्या जीवनशैलीचा एक उपजत पैलू आहे. पंजाबमधल्या प्रसिद्ध संतयोद्धा माई भागो यांचा पराक्रम आणि योगदान देखील इतिहासात अमर झालं. दुर्बल आणि व्यथित झालेल्या मनांत आणि मनगटांत शक्तीचा संचार व्हावा यासाठी प्रेरित करणारं हे अध्यात्माचं स्वरूप किती महत्वपूर्ण आहे! पटियालाच्या बिबी साहेब कौर या राजकुमारीविषयी तर जेवढं लिहावं तेवढं कमीच! अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा अंगार आपल्याही रक्तात कायम राहो!
केवळ घोड्यावर बसून शस्त्रं चालवणं म्हणजे शौर्य वा लढाई नव्हे. ते चालवण्यामागे व्यापक उद्दिष्ट ठेवणं तितकंच आवश्यक! समर्पित आयुष्य जगत, चपखल युद्धनीती वापरुन राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या रणधुरंधर वाघिणींना कडक मानवंदना! वाहे गुरू दा खालसा..वाहे गुरू दी फतेह!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment