अंतरंग अपराजितांचे - ८
बुद्धिचातुर्य
प्रखर राष्ट्रनिष्ठेला बुद्धिचातुर्याची जोड मिळाली तर शत्रू कसा वठणीवर आणता येतो हे भारतीय विरांगनांनी अनेक वेळा दाखवून दिलं! गंगेच्या पवित्र पाण्याने आणि कालीमातेच्या आराधनेने पुनीत झालेली, थोर तत्त्ववेत्ते, साहित्यिक, समाज सुधारक तसंच सशस्त्र क्रांतिकारकांच्या कर्तृत्त्वाने जगभरात नावाजलेली बंगालची पुण्यभूमी! इथेच होऊन गेली राणी रशमोनी (रासमणी). कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिराची निर्माती, ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे त्यांच्याच विरूद्ध वापरुन त्यांना वेळोवेळी ठामपणे विरोध करणारी आणि पतीच्या निधनानंतर पुढची तीन दशकं प्रचंड मोठी जमीनदारी सांभाळणारी राणी रशमोनी! तथाकथित शूद्र वर्णाच्या एका अत्यंत गरीब घरात जन्माला येणार्या या मुलीनं आपल्या कर्मानं फार मोठा इतिहास रचला. रशमोनी ते ‘लोकमाता राणी रशमोनी’ हा तिचा प्रवास मोठा अलौकिक आहे! श्री रामकृष्ण परमहंसांच्या गुरूसामर्थ्याने तो आणखीन उजळून निघाला!
१८३३ सालची अतिशय महत्त्वपूर्ण घटना म्हणजे Saint Helena Act (The Charter Act) हा कायदा ब्रिटिश संसदेने भारताला लागू केला. या कायद्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी दर्जा संपुष्टात येऊन इंग्रजांना इथले संपूर्ण प्रशासकीय अधिकार मिळाले. या अंतर्गत लॉर्ड विल्यम बेंटिंक (Lord William Bentick) हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. यात मुख्यत्त्वाने भारतासाठी कायदे करण्याचे (legislative powers) अधिकारही होते.
त्यावेळचं एक मुख्य आव्हान म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांवर वेळोवेळी लादलेले कर. शतकांपासून गंगा नदी आणि त्याभोवतीच्या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय सुरू आहे. विविध प्रकारचे मासे हे बंगालचं मुख्य अन्न आहे! मात्र ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. १८४० च्या सुमाराला ‘मासेमार्यांच्या या व्यवसायामुळे गंगेच्या पाण्यात इतर व्यावसायिक जहाजांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे’ या सबबीखाली त्यांनी मासेमारीवर मोठा कर लावला. अत्यंत धूर्त अशी ही इंग्रजांची खेळी होती. यातून एकीकडे कंपनीला पैसा मिळणार होता तर दुसरीकडे मासेमार्यांची वाहतूक कमी होऊन प्रवाह मोकळा होणार होता!
या लादलेल्या करामुळे प्रचंड मोठ्या संख्येने असणाऱ्या मासेमार्यांच्या उपजीविकेचं साधनच धोक्यात आलं. जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. त्यांनी कलकत्ता गाठलं आणि त्यांची बाजू इंग्रजांसमोर मांडावी ही विनंती काही जमीनदारांना केली. परंतु कोणीही त्यांच्या समस्येसाठी कंपनीशी वैर घेण्यास तयार नव्हतं. आता त्यांची अंतिम आशा होती राणी राशमोनी!
तिने यावर उपाय शोधला. गंगेची उपनदी असलेल्या हुगळी नदीतला १० किलोमीटर्स लांब प्रवाहाचा एक पट्टा तिने ईस्ट इंडिया कंपनीकडून रीतसर भाड्याने घेतला. यानंतर तिने जे केलं ते थक्क करणारं होतं. तिने प्रचंड मोठ्या २ लोखंडी साखळ्या मेतियाब्रुज ते गुसारी अशा प्रवाहावरती दोन्ही बाजूंनी लावल्या. इथे नदीचा प्रवाह धनुष्याकार झालेला होता. याठिकाणी तिने तिची खाजगी मालमत्ता जाहीर करत मासेमार्यांना काम सुरू करण्यासाठी सांगितलं. त्यांनी तिथे गर्दी केली आणि हुगळी नदीवरची व्यावसायिक तसंच यात्रेकरूंची रहदारी ठप्प झाली!
राणीच्या या अनपेक्षित धाडसामुळे इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यांनी संतापून राणीला कायदेशीर नोटिस बजावली आणि तिच्या या कामाचं स्पष्टीकरण मागितलं. त्या नोटिशीला तिने कायदेशीर उत्तर दिलं की “ही जागा कंपनीकडून कायदेशीर पद्धतीने तिने भाड्याने (lease)घेतली आहे. त्यामुळे तिच्या मालमत्तेतून होणार्या उत्पन्नाचं रक्षण करण्याचा अधिकार खुद्द ब्रिटिश कायदाच तिला देतो. याउलट हुगळी नदीतल्या इतर व्यावसायिक रहदारीमुळे तिच्या हद्दीतल्या मासेमार्यांना मासे पकडण्यासाठी खूप अडथळे येतात ज्यामुळे तिच्या उत्पन्नात घट होत आहे. हा युक्तिवाद जर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मान्य नसेल तर त्यांनी न्यायालयांत तसा रीतसर दावा दाखल करावा. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ती समर्थ आहे.” यापुढे जाऊन राणीनं हेही ठणकावून सांगितलं की जोपर्यंत न्यायालयात हे प्रकरण सुरू असेल तोपर्यंत ती या लोखंडी साखळ्या प्रवाहातून काढता येणार नाहीत. अचूक शस्त्र राणीने वापरलं होतं – खाजगी मालमत्ता!
अशा प्रकारच्या युक्तिवादामुळे ईस्ट इंडिया कंपनीसमोर एकाच पर्याय उरला होता – अखेरीस मासेमारीवरचा कर त्यांनी रद्द केला! मासेमार्यांना पुन्हा त्यांच्या प्रिय गंगेत मुक्त प्रवेश मिळाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला एका विधवा हिंदू राणीने मोठाच शह दिला. गंगा सगळ्यांसाठी खुली झाली. यामुळे गंगेच्या पाण्याला ‘रानी रशमोनी जल’ असं नाव पडलं. यावरून ही घटना किती महत्त्वपूर्ण होती याची प्रचिती येते.
एकदा दुर्गापूजेच्या मिरवणुकीवरती इंग्रजांनी बंदी आणली. राणीला प्रश्न पडला. आमच्याच देशांत येऊन आमच्या उत्सवांवर बंदी घालणारे हे कोण? त्यांना मुळीच न जुमानता राणीने मिरवणूक सुरू ठेवली. याबद्दल शिक्षा म्हणून राणीला इंग्रजांनी ४० रुपये एवढा दंड ठोठावला. हे ऐकून भारतीय जनता प्रचंड संख्येने राणीच्या बाजूने उभी राहिली. त्यांनी रस्ते अडवले. राणीसाठी उभं राहिलेलं हे जनमत पाहून इंग्रजांना तिच्यावर लावलेला दंड मागे घ्यावा लागला!
तिने लोकांसाठी अनेक मूलभूत सुविधा उभ्या केल्या. रस्ते बांधले, बाजारहाट वसवून उद्योगांना चालना दिली. तलाव खोदले. जलसिंचनाकडे लक्षं पुरवलं. पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय बांधले. अनाथालयं, अन्नछत्र सुरू केले. राणीने सुवर्णरेखा नदीपासून ते जगन्नाथपुरीपर्यंत यात्रेकरूंसाठी पक्का रस्ता बांधून घेतला. गंगेच्या काठी तिने बांधलेले घाट अजूनही वापरत आहेत.
त्याकाळी या तथाकथित शूद्र वर्णाच्या राणीने कालीमातेचं मंदिर बांधण्याचा संकल्प कसा पूर्ण केला हा प्रवास थक्क करणारा आहे. तिच्या या अथक प्रयत्नांचं सार्थक झालं ते श्री रामकृष्ण परमहंसासांमुळे! पुजारी म्हणून मंदिरात कामाला लागलेल्या, लोकांच्या दृष्टीने थोड्या ‘विक्षिप्त’ अशा गदाधरामधलं दिव्यत्व राणीने केव्हाच ओळखलं होतं! ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यानेमाने साधना करत असे. त्यांचा एक प्रसंग सुप्रसिद्ध आहे. श्री रामकृष्ण उपदेश करत असतांना राणीचं भटकत असणारं मन त्यांनी ओळखलं आणि तिच्या पाठीवर एक चपराक दिली. इतरांना या गोष्टीचा खूप राग आला, हा वेडेपणाच वाटला त्यांना. पण राणीला मात्र अंतरात जे जाणवलं ते खरंच खूप वेगळं होतं. लवकरच आपला जावई माथुर बाबू याला उत्तराधिकारी म्हणून सगळा कारभार सोपवून तिने श्री रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला भक्ती मार्गावरती समर्पित केलं!
भगिनी निवेदिता अगदी समर्पक शब्दांत राणी रशमोनी बद्दल विचार प्रकट करतात, “राणी रशमोनीशिवाय दक्षिणेश्वर मंदिर नसतं; दक्षिणेश्वर मंदिराशिवाय गदाधर गदाधरच राहिला असता, त्याचे श्री रामकृष्ण झाले नसते; श्री रामकृष्ण नसते तर नरेंद्र दत्त हा नरेंद्र दत्तच राहिला असता त्याचे स्वामी विवेकानंद झाले नसते; आणि स्वामी विवेकानंदांशिवाय भारताचं पुनरुत्थान शक्य झालं नसतं. म्हणून राणी रशमोनी खर्या अर्थाने भारताच्या पुनरूत्थानाची जननी आहेत! ”
अशा लोकमातांच्या दिव्यत्त्वाने भारताच्या इतिहासाची पानं प्रकाशमान झाली आहेत. जन्माने नव्हे तर कर्माने माणूस श्रेष्ठ होतो हा विचार यातून दृढ होत जातो. यांना त्रिवार मानवंदना!
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.) ©
Comments
Post a Comment