अंतरंग अपराजितांचे - ७
धैर्य
“हे राजा आम्हाला अरबांनी गाठून बंदी केलं आहे. वाचवा!वाचवा!” असा स्त्रियांचा आवाज कानी पडला आणि राजा दाहिर त्याच्या बंदिस्त सैन्यरचनेच्या बाहेर येत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्यात पेटता बाण वेगात त्याच्यावर सोडण्यात आला. त्याच्या अंबारीने पेट घेतला. हत्ती त्वरित पाण्याच्या दिशेने गेला. त्याने पाण्यात स्वतःला झोकून दिलं. याच वेळी दाहिरवर बाणांची सरबत्ती कोसळली,त्यांनी त्याच्या हृदयाचा आरपार वेध घेतला. राजा कोसळता क्षणीच शुजा नावाच्या अरबाने तलवारीच्या आघाताने राजाचं शरीर धडावेगळं केलं. ते भाल्याच्या टोकावर लाऊन मुहम्मद कासिमकडे आणलं गेलं. त्याने खात्री करून मग ते खलिफाकडे रवाना केलं गेलं. अत्युच्च धैर्याने राजा दाहिर लढला. एका पराक्रमी पर्वाचा दुर्दैवी अंत झाला. त्याने इ. स. ६७९ ते ७१२ असं दीर्घकाळ सिंधमध्ये शासन केलं. अरबांवर सुरुवातीपासून त्याने टाकलेला विश्वास,त्याचं औदार्य याबदल्यात त्याला केवळ विश्वासघात मिळाला होता. त्याने खूपच मोठी किंमत मोजली होती. हे आक्रमण सिंधु नदी ओलंडण्यापूर्वीच थोपवायला हवं होतं का? नेमकी कशाची परिणती परभवात झाली? ही चर्चा आता मागे पडली होती.
सिंध प्रांत आता जरी पाकिस्तानमध्ये असला तरी प्राचीन काळापासून हिंदुस्थानच्या मातीशी सांस्कृतिक धाग्यानं तो घट्ट बांधला गेला आहे. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध अशा भारताच्या या प्रवेशद्वाराकडे अरबांसारखी परकीय शक्ती आकृष्ट न झाली तरच नवल! इतर सरदारांच्या अनेक अपयशी आक्रमणांनंतर इ. स.७१२ साली मुहम्मद बिन कासिम या आततायी अरबाविरुद्ध राजा दाहिर सेन, त्याचं कुटुंब तसंच अनेक वीर आणि वीरांगना लढल्या. हा लढा सत्तांध अरबांच्या आसुरी महत्वाकांक्षेविरुद्ध होता!
राजा गेल्यानंतर शोकाला आवरत दाहिरचा ज्येष्ठ पुत्र जयसिंह याला मदतीला घेऊन राणी बाई राओडच्या किल्ल्यातून लढण्याची तयारी करू लागली. सैन्य, शस्त्रास्त्रं, दारुगोळा, युद्धसाधनं तिने अधिकाधिक सक्षम केली. १५,००० सैन्याचं नेतृत्व करत त्यांना दिशा दिली. हल्ला थोपवून धरण्यासाठी (defensive)सैन्यरचना केली गेली. हातात तलवार घेऊन राणी बाई आवेशात बोलत होती, “सिंधच्या वीरांनो,कासिमला शरण जाऊ नका. मरण आज ना उदय येणारच आहे. आत्मसन्मानासाठी आपण लढूया.” कासिम सैन्यासह राओड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. चाचनामात त्या वेळचं वर्णन स्पष्टपणे केलेलं आहे, “नौबती झडाडू लागल्या, किल्ल्याच्या बुरूजांवरुन तुतार्यांचे आवाज निनादू लागले. याबरोबरच किल्ल्यावरून दगडांची, बाणांची , भाल्यांची सरबत्ती अरबांवर कोसळली!” मुहम्मद बिन कासिमनं परिस्थितीचा अंदाज घेऊन किल्ल्याच्या तटबंदिशी सुरुंग लावले. ते उडवून आत प्रवेश करण्यासाठी भूमिगत जागा मिळणार होती. पण त्याला वाटलं होतं तितकं सोपं नव्हतं राओडचा किल्ला जिंकणं!
पुढे योजना बदलून कासिमनं त्याच्या सैन्याला दोन भागांमध्ये विभागलं. एक तुकडी दिवसा तर एक रात्री लढत होती. कासिमनं रात्रंदिवस सलग मारा सुरू केल्याने राणी बाई आणि सैन्य अविश्रांत लढत होते. शत्रूवरती नियोजनबद्ध पद्धतीने आगीचे गोळे तसंच दगड फेकत होते. पण अखेरीस सुरुंगाच्या मदतीने अरबांनी किल्ल्याचे बुरूज उडवले गेले आणि त्यांनी किल्ल्यात प्रवेश मिळवला. अल्ला-हू-अकबर असा नारा किल्ल्यात घुमू लागला. राणी बाई आणि किल्ल्यावरच्या स्त्रियांना आता अंदाज आला की किल्ला शत्रूच्या तावडीत जाणार. तसंच ते शहर पूर्णपणे अरबांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे बाहेर पडून कुठेही जाण्याचा पर्याय उरला नाही. आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी जोहर पेटवला आणि त्यात उड्या टाकल्या!त्यांचा आक्रोश ज्वालांमध्ये सामावून शांत झाला...! सिंधमधल्या स्त्रियांना शेवटचं संबोधित करणारे राणी बाईचे शब्द इतिहासात नोंदवून ठेवलेले आहेत. ते आजही काळीज पिळवटून टाकतात! हे साल होतं ७१२. ( हा भारतातला पहिला जोहर नव्हता!)
अरब सैन्यानं आत धाड टाकली तेव्हा त्यांच्या हाती लागली या वीरांगनांची जळालेली शरीरं आणि राख! कासिमने राओडच्या किल्ल्यात ३ दिवस मुक्काम केला. या दरम्यान राओडच्या किल्ल्यातून लढणार्या हजारो सिंध वीरांना बंदी बनवून त्यांची क्रूरपणे कत्तल करण्यात आली. या वीरांच्या बायका, मुलं गुलाम म्हणून ताब्यात घेण्यात आले. राओडच्या किल्ल्यातली प्रचंड संपत्ती ,शस्त्रास्त्रं अरबांनी ताब्यात घेतले. आतापर्यंतच्या लढाईमध्ये चाचनामात नोंदवून ठेवल्याप्रमाणे जवळपास साठ हजार माणसं गुलाम म्हणून पकडण्यांत आली ज्यात राजमहालातल्या ३० स्त्रियाही होत्या. मुख्य म्हणजे राजा दाहिराच्या किशोरवयातील मुली सूरजदेवी आणि परिमलदेवी यांनाही पकडण्यात आलं.
ज्या उध्वस्त झालेल्या शहरातून त्यांना गुलाम करून नेण्यांत येत होतं त्या शहरात त्यांच्या आत्तापर्यंतच्या सुख-समृद्धी आणि वैभवाच्या आठवणी होत्या. फुलांचे गालिचे पसरलेले रम्य रस्ते आता स्वकियांच्या रक्तानं निसरडे झाले होते. प्रजाजनांच्या जयजयकाराने हे नगर दुमदुमून जात असे, ते या राजकन्यांना प्रेम आणि आदराने अभिवादन करत असत. आता त्यांच्याच विद्रूप शरीरांचे खच जिकडे तिकडे पडलेले होते! पवित्र सिंधुमध्ये रक्ताचे पाट मिसळून ती लाल झाली होती.
खालीफाच्या जनानखान्याची शोभा वाढवण्यासाठी त्यांना थेट दमास्कस इथे पाठवण्यात आलं. तिथले लोक या गुलामगिरीला, अमानुषतेला सरावलेले होते. मुलींचं शील भग्न करणं त्यांचा नित्याचा खेळ होता. असंख्य लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि स्वाभिमानावर खलिफानं त्याचं सिंहासन प्रस्थापित केलं होतं.
काही महिन्यांच्या कालावधीनंतर (प्रशिक्षित करून) त्यांना खलिफा अल – वालिद याच्या पुढे सादर करण्यात आलं. त्यांच्या अद्वितीय सौंदर्याने खलिफा वेडा झाला. तिथल्या दुभाषाच्या मदतीने मोजकं संभाषण सुरू झालं. खलिफा पुढे येण्याआधीच सूरजदेवी त्याला आदराने म्हणाली, “खलिफाचा विजय असो! मी एक क्षुद्र गुलाम आहे, मी तुमच्या शयन कक्षायोग्य नाही. कारण मुहम्मद बिन कासिमनं आम्हा दोघींना त्याच्या बरोबर ३ दिवस ठेवलं आणि मग (उपभोग घेऊन) तुमच्याकडे पाठवलं. तुमच्याकडे बहुधा ही पद्धत असावी नाहीतर अशा प्रकारचा अपमान कोणताही राजा सहन करणार नाही.” ते ऐकताक्षणीच तो भयंकर संतापला. अरब इतिहासकारांनी नोंदवून ठेवल्याप्रमाणे “खलिफाचा संयम पूर्णपणे सुटला.” रागानं धुमसत इतर कोणताही विचार न करता त्याने स्वत:च्या हाताने आज्ञा लिहिली, “मुहम्मद बिन कासिम जिथे कुठे असेल तिथे त्याला पकडून चामड्याच्या पिशवीत बंद करून त्वरित खलिफाकडे रवाना करण्यांत यावं.” आज्ञेच्या अंमलबजावणीसाठी पुढची सगळी सूत्र लवकर हलवण्यात आली.
ज्यावेळी कासिमचं गतप्राण झालेलं शरीर दरबारात खलिफासमोर पिशवीतून बाहेर काढण्यात आलं, इतिहासात नोंदवून ठेवल्याप्रमाणे त्यावेळी सूरजदेवीने मोठंच धाडस दाखवून हे मान्य केलं, “वस्तुस्थिती ही आहे की कासिमनं आम्हाला कधीही स्पर्श केला नाही. आमचं शील अबाधित आहे. पण त्यानं सिंधची भूमी उध्वस्त केली,आमच्या वाडवडिलांचा इतिहास जाळून भस्म केला. मंदिरं उद्ध्वस्त केली. अशा माणसाला अपमानकारक पद्धतीने संपवण्यासाठी आम्ही असं बोललो. आमचा उद्देश सफल झाला. जर वासनेची पट्टी खलिफाच्या विवेक आणि न्याय बुद्धीवर बांधली गेली नसती, तर आज तुमच्यावर स्वत:ला दोष देत पश्चात्ताप करण्याची वेळ आली नसती!”
हे अनपेक्षित सत्य ऐकून खलिफाला प्रचंड मोठा धक्का बसला. तो संतापला. जो पराक्रमी सरदार त्याच्यासाठी धुवांधार लढला, ज्याने ठिकठिकाणच्या राजवंशातल्या अशा हजारो सुंदर मुली गुलाम म्हणून खलिफाकडे आणल्या, ज्याने अनेक राजांचे मुकुट त्याच्या पायाशी जिंकून आणले, त्याच्यावर या दोन मुलींमुळे असा मृत्यू ओढवला होता. संतप्त झालेल्या खलिफाने या दोन दाहिर कन्यांना भिंतीत जिवंत गाडण्याचा हुकूम सुनावला! सैनिकांकरवी सगळ्या शहरात घोड्याच्या शेपटाला बांधून फरपटत तशाच जखमी अवस्थेत त्यांना एका भिंतीच्या अरुंद पोकळीत जिवंत चिणलं गेलं! सूरज आणि परिमल दोघींनी मृत्युला अत्यंत धैर्यानं स्वीकारलं!
कासिमच्या आक्रमणादरम्यान आणि नंतर सिंध प्रांतात हिंदूंची धर्मांतरं एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली, की त्यांना हिंदू धर्मात परतण्यासाठी उपाय योजना म्हणून याच काळात ‘देवल स्मृती’ लिहिली गेली. देवल स्मृतीची सुरुवातच ‘सिन्धुतीरे सुखासीनं देवलं मुनिसत्तमम्|’ अशी होते. सिंधच्या वीर कन्यांनो, तुमच्या बलिदानाची गाथा इतिहासात कायमची कोरलेली आहे...ती सदैव तशीच राहील! अखंड भारतातल्या समस्त दुर्गांच्या वीरस्मृतीला कडक मानवंदना! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment