शापादपि .. शरादपि!
युद्ध म्हणजे केवळ शस्त्रास्त्रं, दारुगोळा,तोफांची धुमश्चक्री किंवा वार-प्रतिवार करण्याच्या योजना नव्हेत. तर दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन अत्यंत कठोर परिस्थितीत वाट काढत कोणतं टोक गाठावं लागतं याची जाणीव झाली ते लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर सरांचं भाषण ऐकून! असामान्य अशा लष्करी प्रतिभेचे धनी असलेल्या सरांनी प्रत्यक्ष कितीतरी मोहिमांमध्ये सैन्याचं नेतृत्व केलं आहे. २०१६ सालचा Surgical strike खरंच झाला की नाही अशी शंका मनात ठेवणाऱ्यांना तर त्यांचं भाषण म्हणजे दणदणीत चपराखच! सरांचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणं हा अगदी थरारक अनुभव होता!
निमित्त होतं भारतीय विचार साधना, पुणे यांनी २० जुलै रोजी प्रकाशित केलेल्या दोन अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशानाचं. कारगिल विजयाच्या रौप्यवर्षाचं औचित्य साधून सुनेत्रा जोग यांनी मराठीत अनुवादित केलेली 'द हिरो ऑफ टायगर हिल' (कॅप्टन (ऑनररी) योगेंद्र सिंह यादव) आणि 'भारतीय वीरपत्नींच्या कथा – सैन्यामागील शक्ती' (मूळ इंग्रजी – स्वप्नील पांडे) ही दोन पुस्तकं अनेक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित असलेले लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर सर (निवृत्त) यांच्या हातून प्रकाशित केली गेली. त्यांच्याबरोबर मलाही ही पुस्तकं प्रकाशित करायला मिळणं ही माझ्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे!
२०१९ साली एका IED ब्लास्ट मध्ये हुतात्मा झालेल्या आपल्या लाडक्या सैन्याधिकाऱ्याला पुण्यात फार मोठ्या संख्येने हृदय निरोप दिला गेला – मेजर शशीधरन नायर. किती खडतर परिस्थितीत हा मुलगा सैन्याधिकारी झाला होता हे तरुण पिढीने अवश्य वाचावं. त्यांची वीरपत्नी तृप्ती नायर याही कार्यक्रमाला निमंत्रित केल्या गेल्या होत्या ही मोठीच गोष्ट आहे. सैन्याविषयी कमालीची आत्मीयता बाळगणाऱ्या सुनेत्राताईंनी स्वतः २०२१,२२ साली कारगिल, बटालिक,द्रास इथे जाऊन युद्धभूमीला,युद्धासमारकांना भेट दिली. त्यातूनच ही दोन पुस्तकं अनुवादित करून संगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आत्तापर्यंतचा प्रवास तसंच वीरपत्नी तृप्ती नायर यांच्याविषयी बोलताना कार्यक्रमात त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्यातली आत्मीयता, तळमळ मनाला स्पर्शून गेली. सुनेत्राताई, अॅड.विभावारी बिडवे आणि प्रकाशनाचं पुनश्च अभिनंदन! या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी ही माझ्यासाठी पर्वणीच होती.
‘भारतीय वीर पत्नींच्या कथा – सैन्यामागील शक्ती’ या पुस्तकातले काही उल्लेख करायचा मोह आवरत नाही. लग्नाचा पहिल्या वाढदिवस कसा साजरा करायचा ही योजना करत असलेल्या नितिका कौल आणि त्याचवेळी पुलवामा इथे चकमकीच्या दरम्यान प्राणांची आहुती देणारे त्यांचे पती मेजर विभूती दौंडियाल (शौर्य चक्र). इथून सुरू झालेला प्रवास नितिकाला कुठे घेऊन गेला हे थक्क करणारं आहे. अशीच एक अतिशय धाडसी मुलगी – मेजर प्रिया सेमवाल! पती नायक अमित शर्मा धारातीर्थी पडला, पदरात पाच वर्षांची मुलगी. परंतु अश्रू गाळत न बसता ही मुलगी खडतर परीक्षांना सामोरी गेली. शहीद सैन्याधिकाऱ्यांच्या पत्नी नंतर सैन्याधिकारी झालेल्या भारताने पहिल्या होत्या. पण प्रियाने एका सैनिकाची पत्नी खुद्द अधिकारी कशी होऊन दाखवते हा उच्चांक भारतात प्रस्थापित केला! पहिल्यांदाच अशी घटना भारतीय सैन्यात घडली. पुढे अनेक कठीण अशा सागरी मोहिमांचं नेतृत्व करत ही वीरांगना आर्मीमध्ये आजही मोठं योगदान देत आहे.
अशीच एक प्रेरित करणारी प्रेमकथा म्हणजे लान्स नायक राजकुमार महतो याची पत्नी जया महतो हीची! झारखंड इथल्या छोट्या गावात हा सैनिक जया हिला लग्न करून घेऊन आला. तिच्या शिक्षणासाठी त्याला घरात खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि ती सुद्धा शेतात,घरात राबून शिकत राहिली. जणू राकेश तिला पुढच्या परिस्थितीसाठी तयार करत होता. तो अतिशय सामर्थ्यशाली असा कमांडो झाला, पण सैनिक जणू त्याच्या स्वतःच्या प्राणांचा फक्त विश्वस्त असतो. वेळ आली की त्याला तो देऊन टाकावा लागतो! तसाच राकेशने दिला. तो हुतात्मा झाल्यावर तिच्या आव्हानांमध्ये आता दोन मुलांची भर होती. तिथून ती कशी उभी राहिली ....शिक्षणक्षेत्रात ती कुठवर गेली.. हे प्रत्यक्ष वाचण्यासारखंच आहे!
क्या उनका भी मिट्टी का तन
हम तुम जैसा रज का ही कण?
फिर क्यों हम इतने अकर्मण्य
और वे क्यों इतने कर्मवीर!
होते ही क्या रक्तरंजित या
वज्रपूर्ण ऊनके शरीर!
किस रज से बनते कर्मवीर!
या कथा असाच प्रश्न आपल्या मनाला विचार करायला उद्युक्त करतात. भारतीय स्त्री शक्तीची ही गाथा प्रत्येकाने अवश्य वाचा. दोन्ही पुस्तकं खरेदी करण्याची link खाली comments मध्ये देत आहे.
ज्यासाठी सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं त्या भारताच्या सीमांबरोबरच संपूर्ण समाजही सुरक्षित रहावा, सशक्त होत जावा. हे काम अशा पुस्तकांमधून निश्चितच साध्य होऊ शकतं. शस्त्रं, शास्त्र आणि आपल्या ठायी असलेलं प्रत्येक कौशल्य हे त्यासाठीचं माध्यम व्हावं ही या कारगिलच्या रौप्य महोत्सवी मनोमन इच्छा!
जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)
Comments
Post a Comment