अंतरंग अपराजितांचे - ९

समर्पण

१९३२ चं साल उजाडलं तेच मुळी विद्रोहाच्या गर्जनेने! हिंदुस्थानच्या दाही दिशांतून एकच स्वर ऐकू येत होता – स्वातंत्र्य!याचवेळी मणिपूरमधली एक युवती तिच्या सैन्यासह इंग्रजांविरुद्ध तूफान लढत होती!जंगल,दऱ्या,डोंगर सगळे तिला साथ देत होते!गनिमी काव्याने लढत इंग्रजांना शह देणारी ही स्वातंत्र्यवेडी युवती म्हणजे राणी गाइदिन्ल्यू!
इंग्रजांनी मणिपूरमधल्या अनेक आदिवासी जमातींना मजूर म्हणून वापरायला सुरुवात केली. अत्यंत स्वस्तात हे मनुष्यबळ त्यांना मिळालं. याशिवाय प्रत्येक घरातून त्यांनी कर वसूल करण्यासाठीही सुरुवात केली. हे अत्यंत अन्यायकारक होतं. याविरुद्ध जदोनांग यांनी सुरू केलेली हेरका चळवळ खूप वाढत गेली. तिचं नेतृत्त्व गाइदिन्ल्यूकडे आलं. अवघ्या १७ वर्षांच्या या युवतीला गावागावातून लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. त्यांच्यातल्या असंतोषाला, पिळवणुकीला तिनं दिशा दिली. तिच्या नेतृत्वाखाली ३ ते ४ हजार सशस्त्र सैनिक एकत्र आले. आसाम, नागालँड,माणिपूर या भागात जंगलांमधून फिरत ती गनिमी काव्यानं लढू लागली. इंग्रजांच्या चौक्यांवर हल्ले करून अत्यंत चपळाईनं ती सैन्यासह पसार होत असे. इंग्रज अधिकारी अक्षरशः हतबल झाले. त्यांनी आसाम रायफल्सच्या विशेष कौशल्य असलेल्या सैन्याला त्या भागात तैनात केलं. तिच्या शोधात त्यांनी गावकर्यांना त्रास देऊन जाळपोळही केली. शेवटी त्यांना तिच्यासाठी लवलेलं बक्षीस ५०० रुपये एवढं वाढवावं लागलं. तिची कोणतीही माहिती देणार्याला १० वर्षांसाठी कर माफ करण्यात येईल अशीही घोषणा झाली.परंतु ती हाती लागेना!
१६ मार्च १९३२ रोजी हॅंग्रम (आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यात)इथल्या ब्रिटिश छावणीवर गाइदिन्ल्यू आणि तिच्या सैन्यानं जोरदार हल्ला केला. घमासान लढाई झाली. ही आसामच्या इतिहासात हॅंग्रमची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. अथक प्रयत्नांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १७ ऑक्टोबर १९३२ रोजी गाइदिन्ल्यू आणि तिचे अनेक सहकारी इंग्रजांनी कैद केले. त्यांना कोहिमा इथल्या जेलमध्ये ठेवलं. मणिपूरचा राजकीय प्रतिनिधी मि. हिगिन्स (Mr. Higgins) यानं तिच्यावर खटला चालवला. या वाघिणीला ७ मार्च १९३३ रोजी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली!
आपल्या तारूण्याची समिधा वाहून राणी गाइदिन्ल्यूनं १४ वर्षं सश्रम कारावास भोगला. या दरम्यान तिला कोहिमा, गुवाहाटी,शिलॉन्ग,जोरहाट, ऐजवाल, तुरा अशा अनेक ठिकाणच्या जेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. १९४६ साली हिंदुस्थानचं अंतिम सरकार तयार झाल्यावर तिची सुटका करण्यात आली! सुटकेनंतर स्वतंत्र भारतातही राणी गाइदिन्ल्यू नागालँड आणि इतर प्रदेशांना भारताशी जोडून ठेवण्यासाठी अविरत कार्य करत राहिल्या. एक स्वातंत्र्य सेनानी आणि नंतर एक समाज सुधारक म्हणून जिनं झेमे,लियांग्मई, रोंग्मई,इंग्पुई अशा आसाम,माणिपूर,नागालँड या भागांमध्ये पसरलेल्या अनेक नागा आदिवासी जमातींचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, नागा संस्कृतीचं पुनरुत्थान करण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. १९८२ साली पद्मभूषण देऊन राणीला गौरवण्यांत आलं.
भारतात उसळलेली सशस्त्र क्रांतीची लाट प्रचंड मोठी होती. आसामची कनकलता असो वा बंगालमधल्या युवती..त्यांनी छातीवर गोळी झेलत सर्वोच्च बलिदानाचे अध्याय लिहिले. तारुण्याची नवी व्याख्याच जणू रुढ केली!
कदम कदम बढाए जा...खुशीके गीत गाए जा..
ये जिंदगी है कौम की..तू कौम पे लुटाए जा...!
हे गीत गात मार्चिंग करणारी, ‘जय हिंद’असं अभिवादन करणारी नेताजी सुभाष चंद्र बोसांची आझाद हिंद सेना!याच सेनेचा एक मुख्य भाग म्हणजे भारतीय युवतींची सशस्त्र पलटण - राणी झाशी रेजिमेंट! सामान्य घरातून येऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी ऑक्टोबर १९४३ ते ऑगस्ट १९४५ पर्यंत ‘युद्धापातळीवर’ अथक परिश्रम करणार्या झाशी रेजिमेंट मधल्या सक्रिय युवतींनी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रकट करत मोठाच इतिहास रचला. दुसर्या महायुद्धाची संधी साधून जपानच्या सहाय्याने भारतातल्या ब्रिटिशांवर आक्रमण करण्याची नेताजींची मुख्य योजना होती. त्यासाठीच सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर दृढ विश्वास ठेऊन आझाद हिंद सेनेच्या जवानांबरोबर लढणासाठी सज्ज होत्या या शेकडो धाडसी वीरांगना!
“स्वातंत्र्याची किंमत आहे रक्त! ही किंमत देऊन आपण स्वातंत्र्य मिळवू.” या ध्यासाने नेताजी भारावलेले होते. भारत पुन्हा एकदा झाशीच्या राण्या घडवू शकतो आणि विजयाकडे वाटचाल करू शकतो असा नेताजींचा दृढ आशावाद होता. त्यातूनच राणी झाशी रेजिमेंटची स्थापना झाली. सिंगापूर, इंडोनेशिया, शांघाय, हाँग काँग, फिलीपाईन्स असे अनेक ठिकाणी विखुरलेले भारतीय लोक होते.याच घरातल्या युवती भारताच्या स्वातंत्र्यासाठी सरसावल्या होत्या. “हो...आम्ही स्वातंत्र्य युद्धासाठी आयुष्य समर्पित करायला इथे आलो आहोत... हा देह रणांगणावर राष्ट्राच्या कामी यावा यासारखा त्याचा गौरव नाही!” असं सांगण्याची संधी त्यांना मिळाली होती.
या रेजिमेंट मध्ये २ मुख्य पथक होते. लढाऊ पथक आणि परिचारिकांचं पथक. राण्यांची छावणी अत्यंत शिस्तबद्ध होती. प्रवेशद्वाराजवळ हातात तलवार, खांद्याला रायफल, कमरेला पट्टा, त्यात अडकवलेलं पिस्तूल अशा लष्करी गणवेशात आत्मविश्वासाने पहारा देणार्या या राण्या खूप धीट होत्या. सकाळ, संध्याकाळ मोकळ्या मैदानावर कडक प्रशिक्षण चाले. समर्पण, स्वातंत्र्य आणि समान नेतृत्वावर दृढ विश्वास या सूत्रात बांधल्या गेल्या होत्या. वडिलांप्रमाणे काळजी घेणार्या नेताजींची राण्यांच्या मनांत अतिशय पूज्य अशी प्रतिमा होती. याचं मुख्य कारण होतं नेताजींचं स्वच्छ चारित्र्य!
प्रशिक्षित राण्या प्रत्यक्ष युद्धासाठी में १९४४ मध्ये योजनेप्रमाणे निघाल्या. पुढचा सगळा प्रवास फारच कठीण होता. तेव्हा सतत हवाई हल्ले होत होते. त्यातून वाचण्यासाठी अधून मधून बाहेर जाऊन खाली निपचीत पडावं लागे. उठून पायी अंतर कापावं लागे. बराच मोठा रस्ता हा जंगलांमधून होता. जंगलात जळवांचा सुळ सुळाट असल्याने जळवा आत घुसून शरीराला चिकटून बसत. रक्त शोषत. त्यांना काढून टाकावं लागे. हे अत्यंत वेदनादायी होतं. अशा प्रकारे त्या असंख्य संकटांना तोंड देत पुढे जातच राहिल्या. एका रात्री त्या ज्या शाळेत थांबल्या होत्या त्यावर बॉम्ब हल्ला झाला.मन खचून जाईल, निराशा येईल अशा अनेक घटना अवती भोवती घडत होत्या. पण राण्या अदम्य साहसाने त्यातून बाहेर पडून पुढे वाटचाल करत होत्या.
मात्र दुसर्या महायुद्धांत जपानी सैन्याचा बर्याच ठिकाणी पराभव झाला. म्यानमारमधून जपानी सैन्य माघारी वळवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. त्यामुळे ते भारतीय सैन्याला कोणतीही मदत देऊ शकणार नव्हते हे उघड होतं. राण्यांना सुद्धा परत फिरण्याचे आदेश मिळाले. मोठा आघात होता तो त्यांच्यासाठी. यावेळी नेताजींनी केलेलं भाषण अत्यंत हृदयस्पर्शी होतं. “आपण माघार घेतली पण ही तात्पुरती आहे. भारत स्वतंत्र होईपर्यंत आपण थांबायचं नाही. माणसानं आशावादी असलं पाहिजे. निराशा मनाला शिवू देऊ नका.” राण्यांच्या धैर्याचं, निश्चयाचं त्यांनी खूप कौतुक केलं.
परतीचा प्रवास अतिशय वेदनादायी होता. सगळ्या राण्या सामान आणि बंदुकांसह पाण्यांत उतरल्या. गळ्या एवढ्या पाण्यातून धाडसाने नदी पार करणार्या राण्या पाहून बरोबरचे अधिकारीही गहिवरले! बॉम्ब हल्ले आणि मशीनगनच्या मार्यातून स्वतःला वाचवत खेड्यांमद्धे लपत छपत,आडोसा घेत नेताजी आणि राण्यांनी अनेक मैल पार केले. त्यांची जिद्द, त्यांचं धैर्य, शिस्त, राष्ट्रभक्ती...सगळं नतमस्तक करणारं आहे! भारत त्यांचं समर्पण कधीही विसरणार नाही!त्यांना कडक सॅल्युट! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.) ©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही