कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं...
हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते, श्रीस्वतंत्रते |
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण ||
तो तिथे...अगदी समोर मृत्यू दिसत असतांनाही त्यात बेदरकारपणे स्वतःला झोकून देणारं निर्मोही तारुण्य कोणत्या हाडामांसानं तयार झालेलं असतं? भीतीचा लवलेशही न वाटू देता ‘मी उद्या या जगात नसेन’ असं शांतचित्तानं लिहून ठेवणारा सैनिक मृत्युच्या भीतीवर नेमका कसा मात करतो? ‘हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम्’ हे गीतेचं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणांत कसं आणतो? अशी असंख्य कोडी घालणार्या कारगिलच्या युद्धातल्या एकेक वीरगाथा! पुन्हा पुन्हा स्फुरण चढवणार्या आणि अंतर्मुख करणार्याही. ‘सैनिक केवळ वीरमरणाचे अधिकारी असतात...त्यांच्या शौर्याचा सन्मान करा. भ्याडासारखं त्यांना अमानुष छळून तुम्ही काय मिळवलंत?’ असा आपला आक्रांत पाकिस्तानला कधी कळेल का? त्यांच्या नीच कृत्यांनी जीव कासावीस करणारे व्यथांचे ओरखडेही या युद्धानं आपल्याला दिले. म्हणून २६ जुलै - कारगिल विजय दिवस अभिमान आणि वेदना दोन्ही एकत्र घेऊन येतो. माध्यमांनी पहिल्यांदाच लोकांपर्यंत नेलेलं, सामरिक दृष्टीनं आणि एक राष्ट्र म्हणून अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेलं हे युद्धं भारताला खूप काही शिकवून गेलं. यात अनेकांनी राष्ट्ररक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली. या मालिकेतलंच एक पुण्यस्मरण म्हणजे कॅप्टन विजयंत थापर. त्यांच्या अजरामर पत्रांमुळे त्यांची गाथा आठवणींच्या पोतडीतून वर येत रहाते. २०२० साली प्रकाशित झालेलं त्यांचं चरित्र परवा परत एकदा वाचण्यांत आलं आणि आज त्यांची आवर्जून आठवण झाली.
आर्मीमध्ये येणारी कुटुंबातली चौथी पिढी म्हणजे कॅप्टन विजयंत थापर. लहानपणापासून रायफल्स, रणगाडे, सैन्य याच वातावरणात वाढलेल्या या बालकाचं नाव ‘विजयंत’ हेही एका मुख्य battle tank चं नावच! वडीलांची cap घालून खेळणार्या या मुलानं एके दिवशी स्वतःची peak cap मिळवली!त्याच्या खांद्यावर तारे चमकू लागले. उत्कृष्ट जलतरणपटू आणि अत्यंत साहसी असलेले विजयंत एक जवाबदार सैन्याधिकारी झाले.
जून १९९९. २ राजपुताना रायफल्समध्ये पोस्टिंग असलेले कॅप्टन विजयंत आता कारगील युद्धाच्या प्रत्यक्ष मोहिमेवर जाणार होते. या रेजिमेंटची युद्धगर्जना आहे ‘राणा रामचंद्र की जय’! यांच्या बटालियनला टोलोलिंग हा भाग घेण्याची आज्ञा झाली. कर्नल रविंद्रनाथ यांच्या मुख्य नेतृत्त्वाखाली आपला प्लटून पुढे नेत कॅप्टन थापर यांनी पाकिस्तानचा एक बंकर उध्वस्त केला, २ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. आपल्या साथीदारांसह त्यांनी १३ जून रोजी टोलोलिंग या ठिकाणावर मिळवलेला विजय हा कारगिल युद्धातलं एक महत्त्वपूर्ण वळण होतं. असंख्य भारतीय सैनिकांनी इथेच आपल्या शौर्यानं आकाशाला गवसणी घातली आणि सर्वोच्च बलिदान दिलं. म्हणून टोलोलिंगच्या पायथ्याशी कारगिल युद्ध स्मारक बांधण्यांत आलं आहे.
मिशन थ्री पिंम्पल्स:
तीन उंचवटे असलेलं हे ठिकाण काबीज करण्याच्या दृढ निश्चयानं २८ जून रोजी मेजर मोहित सक्सेना यांनी डेल्टा कंपनी तर मेजर आचार्यांनी आपल्या अल्फा कंपनीबरोबर कूच केलं. कॅप्टन विजयंत हेही एका आघाडीवर होते. तुलनेनं शत्रूच्या बाजूचं बळकट असा हा मोर्चा आणि चढाईसाठी अत्यंत कठीण असा हा ‘नॉल’ (Knoll) डोंगरकडा होता. सावधपणे हळूहळू भारतीय सैन्य पुढे सरकत होतं. संपूर्ण प्रयत्नानिशी चकमक सुरू होती. एकेक मोहरा कामी येत होता. त्यातच कॅप्टन विजयंत यांचे साथीदार धारातीर्थी पडले. मशीनगनचा संतत मारा शत्रूकडून सुरू झालेला होता. हा थांबवणं अत्यंत गरजेचं होतं. तिथूनच पुढे जेमतेम २-३ माणसे जाऊ शकतील एवढी अरूंद अशी बोळ होती. नायक तिलक सिंह याला घेऊन कॅप्टन विजयंत त्या वाटेनं पुढे निघाले. जिवाला मोठाच धोका होता. तथापि ते पुढे सरसावले. मात्र या ठिकाणी डोक्याला गोळी लागून कॅप्टन विजयंत कोसळले.
त्यांचं नेतृत्त्व इतकं खंबीर होतं की त्यांच्या नंतरही भारावलेल्या भारतीय सैन्यानं मिशन यशस्वी केलं आणि २९ जूनच्या संध्याकाळपर्यंत शत्रूची एकेक पोस्ट घेत अखेरीस थ्री पिंपल्स हे ठिकाण जिंकून घेतलं. मेजर आचार्य, कॅप्टन केंगुरूसे हे दोघेही या मिशनमध्ये धारातीर्थी पडले.पोटात गोळी लागून रक्तबंबाळ झालेल्या कॅप्टन केंगुरूसे या नागा अधिकार्यानं तशाही अवस्थेत पुढे जाऊन दोन पाकिस्तान्यांना मारलं आणि मगच प्राण सोडले. मेजर पद्मपाणी हे देखील ग्रेनेडच्या स्फोटानं जखमी झाले आणि आपल्या प्राणांचं सर्वोच्च बलिदान त्यांनी केलं. अशा रोमांचित करणार्या शौर्यगाथांचा साक्षीदार आहे कारगिलचा इतिहास! विजयाचे अध्याय या वीरांनी आपल्या रक्तानं लिहिले आहेत.
कॅप्टन थापर यांना सर्वोच्च बलिदानासाठी मरणोपरांत वीरचक्र प्रदान केलं गेलं. रॉबिन या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या कॅप्टन थापर यांनी लिहिलेलं शेवटचं पत्रं अचंबित करणारं होतं. मृत्यूचं दाट सावट मनोमन ओळखून हा नायक खात्रीनं लिहितो, “तुम्हाला हे पत्रं मिळेपर्यंत मी स्वर्गात अप्सरांचा पाहुणचार घेत घेत तुम्हाला वरून बघत असेल.मला कशाचाही पश्चात्ताप नाही. मला पुन्हा मनुष्य जन्म मिळालाच तर मी पुन्हा सैन्यदलात जाऊन आपल्या राष्ट्रासाठी लढेन. तुमच्या भविष्यासाठी आज भारतीय सैन्यदल कुठे लढलं ते शक्य असेल तेव्हा अवश्य येऊन पहा. तसंच आपल्या यूनिटमध्ये येणार्या सर्वांना या बलिदानाची कल्पना द्या. माझा फोटो अल्फा कंपनीच्या मंदिरात लागेल अशी मला आशा आहे. माझे जे काही अवयव काढून दान करता येतील ते करावे. बाबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल.” याबरोबरच अनाथालयाची देणगी असो वा नकळत घडलेल्या काही चुकांची टोचणी...पत्रातून सगळं काही दिलदारपणे व्यक्त करून हा सेनानायक मिशनवर निघाला होता.
त्यांचे वडील,कर्नल व्ही. एन. थापर यांनी आपल्या मुलाच्या या पत्राला उत्तर लिहिलं आहे – “ प्रिय बाळा, अवघ्या बाविसाव्या वर्षी ज्या शौर्यानं तू या जगाचा निरोप घेतलास त्यावरून तू तुझं हे छोटं आयुष्य तू कसं जगलास आणि कोणत्या मूल्यांवर ते आधारित होतं हे कळतं. थ्री पिंपल च्या लढाईत सगळ्या संकटांवर मात करून नॉल हे शिखर काबीज करण्याचं कर्तव्य बजावत तू शाश्वत सन्मान मिळवलास. मृत्यूला अशा प्रकारे कवटाळून तू राष्ट्राच्या अभिमानाचा परमोच्च बिन्दु गाठलास – खरंच राष्ट्राच्या सन्मानार्थ केलं गेलेलं प्रत्येक बलिदान हे सत्कारणीच लागतं. तुझं हे शौर्य भारतातल्या येणार्या पिढ्यांना सदैव प्रेरित करेल. अशा पराक्रमी मुलाचे आम्ही पालक आहोत हा अभिमान आमच्या बरोबर कायम असेल. मात्र त्याबरोबरच आम्ही ज्याच्यावर खूप माया केली त्या बाळाला गमवल्याची चिरंतन वेदनाही असेल!” हे वाचून आपण नि:शब्द होतो.
धन्य आहे तो पुत्र आणि त्याचे माता पिता! आणि धन्य आहे आपलं भारतीय सैन्यही जे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. वेदनेची किनार असली तरी कारगिलचं हे युद्धं सदैव विजयाचं प्रतीक म्हणून आपल्या मनांत तेजाळत राहील. या वीरांपुढे आपण केवळ नतमस्तक होऊ शकतो. या वीरगाथा आपण मुलांपर्यंतही पोहोचवल्या पाहिजेत, त्यांची उजळणी केली पाहिजे. त्यातून एवढी प्रेरणा पाझरते की आपण आपसुखच आपापल्या कोशातून बाहेर पडतो. आपली शिखरं जिंकून घेण्यासाठी प्रयत्नशील रहातो. ज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं त्याचा सन्मान सदैव राखला जाईल, त्याला कोणताही डाग लागणार नाही असंच वर्तन भारताचे नागरिक म्हणून आपल्याकडून निरंतर घडो या प्रार्थनेसह कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं या वीरांना कडक मानवंदना! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे -कुलकर्णी (नि.)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही