पत्रभेट कारगिल योद्ध्यांशी
– वेदनेतून विजयाकडे...
काही लेख लिहिल्यावर आपल्याला खूप आत्मिक समाधान मिळतं. अशाच एका लेखाची संधी मला यावर्षीच्या ‘पत्रभेट’ दिवाळी अंकांमुळे मिळाली. कारगिल युद्धाचं हे पंचविसावं वर्षं. या निमित्तानं या युद्धाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकणारा लेख लिहिण्याचा प्रस्ताव Mangeshजींनी ठेवला त्याच वेळी झालेल्या चर्चेतून त्यांचा या विषयावरचा सखोल अभ्यास, जिव्हाळा मला जाणवला आणि मी थक्क झाले! थोडा अभ्यास करून ‘पत्रभेट’ या नावाला साजेसा भारताच्या इतिहासातला एक संवेदनाशील कोपरा या निमित्तानं प्रकाशात आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.
अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कारगिल युद्धाची एक अत्यंत हळवी बाजू म्हणजे या दरम्यान लिहिली गेलेली पत्रं आणि डायरीची पानं! त्यावेळी आजच्यासारखे smart phones नसल्यानं आजच्यासारखं whats App, video calls असं काहीही उपलब्ध नव्हतं. सीमेलगतच्या दुर्गम भागातून कुटुंबाशी संवाद साधणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती. त्यामुळे किती तरी गोष्टी या पत्रभेटीतून उलगडल्या गेल्या. दुर्दैवानं यातली बहुतांश पत्रं त्या वीरांच्या आयुष्यातली शेवटची पत्रं ठरली. कारगिलच्या युद्धस्मारकात रोवलेल्या त्या स्मरणशीळांमागची एकेक कथा अंतर्मनाचा ठाव घेणारी आहे. ही पत्रं केवळ युद्धजन्य परिस्थिती वा तिथल्या भीषणतेची साक्ष देत नाहीत तर आव्हानात्मक असलेल्या सैनिकी जीवनाच्या अनेक बाजू यात प्रतिबिंबित होतात.
दिवाळीच्या निमित्तानं या लेखातल्या काही ओळी इथे देण्याचा मोह होत आहे - प्रत्यक्ष युद्धाला सुरू होण्याआधी १९९८ सालाच्या शेवटच्या २-३ महिन्यांत सीमेवर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार खूप वाढला होता. ४ जाट रेजिमेंटमध्ये कारगिल जिल्ह्यातल्या दालूनंग इथे तैनात असलेले कॅप्टन अमित भारद्वाज १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या डायरीत नोंदवतात, “दिवाळीचा हा प्रकाश म्हणजे सत्यानं असत्यावर मिळवलेला विजय! यावेळी इथे भीषण थंडीत आम्ही शत्रूच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहोत. घरी लक्ष्मी पूजन सुरू असेल. दिवा लावताना आईचा हात माझ्या आठवणीनं थंबकत असेल.बाबा तिची समजूत काढत असतील. पण मुलाच्या आठवणीनं व्याकूळ होणारी ही एकमेव आई नाही. अशा अनेक वीरमातांची पराक्रमी मुलं शत्रूनं एक पाऊलही पुढे येऊ नये म्हणून या दुर्गम भागात प्राणांची बाजी लाऊन लढत आहेत. माझ्या आईला तरी आशा आहे की सुट्टी मिळाल्यावर मी येईन, पण माझे साथीदार अर्जुन आणि सतपाल धारातीर्थी पडले. त्यांच्या आईला कसं वाटत असेल!” पुढे या संवेदनशील अधिकाऱ्यानं मोठाच पराक्रम केला. या शब्दांमध्ये, अनेक पत्रांमध्ये उमटलेल्या वीरांच्या संवेदना आणि त्या त्या मोहिमांमध्ये शौर्य गाजवताना सर्वोच्च बलिदानापर्यंत लढण्याची त्यांची उर्मी, त्यातून येणारी कर्मयोगाची प्रचिती अशी गुंफण या दीर्घलेखात आहे. अवश्य वाचा. सीमेवरून लिहिलेली ही हृदयस्पर्शी पत्रं, वीरांचे हे शब्द मन:पटलावर कायमचे कोरले गेले आहेत. हा प्रेरणेचा स्त्रोत पुढच्या पिढ्यांपर्यंत असाच नेत राहू आपण.
रणांगणावर प्रकटलेलं वीरांचं शौर्य हा त्यांच्यातल्या अध्यात्माचा, आत्मबळाचा एक उत्तुंग आविष्कार असतो. हाच विचार पुढे नेत अध्यात्म,शौर्य,विज्ञान,तंत्रज्ञान यांची एकत्र, घट्ट वीण कशा प्रकारे आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे याची प्रचिती या अंकाच्या निवडक लेखांमधून येते. ज्ञानी लेखकांचे हे लेख अनुकरणीय आणि संग्रहणीय आहेत. म्हणून हा अंक आपण सगळ्यांनी अवश्य वाचावा. त्यांच्याबरोबर एकाच अंकात लिहिणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. हा अंक online ही मागवता येतो.
मंगेशजी, आपण दाखवलेला स्नेह, विश्वास आणि आदर यासाठी मी आपली ऋणी आहे. आपण या लेखाबरोबर पाठवलेलं हृद्य पत्रं खूप आवडलं. अशा प्रकारे पत्राद्वारे लेखकांची कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली पद्धत स्तुत्य आहे. मन:पूर्वक धन्यवाद! छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्याला माझ्या अनंत शुभेच्छा! सद्गुरूंची कृपा आपल्यावर सदोदित राहो. दिवाळीच्या या शुभपर्वात भारताच्या स्वातंत्र्यलक्ष्मीला कोटी कोटी वंदन आणि सीमेवर तिचं पूजन करणाऱ्या वीर उपासकांना मानवंदना! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही