अंतरंग अपराजितांचे -२

शौर्य

‘नमस्ते शारदे देवी ‘काश्मीर’पुरवासिनि...’ शारदेच्या उपासनेनं,विद्वानांच्या शास्त्राभ्यासानं आणि शंकराचार्यांच्या तप:सामर्थ्यानं पुनीत झालेली भूमी काश्मीर! याच काश्मीरमध्ये चित्तथरारक अशा अनेक लढाया वितस्ता (झेलम)नदीने पाहिल्या!इथला इतिहास कितीतरी रणरागिणींच्या स्वतंत्र वृत्तीची, प्रशासनाची आणि मुख्य म्हणजे रणकौशल्याची साक्ष देतो. “…वायुपुत्रायितं पङ्ग्वा तया संघाब्धिलङ्घने..! - ज्या अपंग राणीच्या शक्तीवर सुरुवातीला कुणी विश्वास ठेवला नाही..तिने हनुमंताने समुद्र ओलांडावा तितक्या सहजपणे शत्रूला मागे सारलं (पराजित केलं)!” अशा अनेक नोंदी जिच्याविषयी कवी कल्हण आपल्या राजतरंगिणी या ग्रंथात करून ठेवतो ती मूर्तिमंत शौर्य असलेली राणी दिद्दा! दहा,वीस,तीस..नव्हे, इ.स. ९५८ ते १००३ असं तब्बल ५४ वर्षं श्रीनगर या राजधानीमधून राज्य करणारी शस्त्रविद्यापारंगत राणी! आज आपण पॅराऑलिंपिकच्या स्पर्धा बघतो, तशी एका पायाने अधू असलेली ही राणी अत्यंत परिश्रमातून योद्धा झाली. त्याकाळी प्रचलित असलेली शस्त्रं, काश्मीरच्या दऱ्याडोंगरातून,बर्फाच्छादित कड्यांवरून शत्रूशी लढाई करण्यासाठी अगदी प्रगत अशी युद्धनीती, सैन्यरचना फार फार रोचक आहे. कोणत्याही वीराचा इतिहास केवळ शत्रूची आक्रमणं आणि लढायांचा नसतो, तर तो भावभावनांचा आणि कौटुंबिक आव्हानांचाही असतो!यातून दिद्दाचीही सुटका नव्हती! याच कारणांमुळे ती प्रसंगी टिकेचीही धनी झाली.

राणी दिद्दाचं आजोळ गांधार देश..अर्थात आजचा पूर्व अफगाणिस्तान आणि वायव्येकडच्या पाकिस्तानचा भाग,जिथे हिंदू शाही राजे राज्य करत असत. तिचा पिता आजच्या पूंछ आणि भोवतालचा भाग एकत्र असलेल्या ( पार्णोत्सा) राज्याचं राजधानी लोहारीन इथून शासन करत असे. तेव्हाचा भूगोल आणि वराहमूल(बरामुल्ला),राजापुरी (राजौरी)इ. जागांचं सामरिक वैशिष्ट्य फार अद्भुत होतं!
क्षेमगुप्ताशी लग्नं करून दिद्दा श्रीनगरला आली. प्रसंगी आपल्या भटकलेल्या पतीला सन्मार्गावर आणत तिने प्रजेवरही निरतिशय प्रेम केलं. “दिद्दक्षेमगुप्तदेव” अशी दोघांची काढलेली नाणीही प्रचलित झाली. परंतु पुत्र अभिमन्यु लहान असतानाच राजा क्षेमगुप्ताचं निधन झालं. त्याच्या अस्थी गंगेत विसर्जित होतात न होतात तोच...अंतर्गत बंडाळी चालून आली मात्र राणी त्यांना पुरून उरली! साम,दाम,दंड,भेद अशी नीती वापरुन तिने राज्य सुरक्षित ठेवलं. भव्य अशा सैन्याची उत्कृष्ट बांधणी केली. रौद्र रूप धारण करून शत्रूला कापून काढणारी ही रणदुर्गा कोणत्याही संकटाच्या वेळी मात्र अत्यंत स्थिरतेने विचार करून मार्ग काढत असे. तिची ही हातोटी उच्च कोटीची होती असं कल्हण स्पष्ट नमूद करतो. योद्ध्याचं खरं धैर्य त्याच्या शरीरात वा तलवारीत नसून त्याच्या मनात असतं याची प्रचीती दिद्दाचा प्रेरक जीवनप्रवास बघून येते! तिचं सेवाकार्यही काश्मीरमध्ये दीर्घकाळ स्मरलं गेलं.
राणी नंतर महमूद गझनीने इ स १०१५ साली पहिलं तर १०२१ साली काश्मीरवर दुसरं आक्रमण केलं. ते दोन्ही अपयशी ठरले. पुढे इ स १३१९ पर्यंत काश्मीर परकीय आक्रमणापासून दूर राहिलं!
याच काश्मीरमध्ये स्त्रिया राज्यकर्त्या म्हणून इतिहासावर आपली मोठी छाप सोडून गेल्याच परंतु राज्याच्या रणधुरंधर सेनापती म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं. सिल्ला,छुड्डा अशा काही ‘आर्मी कमांडर्स’नी अत्यंत बिकट परिस्थिती असूनही रणसंग्रामाची दिशाच बदलून टाकली,राज्यं तारली! छुड्डा आणि तिचा तरुण पुत्र पंचचंद्र एकत्र लढले.. जिंकलेही! म्हणजे तिचं वय काय असावं त्यावेळी! या साऱ्या गोष्टींची नेमकी आणि स्पष्ट साक्ष आपल्याला काश्मीरच्या इतिहासात लिहून ठेवलेली मिळते. मात्र आजही हा इतिहास दुर्लक्षित आहे. गूगलमध्ये ही नावं टाकली तर काहीही माहिती समोर येणार नाही. प्रसंगी वैयक्तिक हानी सोसूनही आयुष्यभर ऐक्याची कास धरत, राष्ट्रनिष्ठेचा कळस गाठत रणांगणावर धारातीर्थी पडणाऱ्या या रणदुर्गा प्रत्येक भारतीय स्त्रीचा अभिमान आहेत!
अभिनव गुप्तांच्या या काश्मीर भूमीत शस्त्र मजबूत होती म्हणून शास्त्रांचा विकासही मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. श्रीशारदा विद्यापीठाची महत्ता तर किती वर्णन करावी! पण अशा या वैभवसंपन्न काश्मीरला पुढे मात्र वाळवी लागली. आजच्या काळाला फार मोठी शिकवण देणारा,सावध रहायला सांगणारा हा इतिहास प्रत्येकाने वाचावाच. याच वळणाची साक्षीदार आणि परकोटीचं शौर्य धारण करणारी राणी म्हणजे कोटादेवी! ही काश्मीरच्या इतिहासातली लखलखणारी तारका! ती स्वयंतेजाने झळाळली आणि अस्तंगत होताच तिच्याबरोबर काश्मीरची मूळ राजवट, काश्मीरचं स्थैर्य,मुळात अस्तित्वच धोक्यात आलं. १३१९ साली झालेलं तुर्की आक्रमण असो वा पुढचं प्रचंड मोठं धार्मिक स्थित्यंतर, ही न्यायप्रिय राणी प्रचंड धाडसाने काश्मीरसाठी चंडिका होऊन उभी राहिली. इ.स. १३३० मध्ये आलेल्या अचला या तुर्की आक्रमकाला कोटाराणी खरमरीत खलिता पाठवून चेतावनी देते, ‘निवर्तय चमूमन्यां किं मिथ्या देशपीडयाम्?’ अर्थात तू तुझं सैन्य दुसऱ्या दिशेला वळव. माझ्या देशाला विनाकारण त्रास देण्यात काय अर्थ आहे?” आणि आक्रमकाने खरोखर दिशा बदलली. धैर्य आणि नीतीने शासन केल्याने “कोटादेवी सर्वाधिकारिणी’ असं तिचं नाव काश्मीरच्या इतिहासात अमर झालं!
काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. इतिहासाच्या या धाग्यांनी आपलं काश्मीरशी घट्ट नातं बांधलेलं आहे! इथे इतिहास घडवणाऱ्या स्त्रीच्या शक्तीचे, शौर्याचे, सामर्थ्याचे अध्याय माझ्या लेखणीद्वारे विस्तृतपणे सर्व भारतीयांसमोर आणणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे! आपल्या या शौर्यशालिनी रणदुर्गांना अपराजिता ग्रंथातून मानवंदना!जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही