माझी शाळा!
हीच शाळा...हेच पटांगण...हीच इमारत...जिथे मी शिकले,वाढले! त्याच माझ्या शाळेत प्रमुख पाहुणी म्हणून ध्वजारोहण करतांना, आठवणींमध्ये रमतांना, विद्यार्थ्यांसामोर बोलतांना काय वाटत होतं हे शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे! शाळेकडून याआधीही बोलवण्यात आलं, मात्र दूरचा प्रवास, कोरोना अशी आव्हानं समोर होती. यावर्षी आग्रहानं बोलावल्यावर मात्र आपण जायलाच पाहिजे असं वाटायला लागलं. इतर सगळे कार्यक्रम रद्द करून मिळेल त्या मार्गानं मी शाळेकडे धाव घेतली.
समोर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता! मला शिस्तीत ध्वजस्तंभाजवळ नेणारा गार्ड, दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करणार्या विद्यार्थिनी...सगळा थाट पाहून अगदी हरखून गेल्यासारखं झालं! हा सन्मान माझा नव्हता...माझ्यातल्या सैनिकाचा होता! नंतर माझा एकेक शब्द ऐकण्यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणात त्यांनी ओतलेला जीव...सगळं काही माझ्यापर्यंत पोचत होतं. माझं बोलणं झाल्यानंतर प्रश्न विचारण्यासाठी झुंबड उठली होती अगदी! लहानग्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्यासारखेच निरागस...गोड होते! पुढे मी कधी कायकाय केलं, परीक्षा कशा दिल्या, ट्रेनिंग कसं केलं, आर्मीच्या आतलं जग कसं आहे...हे सगळं जाणून घेण्याची किशोर वयातल्या विद्यार्थ्यांची ओढ ओसंडून वहात होती! अशा उत्साहानं फुलून गेलेल्या मैदानासमोर बोलणं म्हणजे मोठाच आनंद! पालकवर्गही आवर्जून उपस्थित होता. तसंच मला भेटायला माझ्या वर्गातले मित्र मैत्रिणीही आले होते...फारच भारावून टाकणारं होतं सगळं! विशेष म्हणजे अशा कार्यक्रमाला प्रथमच उपस्थित असलेली माझी आई आणि माझ्याच शाळेत वीरमाता म्हणून तिचा झालेला सन्मान कधीच न विसरता येण्यासारखा आहे! शाळेतल्या इतर काही दालनांचं उद्घाटन, बक्षीस समारंभ, technical section मध्ये मुलांनी करून दाखवलेले वेगवेगळे तांत्रिक प्रयोग सगळं विलक्षण अनुभव देणारं होतं!
शाळेतून फेरफटका मारतांना कोपर्यां कोपर्यांतून कवितांचे, सुभाषितांचे, नाट्यछटांचे आणि आणखीन खूप खूप शब्द ऐकू येत होते. इथेच “कणा” ताठ ठेवण्याची जिद्द, “...किनारा तुला पामराला” म्हणण्याचं धाडस...गोकुळजनांचं शांतवन करण्यासाठी उद्धवाला पाठवणार्या श्रीकृष्णाची आर्तता...किती गोष्टी मी अनुभवल्या! कमीत कमी शब्दांत नीतीची सूत्रं रुजवणारी संस्कृतची सुभाषितं, गणिताची प्रमेयं, विज्ञानाचे प्रयोग वा छत्रपतींच्या शौर्याच्या गाथा...असंख्य गोष्टी इथेच कोवळ्या मनांवर कोरल्या गेल्या!
खरंतर त्या वेळी उभ्या असलेला या सरस्वती भुवन प्रशालेचा डौल,तिची रौनक बर्याच अंशी कमी झालेली जाणवली. त्या अनुषंगानं मराठी शाळांची आज झालेली दुरावस्था, पुनरुज्जीवनासाठी ठिकठिकाणी सुरू असलेले प्रयत्न, जालना इथलं वातावरण याचीही अधिकार्यांशी चर्चा झाली. अशा शाळांच्या आत्ताच्या गरजा बघता विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा तसंच अधुनिक यंत्रणा उभी करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत आहेत ही आशादायी गोष्ट आहे. शाळेच्या अशा भेटीमुळे तिथून इथवर आपण केलेल्या प्रवासाविषयी एकिकडे समाधान वाटत असलं तरी दुसरीकडे काल ज्या हातांनी भरभरून घेतलं त्यांची आता देण्याची वेळ आहे...याची जाणीव होते!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)
Comments
Post a Comment