झाशीवाली शौर्यशालिनी 

 १८ जूनची सकाळ. आज सूर्याला शेवटचं अर्घ्य! दामोदरला अलगद बाजूला करून राणी लक्ष्मीबाई निघाली. तोच करारी पोशाख, डोळ्यात निखारे, मनात अतूट निर्धार आणि चित्तात कमालीची स्थिरता! ती जय –पराजयाच्या खूप पुढे निघून गेली होती. १३ मार्च १८५४ रोजी या रणलक्ष्मीनं झाशीच्या दरबारात बुंदेलखंडाचा राजकीय प्रतिनिधी मेजर रॉबर्ट एलिस याच्यासमोर गर्जना केली होती, ‘मेरी झाँसी नही दूँगी!’ ती होती अन्यायाविरुद्ध ललकार, ती होती रक्तातली स्वातंत्र्याची उपजत उर्मी!

“Is Jhansi Rani overrated?why is she so glorified?” असं सहजपणे विचारणाऱ्या व्यक्तींनी तिचा संघर्ष अवश्य अभ्यासावा आणि या वाक्याचं उत्तर शोधावं. “मोठी झाशीची राणीच लागून गेलीस!” असं एखाद्या धीट मुलीला आजही अगदी सहजपणे म्हंटलं जातं. किती पिढ्या उलटल्या तरी लहान मुली चंद्रकोर,मोत्याची माळ मिरवत झाशीची राणी होऊन स्पर्धेसाठी उभ्या रहातात! असं काय होतं या वीरांगनेत की तिचं धाडस या भारताची ओळख म्हणून गौरवलं गेलं?आघाडीवर राहून सक्षमपणे सैन्यनेतृत्व करणारं लक्ष्मीबाईचं शौर्य हे केवळ प्रासंगिक किंवा परिस्थितीवश आलेलं नव्हतं. तर अगदी बालपणापासून तिच्या चारित्र्यात, तिच्या निर्णयांमध्ये ते दिसून येतं. त्याला सखोल आणि ठाम अशी भूमिका होती. तिची आंतरिक शक्ती,तिचं आत्मबळ तिच्या शौर्यातून प्रकटलेलं दिसून येते. तिचे शब्द अंतस्थ प्रेरणा होऊन सैनिकांचं मन,मनगट बळकट करत असत.
महाराज छत्रासालांकडून थोरल्या बाजीरावांकडे १७२९ साली झाशीची सुभेदारी आली. पुढे पराक्रमी सरदार रघुनाथ हरि नेवाळकरांच्या अथक मेहनत आणि दूरदृष्टीतून झाशी समृद्धीच्या शिखरावर पोहोचली. १८१७ साली पेशवाईचे सगळे अधिकार संपुष्टात आले तेव्हा इंग्रजांनी झाशीला वंशपरंपरागत पद्धतीनं ते सांभाळण्याची परवानगी दिली होती.
पेशव्यांच्या पदरी दिवाणी कामकाज करणाऱ्या मोरोपंतांची ही कन्या मनुबाई (मनकर्णिका) गहू वर्णाची, सुविद्य,संस्कृत साहित्यात विशेष रमणारी, शस्त्रविद्यापारंगत होती. देहयष्टी फार मजबूत नव्हती, पण अंगी साहस मात्र दुर्दम्य! १८४२ साली या तेजस्वी युवतीचा गंगाधरपंतांशी विवाह झाला कर्तव्यबुद्धीला जणू अधिकारांची जोड मिळाली. नेवाळकरांची कुलस्वामिनी महालक्ष्मी. म्हणून तिचं नाव ठेवलं ‘लक्ष्मीबाई’! स्वतंत्रपणे प्रजेसाठी निर्णय घेत त्यांच्यात ती सामावून गेली. तिचा हळदीकुंकू कार्यक्रम राजपरिवारापुरता मर्यादित न ठेवता झाशीतल्या समस्त स्त्रिया, तरुणी यांनाही तिनं सामावून घेतलं. एकमेकींना हळदी कुंकू लावणारे हे हात राणीसाठी एक दिवस शस्त्रं चालवणारे सामर्थ्यशाली हात झाले!
अवघी चार वर्षांची असतांना झालेला मातृशोक, तान्ह्या पुत्राचा वियोग आणि पाठोपाठ गंगाधरपंतही १८५३ साली निवर्तले. अशा किती आघातांना सोसून ती पुन्हा उभी राहिली. तत्कालीन समाजावर रूढीचा घट्ट पगडा असतानाही राणीनं केशवपन करून लाल अलवण नेसण्यास ठामपणे नकार दिला. स्वतःचा राजधर्म जाणत दत्ताकपुत्र दामोदरला मांडीवर घेऊन तिनं प्रशासन हाती घेतलं. इंग्रजांनी अखेरीस झाशी किल्ला, खजिना सगळं ताब्यात घेतलं तरी पुन्हा झाशी आपल्याकडे येणार ही केवढी तिची दृढ इच्छाशक्ती!
इ. स. १८५७ मध्ये जागोजागी भारतीय सैन्यात स्वातंत्र्य समराचा वणवा पसरू लागला. झाशीजवळ नैगांग या लष्करी ठाण्यात सैन्यांनं मोठं बंड पुकारलं.
‘खुल्क खुदाका |मुल्क बादशाह का |अंमल रानी लक्ष्मीबाईका ||’
ही घोषणा सर्वदूर पसरली. अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. या धुमश्चक्रीमध्ये योग्य संधी बघून राणी लक्ष्मीबाई प्रजेला अभय देत पुन्हा झाशीच्या सिंहासनावर आरुढ झाली. फितूर झालेल्या भाऊबंदाना तिनं कैदेत टाकलं. सैन्यासह चालून आलेल्या नत्थेखानाला अद्दल घडवून परत पाठवलं. झाशीनं कात टाकली. बाजारपेठा फुलल्या! सैन्य सशक्त झालं, तोफा बुरुजांवर चढल्या. दारुगोळ्याचा कारखाना सुरू झाला.
राणीचं व्यक्तिमत्व फार अलौकिक होतं. पहाटे व्यायामापासून तिचा दिवस सुरू होत असे. हीच पळत्या घोड्यावरमांड टाकून भाला फेकणारी वीरश्रीयुक्त सुस्नात काया शुभ्र वस्त्रात व्रतस्थ होऊन धर्माचरण करे तेव्हा ती मूर्तिमंत सात्विकता वाटे! तर दरबारात पायजमा, अंगात गडद रंगाचा अंगरखा, डोक्यावर केशरी रंगाची रेशमी रत्नजडित टोपी, त्यावर बांधलेली सुंदर बत्ती, कमरेला जरीचा दुपट्टा आणि त्याला लटकवलेली रत्नखचित तलवार असा एका राज्यकर्तीला शोभेल असा कडक पोशाख आणि करारी मुद्रेनं ती वावरत असे. अतिशय स्पष्टपणे आज्ञा देत ती दिवाणी,फौजदारी खटले ऐकून न्यायदान करणारी ती एक कुशल प्रशासिका होती.
एक प्रभावी सेनापती म्हणून राणीच्या सैन्यात शिस्त, अनुशासन होतंच पण त्याला भावनेचा स्पर्शही होता. युद्धानंतर सैनिकांचे घाव स्वतः बांधण्यासाठी ती जातीनं उपस्थित असे. त्यांच्या कामगिरीवर खूश होऊन त्यांना पदके देऊन गौरवणं, संकटात घाबरून न जाता सैन्याला खंबीर करणं असे असंख्य गुण तिला सेनापती म्हणून वेळोवेळी सिद्ध करतात. या ओळी प्रसिद्ध होत्या -
जिन्ने (जिसने) सिपाही लोगोंको मलाई खिलाई l
आपने (स्वतः)खाई गुडधानी – अमर रहे झांसी की रानी|
किल्ल्याला वेढा देत इंग्रजांनी २५ मार्च १८५८ रोजी झाशी किल्ल्यावर प्रत्यक्ष आक्रमण केलं. मेजर जनरल हयू रोज समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना रसद उपलब्ध होऊ नये म्हणून भोवती गवताचं पातंही शिल्लक न रहाण्याची खबरदारी तिनं घेतली होती अशी नोंद सर हयू रोज करून ठेवतो. तोफा आग ओकत होत्या. चकमकी वाढत होत्या. रातोरात पडलेल्या भिंती उभ्या करून राणी सैन्याला सतत प्रेरित करत होती. जखमी,आश्रितांची व्यवस्था, दारुगोळा, अन्नछत्र अशा विविध पातळ्यांवर राणी अहोरात्र झुंजत होती. मदतीला येणारे तात्या टोपेही तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे ऐकून राणीचे सरदार निराश झाले तेव्हा ही झाशीवाली त्यांच्यावर कडाडली! स्वबळावर ही लढाई सुरूच ठेवण्यासाठी तिनं त्यांचं मन वळवलं. ३ एप्रिल रोजी किल्ल्याची भिंत फोडून इंग्रज आत शिरले तेव्हा राणीनं आत्माहुती न निवडता मोठंच धाडस दाखवलं. अशाही परिस्थितीत स्थिर चित्तानं पुढची निरवानीरव करत ११/१२ वर्षांच्या दामोदरला घेऊन ती बाहेर पडली. अंगात चिलखत,कमरेला विशाचं पाणी दिलेला जंबिया, एक मजबूत तलवार साथीला. आता पुन्हा कधी झाशीचं दर्शन!
झाशीतली भीषण लढाई, पाठलाग करणाऱ्या वॉकरशी झालेलं द्वन्द्व यानंतर अन्नपाण्याविना राणी लक्ष्मीई सलग १०२ मैल (१६४ किलोमीटर्स) एवढी घोडदौड करत मध्यरात्री काल्पी इथे पोहोचली. हे प्रचंड अंतर आहे. आज चांगल्या रस्त्यावरून,गाडीनं कमीत कमी अडीच-तीन तास लागणारं हे अंतर तेव्हा डोंगराळ असताना, रात्रीच्या गडद अंधारात, प्रचंड तणावाखाली राणीनं कसं पार केलं असेल? मुळात हाच घोडदौडीचा, आत्यंतिक धाडसाचा तिचा पराक्रम भारतीय इतिहासात नोंदवलेला आहे. काल्पीला पोहोचताक्षणीच घोड्यानं अंग टाकलं पण रजस्वला अवस्थेत पोहोचलेल्या राणीनं तशातही मोठंच बळ एकवटलं. पुन्हा हिंमत बांधली.
एवढ्या कडक सुरक्षेतून राणी निघून गेली हे कळताच सर हयू रोज संतापला. राणीचे वडील मोरोपंत तांबे यांना ५ एप्रिल रोजी भर दुपारी सर हयू रोजनं झाशीच्या राजवाड्यासमोर जाहीरपणे फासावर चढवलं. झाशीची प्रचंड लूट सुरू झाली. मोठा नरसंहार झाला. प्रत्यक्ष तिथे असलेला डॉ. थॉमस लिहितो, “Death was flying from house to house with mercurial speed, not a single man was spared. The streets began to run with blood.”
हे ऐकल्यावर राणीची काय अवस्था झाली असेल? त्यातूनही ती पुन्हा उभी राहिली! दुर्मिळातल्या दुर्मिळ अशा स्त्री मधल्या अद्वितीय शौर्याला प्रकट करणारं राणीचं एकेक धाडस वंदनाला पात्र आहे. रावसाहेब पेशव्यांच्या पायावर तलवार ठेवत या रणरागिणीनं त्यांना पूर्वजांच्या पराक्रमाचं स्मरण करून दिलं. पेशवे, नवाब यांच्या साथीनं राणीनं १५ में रोजी काल्पीजवळ मोठाच लढा दिला. वीजेसारखी तिची समशेर शत्रूसंहार करत चौफेर फिरली.
काल्पी इंग्रजांच्या हाती लागल्यावर पुनश्च हरि ॐ! छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवत ग्वाल्हेरचा किल्ला घेण्याचा आग्रह तिनं धरला. इंग्रजांची साथ देत पेशव्यांवर चालून आलेल्या जयाजीराव शिंदेंचा चोख बीमोड केल्यावर त्यांच्या सैन्यातली मराठी अस्मिता जागवून आपल्या बाजूनं वळवण्याचं मोठं काम राणीनं केलं. केवळ साधनांवर युद्धं जिंकली जात नाहीत तर त्यासाठी पराक्रम हवा हे राणी लक्ष्मीबाईनं पुन्हा पुन्हा सिद्ध केलं.
आता मात्र अंतिम लढाई! १७ जून १८५८. इंग्रजांचा तळ ब्रिगेडियर स्मिथच्या नेतृत्वाखाली कोटा की सराई इथे उभारण्यात आला होता. एक नव्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेली राणी घोड्यावरून फिरत, सैन्यरचना करत होती, योजना समजावत होती. ते तिचं स्वतःचं सैन्य नसून ठिकठिकाणचं एकत्र झालेलं विस्कळीत सैन्य होतं. ती त्यांचा मनापासून गौरव करत होती, त्यांचं मनोबल उंचावत होती. इंग्रजांच्या ९५ व्या पायदळ तुकडीनं रेन्स या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली धावा पुकारला. भोवती कोरडे तसंच पाणी असणारे ४-५ फुट खोलीचे मोठे नाले, उंचसखल भाग कशाची तमा न बाळगता राणी सैन्य समुद्राला भिडली! राणी, तात्या, नवाब,सगळं सैन्य यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची एक अभूतपूर्व अशी उंच लाट उसळली होती! राणी दिवसभर अथकपणे लढली.
लढाईचा दुसरा दिवस. राणीच्या घोड्याला मोठा नाला ओलांडता न आल्यानं तो संथ झाला आणि तेवढ्यात राणीच्या मस्तकावर मागून आघात झाला. मागचा भाग विच्छिन्न झाला. समोरून सपासप वार झाले. डोळा बाहेर आला. छातीवर, अंगावर मोठ्या जखमा होऊन रक्तबंबाळ लक्ष्मीबाई कोसळली. अखेरचा श्वासही स्वातंत्र्य देवतेला अर्पण करून ती अनंतच्या प्रवासाला निघून गेली. आकाशानं टाहो फोडला. रामचंद्र देशमुखांनी राणीनं सांगून ठेवल्याप्रमाणे तिचा देह शत्रूच्या हाती लागू दिला नाही. एका कुटीजवळ नेऊन त्यांनी शिताफीनं तिला अग्नी दिला. तात्यां टोपेनच्या टोपेंची मनू त्यांच्या पुढे निघून गेली!
राणीबरोबर प्रत्यक्ष लढलेला स्वतः सर हयू रोज अंतर्मुख होऊन राणीविषयी लिहितो – “Although a lady, she was the bravest and best military leader of the rebels. A man among the mutineers.”
स्वा. सावरकरांचे शब्द जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातला राणी लक्ष्मीबाईविषयीचा गौरव प्रकट करतात- “जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खूबसूरत,वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्छील,राज्याचे नियमनसामर्थ्य,प्रजेची प्रीति, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता,मानाची माननीयता, रणाची रणलक्ष्मी! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’ हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजून मिळालेला नाही! इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असतांनाही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही!लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’ ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य, हे भारतभू, तुझे आहे!”
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही