मॅडम...एवढं कराल please!
(सुधारित repost)
आदरणीय मॅडम,
महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पण पंख पसरून पिलू उडतंय आता घरट्याबाहेर ...
प्राध्यापिका म्हणून तुम्ही अगदी प्रिय आहात विद्यार्थ्यांमध्ये
प्रभाव आहे तुमचा माझ्या मुलीवरही...म्हणून हे पत्रं!
आणि तसंही... आईचं मन...तेही 'मुलीच्या'... कुठे स्वस्थ बसू देतं कुणाला सध्या!
मॅडम,
सगळीच 'माणसं' स्त्रियांना सन्मानानं वागवणारी नसतात,
नसतात सगळीच त्यांना समान दृष्टीनं बघणारी...
हे शिकेलच माझी मुलगी कधी ना कधी.
मात्र तिला हे देखील शिकवा-
सभोवतालच्या वाईट बातम्यांमुळे खचून जाऊ नकोस म्हणावं...
कोवळ्या कळ्यांना चिरडून टाकणारे नराधम आहेत इथे...
पण त्याही पेक्षा जास्त आहेत पाणावलेल्या डोळ्यांनी
कन्येच्या पायांवर नतमस्तक होणारे, तिच्या पंखांमधे बळ देत तिला मोकळं आकाश दाखवणारे पुरुषोत्तमही...कितीतरी रूपांमध्ये!
स्वतःच्या मुलींना गर्भातच मारणारे काही क्रूर मायबाप आहेत ...
पण 'मुलगी झाली' हे सौभाग्य समजून तिचं अभिमानानं
पालन-पोषण करणारे समर्पित आई- बाबा
आणि कुटुंबीयही आहेत!
मित्राच्या रूपात टपून बसलेले संधीसाधू आहेत...
तसेच पार्टीनंतर आपल्या मैत्रिणीला जबाबदारीनं..सुखरूप घरी पोचवणारे...
प्रसंगी तिला खंबीर करणारे...नि:स्वार्थी जिवलग मित्रसुद्धा आहेत!
तिला शिकवा- स्त्रीचं सामर्थ्य कशात आहे खरं -
म्हणजे तिचे जय-पराजय ती स्वतःच ठरवू शकेल!
तिला द्वेष, मत्सरापासून दूर राहायला शिकवा...
आणि नको विश्वास ठेवू म्हणावं 'स्त्रीच स्त्रीची वैरी असते’ यावर-
आवश्यक असेल तिथे ego सोडून मोकळेपणानं घेतली पाहिजे मदत तिनं ...
आणि स्वतःबरोबर दिला पाहिजे भक्कम आधार इतर मैत्रिणींना सुद्धा!
गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं-
त्यांना नमवणं तसं अवघड वाटतं, पण अशक्य नाही!
त्यासाठी शरीराचं सामर्थ्य तर तिनं वाढवावंच पण शिकावं 'माणसं' ओळखायलाही.
सतर्क रहावं चहू बाजूंनी...रेंगाळू नये मोहाच्या भुलवणाऱ्या आणि कुठेही न नेणाऱ्या वाटांवर!
प्रसंगी सामोरी जावं धैर्यानं...उपजत बुद्धिचातुर्यानं...
आणि भस्मसात करावेत दुर्जनांचे मनोदय...
स्वतःच्या आत्मबळावर!
जमेल तसं दाखवत चला तिला...
आपल्या संस्कृतीचं, इतिहासाचं अद्भुत वैभव!
आवर्जून सांगा तिला -
अनेक कर्तृत्त्ववतींनी आपापल्या क्षेत्रामधे जगभरात लढलेल्या लढाया...
...आणि केलेलं समर्पण, दिलेलं योगदान!
जाणवू द्या तिला महत्त्व -
त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलेल्या वाटांचं आणि मोल त्यांच्या संघर्षाचं!
मॅडम,आणखीन एक महत्त्वाचं-
झुंजू दे तिला तिच्या आघाड्यांवर समर्थपणे, स्वतंत्रपणे, अविरत ...
मात्र त्याबरोबरच मिळू दे तिच्या स्त्री-मनाला निवांतपणा...
थोडं विसावत घेऊ दे हिंदोळे तिला...बागडू दे स्वच्छंदपणे...
भटकू दे तिची पावलं वेडी होऊन... सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला!
आणि हेही जाणवू दे हळूवार -
किमया निसर्गाची अद्भुत...
कशी दडली आहे तिच्याच शरीरात!
साऱ्या न्यूनगंडांवर मात करून प्रेम करावं तिनं स्वतःवर... अगदी भरभरून.
...आणि करावा सन्मान स्वतःच्या अनमोल शरीराचा,मनाचा...अस्तित्वाचाच!
तिला हेही आवर्जून सांगा -
सगळ्या वादळांवर मात करणारी नात्यांची ऊब
खूप मोलाची असते आयुष्यात!
पण...प्रत्येकच स्त्रीनं हेही लक्षात ठेवावं -
जर खेळू लागली आपलीच माणसं द्यूत तिला पणाला लावून...
तर मात्र वेळीच 'जागं' होऊन तिनं निवडायला हवा स्वतःचा मार्ग...अपूर्व हिंमतीनं!
माझ्या मुलीला हे समजवता आलं तर बघा मॅडम –
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या
अंतहीन 'फॅशन' च्या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद तिनं कमवायला हवी.
आधुनिकता फक्त पेहरावात नसते, तर ती असते विचारात, त्याप्रमाणे वागण्यात!
म्हणून वेळ पडली तर बदलून टाकावीत तिनं -
तथाकथित अधुनिकतेची परिमाणंच...
घालून नवा पायंडा!
आणि हो-
जे स्वतःला हवंय ते आधी दुसऱ्यांना द्यायला शिकावं तिनं-
आनंद,आदर, प्रेम, क्षमा...अगदी 'space' सुद्धा!
जमलं तर तिच्या मनावर बिंबवा मॅडम -
स्त्री- पुरुष समानतेचा खरा अर्थ!
पुरुषांशी स्पर्धा करणं... अत्यावश्यक नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी.
पुरुषांच्या शिव्या, सवयी, व्यसनं यांची बरोबरी करण्यात कसली आली समानता?
स्वतःला व्यापक करत तिनं जावं
स्त्री –पुरुष तुलनेच्या कितीतरी पलीकडे ...
कारण ही तुलना म्हणजे मुळात एक 'चाकोरीच'!
काढावी मोडून तिनं ती चाकोरी आणि रचावे नवीन मापदंड!
कोणतेही पूर्वग्रह न ठेवता न्यायबुद्धीनं वागावं तिनं सगळ्याच पुरुषांशी
आणि ठेवावी नितांत श्रद्धा उदात्त मानवजातीवर...!
अजून एक विचार रुजवा तिच्यात -
नेहमी 'माणूस' म्हणून बघावं तिनं स्वतःकडे ...
तुलना करावी कालच्या आणि आजच्या तिच्याशीच, स्वतःला शोधत रहावं.
खूप मेहनतीनं पुढे जात रहावं...
तेही आपल्याच स्वतंत्र लयीत!
आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं करावं सोनं...
ठरवावं तिचं क्षेत्रं तिनं स्वतःला चांगलं ओळखून...अगदी आतून!
हेच बघाना - आपली आयुष्यभराची उपासना
ओंजळीत घेऊन एखादी नृत्यांगना साता समुद्रापार संस्कृतीचा दूत होते...
तर एखादी रणरागिणी राष्ट्राच्या सीमेवरती शत्रूवर काळ होऊन बरसते...!
कुणी अंतराळात जाते तर
कुणी मुलांना घडवण्यात रमते!
....वो हर रूप में 'जीवन' हैं!
मॅडम, हेही कोरलं जाऊ दे तिच्या मनावर –
भावनेच्या भरात नव्हे तर विवेकानं घ्यावेत तिनं आयुष्यातले सगळे निर्णय आणि हो...
घ्यावी संपूर्ण जबाबदारी सुद्धा त्या निर्णयांची हिंमतीनं...तरंच त्या 'स्वातंत्र्याला' काही अर्थ आहे!
घडवावं उंच कर्तृत्त्व तिनं...स्वतःचं कौशल्य वापरून
पण कधीही विक्रय करू नये...हृदयाचा, आत्म्याचा...!
लागू नये धक्का कधीच...तिच्या आत्मसन्मानाला.
जे सत्य आणि न्याय वाटतं त्याच्यासाठी निश्चयानं
पाय रोवून तिनं लढावं...अथकपणे...
स्वत:वरचा विश्वास यत्किंचितही ढळू न देता!
मॅडम, आणखीन एक विनंती-
तिला ममतेनं वागवा, पण लाडावून ठेऊ नका.
सदैव तिचा हात धरून चालवू नका तिला...
लागू दे थोड्या ठेचा,चाखू दे चव थोडी वेदनांची.
तयार होऊ दे तिला स्वतःच्या अनुभवातून जग बघण्यासाठी...
त्याला आत्मविश्वासानं सामोरं जाण्यासाठी!
ताऊन सुलाखून निघू दे तिला-कारण न जाणो
कोणत्या वळणावर...
एखादी अग्निपरीक्षा आजही द्यावी लागेल...तिला एकटीला!
तिचं धैर्य डगमगता कामा नये कुठेही!
मॅडम तुम्ही या विचारात असाल...की एवढं सगळं मुलींना सांगायचं...!
पण मुलांना कायकाय आणि कसं सांगावं?
खरंय तुमचं...मुलांना वाढवण्याची जबाबदारी
तितकीच मोठी आहे.
आवर्जून सांगितलं पाहिजे मुलांना-
स्त्रीलाही समजा एक 'माणूसच'...तुमच्यासारखं मन, शरीर, भावभावना, स्वप्नं, आकांक्षा...
सगळं तस्संच असतं म्हणा अगदी तिच्यातही!
जितकं जाणून घ्याल तितकी खोल आणि व्यापक
अशी गवसेल ती तुम्हांला
-अगदी कोणत्याही रूपात!
कळकळीनं सांगा त्यांना -
त्वरित थांबवा तिच्यावरचे अपमानास्पद विनोद आणि शरीराबद्दलच्या भयंकर...असह्य गोष्टी...
ज्याचं अक्षरशः थैमान सुरु आहे सगळीकडे!
करा संकल्प-
कोणत्याही स्वरूपात स्त्रीचा अवमान करणार नाही आणि करूही देणार नाही...कुणालाही!
जे जे शक्य ते ते सगळं करेन तत्परतेनं - तिच्या सन्मानासाठी. तोच खरा पुरुषार्थ!
माफ करा मॅडम,
मी फार बोलते आहे-खूप काही मागते आहे-
पण पहा -
जमेल तेवढं अवश्य कराच,
माझी रेवा - खूपच गोड आणि
मनस्वी मुलगी आहे हो ती!
आणि मला खूप विश्वास आहे मुलांवरही ...
खरा 'पुरुषार्थ' नक्कीच जाणतील ती!
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©
(अब्राहाम लिंकन यांच्या 'हेडमास्तरांस पत्र' या संकल्पनेचा आधार घेऊन!)
Comments
Post a Comment