अंतरंग अपराजितांचे - १
नेतृत्व - राज्ञी कालस्य कारणम्!
... तेराव्या शतकातला भारत! हा उगवता सूर्य नेहमीचा दिनारंभ नव्हे तर एका रणदुर्गेच्या नेतृत्वाने उजळून निघालेला भारतातला एक नवीन पर्वारंभ घेऊन आला होता. किती मोठी ऐतिहासिक घटना होती ही! मंगल वाद्यांच्या घोषात, भरतखंडातल्या पवित्र नद्यांचा जलाभिषेक तिच्या मस्तकावरून ओघळत होता. वेदोच्चारणानं भारावलेल्या वातावरणात तिला राजमुकुट चढवला गेला ...आणि मग पूर्वापार चालत आलेली काकतीयांची प्रसिद्ध तलवार तिला सन्मानपूर्वक सोपवण्यात आली...होय!दक्षिणेतल्या वारंगळ इथे एका तेजस्वी युवतीचा रीतसर राज्याभिषेक होत होता!तिथे आलेले राजे महाराजे काय, हत्तीवर निघालेली तिची भव्य मिरवणूक काय... प्रजेच्या डोळ्यांचे अगदी पारणे फिटले होते! पिता गणपती देव याने विचारपूर्वक घडवलेली राज्याची उत्तराधिकारी रुद्राम्बा सिंहासनावर बसली होती. त्याने गणपम्बा – रुद्राम्बा अशा आपल्या दोन्ही मुलींना ‘मुलींप्रमाणेच’ वाढवलं होतं. गुरू शिवदेवय्या यांच्या तालमीत शस्त्रशिक्षण, लोकप्रशासन, घोडेस्वारी, युद्धनीती हे सगळं आत्मसात करत त्या अगदी निष्णात झाल्या होत्या. गणपम्बाने इ. स. १२५१ ते १२६४ या काळात धरणीकोटा इथे राज्यं केलं. तर सुवर्णकाळ घडवणाऱ्या काकतीय वंशाची धुरा समर्थपणे सांभाळत रुद्राम्बा या राज्यकर्तीने इ.स. १२६२ ते १२८९ असं दीर्घकाळ शासन केलं. प्रत्येक भारतीयाने वाचावा असा हा गौरवशाली इतिहास!
रुद्राम्बा अतिशय कुशल योद्धा होती. अनेक शीलालेख तिच्या पराक्रमाची साक्ष देतात! तमिळनाडूमधले पांड्य असो वा कालिंगचे गंग राजे..त्यांची आक्रमणं राणीने तत्परतेने परतवली. यादवांवर तिने मिळवलेला विजय ऐतिहासिक होता. तब्बल १५ दिवस चाललेल्या या लढाईत तिने प्रचंड मोठं घोडदळ पराभूत केलं. येणाऱ्या काळात शांती प्रस्थापित करण्यासाठी तिने त्यांच्याशी जबरदस्त करार केला! रायागजकेसरी अशी उपाधी मिळवत वारंगळ इथला गौरवशाली रणगमंडप उभा केला. तिची प्रत्यक्ष लढाई आणि धाडसाची वर्णनं वाचून अंगावर शहारे येतात.
अतिशय प्रगत असं युद्धकौशल्य, प्रभावी सैन्यनेतृत्व असलेल्या या रणधुरंधर राणीने सैन्यात सामाजिक ऐक्याचा पाया रचला. पुढे विजयनगरसह अनेक साम्राज्यांमध्ये रूढ असलेली नायक (नायकरा)व्यवस्था मुळात रुद्राम्बा राणीने तिच्या काळात सुरू केली होती. तिचे महत्वाचे सैन्याधिकारी कोण होते, तिने भक्कम केलेली वारंगळ किल्ल्याची सुरक्षा कशी होती हे वर्णन फार रोचक आहे. काकतीयांना उत्तरोत्तर वैभवाप्रत नेणारी तिची अर्थव्यवस्था,सैन्यव्यवस्था यामुळे परकीय वकील,राजदूत हे तिच्या भेटीसाठी दरबारात आल्याची नोंद आहे. अनेक इतिहासकार तसंच मार्को पोलो याने सुद्धा राणीविषयी खूप काही लिहून ठेवलंय! त्याची शेवटची ओळ आहे, “.. and truly she is more beloved by her subjects than any queen or king has never been!”
राणीने प्रशासन केलं त्या काकतीय काळाचे किती पैलू वैभवशाली भारताची साक्ष देतात! शेती, दळण,वळण,व्यापार,जलसिंचनव्यवस्था, अभियांत्रिकी कौशल्य, वास्तूकला,समाजव्यवस्थेची केंद्रस्थानं असलेली मंदिरं, आरोग्य व्यवस्था, प्रयोगशाळा,औषधनिर्मितीचे कारखाने,महिला वैद्यांचं योगदान,प्रसूतीशास्त्र..यात राणीने केलेल्या सुधारणा, उभारलेल्या नवीन व्यवस्था..अपराजिता ग्रंथात सगळं सविस्तर वाचण्यासारखं आहे! ते वाचून पुन्हा पुन्हा भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. राणी १२८९ मध्ये शेवटची लढाई लढली तेव्हा किती वर्षांची होती! मुहम्मद बिन तुघलकाशी काकतीयांचा कसा सामना झाला? वारंगळ लुटून नेलं तेव्हा कोहिनूर हिऱ्यासह हत्ती,घोडे, इतर संपत्ती ही किती मैल चालत असलेली रांग होती?
एका स्त्रीने राज्यकर्ती होणं ही घटना भारताला नवीन नाही...भारतातल्या इतिहासातल्या प्रथम स्त्री राज्यकर्तीचा इतिहास तर आपल्याला थेट सातवाहन काळात घेऊन जातो! नाणेघाट इथे सापडलेल्या शीलालेखांमुळे सतवाहनांचा, विशेषतः नागनिकेचा इतिहास प्रकाशात आला. या विषयाकडे जगभराचं लक्ष वेधलं गेलं! महारथी त्रणकायिर याची अत्यंत धाडसी अशी कन्या आणि सिरी (श्री)सातकर्णी याची पत्नी महाराणी नागनिका!सम्राट अशोकानंतर पराकोटीच्या अहिंसाप्रधान आचरणामुळे परकीय आक्रमकांचं काम सोपं झालं होतं. अशा वेळी वैदिक धर्माला संजीवनी देत समाजातलं क्षात्रतेज पुनरुज्जीवित करण्यासाठी तिने महत्वपूर्ण योगदान दिलं. आपण जिथे रहातो त्या महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्या,गुहा,मंदिरं,इथले पाषाण साक्षीदार आहेत यज्ञाच्या वैदिक स्वरांचे.. त्यातल्या आहुतींच्या दरवळणाऱ्या सुवासाचे आणि अर्थातच एका स्त्रीच्या राजकीय सामर्थ्याचे!
राजा गेल्यानंतर छोट्या राजकुमाराला गादीवर बसवून सातवाहनांची धुरा तिने हातात घेतली. केवळ पराक्रमी सैन्य,सल्लागार मंत्री, मांडलिक राजे यांच्यावर राज्य सुरक्षित रहात नाही. तर त्यांना एकत्र बांधून राज्याचा रथ पुढे न्यावा लागतो तो समर्थ राज्यकर्त्याला! हेच मोलाचं कार्य नागनिकेने केलं. आहारांमध्ये विभागगेली तिची प्रशासन व्यवस्था कशी होती? महाराष्ट्राचे त्या काळी किती विभाग होते? सातवाहनांची वैभवशाली राजधानी पैठण (प्रतिष्ठान)कशी होती? प्रचंड मोठी आर्थिक सत्ता असणाऱ्या सातवाहनांचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याची प्रतिष्ठान नगरीपासून जोडलेली केंद्र,दळणवळण हे सगळं फार फार प्रगत होतं. नागनिकेच्या कारकीर्दीतला महत्वाचा पुरावा नेवासा इथे मिळाला. केवळ आर्थिक सुबत्ता एखाद्या काळाला सुवर्णयुग अशी ओळख देत नाहीत तर सामाजिक जीवन, स्थैर्य,एकात्मभाव याद्वारे त्याची कीर्ती पसरते. सातवाहनांचा काळ असा सांस्कृतिक दृष्ट्याही सुंदर होता.
नेतृत्व हा गुण स्त्री मध्ये उपजत असल्याचे कितीतरी दाखले भारताच्या इतिहासात मिळतात. मग ती पहिली राज्यकर्ती नागनिका असो वा गुप्त –वाकाटाक अशा सुंदर नवनिर्मितीच्या काळाची साक्षीदार, माहेर - सासरचा समर्थ दुवा झालेली श्री प्रभावती गुप्त! गुप्तांचं सामरिक योगदान,वाकाटकांची प्रशासन व्यवस्था..त्यात प्रभावतीने दिलेलं योगदान, तत्कालीन व्यवसाय,तिने बांधलेली मंदिरं हे सारं सविस्तर वाचण्यासारखं आहे. “श्री प्रभावती गुप्ताया शासनं रिपुशासनम्”अशा मुद्रेसह या गुप्त साम्राज्याच्या राजकुमारीने हाती घेतलेला वाकाटकांचा राजदंड भारतात गौरवशाली इतिहास घडवून गेला.
राष्ट्राच्या सीमा अभेद्य राखत या स्त्री राज्यकर्त्यांनी अतिशय सक्षम,समर्थ अशा नेतृत्वाची मुहूर्तमेढ भारतात केली. यांचा इतिहास इतर देशांमध्येही अभ्यासला आणि नावाजला गेला. भारताच्या या अग्रणी स्त्री शक्तीला अपराजिता ग्रंथातून मानाचा पहिला मुजरा!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment