अंतरंग अपराजितांचे - ५

मुत्सद्देगिरी

“दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत. किल्ल्याच्या योगाने औरंगशहा सारख्याची उमर गुजरून जाईल.” हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द भविष्यात किती खरे ठरले! मराठ्यांचे किल्ले जिंकून घेतले म्हणजे यांची पाळंमुळं नष्ट होतील या विचारानं ८२ वर्षांचा औरंगजेब त्याच्या सैन्यासह रात्रंदिन झटू लागला. मराठ्यांच्या सिंहासनावर होते बाल शिवाजी आणि राज्यकारभार होता त्याच्या आईकडे! त्यामुळे आपलं काम खूप सहजतेनं फत्ते होईल अशी खात्री औरंगजेबाला होती. त्याला काय कल्पना! स्वराज्य रक्षण करणाऱ्या प्रत्येक मनात तेच शिवचैतन्य अजूनही तळपत होतं. मुख्यतः रणरागिणी ताराबाई यांच्यात तर ते अवतरलेलंच होतं!
“उपयेन हि यत्कुर्यात्तन्न शक्यं पराक्रमै:’ म्हणजे समोरासमोर लढून जे यश संपादन करणं दुष्कर आहे ते अतर्क्य युक्ती वापरुन प्राप्त करावं!” अशा प्रकारची लवचिक युद्धनीती वापरुन प्रचंड सामरिक बळ असलेल्या शत्रूला देखील नामोहरम करता येतं हे दाखवून देणारं ठळक उदाहरण म्हणजे स्वराज्यरक्षिका महाराणी ताराबाईसाहेब! राजाराम महाराजांनंतर अवघ्या २५ वर्षांच्या ताराबाईंनी सगळ्यांना एकत्र बांधून स्वराज्याची घडी पुन्हा बसवली. पराक्रमी हंबीरराव मोहित्यांच्या या सुकन्येने इ.स. १७००-१७०७ असा अतिशय महत्वाचा कालखंड घडवला.
त्यांची कारकीर्द ही मुळात किल्ल्यांची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला सहा-सात वर्षांत औरंगजेबाने जास्तीत जास्त किल्ले जिंकून घेतले. यावेळी ताराबाईंसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ले लढवले. त्यामध्ये त्यांनी मोठंच चातुर्य दाखवलं - किल्ले लढवतांना कोणतंही टोक गाठायचं नाही. परिस्थितीनुसार लवचिक राहायचं. खूप नुकसान होऊ द्यायचं नाही. वेळ पडली तर शरणागती पत्करून त्यांनी किल्ले शत्रूच्या ताब्यात द्यायचे पण त्याबदल्यात मोठी रक्कम मुघलांकडून वसूल करूनच! अशा प्रकारे जेव्हा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याची वेळ येईल तेव्हा तो रिकामा करून त्यांना द्यायचा पण शक्यतो मुसळधार पाऊस असतांना. याच पावसात किल्ल्यावर जाणार्या – येणार्या मुघलांवर छापे टाकायचे, त्यांची रसद बंद करायची. सगळी मराठा फौज यासाठी वापरायची नाही तर औरंगजेब किल्ले घेण्यामध्ये गुंतलेला असतानाच बाकी मराठा सैन्यानं त्याच्या प्रदेशात जाऊन हल्ले करायचे. हे धोरण अत्यंत यशस्वी झालं. त्याने एकामागून एक किल्ले घेतले खरे पण मराठ्यांनी त्याची ६-७ वर्षांची ही मेहनत मातीमोल केली.
‘दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||’
हे शब्द त्यांनी सार्थ केले.
ताराबाई अतिशय करारी आणि महत्त्वाकांक्षी होत्या. काटक शरीरयष्टीच्या, स्वतंत्र वृत्तीच्या धाडसी ताराबाईंचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. विजेच्या चपळाईने त्या घोड्यावरून दौडत असत. तत्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करणं, हा त्यांचा मोठा गुण होता. खाफीखान त्यांच्याविषयी लिहितो, “ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. तिने विलक्षण धामधूम उडविली. त्यात तिच्या सैन्याच्या नेतृत्त्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकट झाले. तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला राजारामाच्या जागी बसवला. सगळा कारभार आपल्या हाती घेतला. सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या, राज्याचा कारभार, बादशाही मुलुखावरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. तिने आपल्या सरदारांची मने आपल्याकडे ओढून घेतली. तिने आपल्या सैन्याची योजना अशी केली की, दक्षिणेचे सहा सुभे, सिरोज, मंदसोर आणि माळव्याच्या सरहद्दीपर्यंत मराठ्यांनी धामधूम उडविली. बादशहाने आपली हयात मोहिमा करणे आणि किल्ले घेणे यात घालविली, तिच्याविरुद्ध तो शेवटपर्यंत लढत राहिला. पण काफरांचे बळ आणि बंडही दिवसेंदिवस वाढतच गेले.”
सैन्यव्यवस्थेप्रमाणेच राज्यातलं प्रशासनही चोख ठेवत ताराबाईंनी आपली दृष्टी चौफेर ठेवली होती. ताराबाईंची न्यायबुद्धी राजाराम महाराजांच्या काळापासूनच ठळकपणे दिसून येत होती. अनेक तंटे -बखेडे यांचा कोणताही पक्षपात न करता योग्य प्रकारे त्या न्यायदान करत. सामान्य लोकांनी कोणत्याही प्रकारची दाद मागितली असता ताराबाईसाहेब तत्काल न्यायनिवाडा करत असत.
ताराबाईसाहेबांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांचं कणखर व्यक्तिमत्वं, प्रसंगावधान, नेतृत्त्व, माणसांची पारख, धैर्य, विचारांची स्पष्टता,दूरदृष्टी असे अनेक गुण उलगडत जातात. औरंगजेबासारख्या मातब्बर शत्रूचं अचूक आकलन करण्याचं चातुर्य आणि त्याला चोखपणे अद्दल घडवण्याचं धाडस दोन्ही त्यांच्या ठायी होतं. कधी त्वेषानं लढण्याबद्दल त्यांनी दिलेली कडक चेतावनी, तर औरंगजेबाच्या विश्वासघातकी डावपेचांपासून सावध रहाण्याचे सल्ले, मुघलांशी वाटाघाटी करतांना दाखवलेलं चातुर्य तर कधी त्यांनी समजावलेले लष्करी डावपेचांचे बारकावे अशा कितीतरी गोष्टींतून ताराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला प्रकर्षानं जाणवतात.
औरंगजेब विशाळगडाच्या दिशेने सरकला. यावेळी ताराबाईंनी प्रतापराव मोरेंना जे पत्रं लिहिलंय त्यावरून या सगळ्या मोहिमांकडे त्या किती लक्षं देऊन होत्या हे दिसून येतं. त्या लिहितात,“ औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कबिलाबाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावे तरीच तो बलकुबल (धास्तावून) राहतो.”
पावसाळ्याच्या आधीच सिंहगडच्या बेरड प्रमुखांनी किल्ला मुघलांना दिला म्हणून ताराबाई खरमरीत पत्रं लिहितात – “सिंहगडास औरंगजेब बिलगला होता. उतावळी करून, हिंमत सोडून, तहरह करून किल्ल्यावरून उतरून राजगडास आलेस म्हणून हुजूर विदित केले. उतावळी करून हिंमत सोडून ही गोष्ट केली हे काही बरे केले नाही. पर्जन्य पडेपर्यंत किल्ला भांडवावयाचा होता ती गोष्ट न केली.” अशी अनेक पत्रं आहेत.
तऱ्हेतऱ्हेचं राजकारण, उत्तराधिकाऱ्यासंबंधी वाद, मतभेद ताराबाईंच्या जीवनपटात असले तरी त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला धक्का लागत नाही इतकं मोठं ते आहे. त्यांची धाडसी कारकीर्द म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातलं सोनेरी पानच!
कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठाच्या प्रांगणात ताराराणींचा अश्वारूढ पुतळा आहे. त्याखाली कोरलेल्या ग.दि. माडगूळकरांच्या ओळी किती सार्थ आहेत-
सम्राज्ञी ना ,समर कुशला लोकनेत्रि प्रतापी,
सत्तांधांना नमवूनि रणीं आपुले राज्य स्थापी
नारी नोहे, अमर जगतिं ज्योत ही पौरुषाची
ताराराणी जननि आमुच्या अस्मितेची, यशाची!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही