श्रीमंत पेशवीण काशीबाई

तरुण लेखिका अश्विनी कुलकर्णी हिने लिहिलेली, शब्दब्रह्म प्रकाशनाची ऐतिहासिक कादंबरी 'श्रीमंत पेशवीण काशीबाई' नुकतीच वाचली. अतिशय अभ्यासपूर्वक आणि परिपक्वतेने केलेलं हे लिखाण आवर्जून वाचण्यासारखं आहे. काशीबाई - परमप्रतापी थोरले बाजीराव पेशवे (राऊ) यांची पत्नी! खरंतर नियतीने दिलेली दुःख निमूटपणे भोगणारी सोशिक आणि सात्विक स्त्री अशी काशीबाईंची प्रतिमा इतिहासात मुख्यत्वाने रंगवली जाते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला किती आयाम होते, त्याची व्याप्ती किती मोठी होती हे या कादंबरीतून दिसून येतं.
राऊ नावाच्या वादळाची अखंड साथ करणं सोपं नव्हतंच, हे शिवधनुष्य काशीबाईंनी पेललं. त्या दोघांच्या नात्याचा हृदयस्पर्शी गोफ या कादंबरीत विणलेला आहे. जणू जन्मजात औदार्य घेऊन आलेल्या काशीबाईंनी नियतीचे वार सहन करत असतानाही, स्वाभिमान जपला. त्यांनी ज्या परिपक्वतेने दीर्घ काळ पेशव्यांची सून म्हणून सगळं सांधण्याचा प्रयत्न केला तो अलौकिक होता. प्रत्यक्ष राजकारणात नसतानाही राऊंच्या पराक्रमावर दृढ विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवत मराठ्यांच्या विजयाचं स्वप्न कायम त्यांच्या डोळ्यात तेवत होतं. थोरल्या बाजीरावांच्या पश्चातही अतिशय ममतेने त्यांनी आपल्या वात्सल्याचं छत्र पुढच्या पिढीवरती धरलं. दुजाभाव जणू त्यांच्या ठायी नव्हताच! काशीबाईंचे असे असंख्य अलौकिक गुण या कादंबरीतून आपल्या मनाला खोलवर स्पर्शून जातात.
सुंदर आणि दर्जेदार मराठी शब्दांची चपखल योजना, त्याकाळी प्रचलित असलेल्या उत्तरेतल्या हिंदी मिश्रित मराठी भाषेची झलक, प्रसंगी बुंदेलखंडी गीतांच्या वापरलेल्या ओळी आणि सत्यघटनांचा एकमेकांमध्ये घातलेला सुरेख मेळ वाचकाला खिळवून ठेवतो. काशीबाईंच्या अनुषंगाने थोरल्या बाजीरावांचं युद्धनेतृत्व, त्यांचं राजकारण, मराठ्यांची विजयगाथा आणि त्यांनी भारताच्या इतिहासात निर्माण केलेलं महत्वाचं स्थान या गोष्टींचीही कल्पना वाचकाला येते.
तत्कालीन वास्तू, वाडे,त्यांची वर्णनं, वस्त्रालंकार, जोपासलेल्या परंपरा अशा अनेक गोष्टी वाचकाला त्या काळात घेऊन जातात. कादंबरीत ठिकठिकाणी उल्लेख आल्याप्रमाणे, पेशवेकालीन वैभव, त्यांचं औदार्य, त्यांची नि:स्सीम भक्ती,समृद्धी हे सारं खूप सुखावणारं आहे. मराठ्यांच्या इतिहासातला अतिशय देदीप्यमान असा कालखंड आहे हा!
इतिहासाविषयी एवढ्या आत्मीयतेने लिहिणारी अश्विनी कुलकर्णी अशाच दर्जेदार लेखन कृतींमधून तिचं योगदान देत राहो, त्यासाठी आणि या क्षेत्रात ती करत असलेल्या प्रत्यक्ष कार्यासाठीही मन:पूर्वक शुभेच्छा!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (निवृत्त)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही