शताब्दीवर्ष - बालरंगभूमी
मी महाराष्ट्राबाहेर राहून मराठी भाषेची, संस्कृतीची अधिक ओढ जाणवते आणि आपल्या माणसांकडे मन आपसुख झेप घेतं. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल,परदेशात तर जास्तच. गेल्या ३-४ वर्षांपासून मराठी समाज,अहमदाबाद या संस्थेशी जोडले गेलो आहोत. संस्थेच्या स्थापनेचं हे शताब्दी वर्षं! हा शतक महोत्सव १५,१६,१७ डिसेंबर या दरम्यान अहमदाबादमध्ये खूपच उत्साहात साजरा होत आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी खाद्ययात्रा,स्मरणिका प्रकाशन आणि सादर होणाऱ्या नाटकांमुळे हा महोत्सव अधिक रंगतदार होत आहे.
याचाच एक भाग म्हणजे काल बालकराकारांनी सादर केलेली पु. ल. देशपांडे लिखित एकांकिका – वयं मोठं खोटम्! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मंडळानं घेतलेल्या नाट्यशिबिरामुळे मुलांचा चांगला गट जमला. नाटक म्हणजे फक्त स्टेज वर उभं राहून संवाद बोलणं नाही तर मुळात त्या लेखनातून व्यक्त होणारा विचार, दिग्दर्शन, नेपथ्य, आवाजाच्या पट्ट्या, शुद्ध उच्चारण, संगीत, नृत्य असे अनेक पैलू मुलांसमोर उलगडले गेले. त्यावेळी समारोपाच्या कार्यक्रमासाठी बसवलेले मुलांचे वेगवेगळे प्रयोग आणि विशेषतः बाबुजींच्या गीतरामायणावर बसवलेली नृत्यनाटिका इतकी छान होती की मुली रोज घरी गीतरामायणातली गाणी गुणगुणायल्या लागल्या.
हाच बालगट शताब्दी महोत्सवासाठी पुन्हा एकत्र आला आणि शाळा,परीक्षा, इतर classes सगळं सांभाळून रात्री ‘वयं मोठं खोटम्’ च्या तालमी सुरू झाल्या! या तालमी इतक्या enjoy केल्या मुलांनी की रेवा परत आल्यावर अगदी दारातूनच सुरू करायची, “आई,आज काय झालं...” की हसण्याचे कारंजेच कारंजे..! मग हसू कसं बसं आवरून action करून करून गंमती सांगायच्या! तालमीबरोबर गेल्या काही दिवसांपासून नाटकात घालायचे कपडे निवडण्याचं, लागणाऱ्या वस्तू (property) जमवण्याचंही काम सुरू होतं. अगदी एकरूप होऊन गेली होती ही मुलं नाटकाशी. “आई, आमच्या नाटकासाठी हे हवं आहे, ते हवं आहे” असं म्हणत इतरांच्या भूमिकेसाठी वस्तूंचा शोध घेणाऱ्या रेवाला पाहून माझी खात्री पटली की मुळात माझं,तुझं असं सगळं मागे पडून हे ‘आपलं’ नाटक आहे मुलांना समजतंय!
कालचा दिवस अत्यंत उत्साहात उगवला..! मुलं शाळेत गेली होती तरी कधी एकदा संध्याकाळ होते आणि नाटकासाठी तिकडे जमतो असं झालं होतं. (गंमत म्हणजे नेहमीच self-confidence overflow होणारी धाकटी राधा (इयत्ता दुसरी)रेवाला घरून निघताना शुभेच्छा देत होती, “ काहीही लागलं तर सांग मला. आम्ही तिथे आलो की नाटक सुरू होण्या आधी मी आत घुसून एकदा तरी तुला भेटेनच. तुम्ही कुणीही डायलॉग्ज विसरू नका. मोठ्याने बोला आणि हो, आम्ही समोर असलो तरी आमच्याच कडे पाहून डायलॉग्ज बोलू नकोस, जरा इतरांकडेही पहा हॉलमध्ये!बाकी ठिके. All the best!”)केवढा तो दांडगा अनुभव!
तिथे गेल्यावर ती green room, मोठ्ठी make up kit, याची मिशी..,त्याचं धोतर..,स्टेजवर लागलेला set, सगळी पळपळ, मनोभावे केलेलं नटराज पूजन हे सगळं मुलांनी भरभरून अनुभवलं. जिथे या आधी दिग्गज कलाकारांची अनेक व्यावसायिक नाटकं प्रत्यक्ष पाहिली त्या भव्य टागोर हॉलमध्ये उसळलेली गर्दी आणि मोठ्या स्टेजवर नाटक सादर करण्यासाठी मुलांमध्ये संचारलेला अभूतपूर्व उत्साह....हे सगळंच विलक्षण होतं!
कलेचं, नाट्याचं हे बीज या मुलांमध्ये रुजवण्यासाठी, महाराष्ट्र समाज आणि Dhaval Vartak सरांना धन्यवाद!
Kshitij क्षितिजदादा, तुम्हाला आजपासून मुलं खूप mis करतील. मुलांना परत घरी सोडण्यापासून ते त्यांचा आवडता खाऊ, त्यांचे moods सांभाळत त्यांना शिस्त लावणं, पुन्हा पुन्हा समजावून सांगत त्यांच्याकडून अभिनय करवून घेणं, नाटकाचं कालसुसंगत पुनर्लेखन,पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या सगळ्यांसाठी मन:पूर्वक धन्यवाद! कलेचा हा संस्कार मुलांना असाच आपल्या मुळांशी घट्ट बंधून ठेवो...जगात कुठेही वास्तव्य असलं तरी त्यांच्या कंठातून मायबोलीची ओघवती गंगा पुढे प्रवाहित होत राहो...मराठी साहित्याचा, रंगभूमीचा हा वारसा त्यांना अभिरुची संपन्न आणि समृद्ध करत राहो!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.
Comments
Post a Comment