भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून प्रसाद मासिकानं दिवाळीला काढलेल्या “वेदकालीन ते सद्य:कालीन कर्तृत्त्ववान स्त्रिया” या विशेषांकात माझा समावेश होणं माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे!

इतिहासातल्या ज्ञात - अज्ञात अशा भारतातल्या कर्तृत्त्ववती तसंच वीरांगनांवर अभ्यासपूर्ण असे अनेक लेख या अंकात आहेत. आधुनिक युगातल्या यशस्वी उद्योजिका ते सायबर गुन्हेगारी क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणार्या स्त्री-पोलिस अधिकारी, तसंच वेगळ्या वाटा निर्माण करणार्या तेजस्विनी महिला यांचाही यात समावेश आहे. म्हणून आपण सगळ्यांनीच आवर्जून वाचून संग्रही ठेवावा असा हा अंक आहे! Online मागवता येईल - https://akshardhara.com/38719-diwali-ank.html
या निमित्तानं सहज share करावंसं वाटतं - साधारण तीनेक वर्षांपूर्वी मी निवडक विषयांवर लिहायला, वेगवेगळ्या व्यासपीठांवर बोलायला सुरुवात केली. नेतृत्त्वगुण, सीमासुरक्षा असे अनेक विषय माझ्यासाठी सहज - सोपे होते पण स्वत:बद्दल काही बोलण्याचा, लिहिण्याचा मला खूपच संकोच वाटत असे. तरी त्याची हळूहळू सुरुवात झाली. दिलेल्या मुलाखतींनंतर, काही कार्यशाळांनंतर हे जाणवलं की खूप काही great म्हणून नव्हे पण थोडा वेगळा अनुभव म्हणून आपल्या प्रवासाबद्दल थोडं बोलायला काहीच हरकत नाही. मिळालेलं यशापयश, निर्णय घेतांनाची विचार प्रक्रिया इ. काही गोष्टी प्रामाणिकपणे मांडल्यामुळे समोरच्या मुलामुलींचे, पालकांचे बरेच प्रश्न सोपे होतात!
प्रत्येक मुलाखतीतून उलगडत जाणारं आपलं आयुष्य तेच असलं तरी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांमुळे कधी ती छान जमून येते! माझी शैक्षणिक पार्श्वभूमी, स्थलसेनेत झालेली निवड, अति बर्फवृष्टी - तीव्र दहशतवादप्रवण भाग तसंच नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेलं काम आणि त्यातली आव्हानं मी या मुलाखतीत प्रामुख्यानं मांडलेली आहेत. पण याबरोबरच वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश पाडणारे प्रश्नही या मुलाखतीत आवर्जून विचारण्यात आले. त्यामुळे सहजीवन, मातृत्त्व ते अगदी सणवार...असं सगळंच मला "संतुलित" आणि सविस्तर बोलता आलं! मुख्य म्हणजे या निमित्तानं माझ्या करिअरची दुसरी inning, अर्थात् आत्ता मी करत असलेलं संशोधन,लेखन, हाती असलेले काही प्रकल्प याबद्दलही थोडं सांगता आलं. या मुलाखतीसाठी संपादिका डॉ. Uma Joshi-Bodas आणि मुलाखतकार Swati Dadhe यांचे आभार! Kaustubh Kasture मन:पूर्वक धन्यवाद!
यशस्वी व्यावसायिक आयुष्याला समाधानी आणि आनंदी वैयक्तिक आयुष्याची जोड मिळाली तर आपली ऊर्जा द्विगुणित होते! ही दिवाळी आपल्या सगळ्यांना चांगलं काम करण्यासाठी अशीच भरभरून ऊर्जा देऊन गेली असणार याची खात्री वाटते...!
-मेजर मोहिनी गर्गे -कुलकर्णी (नि.)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही