अंतरंग अपराजितांचे - १०
संकल्पशक्ती विजयाची!
आज विजयादशमी! आज राजराजेश्वरीला रुधिराभिषेक करायचाच! आठ वर्षांआधी केलेला विजयाचा संकल्प पूर्ण होणार. भारतीय स्त्रीच्या संकल्पशक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे हे आज इंग्रजांना कळणार! महिलांची सशस्त्र फौज उभारून त्यांचं समर्थपणे नेतृत्त्व करणारी शिवगंगा संस्थानाची राणी वेलू नचियार म्हणजे मूर्तीमंत स्वाभिमान! इ.स. १७७२ साली इंग्रजांनी राजाची हत्या करून संस्थान ताब्यात घेतल्यानंतर पुढची आठ वर्षं आपल्या लहान मुलीला घेऊन जंगलातून, डोंगर दऱ्यांतून फिरत राणीने ज्यासाठी सैन्य जमा केलं होतं तो दिवस आज उगवला होता.
राणी आणि तिची महिलासेना भोवतालच्या स्त्रियांसारखीच पारंपरिक वेशभूषा करून त्यांच्या घोळक्यात मिसळून आत मंदिराजवळ आल्या. मंदिरातली पूजा झाल्यावर जेव्हा तिथली गर्दी कमी झाली, तेव्हा राणीने संकेत दिला...आणि क्षणार्धात सगळ्या महिला सैनिकांनी कमरेच्या तलवारी काढल्या. ‘....वेट्री वेल... वीरा वेल...’या घोषणांनी आकाश दुमदुमलं! त्याचा अर्थ आहे मुरूगन देवाचा ‘विजयी भाला...धैर्यशाली भाला!’ राणीचं सैन्य तलवारींनी घणाघाती प्रहार करायला लागलं. या अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळे राजमहालावर पहारा देणारे इंग्रज सैनिक गोंधळून गेले. तलवारीला तलवारी भिडल्या.
मोठा दारुगोळ्याचा साठा जवळच असल्याने इंग्रज सहज परतवार करत होते. त्यांच्या त्या दरुगोळ्याच्या साठयापुढे आपल्या तलवारी खूप वेळ तग धरणार नाहीत ही वस्तुस्थिती राणीने लगेच ओळखली. ते भांडारच उडवलं तर? राणी भांडाराच्या दिशेने बघून हा विचार करत असतांना कुयिली नावाच्या वीरांगनेने ते मनोमन ओळखलं. समोरच दिवे तेवत होते. त्या दोघींनी एकमेकीना डोळ्यांतून संकेत दिले...घेतले! राणीने पुढे येऊन कुयिलीला गच्च मिठी मारली. कुयिली वेगाने दिव्याकडे जायला निघाली. तेवढ्यांत तिला दोन गोळ्या लागल्या. तशाच जखमी अवस्थेत धीर धरून तिने दिव्यातलं सगळं तेल स्वतःवर ओतून घेतलं. हातात दिवा घेऊन ती दारूगोळ्याच्या दिशेने पळत सुटली. इंग्रजांना अंदाजही लावता आला नाही की समोर काय होत आहे! आणि क्षणार्धांत ‘वेट्री वेल...वीरा वेल’ ची घोषणा देऊन स्वतःला पेटवून कुयिलीने तिची सगळी शक्ती एकवटली. आत शिरून संपूर्ण दारूगोळ्याचा तो मोठाच्या मोठा साठा तिने उध्वस्त केला! आसमंतात आवाज घुमला...जमीन हादरली! इंग्रजांची सगळी शस्त्रं, दारूगोळा नष्ट झाला. त्यात अनेकजण मारले गेले. भारतीय इतिहासातला हा पहिलाच मानवी बॉम्ब असावा! मात्र हा कोणत्याही आतंकासाठी नव्हता. तो होता स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी!
तेवढ्यांत एका महिला सैनिकाने मंदिरात घंटारव सुरू केला. तो सगळीकडे निनादला. राणी आणि तिच्या सैन्याला स्फुरण चढलं. बाहेरून राणीचे इतर सगळे सैनिक आत आले…आणि ब्रिटिशांवर तुटून पडले. मोठाच इतिहास रचला गेला!ब्रिटिशांची सपशेल हार झाली. थोड्याच वेळांत हनुमानाचं चिन्हं असलेला राणीचा ध्वज पुन्हा एकदा शिवगंगा संस्थानाच्या किल्ल्यावर डौलाने फडकू लागला! खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी झाली.
अतिशय चिकाटीने योजना आखून इंग्रजांना युद्धांत गारद करत, स्वतःचं शिवगंगा संस्थान त्यांच्या तावडीतून परत मिळवण्याचा विजयाचा कीर्तिमान राणी वेलू नचियारने स्थापित केला. या राणीला ‘वीरमंगाई’ म्हणजे शूर स्त्री अशी उपाधी लावण्यात आली.
अशा किती लढाया विरांगनांनी लढल्या!जेव्हा जेव्हा शक,अरब,अफगाण, तुर्क, मुघल, पोर्तुगीज,डच,इंग्रज अशा अनेक परकीय आक्रमकांविरुद्ध भारत लढला, तेव्हा तेव्हा त्यात स्त्री शक्तीचं मोठं योगदान होतं. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी – लढणं किंवा शरण जाणं - श्रेयस वा प्रेयस- यांच्यापैकी त्यांनी लढण्यासाठी घेतलेला श्रेयस्कर निर्णय हाच त्यांचा विजय आहे. या वीरांगनांच्या रक्तात असलेली स्वातंत्र्याची मूलभूत ऊर्मी, आभाळापर्यंत पोचलेलं त्यांचं उत्तुंग मनोधैर्य, त्यांच्या उरातला अभंग आवेश, त्यांनी केलेली राष्ट्रनिष्ठेची पराकाष्ठा या गुणांमुळे त्या अजरामर झाल्या. ‘हतो वा प्राप्यसि स्वर्गं...’ हे गीतेचं तत्त्वज्ञान त्या प्रत्यक्ष जगल्या. विविध रूपात त्यांच्या अंगी प्रकटलेलं शौर्य हा त्यांच्यातल्या आत्मबळाचा, मन:शक्तीचा आणि अध्यात्माचा एक उदात्त आविष्कार म्हणावा लागेल.
या वीरांगनांनी केवळ राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा बाळगत वा वैयक्तिक अपमानाचा बदला म्हणून प्रजेला युद्धाच्या धुमश्चक्रीत कधीही लोटलं नाही. उलट शांती प्रस्थापित करून मातेच्या स्नेहार्द्र हृदयाने प्रजेच्या कल्याणासाठी त्या रात्रंदिन झटल्या. परंतु जेव्हा जेव्हा या वीरांगनांना दुर्बल समजून त्यांचं राज्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तेव्हा अत्यंत कठोर होऊन या मातृशक्तीने शत्रूला शासन केलं. स्त्री राज्यकर्त्यांनी त्यांचं सिंहासन हे प्रजाकल्याणासाठीचं एक साधन मानलं तर सशस्त्र क्रांतिकारिकांनी मोहाचे असंख्य धागे मागे सोडून बलिदान दिलं आणि स्वातंत्र्याचं मूल्य प्राणपणानं जपलं. दुर्दैवाने त्या अद्यापही उपेक्षेच्या सावटाखाली आहेत.
अपराजिता या ग्रंथात अखंड भारतातल्या गेल्या २००० वर्षांच्या काळखंडातल्या निवड वीरांगनांवर प्रकाश टाकला आहे. प्राचीन ग्रंथांमधल्या संदर्भांसह त्यांच्या योगदानाचे अनेक पैलू सविस्तर मांडत दुसरीकडे एक संवेदनशील स्त्री म्हणून त्यांना समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. ही चरित्रं स्वाभिमानी आयुष्य जगण्याचं धाडस आपल्यात निर्माण करतात. इतिहासावर अशा प्रकारे लिखाण करणं ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. उद्या आणखी काही संदर्भ उजेडात येतील आणि तथ्यांची पुनर्मांडणी होईल, ती अवश्य होवो. सकारात्मक हेतूने या ग्रंथातल्या चुका निदर्शनास आणून देणाऱ्यांची मी ऋणी असेन.
भारत शस्त्र आणि शास्त्र दोन्हींमध्ये जगाचं नेतृत्व करो! आपल्या राष्ट्राचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व सदोदित अखंड राहो आणि विविध क्षेत्रांत राष्ट्राला उन्नत करणारे वीर तशाच वीरांगना इथे उत्तरोत्तर घडत राहो या प्रार्थनेसह हा अपराजिता ग्रंथ वाचकांना सुपूर्द करत आहे! जय हिंद!
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.) ©
Comments
Post a Comment