बंदिश - मैफल गप्पांची
मराठी - राजभाषा गौरवदिन
कथा,काव्य,नाट्य अशा कितीतरी जीवनसत्त्वांनी आपलं पोषण करणारी, काळानुरूप अनेक वळणं घेत....पिढ्यापिढ्यांना समृद्ध करत अखंड वहाणारी भागीरथी...मातृभाषा मराठी! ज्ञानेश्वरी,दासबोध असे ज्ञानग्रंथ आपल्यात रुजवत, वाडवडलांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेली ‘मायमराठी’ ते जगाच्या तसंच भारताच्या कानाकोपऱ्यात वसणाऱ्या चिमण्यांच्या कंठात चिवचिवणारी ‘My मराठी’ हे स्थित्यंतर पचवून आपली भाषा दिवसेंदिवस व्यापक होत आहे. आजची मराठी भाषा तिची साहित्यिक शैली, तिचा बाज, तिचं अभिजात सौंदर्य याबरोबरच नवीन विचार आणि इतर क्षेत्रांमधले वैविध्यपूर्ण अनुभव यांचं प्रभावी माध्यम होऊन महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपल्या ‘विचारसमृद्धीची’ भुरळ पाडत आहे.
सैन्यदलासारख्या एका गौरवशाली क्षेत्राचा अनुभव घेऊन बाहेर पडल्यावर, मातृत्वाच्या निमित्तानं आयुष्य ‘Re-compass’ करण्याची सुंदर संधी मला मिळाली आणि मी परत मुळांकडे वळले. अर्थात् ही अगदीच सुरुवात आहे किंवा हा एक प्रयोग आहे,याची जाणीव मला आहे. प्रारंभीच्या या टप्प्यावरच दैवयोगे अतिशय विद्वान आणि अनुभवसमृद्ध असे मित्र मैत्रिणी मला भेटत आहेत हे माझं भाग्य! डॉ.अंजली Anjalee Joshi ही अशीच चित्र - संगीत- साहित्य यांवर वेगळा दृष्टिकोन असणारी, कलेवरती भरभरून प्रेम करणारी अतिशय रसिक मैत्रीण. ती प्रकाशन क्षेत्रात गेली अनेक वर्षं कार्यरत आहे. अंजलीकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. आज मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त एक वेगळी आणि काळसुसंगत अशी संकल्पना घेऊन तिनं बंदिश या तिच्या you tube चॅनलवर छान गप्पा जुळवून आणल्या. या निमित्तानं बंदिश टीम मधलीच Deepali Patki Datar हिच्याशी मैत्री झाली आणि गप्पाही मारण्याचा योग आला. माझ्यासारखीच, करियरमध्ये दुसरी inning सुरू करणारी दीपाली IT क्षेत्रात बरेच वर्षं योगदान देऊन मग मराठी साहित्याकडे वळली. या मुलीचं वाचन आणि मराठी साहित्यावरचं प्रेम थक्क करणारं आहे!
आपापल्या क्षेत्रातली थोडी पार्श्वभूमी, करियरचा नवीन अध्याय, काही गंमती – जमती आणि मराठी भाषेच्या सूत्रात सहजपणे गुंफलेल्या मनमोकळ्या गप्पांची ही मैफल तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. बंदिश चॅनलवरचा हा भाग आवर्जून बघा आणि कसा वाटला ते कळवा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा!
‘.. अनंत आमची ध्येयासक्ती,अनंत अन् आशा..किनारा तुला पामराला..’ असं म्हणणाऱ्या कोलंबसाचा दुर्दम्य आत्मविश्वास तसंच ‘.. पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा ‘ अशी विनंती करणाऱ्या तरुणाचा स्वाभिमान, त्याची चिकाटी आपल्याही रक्तात सदैव भिनलेली राहू दे! मराठी भाषेची ही पालखी वाहून नेण्याचा मान जसा आपल्याला मिळाला तसाच तो आपल्या पुढच्या पिढीलाही मिळावा यासाठी निरंतर प्रयत्नशील रहाण्याची प्रेरणा आपल्यात अशीच जागृत असू दे!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही