आठवणीतल्या वीणाताई....
आदरणीय वीणाताई देव यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या काही सुखद आणि दुर्मिळ आठवणी मनाच्या कुपीत मी कायमच्या जपून ठेवल्या आहेत.
काही काळासाठी दक्षिण कमान मुख्यालय (Southern Command) पुणे इथे माझी पोस्टिंग होती. त्यावेळी आमचा अतिशय जवळचा आणि धाडसी मित्र समीर धामणगावकर, Snovel India संस्थेचा संस्थापक, मराठी साहित्य ऑडिओमध्ये रूपांतरित करण्याच्या ध्यासाने झपाटलेला होता. तेव्हा वैभवही त्यात बराच सक्रिय होता आणि या दोघांमुळे मी सुद्धा snovel शी जोडले गेले. हे क्षण फार सुरेख होते!
त्यावेळी गो. नी. दांडेकरांच्या पडघवली,शितू अशा काही अजरामर पुस्तकांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम वीणाताई करत असत. त्यापैकी 'शितू ' ही सीडी Snovel तर्फे काढण्याचं निश्चित झालं. ती आणि बरोबर इतर काही सीडीज् यांच्या अनावरणासाठी पुण्यात कार्यक्रम ठरला. अच्युत गोडबोले सर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर आमच्या सुदैवाने वीणाताईंच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली! त्यादरम्यान वीणाताईंशी फोनवर होत असलेला संवाद, त्यांचं समजावणं अगदी अधाशासारखं मनात साठवत होते मी! ते ओघवतं बोलणं कधी संपूच नये असं वाटायचं. त्यांच्या घरी जाण्याचाही योग लवकरच जुळून आला.पत्ता समजावताना त्या आवर्जून जवळच्या सोनचाफ्याच्या झाडाचा इतका सुंदर उल्लेख करत असत...!
त्या कार्यक्रमातलं त्यांचं भाषण, माझ्यासारख्या एका नवख्या कॅप्टन मुलीचं त्यांनी भरभरून केलेलं कौतुक,त्यांनी दिलेली शाब्बासकी...माझ्यासाठी अक्षरशः स्वप्नवत होतं! त्यांचं सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व, मधाळ आवाज, प्रेमळ स्वरात केलेलं मोलाचं मार्गदर्शन,त्यांचा प्रसन्न वावर...काय आणि किती घ्यावं आपण! त्यावेळी Snovel अतिशय प्राथमिक स्वरूपात होतं. तरी ते स्वप्नं उराशी बाळगत मनापासून प्रयत्न करणाऱ्या आम्हा तरुण मंडळींच्या पाठीशी त्या अगदी खंबीरपणे उभ्या होत्या. कालांतराने मी,वैभव महाराष्ट्राबाहेर पडलो,पण समीरने मात्र Snovel च्या रोपट्याचा वृक्ष केला!
वीणाताईंचा अगदी थोडा सहवास लाभला तरी त्यांच्या विचारांनी, शब्दांनी आम्हाला नकळत मोठं वळण मिळालं. मर्मबंधातली ठेव ही! यासाठी मी त्यांच्या कायम ऋणात राहीन! अतिशय जड अंतःकरणाने आमच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! तुमच्या आवाजातली 'शितू' हृदयाच्या कायम जवळ आहे...ती तशीच राहील. तुमच्याकडून जे शिकायला मिळालं ते आचरणात आणण्याची सुबुद्धी आणि प्रयत्नशील रहाण्याची चिकाटी,बळ आम्हाला मिळो!
-- मोहिनी
Comments
Post a Comment