पङ्गुं लङ्घयते गिरिम्...!
- लेफ्ट.कर्नल डॉ.डी.डी. गोयल
मराठी अनुवाद – सुनेत्रा जोग.
“When People Doubted My Ability to Walk I Decided to Fly” या लेफ्ट. कर्नल गोयल यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचं “पङ्गुं लङ्घयते गिरिम्” असं केलेलं अनुवादित शीर्षकच या अनुवादाच्या यशाविषयी सर्वकाही सांगून जातं! अत्यंत प्रेरणादायी असा गोयल सरांचा प्रवास त्यांनी स्वतः या पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे! “मर्यादा हा आभास आहे” अशी आपली धारणा व्हावी आणि प्रतिकूलतेशी दोन हात करत आपण वेदनेच्या पार जावं...समाधानी,आनंदी आयुष्य जगावं यासाठी हा पुस्तक प्रपंच आहे!
जगण्यासाठी धडपड करत अत्यंत मेहनतीनं ढाबा चालवणार्या आई वडीलांचा संघर्ष, बोर्डिंग स्कूल मधलं प्रतिकूल वातावरण, पुढे स्वतःही ढाबा चालवण्याचा अनुभव या सगळ्यांतून आयुष्याचे धडे गिरवत एक मुलगा मोठ्या कष्टानं कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतो काय आणि साहसी आयुष्याचं स्वप्नं बघत २००१ साली चक्क भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून निवडला जातो काय...सगळंच चित्रापटात घडतंय असं वाटतं! पण हे फक्त ट्रेलर आहे!
आर्मीमध्ये सीमेवर duty करत असताना पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. त्यात झालेल्या स्फोटामुळं डावं पाऊल आणि त्यावरचा काही भाग वेगळा होऊन हवेत उडाला. अत्यंतिक वेदना आणि तिच्यावर मात करण्याची जिद्द यांनी भारलेले पुढचे कित्येक महिने सरले. हे सगळं होऊनही मला माझ्या युनिट मध्ये येऊ द्या असा हट्ट धरून duty वर परत रुजू होणारा हा सैनिक! गोयल सरांना २००३ पासून कृत्रिम पायाची सोबत मिळाली आणि इथून चालण्यासाठीच काय पण उडण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला! पॅराग्लायडिंगचं शिस्तबद्ध ट्रेनिंग,त्यासाठी वारंवार जखमी होणारा तरीही पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारा हा विरळाच माणूस! “हो...हे सगळं वेदनादायी होतं पण वेदनेनं पराजित केलेलं आयुष्य मला नको होतं,वेदनेवर जय मिळवण्यासाठी मी ठाम होतो!” ही त्यांची प्रतिज्ञा होती! बास्केट बॉल, उंचावरून पाण्यात उडी मारून पोहणं यावर ते थांबले नाहीत तर अत्यंत कठीण ठिकाणांवर ट्रेकिंग,river rafting अशा कितीतरी साहसांमध्ये त्यांनी आघाडी मारली. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी - देहारादूनच्या IMA मध्ये instructor म्हणून मिळालेली पोस्टिंग त्यांनी स्वकर्तृत्त्वावर सार्थ करून दाखवली!तिथे अनेक तरुण अधिकार्यांना त्यांनी घडवलं!
जननी आणि जन्मभूमी दोघींसाठी सज्ज असणारे गोयल सर वैयक्तिक आयुष्यातही हिरो आहेत. पत्नी संगीता आणि दोन्ही मुलं यांची काळजी घेत आजारी आईची तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सेवा केली. आई देवाघरी गेली तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण तिला श्रद्धांजली म्हणून दुसर्याच दिवशी (१९ जानेवारी २०१४) मुंबई मॅरेथॉन धावण्यासाठी किती आत्मबळ लागत असावं याची कल्पनाही आपण करू शकत नाही!
साहसाची मालिकाच सर करण्याचा त्यांनी चंग बांधला. मध्य भारतातली भर उन्हाळ्यात निघालेली मोटर सायकल मोहीम आणि त्याहूनही चित्तथरारक अशी मोठ्या अंतराची तलावात पोहण्याची मोहीम...! मासे,होणार्या जखमा अशा अनेक आव्हानांशी झुंजत हा वीर पुढे जातच राहिला!हे सगळं विस्तारानं वाचण्यासारखं आहे. त्यांनी केवळ आयुष्यात होणारे बदल स्वीकारले नाहीत तर त्यांचा आस्वाद घेत ते आयुष्य जगले...अजूनही जगत आहेत! ज्या धैर्यानं कृत्रिम पायानिशी मोटर सायकलवर सर स्वार होतात त्याच उत्साहानं पार्टीतल्या संगीतावरही त्यांची पावलं थिरकतात!
रोजचा सूर्य ज्यांच्यासाठी नवीन कुतूहल घेऊन येतो...ती माणसं खरी जिवंत असतात असं वाटतं! ही माणसं आतून प्रेरित झालेली असतात आणि इतरांसाठीही दीपस्तंभ होतात! शब्दमल्हार प्रकाशनाचं हे छोटसं पुस्तक पूर्ण वाचूनच मी खाली ठेवलं. भितीवर,वेदनेवर मात करण्यासाठी माणसाचं मन कोणत्या प्रक्रियांमधून जातं हे समजून घेण्यासाठी अवश्य वाचावं हे पुस्तक!
फेसबुकवरच्या विचारमंथनातून गवसलेल्या सखीरत्नांपैकी एक म्हणजे Sunetra Jog . सर्वार्थानं ज्येष्ठ असलेल्या या मैत्रिणीकडून मला खूप काही शिकायला मिळतं. भारतीय सैन्याविषयी तिच्या मनात ओतप्रोत भरलेली आस्था, आदर अनेक वेळा व्यक्त होत असतो. काही महिन्यांपूर्वी सैनिकांना भेटण्यासाठी लडाखला जातांना भरभरून वहाणारा तिचा उत्साह मला स्पष्ट आठवतो. तिच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काम करणार्या काही सामाजिक संस्थांशीही मी जोडले गेले. हे पुस्तक मला तिनं खूप प्रेमानं, औदार्यानं भेट म्हणून पाठवलं...मी ऋणी आहे! सुनेत्रा, लेखिका, अनुवादिका म्हणून अनेक पुस्तकं तुझ्या नावावर आहेतच. तुझी ग्रंथसंपदा अशीच वाढत जावो ही सदिच्छा! नुकतीच सायकॉलोजीमध्ये Ph D मिळवलेल्या या साहसवीराला...गोयल सरांना तुझ्या वशिल्यानं भविष्यात कधी भेटण्याची संधी मिळाली तर माझं भाग्यच आहे! ईश्वर त्यांना असंच बळ देत राहो!
“जगण्यासाठी हे जग ही एक उत्तम जागा आहे यावर जर तुमचा विश्वास असेल, तर समाजातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेल आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकावर तुम्ही प्रेम कराल...!” आपल्या लहान सहान तक्रारींना,कुरबुरींना हवेत विरून टाकणार्या या पुस्तकातल्या अनेक ओळी मनावर कोरण्यासारख्या आहेत, दुर्दम्य आशावाद जागवणार्या आहेत- “आयुष्याच्या लढाईत तुमचा स्वत:वरचा विश्वास तुम्हाला तारून नेईल आणि कधीही खाली पडू देणार नाही. ...तुमच्या मनाचं आणि आयुष्याचंही नियंत्रण तुमच्या हातात घेणं उत्तम!”
- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)
Comments
Post a Comment