तनोट - श्रद्धावान् लभते शौर्यं…

राक्षसांचं निर्दालन करणाऱ्या शक्तिस्वरूपिणी देवीची विविध रूपं आपण जाणतो, तिची आराधना करतो. तसंच स्वराज्य संस्थापनेसाठी छत्रपतींना प्रेरित करणारी, त्यांचं रक्षण करणारी आई भवानी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. हीच शक्ती जेव्हा युद्धात भारतीय सैनिकांचं आत्मबळ वाढवून त्यांना आश्वस्त करणारी विजय देवता असते तेव्हा तिच्या दर्शनातून मिळणारी ऊर्जा शब्दांत सांगणं कठीण आहे. जैसलमरजवळ साधारण १२० किलोमीटर्स दूर भारताच्या सीमेवर विराजमान झालेली विजयदेवता म्हणजे श्री तनोट राय माता. नुकताच तिच्या दर्शनाचा योग आला. १९६५ च्या युद्धानंतर या मंदिराची व्यवस्था, पूजाअर्चा Border Security Force(BSF) नं स्वतःकडे घेतली, ती आजतागायत मोठ्या श्रद्धेनं सुरू आहे.
अतिशय मनोहर अशा मातेच्या दर्शनानंतर इथली संध्याकाळची आरती म्हणजे अविस्मरणीय अशी अनुभूती आहे. आरती बघायला मिळावी म्हणून केलेला आमचा खटाटोप सार्थकी लागला. संध्याकाळ होताच (BSF) चे गणवेशधारी सैनिक पुढे आले. त्यांनी नगारे वाजवायला सुरुवात केली. बघता बघता नगाऱ्याच्या आवाजानं आसमंत भरून गेला. वातावरणात सकारात्मक लहरी पसरू लागल्या. राजस्थानमधल्या ढोलाच्या ठेक्यावर जगदंबेची आरती सुरू झाली. अत्यंत जोशात घंटारवही सुरू होता. तेवढ्यात लक्षं वेधून घेतलं ते मोठ्या झांजा वाजवणाऱ्या जवानांच्या गटानं. त्यांची गती काय वर्णावी! अतिशय जोशात होणारी जगदंबेची ही प्रसिद्ध आरती अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि इतर अनेक अधिकारीही जमले होते. बघता बघता वातावरण असं काही भारावून गेलं की आपण अगदी वेगळ्याच जगात हरवून गेलो आहोत याच प्रचिती आली!
खूप मनोभावे सैनिक जणू म्हणत होते – हे आई, आजवर किती संकटं आमच्यावर आली! विविध बांजूनी शत्रूनं घेरलं तेव्हा कधी कडक्याची थंडी तर कधी वाळवंटात घोंघावणारी प्रचंड मोठी धुळीची वादळं...अशा अनेक अडचणींवर मात करून विजय प्राप्त करण्यासाठी तूच आम्हाला बळ दिलंस, तुझ्या छत्रछायेत घेतलंस! अशीच आमच्या पाठीशी रहा.. उद्या आम्ही असू वा नसू, भारताच्या या सीमा अभेद्य राहू दे! कधी आक्रमण झालंच तर कोणताही संभ्रम मनांत न येता पुन्हा आमचा रणराग जागा होऊ दे! आम्हाला विजयाचं अखंड वरदान दे! हे जगदंबे तुझ्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत!
भारताची सगळी संरक्षण दले, सहाय्यक दले अत्यंत श्रद्धेनं परमेश्वरी शक्तीची उपासना करतात. रेजिमेंटमध्ये जवानांची प्रांतवार संख्या ठरलेली असते. त्या त्या धर्माच्या उपासनास्थळाची रेजिमेंटमध्ये स्थापना केलेली असते. गणेशोत्सव असो नवरात्री - सगळे उत्सव अत्यंत जोशात साजरे होतात. एक अधिकारी म्हणून आपण ज्यांचं नेतृत्व करत आहोत त्या जवानांचा धर्म, संस्कृती, उपासना पद्धती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. परमेश्वरावर श्रद्धा ही सैनिकाच्या आयुष्याचा खूप मोठा आधार असते. विशेषतः युद्धजन्यक्षेत्रात परिस्थिती कठीण असते. निसर्गाच्या बदलत्या रौद्र रुपांना त्यांना सतत सामोरं जावं लागतं. पदोपदी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस अथकपणे ते काम करत असतात. त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नसतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण असतात तीही माणसंच! संभ्रम, भीती त्यांच्याही मनात असतेच. पण त्या भीतीवर वेळोवेळी मात केली जाते. विविध उपायांनी आत्मबळ उंचावलं जातं आणि यात श्रद्धेची खूप मोठी भूमिका आहे यात वादच नाही.
अशीच प्रचीती या तनोट माता मंदिरातही आल्याशिवाय रहात नाही. इथे या मंदिराचा इतिहास छोट्या film द्वारे आवर्जून दाखवला जातो. शिवाय तिथले अधिकारी, सुभेदार आणि जवानांशी बोलतांना त्यांना या मंदिरांविषयी वाटणारा जिव्हाळा, अभिमान, मातेविषयी असणारं प्रेम माझ्यापर्यंत अगदी थेट पोहोचत होतं. त्यांच्याकडून हा इतिहास समजून घेताना मी खूप भारावून गेले.
देवी सतीच्या मुख्य ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणजे बलुचिस्तानातलं हिंगलाज देवीचं शक्तिपीठ. विशेषतः चारण राजपूतांची ही उपास्य देवता. हिचंच एक रूप म्हणजे जैसलमेर स्थित श्री तनोट माता. नवव्या शतकाच्या सुरुवातीला महाराज केहर यांच्या तनु नावाच्या मुलाप्रीत्यर्थ त्यांनी हे मंदिर (आताच्या भारत – पाक सीमेवर) बांधून घेतलं. तेव्हापासून राजपुतांच्या अनेक पिढ्यांनी या देवीची उपासना केली. पुढे हीच देवी राष्ट्ररक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचा आधार झाली आणि हे शक्तिपीठ त्यांच्या श्रद्धेचं केंद्र झालं. १९६५ आणि १९७१ अशा पाकविरुद्धच्या दोन्ही युद्धांमध्ये तिनं सैनिकांचं मनोधैर्य वाढवलं.
१७ नोव्हेंबर १९६५ रोजी पाकिस्ताननं तनोट या प्रदेशाला तिन्ही बाजूंनी घेरलं. त्यावेळी त्यांच्याकडे युद्धाची उपकरणं, शस्त्रास्त्रं सीमित होती. असं सांगितलं जातं की या वेळी देवीनं दृष्टान्त देऊन सैनिकांना आश्वस्त केलं की तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही अगदी सुरक्षित रहाल. सर्व शक्तिनिशी लढा,विजय तुमचाच आहे! या दृष्टांतामुळे सैनिकांचं मनोधैर्य वाढलं आणि ते निर्भयतेनं लढले. आणखी एक आश्चर्य असंही सांगितलं जातं की या मंदिरावर पाकिस्तानी सैन्याकडून बॉम्बचा वर्षाव करण्यात आला परंतु ते सगळे निकामी झाले आणि युद्धाच्या प्रचंड धुमश्चक्रीत देवीचं मंदिर मात्र सुरक्षित राहिलं. हे निकामी झालेले काही गोळे आपल्याला मंदिरातच असलेल्या संग्रहालयात जतन केलेले दिसून येतात. मोठ्या गर्वानं हे सगळं दाखवलं जातं!
पाकच्या सैन्यानं जाता जाता या मंदिरातल्या छोट्या मूर्ती खंडित केल्या, मंदिरात विध्वंस केला. तसंच देवीचे दागिने आणि चांदीचं छत्र चोरून ते पळाले. परंतु ते अपयशी ठरले. वाळूत गाडले गेले. त्या ठिकाणाहून त्यांची पावलं पुढे जाताना दिसली नाहीत. ही घटना सर्वश्रुत झाली. विजयाचं वरदान देणाऱ्या, सैन्याची हिंमत वाढवणाऱ्या या शक्तीचा महिमा पाहून भारतीय सैन्य आणि सैन्याधिकारी नतमस्तक झालेच पण पाकिस्तानी कमांडर कर्नल शहानवाज खान सुद्धा खूप प्रभावित झाले. पुढे promotion होऊन ब्रिगेडियर झाल्यावर त्यांनी भारतात येऊन तनोट माता मंदिराला भेट दिली आणि चांदीचं छत्र तिला श्रद्धापूर्वक अर्पण केलं. हे छत्र इथेच जतन करून ठेवलेलं आपल्याला बघता येतं. तनोट माता ‘युद्ध वाली देवी’ या नावानंही प्रसिद्ध आहे.
१९७१ साली पाकिस्ताननं पुन्हा हे दु:साहस केलं. पण त्यांचे रणगाडे इथल्या वाळूत फसले आणि ते भारतीय वायुसेनेचं सहज लक्ष्य झाले. याही वेळी भारतीय सैन्याला विविध स्वरूपात देवीनं तारलं आणि लढण्यासाठी आत्मविश्वास दिला असा प्रत्यय त्यांना आला. लॉन्गेवाला इथल्या लढाईत मिळालेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारतीय सैन्यानं तनोट माता मंदिराच्या परिसरात मध्यभागी ‘तनोट विजय स्तंभ’ उभारला.
देवी आणि सैनिकांचं असलेलं घट्ट नातं इतर काही प्रसंगांवरूनही दिसून येतं. असं सांगितलं जातं की १९६५ च्या युद्धानंतर तिथल्या पोस्टवरचे जवान सवाई श्री गुमान सिंह सिसोदिया यांना स्वप्नात दृष्टान्त दिला आणि मंदिराच्या पश्चिमेकडे खोदकाम करायला सांगितलं. त्यानुसार खोदकाम केल्यावर देवींच्या ७ मूर्ती, मोठा नगारा, चिमटा, त्रिशूल, तलवार असं बरंच सामान मिळालं, हे आजही तिथे ठेवलं आहे.
नवरात्रीच्या वेळी इथे मोठा उत्सव होतो, जगदंबेचा अखंड जागर होतो. त्यावेळी इथे BSF द्वारे रोज प्रसादरूपी भंडारा होतो. मोठ्या प्रमाणावर अन्नदान केलं जातं. यात इथले जवान स्वतः भक्तांना जेवण वाढतात. हे श्रद्धेचं केंद्र आजही सैन्याला ऊर्जा देतं, प्रेरित करतं. आवर्जून बघावा, जाणून घ्यावा असा हा इतिहास आहे. त्यामुळे नुकतंच उत्तर काशी इथे फसलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम पार पाडतांना ऑस्ट्रेलियाचे तज्ञ प्रोफेसर आरनॅल्ड डिक्स (Arnold Dix)जेव्हा मंदिरासमोर हात जोडतात तेव्हा त्यांच्या भावना आपण भारतीय अगदीच समजू शकतो,नाही का?
तेरा वैभव अमर रहे माँ... हम दिन चार रहे ना रहे!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही