अंतरंग अपराजितांचे - ६

तितिक्षा

“लवकर सांग..कुठे आहे तुझा पती गदापाणी?” असं वारंवार विचारूनही जयमतीने एकच उत्तर ठामपणे दिलं,“मला माहित नाही.” त्यावर संतापून लालूकसोला याने आज्ञा दिली, “जयमतीला जेरेंग पठारावर घेऊन जा आणि तिच्या पतीचा – गदापाणीचा पत्ता काढून घेण्यासाठी तिच्याबरोबर जे जे तुम्हाला करावं लागेल ते ते सगळं करा.” गिदागाठी हजरिका याने तिला भर रस्त्यांवरून फरपटत जेरेंग पठारावर आणलं. उघड्या पठाराच्या मधोमध एक मोठा लाकडी खांब होता त्याच्याशी दोरीने जयमतीला घट्ट बांधण्यांत आलं. दुपारचं कडक ऊन असो, अवेळी कोसळणारा मुसळधार पाऊस वा रात्रीची बोचरी थंडी असो ...सगळे ऋतू तिच्यावर कोसळत होते. हजारिकाला वाटलं हेच तिच्यासाठी खूप आहे, ती स्वतःहूनच गदापाणीचा पत्ता सांगेल. पण हा त्याचा भ्रम होता.
जयमतीचं अन्न पाणी बंदच होतं. ती गदापाणीविषयी काहीही सांगत नाही हे पाहून काही दिवसांनी तिचा आणखीन छळ सुरू झाला. शरीराच्या उघड्या भागांवर खाज आणणारी पानं घासण्यात आली. हात मागे बांधलेले होते. त्यानंतर चाबकाचे जबरदस्त फटकारे..! तरीही आतला निश्चय ढळला नाही. जयमती म्हणजे मूर्तिमंत तितिक्षा होती!
शौर्य म्हणजे नक्की काय? हातात तलवार घेऊन शत्रूवर तुटून पडणं हे तर शौर्य आहेच पण अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या निश्चयावर ठाम रहाणं हे सुद्धा मोठंच शौर्य! रणांगणावर लढतांना जखमा झेलणं हे जसं शौर्य तसंच शरीराच्या आत्यंतिक वेदनांवर मनोधैर्याने मात करणं हेही शौर्यच! शौर्याची अशी वेगवेगळी रूपं प्रस्थापित करणार्या या अहोम वीरांगना!
१२२८ सालापासून विकसित झालेल्या अहोमांच्या संस्कृतीचा, राजकारणाचा, सामाजिक जीवनाचा ब्रह्मपुत्रेच्या खोर्यावरती मोठाच प्रभाव पडला. अनेक वंशांना, जाती जमातींना त्यांनी संघटित केलं आणि सगळ्यांना मिळून ‘अहोम’ असं संबोधलं गेलं! अहोमांनी इ. स.१८२६ पर्यंत (आताच्या) आसाममध्ये राज्य केलं. या मोठ्या कालखंडात अहोमांनी अनेक चढ उतार पाहिले. त्यात मुघल – अहोम संघर्ष १६१५ सालापासून वाढत गेला.
अहोमांची जीवनशैलीच मुळात योद्धयाची होती. युद्धकौशल्य, शस्त्रविद्या,युद्धसाधनं हाताळणं, स्वसंरक्षण या गोष्टी कौटुंबिक संस्कारांचा अविभाज्य भाग होत्या. लाकूड आणि लोखंडापासून वाहतुकीची साधनं, जहाज तयार करणं, शस्त्र आणि दारूगोळा निर्मिती, चिलखत आणि ढाली तयार करणं असं अनेक गोष्टींचं प्रशिक्षण कुटुंबात स्त्री - पुरुष दोघांनाही बरोबरीने मिळत असे. त्यामुळे आईही मुलांना हे शिक्षण सहज देऊ शकत असे!
इ.स. १६७० सालापासून पुढे आसामच्या भूमीचा ११ वर्षं ग्रहणकाळ सुरू होता. निष्ठावान पराक्रमी योद्धा लाचित बडफुकन गेल्यानंतर त्याचा मोठा भाऊ लालूकसोला हा बडफुकन म्हणून नियुक्त केला गेला. पण हा मुघलांशी हात मिळवणी करणारा होता. बडफुकन ही अहोम राजांद्वारे केली जाणारी एक महत्वपूर्ण नियुक्ती होती. बडफुकन यांना न्याय आणि प्रशासनाचे स्वतंत्रपणे अधिकार होते. लालूकसोला याने राजा सुदैफाला मारून अवघ्या १४ वर्षांच्या सूलिक्फा (रत्नध्वज सिंह ) याला गादीवर बसवलं. मग हिंसेचं एक भीषण पर्व सुरू झालं. राज्यभरातले लहान, तरुण राजकुमार शोधून काढून त्यांना एकतर मारून टाकायचं किंवा गंभीर जखमी करून अपंग करायचं, जेणेकरून अहोमांच्या सिंहासनासाठी ते पात्रच ठरणार नाहीत! असंख्य राजकुमार पकडले गेले, मारले गेले. जयमतीच्या आग्रहावरून तिचा पती राजकुमार गदापणी आणि दोन्ही मुलं लाई आणि लिचाई तिथून निघून गेले. आधी नागभूमीत आणि नंतर दऱ्याखोऱ्यात फिरून गदापाणी सैन्य जमवत राहिला. यातच जयमतीला पकडून बंदी करण्यात आलं होतं आणि तिच्यावर अनन्वित अत्याचार सुरू होते.
अखेरीस २७ मार्च १६८० रोजी जयमती हे जग सोडून गेली...! तिचं हे सर्वोच्च बलिदान गदापाणीने वृथा जाऊ दिलं नाही. तो पेटून उठला. प्रचंड सैन्य जमा करून त्याने अन्यायी सत्तेचा बीमोड केला. मार्च १६८२ मध्ये गदापाणी अहोमांच्या सिंहासनावर बसला. ऑगस्ट १६८२ मध्ये प्रचंड मोठा युद्धनौकांचा ताफा मुघलांवर आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. बांदार बडफुकन, चंपा पानीफुकन हे आपल्या सैन्यासह ब्रह्मपुत्रेवरून तर दुसरा ताफा झांडिकोई फुकन, खामराक फुकन हे कोलोंग नदीवरून, याशिवाय भूभागावरून सशस्त्र पायदळ असे सगळे दक्षिण तीरावर गेले. खवळलेल्या युद्धनौका, जिंकण्याचा निर्धार आणि सती जयमतीचं हौतात्म्य यांच्यापुढे मुघल टिकू शकले नाहीत. मन्सूर खान आधीच त्यांच्या मुख्यालयाकडे रंगमतीकडे परत गेला होता. त्यामागोमाग मुघलांचा कमांडर अली अकबर हाही माघारी गेला. अहोम सैन्याने मुघलांना पार मानस नदीपलीकडे हद्दपार केलं आणि अहोम राज्याची सीमा विस्तारली. याशिवाय सोनं, चांदी, हत्ती, घोडे, बैल, म्हशी, तलवारी, बंदुका असा मोठा साठा हस्तगत केला. या युद्धाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे औरंगजेबाला जबरदस्त धडा मिळाला!
राजा रुद्र सिंहाने (लाई) आपली आई सती जयमती हिच्या पुण्यस्मरणार्थ जेरेंग पठारावरती तिला जिथे बांधण्यात आलं होतं त्याभोवती एक मोठा तलाव खोदून घेतला, तोच जय पुखुरी (तलाव). त्यालाच जय सागर असंही म्हटलं जातं. ‘सती जयमती अमर रहे’ असं मनामनांवर कोरत हा तलाव आजही शिवसागर इथे बघायला मिळतो, मंदिरही आहे.सत्तांध, भ्रष्ट, अन्यायी कुप्रशासकाविरुद्ध तिने सामर्थ्यशाली मनाचं उदाहरण प्रस्थापित केलं आणि कल्याणकारी राज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली!
शौर्य हा गुणधर्म आसामच्या मातीत असल्याने कितीतरी वीरांगना इथे होऊन गेल्या. बंगालचा नवाब नासिरुद्दीन याचा सरदार तुर्बक चालून आला तेव्हा त्याच्याविरुद्ध मूला गभारू हत्तीवर बसून अखेरच्या श्वासापर्यंत समरांगणात लढली! अशीच धाडसी होती राणी कुरूंगनयनी. ही मुळात मणिपूरची राजकन्या, जिने अहोम साम्राज्याप्रती निष्ठा कायम ठेवत मोआमारिया बंडाला मोडून काढलं. सत्ता ओरबाडून मनमानी करणार्या आततायी शासकाची मान धडावेगळी करण्याचं अद्वितीय शौर्य दाखवलं! पूर्वांचलातल्या या सगळ्या धैर्यमूर्तींना अपराजिता ग्रंथातून मानाचा मुजरा!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही