Body language - देहाची अद्भुत भाषा
ग्रंथ परिचय
“The most important thing in communication is hearing what isn’t said!” – Peter Drucker या ग्रेट माणसाने लिहिल्याप्रमाणे शब्दांच्या पलीकडे जाऊन संवाद साधण्याची कला अवगत व्हायला हवी. संवादाचं खूप प्रभावी माध्यम म्हणजे देहबोली- body language! तरुणांनी मुलाखतींना सामोरं जातांना त्यांची देहबोली कशी ठेवावी...त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्वं कसं उलगडत जातं? एका राष्ट्राच्या पंतप्रधानाने दुसर्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना किती घट्ट हस्तांदोलन केलं..त्यावेळच्या त्यांच्या एकूण हावभावावरून भविष्यात दोन राष्ट्रांचे संबंध कसे असतील?एवढंच काय पण आई म्हणून लहान मुलांच्या देहबोलीचे निरनिराळे अर्थ कसे लावावेत? अशा प्रकारे असंख्य वेळेला देहबोली हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्या समोर येतो.देहबोलीतून प्रत्येक जण संवाद साधत असतो कारण आपलं शरीर आपल्या विचारांना प्रकट करण्याचं प्रभावी साधन आहे! माणसाचा ३५ % संवाद हा शब्दांनी तर ६५ % संवाद नि:शब्दपणे साधला जातो. म्हणून हे भान...ही जाणीव आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे!
“चैतन्य आणि सृजनक्षम ऊर्जा म्हणजेच जाणीव होय. जाणीव म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं सार. कारण जाणीव हे मूल अधिष्ठान आहे. जाणीव सर्वव्यापी आहे. जाणीव अमूर्त आहे. जाणीव हेच अंतिम सत्य आहे...नि:शब्द शांतता हे जाणिवेचं उदात्त रूप आहे!” अशा अनेक मूलभूत विधानांनी आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा एक ग्रंथ नुकताच वाचनात आला-“body language-देहाची अद्भुत भाषा”. साडेतीन दशकाहून अधिक काळ होमिओपॅथीच्या क्षेत्रात मोलाचं काम करणार्या डॉ. अजित कुलकर्णी यांनी रूग्णाला समग्रतेने जाणून घेण्याच्या ध्यासातून देहबोलीचा खोलवर अभ्यास केला आणि या ग्रंथाची निर्मिती झाली. अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या मूळ इंग्रजी ग्रंथाचा तितक्याच ताकदीचा एस.व्ही. कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला. मैत्रीण प्राजक्ता टाकसाळे हीने या मराठी पुस्तकाचं मुद्रित शोधन (proof reading)केलंच पण ती या उपक्रमात अगदी मनापासून सहभागी होती यामुळेच हा ग्रंथ माझ्याही वाचनात आला.
देहबोलीचा अर्थ आणि विस्तार मुळात या पुस्तकात दिलेला आहे.
देहबोलीच्या विज्ञानाला Kinesics म्हणतात. देहबोलीच्या माध्यमातून गूढ अशा मानवी मनाचा माग काढण्याचं हे विज्ञान सगळ्याच क्षेत्रांमधे उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे. मन आणि शरीर यांच्या अतूट नात्यावर देहबोलीची नैसर्गिक संकल्पना उभी आहे. मनातली सूक्ष्म ऊर्जा शरीरातल्या प्रवाहाला, हालचालींना नियंत्रित करते, त्यांना दिशा देते. यामुळेच दहबोलीतून व्यक्तीची मानसिक स्थिती, तिचं व्यक्तीमत्त्वं आपसुख उलगडत जातं. मुख्य ४ विभागांमध्ये विस्तारलेला हा ग्रंथ अतिशय रंजकतेने हे विज्ञान आपल्यापर्यंत पोचवतो.
विभाग १: देहबोलीचं विज्ञान आणि इतिहास:
मानवी देहाबरोबरच देहबोलीही विकसित झाली. शाब्दिक भाषा आणि देहबोली या दोन्हींचा उगम, महत्त्व, कार्य याबरोबरच त्यांच्यातल्या साम्य आणि फरकांवरही हा ग्रंथ अचूक भाष्य करतो. आपण बोलतो त्या शब्दांभोवती असलेल्या वर्ग, शिक्षण, सामाजिक स्तर अशा कितीतरी वलयांना भेदून अंतरंगातली देहबोली पुढे निघून जाते. जिथे भाषेच्या मर्यादा दिसून येतात तिथे देहबोलीतून मात्र माणूस नैसर्गिक पद्धतीने अभिव्यक्त होत जातो! भरतनाट्यम मधला मुद्राभिनय असो वा हृदयाला स्पर्श करणारे मूकपट यातून हेच सिद्ध होतं!यापुढे जाऊन, भाषा आणि देहबोली दोन्ही बरोबर आले तर तो परिपूर्ण आविष्कार ठरतो!
माणसाचे कपडे, त्यांचा रंग, केस, गंध, हातवारे, चेहर्यावरचे हावभाव, उभं रहाण्याची वा बसण्याची पद्धत, बोलण्याची गती, डोळे, स्वरांतला चढ उतार, हसणं, स्पर्श, भुवया, बोटं, नाक या सगळ्यांमद्धे दडलेले गूढार्थ या ग्रंथातून रंजकतेने उलगडत जातात. आपलं शरीर... रोजचेच आपण... पण इतक्या सूक्ष्म पद्धतीने या सगळ्यांचं अर्थ आपण कधीही जाणून घेतलेला नसतो. म्हणून हे थक्क करणारं आहे!
विभाग २ : संवाद साधन
या विभागात मेंदू मधलं संवेदनांचं जग आणि संवाद साधण्याची प्रक्रिया किंवा तंत्र स्पष्ट केलेलं आहे. नि:शब्द संवादामधे अक्षरशः जादू असते! शब्दांनी जे साध्य झालं नाही ते कृष्णाच्या विश्वरूपदर्शनाने अर्जुनाला कळून आलं - हे उदाहरण किती बोलकं आहे! या विभागात दिलेले संवाद कौशल्याचे अनेक पैलू आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ऐकणं आणि लक्षपूर्वक ऐकणं यातला फरक, प्रतिसाद, बोलणं, बघणं याशिवाय विशिष्ट उद्देशासाठी मुलाखतकाराने मुलाखतीचं नेमकं कोणतं तंत्र निवडावं- मुलाखत घेतांना आधार, सहानुभूती, दिलासा देत सूत्रबद्ध पद्धतीने सत्यापर्यंत कसं पोचावं हे सोप्या पद्धतीने या ग्रंथात लेखकाने समजावलं आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्याला जाणण्याआधी स्वतःला नीट जाणलं पाहिजे, म्हणूनच “स्वसंवाद” या सातत्याने चालणार्या आंतर प्रक्रियेवर लेखक इथे भर देतो. स्वसंवादाचं स्वरूप लक्षांत घेऊन त्याचा दहबोलीशी कसा संबंध आहे हे जाणून घेणं केवळ अद्भुत आहे!
या जीवन प्रवासात आपण आपल्या मूल स्वरूपापर्यंत पोचणं हे आपलं ध्येय आहे. म्हणून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही पातळ्यांवर आरोग्य स्वस्थ असलं पाहिजे याची जाणीव आपल्याला हा ग्रंथ करून देतो. एक प्रकारे या ग्रंथाला असलेलं प्रबळ असं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या लक्षात आल्याशिवाय रहात नाही.
विभाग ३ : देहबोलीची मूलतत्त्वं
व्यक्तीची प्रथम दर्शनी छाप (first impression)इथपासून ते पुढे निरीक्षणाच्या इतर अनेक गोष्टी आपल्याला या विभागात प्रकर्षाने शिकायला मिळतात. कोणता रंग कोणत्या भावना प्रकट करतो, चपला, केस, घातलेले दागिने, दाढी – मिशा, एखाद्या स्त्रीने केलेली रंगभूषा किती गडद वा हलकी आहे, एखाद्याने व्यक्तीचा टॅटू कसा, कुठे आहे, खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने पाय कसे सोडले वा गुंडाळले आहेत, गाडी चालवताना स्टेरिंग कसं पकडलं आहे, चेहर्यावरचे पुरळ ...या सगळ्या गोष्टींमधे कितीतरी अर्थ दडलेला असतो! तसंच बोटांमधले मज्जातंतू मेंदुमधल्या वाचाकेंद्राशी जोडलेले असतात म्हणून हस्तमुद्रांमधल्या विज्ञानाला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे. याचप्रमाणे माणसाच्या अंतरंगाचं दर्शन घडवणारं आश्चर्य म्हणजे डोळे! “डोळे हे मेंदुचं विस्तारित रूप आहे” हा सिद्धांत लेखकाने अत्यंत जवाबदारीने मांडला आहे.
“जेव्हा एखादा संवाद होतो तेव्हा तो २ पातळ्यांवर चालतो- शब्दांनी आणि आवाजाच्या शैलीतून. शब्दांपेक्षा आवाजात अधिक अर्थ भरलेला आहे!” हे नेमकं कसं ते सांगताना लेखकाने मानवी आवाजाची निर्मिती, तिची कार्यप्रणाली,आवाजातून स्वाभाविकपणे समजणार्या गोष्टी यावर विशेष भर दिला आहे.
विभाग ४ : सम्यक दृष्टीकोनातून देहबोली
कोणत्याही व्यक्तीच्या वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात देहबोलीचा संबंध कसा आहे हे ग्रंथाच्या या विभागात प्रामुख्याने दिलं आहे. समस्येची मूळ कारणं त्या व्यक्तीच्या अंतरंगात सुप्तावस्थेत दडलेली असतात. म्हणून यशस्वी होण्यासाठी “शांततेचा अनुवाद” करायला जमलं पाहिजे! स्वत:च्या तसंच दुसर्यांच्या समस्या सोडवताना भावना ओळखण्यासाठी निरीक्षणाची हातोटी हवी. यासाठी देहबोली महत्त्वाची ठरते. समोरच्याच्या देहबोलीतल्या सूचक गोष्टी, विरोधाभास हे आपल्याला कळलं पाहिजे. अगदी जीवसृष्टीतही देहबोलीचे आविष्कार आढळतात. अक्रोडची मेंदुसारखी रचना, घेवड्याच्या बियांचा मूत्रपिंडासारखा आकार... म्हणजे अर्थातच ती गोष्ट त्या अवयवासाठी अत्यंत उपयुक्त असते! अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
नातेसंबध असो वा व्यावसायिक यश- व्यक्तीच्या मनाशी संबंध जोडायचा असेल तर देहबोली हा प्रभावी मार्ग आहे. आपल्या गुणवत्तेला, व्यक्तिमत्त्वाला योग्य साधनांची, विशेषतः देहबोलीची साथ आपण दिली आहे का हे प्रत्येकाने पडताळून पहावं. नाहीतर कितीही छाप पडणारं व्यक्तिमत्त्वं असलं तरी त्याला यश मिळत नाही. प्रत्येकाने सुस्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि विश्वासार्ह संवाद साधण्यासाठी देहबोलीचं तंत्र आवश्य जाणून घ्यावं. सकारात्मक देहबोलीचा परिणाम आधी स्वत:वर होतो. आपण योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचत आहोत का याकडे प्रत्येकाने लक्षं दिलं पाहिजे.
मुलांना कुमारवयातच देहबोलीशी निगडीत योग्य पद्धती शिकवल्या तर यशस्वी होण्यासाठी त्यांना मदत होईल. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, समुपदेशक, नेते, शिक्षक, पालक,मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत, अभिनेते, इतर व्यावसायिक...अगदी कुणीही असो....प्रत्येकासाठी देहबोलीचं ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे!
अशा प्रकारे जागतिक कीर्तीचे आणि अतिशय उपयुक्त ग्रंथ मराठी भाषेत येत आहेत ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे! मन:पूर्वक शुभेच्छा!
(मूळ इंग्रजी लेखक - डॉ. अजित कुलकर्णी मराठी अनुवाद – एस. व्ही. कुलकर्णी)
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment