चाणक्य : नाटक नव्हे ध्यास...!
“राष्ट्र और समाज के उन्नती के पथ में यदि धर्म बाधक है, वह धर्मभी त्याज्य है!” अशा अनेक मर्मभेदी वाक्यांनी मनाचा ठाव घेणारं...श्री मिहिर भूता यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शक पद्मश्री मनोज जोशी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्राण फुंकलेलं धगधगतं नाटक - “चाणक्य!” अस्खलित हिंदीभाषेच्या अमृतानं कानांना तृप्त करणारं हे नाटक बघणं म्हणजे मोठीच पर्वणी! संध्यावंदन करणार्या चाणक्यापासून सुरू होणारं हे नाटक पुढे ज्या पद्धतीनं आपल्यात भिनत जातं...ही सांगायची नव्हे तर केवळ अनुभवायची गोष्ट आहे!
चार वर्षं संशोधन करून लिहिल्या गेलेलं हे नाटक तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर सादर होत आहे. चंद्रगुप्त मौर्य, राक्षस अमात्य या मुख्य भूमिका वठवणारे तसंच इतर सर्व कलाकार अत्यंत ताकदीचे आहेत! अप्रतिम अशी प्रकाश योजना व्यक्तिरेखांना वेगळाच उठाव देऊन जाते! त्यामुळं फार भव्य नेपथ्य वा इतर कुठल्या विशेष तंत्रज्ञांनाशिवायही तो काळ अत्यंत सहजपणे आपल्यासमोर अवतरतो! आलेक्झांडरची आक्रमणं, त्याकाळची शस्त्रास्त्रं असू देत वा वेशभूषा...सगळंच तोडीस तोड!
आर्य चाणक्याच्या अचाट बुद्धिसामर्थ्याला शोभणारं तरीही कुठेही डोईजड न होणारं असं अत्यंत सुंदर लिखाण मनोज जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोचवतात यात शंकाच नाही! भारताचा गौरवशाली इतिहास आणि अखंड भरतवर्षासाठी चाणक्यानं केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा सगळ्यांपर्यंत पोचवण्याची मनोज जोशींची तळमळ या प्रयोगाला नाट्यकलाकृतीच्या पलीकडे नेऊन एका ध्यासपर्वात रूपांतरित करते! गेल्या बत्तीस वर्षांपासून या कलाकृतीसाठीचं त्यांचं समर्पण खूप मोठं आहे! अपमानित झालेला चाणक्य जेव्हा प्रतिज्ञा करतो तेव्हाचा क्षण अक्षरशः अंगावर सरसरून काटा आणणारा आहे! तसंच अर्जुनाप्रमाणे “या लढाया मी कशासाठी करू?” असा प्रश्न चंद्रगुप्ताला पडल्यावर ज्या पद्धतीनं चाणक्य त्याला कडकपणे समजावतो...केवळ अद्भुत...शब्दातीत!
या नाटकाद्वारे त्याकाळचा इतिहास तर परिणामकारक रित्या उलगडतोच शिवाय चाणक्याची अनेक...अनेक वाक्य मेंदूत थेट नोंदवली जातात! आजच्या काळातही त्यांची समर्पकता आपल्याला मुळापासून विचार करायला भाग पाडते! “कर्म बिना विद्या ये व्यासंग नही...व्यभिचार है|” ...संपूर्ण प्रयोगात चाणक्याच्या किती वाक्यांवर टाळ्या पडतात याला सीमाच नाही!
आर्य चाणक्याच्या संकल्पशक्तीची, त्याच्या अद्भुत प्रतिभेची प्रचिती येऊन तीन साडेतीन तासाच्या दीर्घ प्रयोगानंतर आपण प्रचंड भारावून जातो! इतर कलाकारांच्या परिचयानंतर शेवटी जेव्हा पद्मश्री मनोज जोशी येऊन व्यासपीठावर मस्तक टेकवतात....तेव्हा संपूर्ण सभागृहात उभ्यानं वाजणार्या टाळ्यांचा दीर्घकाळ होणारा कडकडाटच सगळं सांगून जातो! यानंतर मनोज जोशीं जिव्हाळ्यानं जो काही मोजका संवाद साधतात...कलाकार,माणूस आणि एक राष्ट्रभक्त म्हणून आपल्या मनांत ते कायमचं घर करतात!
“राजा होना ये सुखी होने का मार्ग नहीं है कदापि...!” चाणक्याचं हे एक वाक्य जरी आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घेतलं तर किती बरं होईल...असं आपल्याला प्रकर्षानं जाणवतं! अधिक काय बोलणे!कोविड नंतर रंगभूमीवर असेच उत्तमोत्तम प्रयोग आपल्याला आणि विशेषतः आपल्या मुलांना बघायला मिळू देत! ज्याला जिथे शक्य होईल तिथे आवर्जून पहा – चाणक्य!
- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment