रामकथामाला - संपूर्ण भारताला सांधणारं ऐक्याचं सूत्र आणि अखिल मानवजातीसाठी दीपस्तंभ! - पुस्तक परिचय.

“आमची स्वधर्माची कल्पना ही स्वराज्याशिवाय भिन्न नाही, ती दोन्ही साध्य- साधन या नात्याने संलग्न आहेत. स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ होय व स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होय.” सावरकरांच्या या उक्तीप्रमाणे या तत्त्वद्वयांसाठी - स्वधर्म आणि स्वराज्यासाठी जगणारे आणि लढणारे पराक्रमी वीर ही भारताची ओळख! याचा परमोच्च आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम! दुष्टांचं निर्दालन करून धर्मसंस्थापना अर्थात न्यायाचं राज्य पुन:स्थापित करण्यासाठी रामाने जन्म घेतला!अत्युच्च कोटीची राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, धर्मपरायणता श्रीरामाच्या चरित्रातून स्त्रवते. म्हणूनच रामायण म्हणजे केवळ रामाची जीवनकथा नसून शतकानुशतकं भारतीय जनमानसाला व्यापून टाकणारा, समाजाला सामर्थ्यशाली करणारा तो जीवनमंत्र आहे!
रामकथेला अतिशय व्यापक स्वरुपात किंबहुना वैश्विक स्वरुपात मांडणारं एक अभ्यासपूर्ण पुस्तक नुकतंच वाचनात आलं- दीपाली नरेंद्र पाटवदकर यांचं “रामकथामाला”! रामायणावरचे व्यासंगी संशोधक डॉ. निलेश ओक यांच्या प्रस्तावनेचं कोंदण लाभलेलं आणि विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभाग पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आतापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या रामकथेची व्याप्ती किती मोठी आहे याची नव्याने जाणीव करून देतं!
“रामकथा देश,भाषा, धर्म, पंथ अशी कोणतीच बंधनं मानत नाही. ती केवळ भारताची नाही,हिंदूंची नाही, तर संपूर्ण मानवजातीची कथा आहे.” हे उदात्त सूत्र या संपूर्ण पुस्तकात सुंदर पद्धतीने गुंफलं आहे...! जगभरातल्या साहित्यातून लिहिल्या गेलेली रामकथा, चित्र आणि शिल्पातून, नृत्य - नाट्यातून, लोककलेतून प्रकटलेली आणि अर्थात animation च्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत असंख्य भाषांमध्ये पोचलेली आजची अभिनव स्वरूपातली रामकथा...अशा ओघवत्या स्वरुपात रामकथेचे एकेक अंतरंग यातून आपल्यासमोर उलगडतात! वाल्मिकी रामायणाची विस्तृत माहिती यात आहेच. याशिवाय वैदिक काळातले, महाभारतातले, प्राचीनतम साहित्यांपैकी एक अशा तमिळ संगम साहित्यासह दक्षिण भारतातलेही अनेक उल्लेख यात आहेत.
रामायण कथा भारतात जन्मलेल्या सगळ्या पंथांना “आपली” वाटते! म्हणूनच जैन, बौद्ध...आणि अगदी शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्म ग्रंथात सुद्धा प्रेरक अशी ही रामकथा आहे! याचप्रमाणे पर्शिया(आताचा इराण), अफगाणिस्तान, पाकिस्तान,तिबेट, चीन,मंगोलिया, कंबोडिया, इंडोनेशिया अशा कितीतरी देशांमधे रामकथा प्रवाहीत होत आहे. अर्थातच स्थळ, काळ, परिस्थितीनुसार तिकडच्या रामकथेत काही बदलही जाणवतात. साहित्यकारांच्या, कलाकरांच्या प्रतिभा, मानवी भाव भावना रामकथेत मिसळून तिचे वेगवेगळे रंग तयार होतात....पण “राम” हे अमर सूत्र अखंडपणे त्यातून पुढे जातं!हे बदल नेमकेपणाने, रोचक पद्धतीने आपल्याला यात वाचायला मिळतात. म्यानमार, थायलंड या देशांमधलं राष्ट्रीय काव्य रामायण आहे तसंच नेपाळचं ब्रीद वाक्यच रामायणातलं आहे...पुस्तकात आवर्जून दर्शवलेल्या अनेक गोष्टी आपल्याला खडबडून जाग्याही करतात..!
पुस्तकातला अत्यंत भावणारा भाग म्हणजे रामकथेद्वारे समाजमनाला दिल्या गेलेला आधार, शक्ती! मनुष्यावर आलेल्या आपत्तींसाठी त्याने “राम राम” या मंत्रातून धैर्य मिळवलंच पण परकीय आक्रमणांच्या काळात, अन्यायकारक राजवटींमधे तुलसीदास, एकनाथ महाराज अशा अनेक संतांनी रामकथेद्वारे समाजाला वेळोवेळी निराश, दुर्बल होण्यापासून वाचवलं. लोकांना धैर्य दिलं, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केलं, मुख्य म्हणजे स्वधर्माशी एकनिष्ठ ठेवलं! इंग्रजांच्या काळात गांधीजींनी आपलासा केलेला “रघुपती राघव राजा राम...” हा मंत्रही किती सामर्थ्यशाली होता!
या पुस्तकांत चित्रातली, शिल्पातली रामकथा अत्यंत सुबकतेने व्यक्त झाली आहे! भारत आणि जगभरातल्या विविध चित्रशैलींमधल्या रंगीत आणि मनोवेधक चित्रांचा अंतर्भाव पुस्तकांत आहे. मधुबनी, पट्टचित्र,चित्रकथी हे प्रकार तसंच काश्मीर, हिमाचल, केरळ इत्यादि प्रांतांतल्या पारंपारिक चित्रशैली, दगडांत, लाकडांत कोरलेल्या देशोदेशींच्या शिल्पांचे फोटोज आपल्याला थक्क करतात! याचा आणखीन एक फायदा म्हणजे अक्षर ओळख नसलेल्या अगदी लहान मुलांनाही हे पुस्तक आकर्षक वाटतं आणि ते चित्रं बघत रहातात, गोष्टी ऐकतात! पुस्तकातला जिजाऊंच्या मांडीवर बसून रामायण ऐकतांनाचे लोभस बाल शिवाजी महाराज बघून रामकथा ही स्वराज्यनिर्मितीचीही प्रेरणा होती हे लक्षात येतं!
भरतनाट्यापासून ते कठपुतलीच्या खेळापर्यंत रामकथा असंख्य प्रकारे जगभरात सादर केली जाते! रामलीला या प्रकाराचा UNESCO ने मानवाच्या Intangible Cultural Heritage मधे केलेला समावेश ही भारतीयांसाठी किती गर्वाची गोष्ट आहे...अशा खूप गोष्टी या पुस्तकातून कळतात!
पुस्तकात अनेक ठिकाणी इतिहासातले अचूक संदर्भ दिले आहेत. उदाहरणार्थ, संस्कृत नाटककार भास याने रामकथेवर लिहिलेल्या नाटकांचा गाभा विशद करतांना भासावरती केरळच्या टी. गणपतीशास्त्री यांनी केलेल्या संशोधनाचा लेखिका आवर्जून उल्लेख करते. अशा संदर्भांमुळे माहितीत मोलाची भर पडते. तसंच संत तुलसीदासांच्या जीवनात आलेले चढ उतार...इत्यादि अनेक गोष्टी आपल्या मनाला स्पर्शून जातात!ठिकठिकाणी संकृत श्लोक, काव्य, वचनं यांच्या समर्पक ओळी पुस्तकात पेरलेल्या आहेत. रामायण – काल, आज आणि उद्या हा महत्त्वपूर्ण विचार समोर ठेवत...हेलीकॉप्टरमधून राम सेतूचं विहंगम दर्शन करण्याचा आशावाद आपल्यात जागं करणारं हे पुस्तक आहे!
आहे ती परिस्थिती स्वीकारून मिळालेल्या संधींचं सोनं करत गेलेला श्रीराम...! म्हणूनच माणसाला सातत्याने कर्मप्रवण ठेवण्याचं काम रामकथा करते!रामायणातली मूल्यं अक्षय आहेत, कालातीत आहेत! म्हणून पुढच्या पिढ्यांना ही कथा मार्ग दाखवत राहील!
कागदाचा, रंगीत चित्रांचा उच्च दर्जा राखून आणि पुस्तक त्वरित घरपोच देण्याच्या सेवेसह विवेकानंद केंद्राने हे पुस्तक फक्त २०० रुपयांना उपलब्ध करून दिलं आहे! २० वर्षं software क्षेत्रात काम करणार्या दीपाली ताईंनी “स्व” च्या शोधार्थ वेगळ्या दिशेला प्रवास सुरू केला आणि अनेक अभ्यासपूर्ण लेख, पुस्तकं आपल्या हातात पडली! हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अशा अनेक साहित्यकृती, कलाकृती निर्माण करण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा! Deepali Patwadkar . तसंच या पुस्तकाचं लवकरात लवकर भारताच्या विविध भाषांमधे , विशेषतः हिन्दी आणि इंग्लिशमधे भाषांतर व्हावं असं मनापासून वाटतं.
आज इंटरनेटच्या काळात विश्वातल्या चांगल्या माहितीबरोबरच विचलीत करणारी अनेक प्रलोभनंही आपल्या मुलांना सहज उपलब्ध आहेत! त्यांना कुठे कुठे अडवणार आणि किती गाळण्या बसवणार? समोरच्या वस्तूंवर प्रतिबंध लावण्यापेक्षा ... मुळात चांगलं नी वाईट ठरवायचं कसं हा “नीरक्षीरविवेक” त्यांच्यात जागा करणं हाच अंतिम उपाय पालक म्हणून आपल्या हातांत आहे!यासाठी वेगळे काय संस्कार करणार?इतिहासातल्या जीवन चारित्रांमधून कळणारा जीवनानुभव त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवणं हे आपण सहज करू शकतो. नवीन पिढी अत्यंत डोळस आहे...साहजिकच त्यांच्या तर्काला पटेल अशा अभ्यासू पद्धतीने आपण आपल्या गौरवशाली इतिहासाशी त्यांची ओळख करून द्यायला हवी! अशा “सप्रमाण” लेखनामुळे बुद्धीवरची धूळ झटकली जाईल. रामायणाप्रमाणे सरसकट “mythology” मधे गणल्या जाणार्या अनेक भारतीय गोष्टी या “myths” नसून मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहेत... हे आपल्याला सगळ्यांनाच खात्रीपूर्वक पटेल!
यावत् स्थास्यन्ति गिरय: सरित: च महीतले |
तावत् रामायणी कथा लोकेषु प्रचरिष्यति ||
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी.

- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी(नि.) ©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही