भूर्जपत्रं...कश्मीरच्या भूमितले - आठवणीतलं झाड!
हिमालयाच्या कुशीतल्या आठवणी म्हणजे सुखद गारवाच! ही अशीच एका वृक्षाची आठवण!कश्मीरचा अत्यंत दुर्गम भाग...तिथे आमच्या युनिटनं रस्तेबांधणीचा ध्यास घेतला होता. या छोट्या रस्त्यांनी अनेक फायदे होतात. मुख्यत: अति-दुर्गम भागात गाडी जाऊ शकते आणि तिथे पहारे देणार्या infantry च्या जवानांना वेळेत रॅशन मिळतं! यासाठी मुळात आतल्या भागात असलेल्या त्यांच्या छावण्या आणि मुख्य रस्त्यांपासून तिथपर्यंत रस्ता (किंवा track)कसा बांधला जाऊ शकतो यासाठी पाहणी करणं आमच्यासाठी महत्त्वाचं असे. अंगावर जाडजाड कपड्यांची आवरणं सांभाळात दर्याखोर्यांमधे मैलोन् मैल पायपीट व्हायची. मात्र बांधून झाल्यानंतर त्या नवीन रस्त्यांवर पहिल्यांदा जिप्सी किंवा जीपमधे बसून गोल गोल वळणांनी वर टोकावर पोचणं हा अक्षरशः रोमांचकारी अनुभव असे! (ट्रायल असल्यानं धाकधूकही असायची!!!!).
एकदा एका भागाचं निरीक्षण करत फिरतांना आमची आहे ती गाडी बंद पडली. मग driver आणि काहींना तिथे मागे सोडून माझे वरिष्ठ अधिकारी (मेजर साहेब),रिटायरमेंटला आलेले एक अनुभवी हवालदार, एक जवान आणि मी (नुकतंच प्रमोशन झालेली एक उत्साही कॅप्टन साहिबा), असे पुढे कुठे मदत मिळतेय का हे बघण्यासाठी निघालो. भोवती निर्मनुष्य दर्या, डोंगर, भरपूर दगड असं सगळं होतं. ऊन्हात नेहमीप्रमाणे काहीही जीव नव्हता. त्यामुळे अंधारून येतं की काय ही शंका सतत मनात यायची. खूप उंचीवर होतो आम्ही. तिथे वर चढतांना एका वळणाच्या अगदी टोकावर एक वेगळंच, भव्य झाड दिसलं. त्याची साल बरीच निघालेली होती. त्या हवालदाराला मी विचारलं की हे कोणतं झाड आहे? तर मूळच्या उत्तर प्रदेशातल्या आणि माझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या अशा त्या हवालदारानं सांगितलं, “सहाबजी जब कागज नही थे तब हमारी पुरखे इसी पेडकी खालपर लिखा करते थे...भोजपत्तर!” तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला! या भागात हे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यात बरेच प्रकारही असतात असं त्यानं सांगितलं..! मी ती साल थोडी नमुन्यादाखल तोडण्यासाठी सांगितलं. कोपर्यावर खूपच उंचीवर होतं झाड, खाली खड्डा होता. साल न फाटता काढणं अतिशय अवघड होतं, पण बायोनेट वगैरेच्या मदतीनं थोडी साल आम्ही काढलीच! Risky होतं. बरेच कीटकही त्यात होते.
“हम इसे साथ ले चलते है...” असं मी बोलत असतानाच तिथे माझे सिनियर मेजरही आले. तसं ते मला गंमतीत “ज्यादा पढी लिखी लडकी” म्हणून चिडवत असत. पण आता ती साल तोडणार्या मला पाहून मात्र “कोणाला कशाचं ...आणि कोणाला कशाचं!” हे भाव त्यांच्या चेहर्यावर मी वाचू शकत होते! कारण पाठीला रायफल, कॉंबॅटच्या खिशांमध्ये इतर समान...त्यात हे मी कुठे ठेवणार? किती लांब नेऊ शकणार? गाडी कधी उपलब्ध होईल? सगळेच प्रश्न होते. मी पटकन तोडलेला तो गुंडाळा मोठ्या खिशात कोंबला. वेळ आली तर ते फेकून दोन्ही हात “सज्ज” होतील...याची स्वत: खात्री करून घेतली!
प्रवास सुरूच राहिला,काम पुढे गेलं. हा ऐवज मी गाडीच्या सीटखाली सुरक्षित ठेवला. काही दिवसांनी घरी (युनिटमधे) आल्यावर आठवणीनं ती साल मी आमच्या स्टेशनरी सेलमधे घेऊन गेले. कामाची घाईतच तिथल्या आमच्या जवानाला समजाऊन सांगितलं किती महत्वाची आहे ही साल ते. तुझं काम झाल्यानंतर, ही साल स्वच्छ करून मला ती जपून ठेवता येईल असं काही करून दे म्हणून सांगितलं. हे...ते...खूप सूचना दिल्या. “सहाबजी, समझ गया, सब ठीक कर दूंगा!” हे ऐकून मी परत गेले. संध्याकाळी केबिनमधे तो तळहाताएवढ्या आकारात spiral binding करून ते घेऊन आला. समोर आणि शेवटी ड्रॉइंग पेपर लावला होता. “ये ठीक है तो इसपे नाम लिख देता हूं आपका|” मी त्याचे मनापासून आभार मानले. नाव नको टाकू म्हणून सांगितलं.
तो गेल्यावर मी इतकं न्याहाळून पाहिलं त्या भूर्जपत्रांना...स्पर्श मऊ, अगदी तलम...! फारच सुरेख एकसारखे तुकडे कापून, बांधणी करून तो घेऊन आला होता...जणू पोथीच! आजोबांचीच आठवण आली मला. मनात विचार आला, यावर माझं नाव टाकणारी मी कोण बापडी! ही पानं मुळात कोरी नाहीतच! कितीतरी लिहिलेलं आहे यावर प्राचीन काळी भरतखंडातल्या ऋषी-मुनींनी! यावरच कुठेतरी लिहिलेलं असेल... “...शापादपि...शरादपि !” कश्मीरच्या अर्थातच तपश्चर्येच्या, साधनेच्या भूमीमधे रस्ता चुकून हा भव्य वृक्ष माझ्या नजरेला पडावा काय आणि जिवाचा आटापिटा करून त्याला सांभाळण्याची बुद्धी मला व्हावी काय! त्या भूर्जपत्रांवर नाहीच, पण ड्रॉइंगपेपरच्या कव्हरवर त्यावेळी सहज मनात आलेला गीतेचा श्लोक लिहून ठेवला आठवण म्हणून...! तपपूर्ती होईल लवकरच या माझ्या पोथीची!
मुलींमुळे आठवणींची ही फौजी ट्रंक सारखी उघडल्या जाते. त्यात गोष्टीच गोष्टी! “आई तू ही पोथी, या मातीच्या पुड्या, इतर छोटं छोटं सामान चिनारचं डिझाईन असलेल्या लाकडी बॉक्समधे घालून याच ट्रंकेत का ठेवतेस?” त्यांना सोप्या भाषेत सांगितलं, पण तेव्हा मनात आलं - “हे सगळं एकत्रच, कारण त्यातले वेगवेगळे युनिफॉर्म्स,बेल्ट्स,स्टार्स,अशोकचिन्हं हे सगळं कधीही एकटं नसतं! प्रचंड घामानं यातला एकेक धागा विणलेला असतो. वेदना, कृतज्ञता, शौर्य, अभिमान या वेगवेगळ्या भावनांबरोबरच वर्दीला असंख्य आठवणी चिकटलेल्या असतात...माणसांच्या,वस्तूंच्या, ठिकठिकाणी राहिलेल्या वास्तूंच्या, घोर संकटांवर मात करणार्या उत्तुंग मनोबलाच्या, दगडा-मातीच्या, अनवट वाटांच्या, संहाराच्या तशाच सृजनाच्या आणि मुख्य म्हणजे खाकी वर्दीच्या आत दडलेल्या संवेदनशील मनाच्या!”
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©
Comments
Post a Comment