होय....ही तीच बंडखोर भारतीय सैनिकांची २६वी तुकडी!

 मियाँ मीर...ही एका प्रसिद्ध सूफी संतावरून नाव असलेली ब्रिटिशांची मोठी छावणी होती. लाहोरपासून साधारण ५-६ किमी अंतरावर असलेल्या या छावणीत भारतीय सैनिकांच्या (Native Infantry) अनेक तुकड्या तैनात होत्या. यातलीच एक बंगाल आर्मीचा भाग असलेली २६ वी भारतीय तुकडी! ही बंगाल आर्मी १७५७ मध्ये उभी करण्यांत आली. यात आजच्या बंगाल, बिहार,उत्तर प्रदेश या भागांतले उत्तम असे भारतीय निवडण्यात आले. १८५७ पर्यंत प्रत्येकी ८०० सैनिक अशा बंगाल आर्मीच्या ७४ तुकड्या भारतभर तैनात होत्या!

१० में रोजी मेरठमध्ये झालेल्या विद्रोहाची बातमी लाहोरला पोचली. “सगळ्या भारतीय सैनिकांकडून त्वरित शस्त्र काढून घेण्यात यावे(disarmament)...” या आज्ञेचं तंतोतंत पालन करत २६ वी भारतीय तुकडी सुद्धा १३ में रोजी नि:शस्त्र करण्यात आली. विद्रोहाच्या बातम्या ऐकून सैन्य बिथरू नये म्हणून त्यांच्यापर्यंत कमीत कमी बातम्या पोचतील अशीही दक्षता घेण्यात आली. कारण रावळपिंडी,होशियारपूर,जलंदर ..कितीतरी छावण्यांमध्ये भरपूर भारतीय सैन्य तैनात होतं!
यावेळी पंजाबचा चीफ कमिश्ंनर सर जॉन लॉरेन्स यानं बंगाल आर्मीमधल्या हिंदुस्तानी सैन्याला धमकावणारं एक पत्र जाहिर केलं, “...काही मूठभर वाईट सैन्य हे तुमच्या बदनामीचं कारण होऊ देऊ नका...तसं झालंच तर तुम्हाला चिरडण्यासाठी इथे पंजाबमधे भरपूर सैन्य उपलब्ध आहे हे ध्यानात ठेवा!” यानंतर अत्यंत कडक धोरण राबवत “...having failed in their duty to the state” असं कारण देऊन किती तरी भारतीय सैनिक कोणत्याही पुराव्या अभावी तत्क्षणी फासावर लटकवले गेले! त्या व्यक्तीचा जीव,कायदेशीर पद्धत,पुरावा, न्याय वगैरे...यापेक्षा इतरांना जरब कशी बसेल ही इंग्रजांची एकमेव प्राथमिकता झाली!
तरीही,अन्यायानं पिचून गेलेल्या भारतीय सैनिकांमधलं रक्त स्वातंत्र्यासाठी उसळी घेऊ लागलं! किती दडपाल...आता त्याची भीतीच नाहीशी झाली! या दरम्यान पंजाबमधल्या अनेक छावण्या विद्रोहानं पेटून उठत होत्या. जुलैमधे ही २६ वी तुकडीही हिंमत बांधू लागली. ३० जुलै १८५७ रोजी प्रकाश सिंह हातात तलवार घेऊन ओरडला,“या रे या...पुढे या...हाच तो..मारा याला...!” त्यांनी कमांडिंग ऑफिसर मेजर स्पेन्सर यालाच उडवलं!पूर्ण छावणी हादरली. लेफ्टनंट मोंटेग व्हाईट तिथून कसाबसा निसटला. सार्जंट मेजर मारला गेला. या चकमकीनंतर सोसाटयाचा वारा २६ व्या तुकडीच्या मदतीला धावून आला...त्यांची तिथून सुखरूप सुटका करण्यासाठी!
ही धक्कादायक बातमी ऐकून त्यांचा कसून शोध सुरू झाला. दुसर्या दिवशी खबर मिळाली की हे बंडखोर सैनिक रावी नदी ओलांडत असताना त्यांना तिथल्या तहसीलदारानं अडवलं. जिल्ह्याचा ऑफिसर ८०-९० घोडेस्वारांसह तिकडे पोचला. पण मोठाच संग्राम तिथे घडून गेलेला त्यांना दिसला. साधारण १५० जण आजूबाजूला मरून पडले होते. चिखलात अनेक ठसे उमटले होते..म्हणजे याच दिशेनं हे बंडखोर पळाले...!
तिथून एक किलोमीटरवर असणार्या बेटावर भारतीय सैनिक होते. मागोमाग बोटी घेऊन ब्रिटिश त्याच बेटावर पोचले. त्यांना पाहून भारतीय सैनिक लाकडाचे तुकडे आणि मिळेल ती साधनं घेऊन प्रवाहात उड्या टाकू लागले. अनेक जण खोल पाण्यात सापडून वाहूनही गेले. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी गोळीबार न करता जास्तीत जास्त जणांना जिवंत पकडण्याचे आदेश होते. कारण इतका सहज मृत्यू त्यांना दिला असता तर त्यांना आणि इतरांनाही त्यांच्या अपराधाची जाणीव कशी झाली असती! दुर्दैवानं बरेच जण पकडल्या गेले. त्यांना बोटीत घालून काठावर आणण्यात आलं. हे भारतीय सैन्य अत्यंत थकलेल्या अवस्थेत होतं. वादळ,वारा, पाऊस,तहान,भूक....कितीतरी गोष्टी सहन करत या जोखडातून दूर जाण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता! त्यांचे जवळपास ४० मैल आधीच चालून झाले होते. जसा त्यांनी बोटीतून पाय खाली ठेवला...तसं त्यांना घट्ट पकडण्यात आलं. त्यांच्या युनिफॉर्म वरची चिन्हं ओढून घेण्यात आली. आतापर्यंत गावकरीही तिथे जमू लागले होते.परंतु काहीही इलाज नव्हता!
एकामागून एक गटागटानं बोटीतून २६ वी तुकडी काठावर आणण्यात आली. तीच पद्धत सगळ्यांना – कपडे ओढून काढणं आणि करकचून हात बांधणं...! तिथून अजनाला पोलिस ठाण्यापर्यंत त्यांना नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या अर्धमेल्या अवस्थेत गुडघ्या एवढ्या चिखलात पुन्हा ६ मैलांची पायपीट! अंधुकसा चंद्रप्रकाश होता! पहाटेपूर्वीच सगळे अजनाला पोलिस ठाण्यात पोचले! पावसाची भुरभूर सुरू झाली...त्यांना आणखीन काही श्वास मिळावेत यासाठी पाऊसही धडपडत होता! पावसामुळे लगेच काहीही निर्णय घेता आला नाही. छोट्या जागेत अनेक जणांना एकत्र डांबून टाकण्यात आलं.
या लेखात आतापर्यंतचं आणि इथून पुढचंही शब्द न् शब्द असं सविस्तर वर्णन ज्यानं स्वतःच करून ठेवलं आहे तो या अमृतसरचा डेप्टी कमिश्ंनर फ्रेड्रिक कूपर! हा अत्यंत तत्पर अधिकारी होता...या भारतीय सैन्याला झाडावर लटकवण्याची वेळ आली तर त्यासाठी जाड दोरीची मागणी त्यानं आधीच करून ठेवली होती. पुरेशी झाडं नसतील तर गोळ्या घालण्यासाठी (wholesale execution)शिखांची अतिरिक्त फायरिंग पार्टीही त्यानं बोलावली होती! तेवढ्यात जवळच असलेल्या एका मोठ्या कोरड्या विहिरीविषयी त्याला खबर मिळाली! व्वा! कामच झालं! आधीच गोळ्या घालण्याचे कष्ट...त्यात गोळ्या घातल्यावर या बंडखोरांचं सांडलेलं रक्तही पुसा...छे!कटकट नकोच!
१ ऑगस्टची पहाट! त्या दिवशी ईद होती! तुमच्या धार्मिक भावना आम्ही किती जपतो तो हे दाखवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुस्लिम घोडेस्वारांना तिथून दूर पाठवण्यासाठी त्यांना अमृतसरमध्ये जाऊन ईद साजरी करण्याची परवानगी देण्यांत आली!हे सैन्य २६ व्या तुकडीच्या मदतीसाठी येण्याची दाट शक्यता होती. ते निघून गेले. कूपर सुखावला. सगळं कसं जुळून येत होतं! कुणीही मदतीला येऊ नये म्हणून संपूर्ण भागात दूरवर पहारेकरी नेमण्यात आले. या स्थळी येण्यासाठी कूपरनं त्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही खास निमंत्रण पाठवलं. विहिरीजवळ execution point तयार करण्यात आला. शिखांची फायरिंग पार्टी सज्ज झाली. एकजण हातातल्या यादीतून सैनिकांची नावं पुकारू लागला. १० -१० च्या गटानं २६ व्या तुकडीला तिथे आणण्यात आलं. हातपाय बांधून एकत्र करण्यात आलं....काही मिनिटात देहाची चाळणी! पुढच्यांना मारत असतांना मागचे ते बघत होते. त्यांच्याही मागे जेलमध्ये असणार्यांना ते आवाज ऐकू येत होते....काय सुरू असेल त्यांच्या मनात?अन्नपाण्यावाचून वेदनेनं तडफडणारे हे जीव एकमेकांशी काय बोलत असतील? आई..बाप..चिमूरडी लेकरं...कायकाय!असले प्रश्न आपल्या मनात येऊच द्यायचे नाहीत!
यातले बहुतांश सैनिक मरताना गंगामातेचं प्रकटपणे स्मरण करत होते...अशी नोंदही कूपरनं न चुकता करून ठेवली आहे! १५० जण संपले!पुढचे सैनिक आणणार एवढ्यात समोरच्या फायरिंग पार्टीमधल्या एका वयस्कर शिख सैनिकाला भोवळ आली! स्वकीयांवर अगणित गोळ्या झाडून मेंदू शिणला असावा बिचार्याचा! त्यामुळं सगळ्यांना ब्रेक दिला गेला. परत काम सुरू. बरोब्बर २३७ बंडखोर संपले! तरी आणखीन ४५...सगळ्यात शेवटी आणल्या गेलेले उरलेच! त्यांना आणण्यासाठी कोठडीचा दरवाजा उघडला तर काय! त्यांना गोळ्या घालायचं काम वाचलं होतं! ते गुदमरून तिथेच निष्प्राण झाले होते!त्यांनाही आणून आधीच्या देहांवर टाकून देण्यांत आलं. (…forty five bodies dead from fright, exhaustion, fatigue, heat and partial suffocation; were dragged into light and consigned, in common with the other bodies, into a common pit, by the hands of the village sweepers.) एक दुर्दैवी शिपाई तडफतडत होता...त्याला तसंच लाहोरला पाचारण करण्यांत आलं. याशिवाय अमृतसर इथल्या ४१ विद्रोही भारतीय सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यांत आलं! मागच्या २ दिवसात कूपरनं ५०० बंडखोर संपवले होते!हुश! विशेषतः ही २६ वी तुकडी जर निसटली असती, तर त्याचे परिणाम फारच वाईट झाले असते!
कूपरला वरिष्ठांची अभिनंदनपर अनेक पत्र आली. त्यात राजा रणधीर सिंहासारखे फितुरही होते! जुडीशियल कमिश्ंनर रॉबर्ट मोंटेगोमेरी कूपरची अफाट स्तुती करून पुढे हेही लिहितो, “यातून काहीजण वाचले असतील तर त्यांना इकडे द्या पाठवून. You have had slaughter enough. त्यांना इथे साक्षीदार म्हणून सगळ्यांसमोर उभं करता येईल.तरच बाकीचे विश्वास ठेवतील!” यानंतर लगेच चीफ कमिश्ंनर जॉन लॉरेन्सनं जाहिरनामा काढला, “या तुकडीला ज्या प्रकारे शिक्षा दिली गेली ती घटना इतर हिंदुस्तानी सैन्याला विद्रोह करण्यापासून आणि ब्रिटिश अधिकार्यांना मारण्यापासून परावृत्त करेल अशी दृढ आशा वाटतेय!” कूपर या अभूतपूर्व घटनेची त्याच्या पुस्तकात भलामण करतो –अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी या सैनिकांना नाहक जीव गमवावा लागला! पण यांनी पुढच्या हजारोंचा जीव वाचवला...त्यांना बंड करण्यापासून रोखून! (..their extermination probably saved the life of thousands!). इथून पुढे जो कोणी या वाटेवर चालण्याचा सल्ला देईल त्याला या घटनेच्या गांभीर्याकडे बोट दाखवून इतर सैनिक वेड्यात काढतील! या अभूतपूर्व घटनेची दहशत कायम राहील! कानपूरमध्ये अशी विहिर होतीच आता अजनाला मधेही झाली!
या संपूर्ण घटनेचं यथासांग वर्णन लिहून ठेवलेलं असतानाही ही विहिर शोधायला २०१४ साल उजाडलं! त्यानंतर खात्री करून घेण्यासाठी पुढची आणखीन ८ वर्षं लागली! या काळात इतिहासकार, पुरातत्त्व आणि forensic दोन्हीतले शास्त्रज्ञ सगळेच काम करत होते. २०० च्या वर असणारे हे सांगाडे सुरूवातीला भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यानचे असतील अशीही दिशाभूल झाली.परंतु अनेक पुराव्यांवरून कळलं की हे पंजाबमधल्या माणसांचे सांगाडे नव्हतेच! पंजाब विद्यापीठाचे जे. स. सबरवाल यांच्या नेतृत्वाखाली, हैदराबाद इथली CCMB ही जीवशास्त्र क्षेत्रात काम करणारी संस्था, लखनौ इथली बीरबल साहनी संस्था आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांनी अथक काम करून हा निष्कर्ष काढला...की हे सांगाडे कूपरनं मारलेल्या २६व्या भारतीय सैनिकांच्या तुकडीचेच आहेत! हाडांबरोबरच दातांवरून DNA घेण्यात आले. तरूण,सुदृढ देह, शाकाहारी खाण्याच्या सवयी,गंगेच्या प्रदेशात वास्तव्य अशा अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. आतापर्यंत १८५७ मधल्या एकाच घटनेत मारल्या गेलेल्या माणसांचे एवढे सांगाडे सापडण्याची ही पहिलीच वेळ! तसंच ९,६४६ दात एकाच स्थळी सापडणं हा विश्वविक्रम आहे! यात १८०६,१८४१ आणि १८५३ सालची नाणीही सापडली आहेत! दोन भुवयांमधे तसंच इतर हाडांवर मारलेल्या गोळ्यांच्या खुणाही यांच्यावर स्पष्ट दिसून आल्या!
रणशिंग मधले शब्द आठवतात,“कागदावर लिहिलेले इतिहास फाडले तरी ते दगडांवर कोरलेले आहेत. त्या दगडांचे चूर्ण केलेत तरी इतिहास मरतोच असे नाही....आकाशात उंच उंच अशोकाच्या स्तूपावर तो विराजत असतो किंवा भूगर्भातील खोल खोल मोहोंजोदडो सारख्या पातालमंदिरात त्याची ग्रंथालयं सहस्त्रावधि वर्षं अभंगची अभंग रहातात!” अशा कितीतरी अनाम विहिरी सैनिकांचा अमर इतिहास घेऊन लुप्त झालेल्या असतील! त्यांचं बलिदान आपल्या सदैव स्मरणात राहो!
राष्ट्राच्या रक्षका तुला शत शत नमन
आहुतींची धार आणि तूच गंगेचं स्मरण!
गाडला तव देह परी,अदृश्य धागा गुंतलेला!
स्वातंत्र्याचा मंत्रघोष तू...भरतखंडा व्यापलेला!
वार सन्मुख झेलणार्या महावीरा कसलं मरण!
राष्ट्राच्या रक्षका तुला शत शत नमन!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
(Reference book – “The crisis in the Punjab” - from the 10th of May until the fall of Delhi – by Frederic Cooper, DC of Amritsar, published in London, 1858).

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही