माऊंट एव्हरेस्ट : बस नामही काफी है!(?)
एकेक राज्य जिंकून घेत आठराव्या शतकाच्या शेवटी इंग्रजांनी आपले पाय हिंदुस्थानात घट्ट रोवले होते. सैन्य, लढाया,नकाशे, पुढच्यायुद्धयोजना सतत सुरूच होत्या. मात्र एक अडचण होती. लढाईसाठी आवश्यक असणार्या tactical नकाशांमध्ये भारतातल्या प्रांतांची नेमकी भौगोलिक माहिती देणं खूप कठीण होतं. कारण जागांची अंतरं, पर्वतांची ऊंची, त्यांचे अक्षांश, रेखांश...अशा प्रकारची अचूक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे नकाशे आणि वस्तुस्थितीत तफावत येत असे. म्हणून यावर काम करण्याचं ब्रिटिश अधिकार्यांनी ठरवलं, विशेषतः टिपू सुलतानाशी झालेल्या लढाईनंतर. त्रिकोणमितीय किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून भारताचं सर्वेक्षण करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्टन(William Lambton) याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीनं १० एप्रिल १८०२ रोजी एक प्रकल्प सुरू केला. जो नंतर Great Trigonometry Survey of India या नावानं प्रसिद्ध झाला. मद्रासपासून सुरू झालेलं हे काम वाढत हळूहळू उत्तर भारतातही सुरू झालं.
पुढे १८३० साली सर जॉर्ज एव्हरेस्ट (Sir George Everest) हा भारताचा Surveyor General अर्थात मुख्य सर्वेक्षक अधिकारी म्हणून नियुक्त झाला. या दरम्यान सुरू असलेल्या बंगालच्या नकाशावर काम करण्यासाठी तो गोलाकार त्रिकोणमिती, सोप्या भाषेत spherical trigonometry या विषयात तज्ञ असलेल्या व्यक्तीच्या शोधात होता. हे कळल्यानंतर कलकत्त्यातलं हिंदू कॉलेज अर्थात आत्ताचं प्रेसीडेन्सी कॉलेज (Presidency College) इथे प्राध्यापक असलेल्या जॉन टाइटलर (John Tytler) यानं अवघ्या १९ वर्षांच्या त्याच्या एका भारतीय विद्यार्थ्याची या कामासाठी शिफारस केली! हा तल्लख बुद्धीचा असामान्य गणितज्ञ होता राधानाथ सिकदर! १८२४ पासून तो या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. किशोरवयातच गणिताची क्लिष्ट आणि महत्त्वाची प्रमेयं समजून घेणार्या दुर्मिळ भारतीय विद्यार्थ्यांमध्ये त्याची गणना होती. या राधानाथला १९ डिसेंबर १८३१ रोजी सर्वेक्षणाच्या प्रकल्पावरती ३० रुपये महिना पगारावर “computer” या पदावरती नोकरी मिळाली! देहारादून जवळ सिरोंज इथं त्याला पाचारण करण्यात आलं. त्याच्याबरोबर इतर ६-७ विद्यार्थीही होते. परंतु विलक्षण बुद्धिमत्तेमुळे राधानाथचा सर एव्हरेस्टवर आत्यंतिक प्रभाव होता.
एव्हरेस्ट १८४३ साली निवृत्त झाल्यावर कर्नल अँड्र्यु स्कॉट वॉ (Col Andrew Scott Waugh) यानं मुख्याधिकारी म्हणून पदभार घेतला. १८५१ मध्ये राधानाथची Chief Computer अर्थात “मुख्य गणक” म्हणून बढती झाली आणि तो कलकत्त्याला काम करू लागला. या आधीही गणिताच्या प्रस्थापित पद्धती वापरुन त्यानं अत्यंत मोलाचं योगदान या प्रकल्पात दिलं होतं. आता तो पर्वत शिखरांची मोजणी करत होता. प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सहा वेगवेगळ्या प्रकारच्या निरिक्षणांच्या सहाय्यानं त्यानं महत्त्वाचा data दाखल केला. त्यानं असा निष्कर्ष काढला की आत्तापर्यंत मानलं जाणारं कांचनजंगा हे जगातलं सगळ्यात उंच पर्वत शिखर नाहीच, त्याहीपेक्षा त्यानं मोजलेलं XV नावाचं शिखर सगळ्यात उंच आहे! हे फारच मोठं धाडस होतं!
त्यानं केलेलं मापन अचूक होतं. ईस्ट इंडिया कंपनीनं त्यावर शिक्का मोर्तब केलं. या XV शिखराला नाव काय द्यावं असा प्रश्न कंपनी अधिकार्यांसामोर होता! तिबेटीयन लोक पूर्वी या शिखराला “चा-मो-लंग-मा” (Cha-mo-lung-ma) नावानं ओळखत. या शब्दाचा अर्थ “विश्वाची देवता” असा होतो. भूगोलशास्त्रज्ञ D. Anville यानं १७३३ मध्ये पॅरिस इथे प्रकाशित केलेल्या नकाशावर याच नावाचा उल्लेख आहे. तर नेपाळमध्ये या शिखराला “सागरमाथा” असं संबोधलं जात असे. अर्थात “आकाशाची देवता”! तथापि, याविषयी अज्ञान म्हणून वा याकडे दुर्लक्ष करून अहवालात “सुसंस्कृत माणसांना समजेल असं या शिखराला नाव नाही” (The mountain has no name intelligible to civilised men”) असं सबब देण्यांत आलं. (सुसंस्कृत हा शब्द ब्रिटिश लोकांकडे निर्देश करतो हे वेगळं सांगायला नको). कर्नल वॉ यानं या शिखराचं नाव सर एव्हरेस्ट याच्या नावावरून “माऊंट एव्हरेस्ट” असं असावं अशी जोरदार शिफारस केली. (Col Waugh has therefore ventured to denominate it “Mount Everest” after a former surveyor-general.” (Calcutta Correspondent of the Times). हा ठराव संमत होऊन आतापर्यंत XV नावानं संबोधलं जाणारं हे अत्युच्च पर्वत शिखर १८६५ मध्ये “माऊंट एव्हरेस्ट” या नवीन नावानं जगभरात ओळखलं जाऊ लागलं!
एकतर सर एव्हरेस्ट यानं या शिखरावर स्वतः कधीही पाऊल ठेवलेलं नव्हतं! दुसरं म्हणजे तो सर्वेक्षण अधिकारी असतांना, त्याच्या कार्यकाळात या शिखराचं मोजमापन झालं नाही. तिसरं म्हणजे यावेळी सर एव्हरेस्ट हयात होता. तर या शिखराला त्याचं नाव देण्यात यावं ही त्याची ईच्छा होती का? तर तसंही नाही! या उलट एखाद्या स्थानिक नावानं हे शिखर ओळखल्या जावं असं त्याचं स्पष्ट मत होतं. “Mount Everest” या नावामागे आहे केवळ कर्नाल वॉ यानं देऊ केलेला आदर आणि औदार्य! शिवाय आपण ज्या प्रमाणे आज “एव्हरेस्ट” असा उच्चार करतो, तो तसा नव्हताच! आणि आपलं चुकीचं नाव उच्चारल्या जाण्याविषयी सर एवरेस्ट याला अत्यंत खेद होता...! अखेरीस ते चुकीच्याच उच्चारानिशी प्रसिद्ध झालं.
हा इतिहास आज वाचण्याचं कारण म्हणजे २९ में...माऊंट एव्हरेस्ट दिन याही वर्षी साजरा करण्यांत आला. एडमंड हिलरी (Edmund Hillary) आणि तेनजिंग नोर्गे यांनी एवरेस्ट सर केल्याच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून Himalayan Mountaineering Institute Group यांची ही मागणी आहे की ब्रिटिश भारत सोडून गेले याला ७ दशकं उलटून गेली...निदान आता तरी याला माऊंट सिकदर असं संबोधायला काय हरकत आहे?
संदीप रॉय नावाचे लेखक या विषयावर Times of India मध्ये लिहितांना स्टीफन अल्टर (Stephen Alter) या लेखकाच्या ओळी उद्धृत करतात, “...while the Great Arc, the ambitious project that measured the Himalaya and mapped the topography of the Indian subcontinent, contributed immensely to our understandings of geography, we should not romanticise it. It was ultimately a colonial enterprise to map the Raj’s dominions often using forced labour.” भारतीयच काय पण आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा असा हा सर्वेक्षण प्रकल्प आहे, मात्र त्यासाठी लागलेले भारतीयांचे श्रम विसरण्याजोगे नाहीत. विशेषतः राधानाथ सिकदर यांची निष्ठा, बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा यात सिंहाचा वाटा आहे!
परंतु याचं वर्तमान आणि भविष्य काय? एखाद्या रस्त्याच्या वा शहराच्या नावाची एक पाटी काढून दुसरी लावण्याइतकं हे सोपं आहे का? नामांतराची काही दुर्मिळ उदाहरणं इतिहासात सापडतातही. जसं की काही दशकांच्या वादानंतर बराक ओबामा यांनी २०१५ साली उत्तर अमेरिकेतल्या उच्चतम शिखराचं “माऊंट मॅकिनले(Mount McKinley)” हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या स्मरणार्थ दिलेलं नाव बदलून अलास्का इथलं स्थानिक नाव “माऊंट देनाली” असं जाहिर केलं. यावर टीकाही झाली. पण एकतर राष्ट्राध्यक्ष मॅकिनले यांच्या आठवणी इतर मार्गांनीही जपण्यात येत आहेत. दुसरं म्हणजे या पर्वत शिखरावर त्यांनी पाऊलही ठेवलं नसल्यानं त्याच्याशी त्यांचा विशेष काही संबंध नव्हता, याउलट देनाली हेच नाव स्थानिक लोक वर्षानुवर्षं वापरत आले आहेत असं स्पष्टीकरण यावेळी देण्यांत आलं. याच धरतीवर विचार केला तर एवरेस्टच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. एकीकडे “माऊंट एव्हरेस्ट” या नावानं दीड शतकाहून अधिक काळ जी प्रतिमा आपल्या मनात निर्माण केली आहे...त्या नावाला जे वलय प्राप्त झालं आहे...ते असामान्य आहे! तर दुसरीकडे अशा प्रकारचं नामांतर हे ब्रिटिशांच्या पाऊलखुणा पुसण्याचं अत्यंत मोठं उदाहरण ठरेल...असा विचार आहे! एकीकडे हे नामांतर म्हणजे एक अनावश्यक राजकीय खेळी वा केवळ राजकीय अस्मितेचा भाग वाटू शकेल तर दुसरीकडे आपण मुघल..ब्रिटिश यांना आतातरी भारताच्याच इतिहासाचा एक भाग म्हणून स्वीकारणार की ते परकीयच राहतील असाही सवाल आहे! मुख्य म्हणजे एव्हरेस्टचं नामांतर हे भारताच्या अखत्यारित नसून तो निर्णय नेपाळला घ्यायचा आहे.
महत्त्वाची गोष्ट ही आहे, की थेट नाव न बदलता, ज्याप्रमाणे सर एव्हरेस्ट याचं नाव प्रसिद्ध झालंय त्याप्रमाणेच राधानाथ सिकदर यांच्या योगदानाची संपूर्ण जगाला, विशेषत: भारतीयांच्या येणार्या पिढ्यांना जाणीव करून देण्यासाठी भारत स्वतःकाय प्रयत्न करत आहे? आणि नेपाळ तसंच चीन यांनीही हे करावं यासाठी भारत कसा प्रयत्नशील आहे?
सर एव्हरेस्ट आणि वॉ या दोन्ही अधिकार्यांनी वर्षानुवर्षं वापरुन घेतलेल्या राधानाथ यांचं ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध मात्र अत्यंत परखड मत होतं. १८४३ साली मॅजिस्ट्रेट वॅन्सीटार्ट (Magistrate Vansittart) यांनी चालवलेल्या सर्वेक्षण खात्यातल्या मजुरांच्या शोषणाला राधानाथ यांनी कडाडून विरोध केला. यासाठी त्यांना २०० रुपये दंडाची शिक्षा झाली! १८५४ साली त्यांनी मासिक पत्रिका नावाचं बंगाली नियत कलिकही सुरू केलं होतं. १८६२ साली राधानाथ निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी गणित अध्यापनाचं कार्य केलं. १७ में १८७० रोजी चन्दननगरच्या गोंदलपाडा इथे गंगेच्या काठी त्यांचं निधन झालं.
राधानाथ कार्यरत असताना, १८५१ साली कॅप्टन थलियर (Capt H L Thullier) आणि कॅप्टन स्मिथ (Capt F Smyth) यांनी संपादित केलेलं पुस्तक सर्वेक्षण खात्यानं प्रकाशित केलं होतं, त्याच्या प्रस्तावनेत असा स्पष्ट उल्लेख होता की यातील महत्त्वाचा तांत्रिक भाग आणि गणितीय प्रकरणं ही राधानाथ सिकदर यांनी लिहिली आहेत. हे पुस्तक सर्वेक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक होतं. मात्र १८७५ साली म्हणजे राधानाथ यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीत हा उल्लेख सपशेल गळून टाकण्यात आला. राधानाथांचं अत्यंत मोलाचं योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला खुद्द ब्रिटिश सर्वेक्षकांनीही तीव्र निषेध केला. १८७६ सालच्या friend of India या पेपरमध्ये या घटनेला “robbery of the dead” म्हणून संबोधण्यांत आलं!
सर्वेक्षणाच्या योगदानासाठी २७ जून २००४ रोजी राधानाथ यांच्या स्मरणार्थ भारत सरकारनं पोस्टाचं तिकिट काढलं. चंदननगर इथे त्यांच्या नावे एक मोठं संग्रहालयही आहे.
सर्वशक्तिमान अशा निसर्गाचा उत्तुंग अविष्कार म्हणजे ही पर्वत शिखरं! खरंतर चिरस्थायी अशा या शिखरांना मानवी नावांनी आपण काय ओळख देणार? तरीही ही नावं कशी दिली जातात आणि पुढे इतिहासात कशी प्रसिद्ध होतात याच्या अशा काही कथा मानवाला आज विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात- किती माणसांचं योगदान,त्यांचं कौशल्य,त्यांची प्रतिभा,त्यांच्या कलाकृती गुलामगिरीच्या इतिहासात अशा प्रकारे दडपून टाकल्या गेल्या असतील? तरीही त्याची पर्वा न करता, काहीही अपेक्षा न ठेवता ही माणसं त्यांचं काम करतच राहिली! या निमित्तानं त्या सगळ्या कर्मयोग्यांना मनापासून अभिवादन! याबरोबरच “अनंत आमुची ध्येयासक्ती” असं गर्जत उंच पर्वत शिखरांना सर करणार्या योद्ध्यांच्या संघर्षाला, त्यांच्या जिद्दीला त्रिवार वंदन!
- मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)©
Jai Hind
ReplyDelete