आंतरराष्ट्रीय महिला दिवस...आतापर्यंतचा इतिहास आणि भारताची भूमिका!

 महिला दिन म्हणजे शुभेच्छांचा वर्षाव, ऑफिस आणि संस्थांमध्ये कार्यक्रम, कर्तृत्त्ववती महिलांचं स्मरण आणि सत्कार...अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने बघत आहोत. सुरूवातीला हे “आपलं” नव्हे “बाहेरचं” फॅड आहे...असेही वादाचे मुद्दे कानावर यायचे. पण या सगळ्या वादांना मागे सारत वैश्विक पातळीवर साजर्या होणार्या या दिवसाने समस्त स्त्री वर्गात उत्साह संचारतो हे नक्की! काही मैत्रिणींच्या जाणिवा आकार घेत आहेत...पण काहींच्या दृष्टीने मात्र ही स्त्री म्हणून “स्व” च्या जाणिवेची सुरुवात ठरू शकते! मला वाटतं ही जाणीव म्हणजेच “महिला दिन!” मागे वळून पाहिलं तर आज साजर्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात...ही मुळात एक जाणीवच होती...ज्याचा पुढे लढा झाला!

महिला दिनाचा इतिहास:
विसावं शतक सुरू झालं आणि लोकसंख्येबरोबरच कारखाने, व्यापार सगळं मोठ्या प्रमाणात विस्तारत गेलं. औद्योगिकरणाबरोबरच व्यक्तीचे अधिकार जास्त ठळक झाले आणि त्याबरोबरच त्यांच्यातली आर्थिक विषमता, वाद हेही वाढल्याने आर्थिक मुद्द्यांवर आधारित वेगवेगळ्या विचारसरणीही अस्तित्त्वात आल्या, झपाट्याने विकसित झाल्या. त्यावेळी ज्या महिला आणि पुरुष कारखान्यांमधे काम करत होते, त्यांच्यातल्या भेदभावाची महिलांना जाणीव झाली आणि त्यांच्यात असंतोष पसरला. त्यांनी संघटित होऊन कामाचे तास, भत्ते ई.बाबत त्यांच्या मागण्या समोर ठेवायला सुरुवात केली.
महिलांच्या या अधिकारांची समाजालाही जाणीव होत गेली. १९०९ साली अमेरिकेतल्या समाजवादी पक्षाने ( Socialist Party of Amerika) २८ फेब्रुवारी हा दिवस त्यांचा राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. यातून प्रेरणा घेऊन १९१० साली कोपेनहेगन इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत, वर्षातला एक दिवस आंतर्राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी विशेष दिन म्हणून घोषित करण्यात यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला. १७ देशांतून आलेल्या शंभरेक महिलांनी याला अनुमोदन दिलं. यानुसार १९११ मधे पहिल्यांदाच ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमधे १९ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यांत आला. भेदभाव मिटवून स्त्री-पुरुष समानतेच्या उद्दिष्टासाठी मोठी रॅली काढण्यांत आली.
यानंतर आठवड्याभरातच न्यू यॉर्क शहरात Triangle Shirtwaist या कारखान्यांत लागलेल्या दुर्दैवी आगीमधे जवळपास दीडशे माणसं जळून मृत्यूमुखी पडली, ज्यात प्रामुख्याने तिथे स्थलांतरित झालेल्या तरुण स्त्रिया होत्या. या घटनेने सगळ्यांचं लक्षं वेधलं गेलं आणि या गेलेल्या महिला परिस्थितीमधे आमूलाग्र बदल घडवण्याची प्रेरणा होऊन विचारांमधे राहिल्या!
१९१३ -१४ मधे पहिल्या महायुद्धाचा उद्रेक होत असतांना रशियामधल्या महिलांनी याच दिवशी “जागतिक ऐक्याची भावना” प्रदर्शित करत मोठी रॅली काढण्याचं धाडस दाखवलं. पहिल्या महायुद्धात लाखो रशियन सैनिकांनी आपला जीव गमावला याच्या निषेधार्थ महिला दिनाचं औचित्य साधून नंतर अनेक महिलांनी “bread and peace” साठी तिथे मोठं आंदोलन छेडलं. याचा परिणाम म्हणजे रशियाचा सम्राट झार याला सत्ता सोडावी लागली आणि स्थापन झालेल्या दुसर्या शासनाने महिलांचा मतदानाचा अधिकार तत्काळ मान्य केला! लंडनमधेही याच सुमाराला महिलांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला.
महिला दिनाचं बदलतं स्वरूप :
सुरूवातीचे अनेक वर्षं जागतिक पातळीवरचा महिला दिन काम करणार्या महिलांच्या हक्कांच्या संदर्भात अनेक सुधारणा घडवत राहिला. विविध स्वरुपात अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हा दिवस मुख्यत्त्वाने प्रेरणा ठरला. देश,प्रांत, कोणताही असो... न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आणि अधिकारांच्या मागणीसाठी या दिवसाने स्त्रियांच्या मनगटात बळ दिलं. संघर्ष त्याच्या मुळाशी होताच पण पुढे त्याचं स्वरूप जगभरात अधिक व्यापक होत राहिलं! सामाजिक, राजकीय, आर्थिक, संस्कृतिक या सगळ्या क्षेत्रांमधे महिला कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत ते जाणून घेऊन त्यासाठी उपाय योजना करणं, विविध क्षेत्रांमधे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं,तसंच स्त्रियांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांन पुरस्कार देऊन गौरवणं हेही या दिवशी आवर्जून केलं जाऊ लागलं!
संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय महिला दिनाची औपचारिक घोषणा:
संयुक्त राष्ट्रसंघात प्रथम १९७५ साली महिला दिन साजरा करण्यांत आला! १९७७ साली संयुक्त राष्ट्रसंघाने औपचारिक रित्या जाहीर केलं - “स्त्रियांनी केलेला विकास प्रदर्शित करणं, त्यात सुधारणा घडवून आणणं तसंच स्त्रियांनी दृढ निश्चय आणि अतुलनीय धैर्य दाखवत महिलाधिकारांसाठी जिथे जिथे असामान्य योगदान दिलं, त्या कार्याचा गौरव करण्याच्या” उद्देशाने ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाईल. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट संकल्पना किंवा विषय घेऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर जगभरात काम होत राहिलं.
महिला दिनाचा शतकोत्सव:
२०११ साली आंतर राष्ट्रीय महिला दिनाला १०० वर्षं पूर्ण झाल्याचा सर्वत्र जल्लोष करण्यांत आला. बराक ओबामांनी “राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणार्या असामान्य महिलांच्या गौरवार्थ” मार्च २०११ हा “Women’s History Month” म्हणून घोषित केला. सगळ्या देशांमधे विविध योजना राबवण्यात आल्या. या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढलं! या निमित्ताने स्त्री- पुरुष समानतेचा पाया रचला गेला,समान संधी, समान अधिकार, हिंसेविरुद्ध संरक्षण, प्रसूती दरम्यान हक्काची सुट्टी, child care leave असे कितीतरी टप्पे गाठत येणार्या काळात अनेक लढाया सर झाल्या!
भारताचा दृष्टिकोन आणि भविष्यातली आव्हानं:
मुळात या चळवळीची सुरुवात साम्यवादी विचारधारेतून किंवा स्त्रीवादी दृष्टिकोनातून झालेली असली तरी हे सगळे संदर्भ ओलांडून हळूहळू जास्तीत जास्त देशांनी या निमित्ताने स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. यात भारतही अग्रेसर आहे! महिलांच्या बाबतीत सुधारणेला भरपूर वाव आहे हे मान्य करत या उदात्त वैश्विक ध्येयासाठी भारताने नेहमीच समर्थन दर्शवलं. स्त्रियांच्या बाबतीत अनेक आव्हानं भारतासमोर आहेत. स्त्री- शिक्षण, हिंसाचाराला आळा, हुंडाबंदी,
बालविवाह यासाठी कायदे असले तरी याबाबतीत अजूनही खूप सामाजिक अंतर गाठायचं आहे. गुन्ह्यांची आकडेवारी भयंकर असली तरीही भारतात स्त्रियांच्या प्रश्नांवर गेले अनेक वर्षं विविध माध्यमातून काम सुरू आहे ही आशादायी गोष्टही आपण समजून घेतली पाहिजे. अनेक विकसित देशांच्या हातात हात घालून स्त्रीसक्षमीकरणासाठी भारत कटिबद्ध आहे. राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी यांनी २०१६ साली त्यांच्या महिला दिनाच्या भाषणांत - या राष्ट्राच्या उभारणीसाठी भारतातल्या समस्त महिलांनी आतापर्यंत जे अमूल्य योगदान दिलं त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतात महिला दिनाच्या औचित्यावर दर वर्षी सन्मानाने वीरनारी पुरस्कार दिले जातात.
यातून भारताचा दृष्टीकोन व्यक्त होतोच पण अनेक योजना विविध पातळ्यांवरती इथे राबवण्यात येत असलेल्या दिसून येतात. ज्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अर्थातच अनेक गोष्टींवर अवलंबून आहे...! भ्रूणहत्या थांबवून शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना स्वावलंबी करू बघणारी प्रसिद्ध “बेटी बचओ बेटी पढाओ” योजना, समस्त महिला उद्योजिकांना अगदी घरी बसून जगाशी जोडण्यासाठी ज्यायोगे मोठं व्यासपीठ मिळालं आहे ती “महिला-ई-हाट” योजना, ग्रामीण युवती आणि महिलांचं कौशल्य विकसन, रोजगार, आरोग्य, डिजिटल साक्षरता अशा कितीतरी मुद्द्यांवर काम करणारी “महिला शक्ती केंद्र”, महिला आणि बालकांना संकटकाळात आश्रय, पोलिस , कायद्याचा सल्ला, समुपदेशन इ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी “One – Stop Centre Scheme” आहे, अभयम हेल्पलाइन नंबर 181 अनेक राज्यांमधे कार्यरत आहे. महिला पोलिस volunteers (MPV) इत्यादि अनेक योजना आहेत. Learning, labour and leadership या त्रीसूत्रींना घेऊन शासनाबरोबर असंख्य सामाजिक संस्था, NGOs देशभर कार्यरत आहेत ही आशादायी गोष्ट आहे. तरीही सतत होणार्या अत्याचारांच्या घटनांनी मन उद्विग्न होतं हेही खरंय! आणखीन काय केलं म्हणजे हे अत्याचार थांबतील हा विषय आपल्या सगळ्यांच्याच मनात सतत येत राहतो!
सध्या खाजगी कंपन्यांमधेही महत्त्वाच्या पदांवरती महिला सक्षमपणे काम करतांना दिसतात. तसंच खेळ, कला, व्यापार, संरक्षण,राजकारण अशा असंख्य क्षेत्रांमधे भारतीय स्त्रिया अग्रेसर आहेतच किंबहुना जगात भारताचं प्रतिंनिधीत्त्वं करतांना त्या दिसून येतात!हे अत्यंत प्रेरणादायी आहे!
संयुक्त राष्ट्रसंघात प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिलादिनासाठी एक संकल्पना ठरवली जाते. यावर्षी - २०२१ सालच्या महिला दिनाची theme “Women in leadership: Achieving an equal future in a COVID -19 world” अशी ठेवत संयुक्त राष्ट्र संघाने कोविडच्या आव्हानात्मक काळात जगभरामधे महिलांनी मुख्यत्त्वाने आरोग्य आणि त्याबरोबरच इतर व्यवस्थांमधे विविध स्वरुपात जे योगदान दिलं त्याचा गौरव केला आहे!
अजून कितीतरी वर्षं हा दिवस, त्यानिमित्ताने एकेक लढा सुरूच राहील यात शंका नाही.पण फक्त स्त्रियांच्या नव्हे तर स्त्री- पुरुषांच्या पूरक नात्यावर आणि दोन्हींच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्राच्या साक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यावर मी विश्वास ठेवते. म्हणून भारतासारख्या देशात जिथे इतिहासातून
आपल्याला उज्ज्वल स्त्रियांचा वारसा मिळाला आहे, जिथे आज अनेक स्त्रिया जगभरात “भारताचा चेहरा” म्हणून आत्मविश्वासाने वावरत आहेत – तिथे केवळ पुरुषांशी बरोबरी करण्याचं ध्येय ठेवणं संकुचित ठरेल.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तम आरोग्यपासून ते चांगल्या व्यक्तिमत्त्वापर्यंत सर्वार्थाने आपण विकसित होणं हे स्त्रियांच्या स्वतःच्याही हातात आहे...केवळ परिस्थितीला दोष देऊन चालणार नाही. स्वत:ची सकारात्मक प्रतिमा घेऊन आत्मविश्वासाने जगाला सामोरं गेलं पाहिजे. माझ्यात छोट्या छोट्या सुधारणा घडवून आणण्यासाठी आळस झटकून मी स्वतः किती प्रयत्न करत आहे? आजच्या दिवशी ही जाणीव ...आणि त्या दृष्टीने टाकलेलं एक छोटं पाऊलही...खूप मोठी गोष्ट आहे! दुसर्यांनी येऊन मला सक्षम करण्यापेक्षा मीच स्वतःला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तयार केलं पाहिजे. माझ्यातल्या त्या क्षमतेची, त्या सामर्थ्याची जाणीव म्हणजेच आजचा दिवस!
ज्येष्ठ कवी सुमित्रानंदन पंत यांच्या शब्दांचा आधार घ्यायचा मोह आवरत नाही-
तुम्हारे छूने में है प्राण, संग में पावन गंगा स्नान;
तुम्हारी वाणीमें कल्याणि,त्रिवेणी की लहरों का गान!
करूण भोहों में है आकाश, हास में शैशव का संसार;
तुम्हारी आंखों में कर वास... प्रेम ने पाया था आकार!
बिंदु में हो तुम सिंधु अनंत,एक सूर में समस्त संगीत,
एक कालिका में अखिल वसंत,धरा में हो तुम स्वर्ग पुनीत...!
धरा में हो तुम स्वर्ग पुनीत...!

- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही