स्वभावाला औषध आहे: पुष्पौषधी!
पुष्पौषधी म्हणजे नेमकं काय :
पुष्पौषधी म्हणजेच निसर्गात मिळणाऱ्या काही विशिष्ट झाडांच्या फुलांचा रस. जो आपण सेवन केल्यानंतर मुळाशी जाऊन मानवी भावनांचा समतोल राखण्यासाठी मदत करतो. या औषधीचे शरीराच्या इतर अवयवांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
भावनांचा असमतोल हा शारीरिक व्याधीचं पूर्वचिन्ह असतं.भावनांचा स्रोत मन आहे. मनावर येणारे तणाव हे सतत भावनांचे संतुलन बिघडवत असतात. शरीरावर त्याचे परिणाम झाल्याशिवाय रहात नाहीत, त्यातून वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. शरीरावरील व्याधींच्या औषधींनी मनावरचे तणाव कमी होत नाहीत, म्हणूनच औषधींचा परिणाम रोगाच्या मुळावर, भावनांवर, मनापर्यंत पोचत नाही आणि माणूस पूर्णतः निरोगी व आनंदी होत नाही. स्वास्थ्यामध्ये (health) शरीराबरोबरच मनाचाही अंतर्भाव आहे. म्हणून पुष्पौषधींना खूप महत्त्व आहे.
पुष्पौषधींचे जनक आणि पार्श्वभूमी :
डॉ. एडवर्ड बॅच हे खरंतर ऍलोपॅथीचे डॉक्टर होते. परंतु रोगाच्या मुळांशी पोचणारी निसर्गाची यंत्रणा शोधण्यासाठी त्यांनी 6 वर्षे सतत संशोधन केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की वनस्पती, त्यांची फुले अनेकदा एकांत ठिकाणी निसर्गाच्या लहरींना, आघातांना...तोंड देत आनंदाने जगत रहातात...हे कसे घडते? पाऊस, वादळ, ऊन, विजांचा कडकडाट हा सगळा ऋतूंचा तीव्र परिणाम या वनस्पती कशा सहन करतात? हे सहन करण्याचे या वनस्पतींचे गुणधर्म माणसांना कोणत्या स्वरूपात उपयोगी पडू शकतील? मग लक्षात आलं की "वनस्पतीचे सगळेच गुणधर्म त्यांच्या फुलामधे असतात !" फुलांचे हे गुणधर्म माणसांच्या वारंवार बदलणाऱ्या भावनांप्रमाणेच असतात. म्हणूनच पुष्पांमधील निसर्गाच्या लहरी स्वभावाला सामोरं जाण्याचे गुणधर्म माणसांनाही निरोगी, स्वस्थ आणि आनंदी ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
डॉ. बॅच यांचं तत्त्वज्ञान:
"आरोग्य हा माणसाचा अधिकार आहे. आरोग्य म्हणजे शरीराचं, मनाचं....आत्म्याचं चैतन्य !"
हे समजून घेतल्याने जीवनाबद्दलचा एक व्यापक दृष्टिकोन तयार होतो. प्रत्येक जीवनाचा श्रेष्ठ, आकर्षक,सुंदर, उदात्त, विशिष्ट असा हेतू असतो. हा हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न शरीर आणि मनाच्या माध्यमातून आत्मा करत असतो. जेणे करून शांत आणि आनंदी जगणं शक्य होतं. हे साध्य करण्यासाठी कुठेही वनात जाण्याची आवश्यकता नाही. आपण करत असलेल्या कामावरचं आपलं प्रेमच आपल्या जीवनाचा हेतू सफल करण्यास पुरेसं असतं. म्हणून आपलं कार्य, हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे. फक्त हे कार्य कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण करणं आवश्यक आहे.
मी करत असलेलं कामच माझ्या आयुष्याचा हेतू पूर्ण सफल करणारं आहे हे जेव्हा माणसाला समजतं तेव्हाच त्याचं आयुष्य आनंदी आणि परिपूर्ण होतं. त्याच्या स्वतःच्या आयुष्यात कोणताही अडथळा येत नाही आणि तो माणूसही इतरांच्या आयुष्यात अडथळा होत नाही. आपण निवडलेल्या आयुष्याच्या मार्गावरील कोणताही अडथळा आपलं मानसिक संतुलन बिघडवतो व आनंदापासून आपण दुरावतो. आत्मा, मन आणि शरीर यांतील चैतन्य नाहीसं होत जातं...अखेरीस आपण रोगाचे बळी ठरतो.व्याधिग्रस्त होतो.
लहान मुलांची निरागसता ही त्याच्या आवडीमधे असते. कारण ती त्याने निवडलेली असते.( his chosen way of life). त्यात विघ्न आले की मन नाराज होते, बाळाची वाढ खुंटते. ते मोकळेपणाने, आनंदी जगू शकत नाही आणि अनारोग्याचा बळी ठरतं. काळजी इतकीच घ्यावी लागते की आपली निवड (chosen way of life) ही अंतरात्म्याला अनुसरून असावी. तरीही अडथळे येणारच आहेत हे ओळखून आई बाळाची काळजी घेते. तसंच, हे अडथळे प्रेरणा बनून आपल्या निवडलेल्या प्रेरणादायी मार्गावर चालण्याचं आत्मबळ देत असतात हे समजणं गरजेचं आहे.
या अडथळ्यांमुळे मनावर तणाव येतात आणि शारीरिक आरोग्य बिघडलेलं लक्षात येतं. कारण शरीर हा मनाचा आरसा आहे. त्यात मनाचं प्रतिबिंब आढळतं.
आपल्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार आपण निवडलेला, आपलं आयुष्य जगण्याचा मार्ग हा आत्मोन्नतीकडे नेणारा असतो. तोच आपल्याला आरोग्यदायी आणि आनंदी ठेवत असतो. जेव्हा भावनांना होणारा अडथळा आपण सहन करतो तेव्हाच आत्मा-मन-शरीर या त्रिकुटाची शांतता भंग होते आणि माणूस आजारी पडतो. "आपण आत्म्याच्या आवाजाकडे केलेलं दुर्लक्ष म्हणजेच आपलं आजारपण असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे."
शारीरिक व्याधी म्हणजे नक्की काय? :
डॉ. बॅच यांच्या मते शारीरिक रोग म्हणजेच मनाच्या भंगलेल्या अवस्थेचा परिणाम असतो, तो आपल्या दुर्लक्षाचे प्रतिबिंब असतो. जेव्हा आपण आतील आवाजाच्या आज्ञेचा भंग करतो तेव्हाच आपण भीती, संशय, राग, संताप, द्वेष, मत्सर, लोभ, मोह इ. विकारांचे बळी ठरतो आणि दुःखी होतो.म्हणून माणूस मनातून सुदृढ झाला की दुःख नाहीसं होतं.म्हणून शारीरिक दुःखाबरोबरच मानसिक लक्षणं विचारात घेणं महत्त्वाचं ठरतं.शारीरिक दुःखाने माणसाच्या मनावर कसा आघात केला आहे हे समजून घ्यावं लागतं! मग ती भीती वा संशय असेल, पूर्ण निराशा असेल, राग किंवा वैताग असेल, द्वेष किंवा मत्सर असेल...हे विकार दूर झाले की शारीरिक दुःख दार होतात! म्हणजे दुःखाची भावना दूर झाली की शारीरिक दुःख पळून जाते.
अशा पद्धतीने बॅच फ्लॉवर रेमेडी हा मानसिक तणाव आणि शारीरिक दुःख या दोन्हींवरचा उपाय आहे.
मन आणि शरीर हे दोन्ही एकमेकांची बिंब, प्रतिबिंब असतात. शारीरिक दुःख मनावरील तणाव सांगत असतं, तर मानसिक तणाव शारीरिक दुःखाला जन्माला घालत असतो...हे परस्परांवर अवलंबन समजून घ्यावं लागेल.
बॅच फ्लॉवर रेमेडीचे फायदे :
एकूण 38 औषधी असल्यामुळे औषधींची निवड करणं सोपं आहे.
लक्षणे ओळखता आली तर स्वतःची औषधी स्वतः निवडू शकतो.तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता नाही.
एकापेक्षा जास्त औषधी आपण एका वेळी घेऊ शकतो
पुष्पौषधींचे कोणतेही दुष्परिणाम(side effects) नाहीत.
पुष्पौषधी घेत असतांना इतर कोणत्याही औषधी सुरु ठेवता येतात.
होमिओपॅथी प्रमाणे या औषधी घेण्यासाठी अत्यंत सोप्या आहेत.(छोट्या गोड गोळ्यांच्या स्वरूपात).अधिक परिणामांसाठी जेवणाच्या तासभर आधी/नंतर घेण्याला प्राधान्य आहे.
मागील 85 वर्षांची आहे त्यामुळे या ( flower remedy) चा सध्या भरपूर प्रचार होत आहे. तणाव मुक्त होण्यासाठी अत्यंत फायद्याची ठरत असलेली ही उपाय योजना आहे.
सद्गुण आणि भावनिक अडथळे :
सद्गुण: प्रेम,आदर, विश्वास, सहानुभूती, शांतता, स्थिरता, निश्चय, माणुसकी, आत्मबळ,समजदारी, परिपक्वता(maturity), सहिष्णुता, सहनशक्ती, ईच्छाशक्ती, क्षमा, धैर्य, आनंद, समाधान, उत्साह, आत्मविश्वास, परस्पर सहकार्य ई.
अडथळे: निर्णयक्षमता नसणं, लक्ष नसणं,एकाग्रता नसणं, ईच्छा नसणं, रस (interest) नसणं, संशय, अविश्वास, नैराश्य, अतिउत्साह, तापटपणा, अजिबात सहनशक्ती नसणं, दुर्लक्ष करणं, अयशस्वी, कशातच रस नसून काहीच करावंसं न वाटणं, चिडचिड अनावर होणं, स्वतःवर संयम नसणं, स्वार्थ, हेकेखोरपणा, भीती, दुःख, लपवणं(खोटं बोलणं) ई.
हे अडथळे पार करून मन आणि शरीर निसर्गाच्या जवळ, आतील आवाजाचा कानोसा घेत आनंदाकडे नेणारा मार्ग म्हणजे "बॅच फ्लॉवर रेमेडी."
वरील अडथळ्यांचे एकूण सात गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे:
१.भीती २.काळजी ३.नैराश्य ४.अनिश्चितता ५.अतिसंवेदनशीलता ६.असंवेदनशीलता ७.एकटेपणा
यांचं सद्गुणांमधे रूपांतर करावयाचे असेल तर पुढची सात पाऊले चालावी लागतील:
१. शांतता २.आशा ३.आनंद ४.विश्वास ५.निश्चितता ६.ईच्छाशक्ती ७.प्रेम.
"The creator is perfect and so is his creation- the nature !"
हा निसर्ग सूत्रधाराच्या इच्छेनुसार सर्वकाही परिपूर्णतेकडे घेऊन जातो. आपण आनंदासाठी, आरोग्यासाठी निसर्गात शोध घेत असतो जो खूप प्राचीन काळापासून सुरु आहे! आपण स्वतः नेमके कोणत्या गटात मोडतो आणि तिथून आपल्याला कशी प्रगती साधायची आहे हे ठरवा! पुष्पौषधी घ्या आणि आनंदी राहून स्वस्थ आयुष्य जगा!
Comments
Post a Comment