शहामतपनाह बाजीराव - ग्रंथपरिचय


भारताच्या इतिहासाचं सामर्थ्य आणि अमरत्त्वं ठळकपणे मांडत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या रणशिंग या पुस्तकांत लिहितात,“कागदावर लिहिलेले इतिहास फाडले तरी ते दगडांवर कोरलेले आहेत. त्या दगडांचे चूर्ण केलेत तरी इतिहास मरतोच असे नाही. भाषेत,वाक्प्रचारांतून, चालीरीतीमध्ये,स्मृतींच्या रोमरोमांत तो भिनलेला असतो. मूर्तीभंजकांचे दुर्बल हात सहसा न पुरतील इतका वर आकाशात उंच उंच अशोकाच्या स्तूपावर तो विराजत असतो किंवा भूगर्भातील खोल खोल मोहोंजोंदडोसारख्या पातालमंदिरात त्याची ग्रंथालयं सहस्त्रावधि वर्षं अभंगची अभंग राहतात!” या ओळी कुठलंही स्पष्टीकरण न लागणार्या आहेत!
भारत हा वीरांचा देश आहे...इथे कणांकणांतून शौर्य प्रकटतं! असं असतांनाही काही वीरांना मात्र उपेक्षेचं, गैरसमजांचं ग्रहण वर्षानुवर्षे झाकोळून टाकतं. याचं मोठंच उदाहरण म्हणजे म्हणजे थोरला बाजीराव पेशवा! आत्तापर्यंतच्या कलाकृतींमधे रंगवलेल्या त्याच्या विलासी प्रतिमेतून बाहेर काढून या वीराला अद्वितीय योद्धा म्हणून आपल्यासमोर आणणारा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ नुकताच वाचनात आला- श्री कौस्तुभ कस्तुरे लिखित “शहामतपनाह बाजीराव!” राफ्टर पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा ग्रंथ बाजीरावच्या संपूर्ण कारकीर्दीवर “सप्रमाण” प्रकाश टाकतो! ग्रंथाच्या मुखपृष्ठावरती रेखाटलेलं अश्वारूढ बाजीरावाने सिद्ध केलेल्या भाल्याच्या पात्याचं जे तेज आहे ते जणू त्याच्या दैदिप्यमान पराक्रमाचंच प्रतीक आहे...!ती तेजस्विता या ग्रंथाच्या शब्दकळेतही उतरत जाते! पेशवाईच्या इतिहासाने झपाटलेल्या कौस्तुभ नावाच्या या तरुण लेखकाने याआधीही अनेक ऐतिहासिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. ४८० हून अधिक संदर्भ हाताळून हा लेखक एवढा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहू शकतो...तर आपण तो निदान वाचला पाहिजे आणि इतरांपर्यंत आवर्जून पोचवला पाहिजे या हेतूने हा शब्दप्रपंच!
ग्रंथात बाजीरावांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख झालेला आहे, तथापि मी इथे सवयीमुळे “तो बाजीराव” असं संबोधत आहे. हा ग्रंथ मुख्यतः तीन भागांमधे विभागण्यांत आला आहे.

१. उपोद्घात:
यामधे बाजीरावाच्या घराण्याची पार्श्वभूमी, हरिहरेश्वर ते पेशवेपदापर्यंत बाळाजी विश्वनाथ भटांचा स्वकर्तृत्त्वावर झालेला प्रवास, पेशवाईची सुरुवात याचं वर्णन आहे. त्यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या विशीमधे शाहू महाराजांनी मोठ्या विश्वासाने ज्याला पेशवेपद बहाल केलं तो उमदा बाजीराव आपल्या समोर येतो! पुढे त्याचा राजकारणांत प्रत्यक्ष शिरकाव, त्याच्या यशाची त्रिसूत्री अशा अनेक गोष्टींमधून त्याचा एकूण प्रवास स्पष्ट होतो. या भागाची किंबहुना संपूर्ण ग्रंथाची म्हणता येतील अशी काही वैशिष्ट्य नमूद करावीशी वाटतात.

(अ) संदर्भग्रंथांचे अचूक दाखले:

ठिकठिकाणी आलेले संदर्भांचे दाखले आपल्याला आश्चर्यचकित करतात! मुळात मराठ्यांच्या इतिहासावर एवढं विपुल लिखाण झालं आहे...याची प्रकर्षाने जाणीव होते! याच अनुषंगाने अनेक ज्येष्ठ इतिहासकारही आपल्याला कळतात. यामुळे तरुण पिढीसाठी, नवोदितांसाठी आवर्जून शिफारस करावा असा हा ग्रंथ आहे आणि इतिहास प्रेमींसाठी तर हा अक्षरशः खजिनाच आहे! बाजीरावाच्या रोजनिशीमधले काही दाखलेही आपल्याला अचंबित करतात. यामुळे हा ग्रंथ निर्विवाद असण्याची परिसीमा गाठतो!

(आ) उद्धृत केलेला पत्रव्यवहार आणि त्यातून उलगडत जाणारं बाजीरावाचं व्यक्तिमत्त्वं:
काही बाजीरावाला आलेल्या, तर काही त्याने लिहिलेल्या अशा असंख्य पत्रांचे दाखले ठिकठिकाणी पेरलेले आहेत. त्यातून त्या काळची भाषा तर कळतेच पण बाजीरावाविषयी असलेल्या अनेक गैरसमजांना,शंकांना चोख उत्तर देत लेखक ते सपशेल खोडून काढतो! त्या पत्रांमधून बाजीरावाचं व्यक्तिमत्त्वंही उलगडत जातं. प्रसंगी कठोर शब्दांत साथीदारांच्या नाकर्तेपणाची निर्भत्सना करणारी तर कधी त्याच्या दिलदार वृत्तीचं दर्शन घडवणारी ही पत्रं आहेत. बाजी रेठरेकर हा आपला सवंगडी वसईच्या मोहिमेत कामी आला तेव्हा त्याच्या आईला बाजीरावाने स्वतः लिहिलेलं पत्रं खूपच हृदयस्पर्शी आहे! बाजीराव नुसता आदेश देऊन कामं करवून घेणारा हुकूमशहा नव्हता तर मराठ्यांमद्धे शौर्याचं स्फुल्लिंग जागवत त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करणारा एक संवेदनाशील सेनापती होता हे यातून दिसून येतं! इतर पत्रांमधून चिमाजी अप्पाची सावलीसारखी लाभलेली साथ, कधी वाढत्या कर्जामुळे व्यथित झालेला बाजीराव, सोबतीला शिंदे होळकरांसारखे खंदे लढवय्ये साथीदार अशा अनेक गोष्टी समोर येतात!

(इ) युद्ध या संकल्पनेची मीमांसा :
युद्धं म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न थेट मांडत जनरल क्लाउझेविट्स, बर्नाड मोंटेगोमेरी अशा काही तज्ञांच्या युद्धविषयक व्याख्या घेऊन रणनीती, राष्ट्राचं धोरण या संकल्पनांची चर्चाही ग्रंथात वाचायला मिळते!

(ई) परकीय इतिहासकारांचे बाजीरावाबद्दलचे विचार:
मराठ्यांचा विस्तृत इतिहास लिहिणारे ग्रँट डफ, चार्ल्स किंकेड, तसंच सर रिचर्ड टेंपलसारखे तज्ञ आशा अनेकांचे बाजीरावाबद्दलचे उतारे ग्रंथात इंग्लिश तसंच मराठीमध्ये उद्धृत केलेले आहेत. त्यातून देहयष्टी, लहानपण,युद्धनीतीचं प्रशिक्षण, त्याची अलौकिक बुद्धिमत्ता, राजनीती, त्याचं अद्वितीय अश्वारोहन… असे बाजीरावाच्या व्यक्तिमत्त्वाचे, जडण घडणीचे सुंदर कंगोरे आपल्यासमोर उजळून निघतात! त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते.

(उ) इतर अनेक व्यक्तिरेखा आणि भोवतालच्या समकालीन इतिहासाचा समावेश :
या ग्रंथाच्या निमित्ताने बाजीरावाच्या समकालीन अनेक व्यक्तिरेखा आपल्याला नव्याने कळतात. पेशवाईमधले तसंच मुघलांचे अनेक सरदार, भौगोलिक स्थानं,किल्ले अशी मुबलक माहिती ग्रंथात आहे. अनेक घराण्यांचा इतिहास आणि ठिकठिकाणी संदर्भ देऊन त्यांच्यात दाखवलेली सुसूत्रता फार सुंदर आहे! काही ठिकाणी हा लेखक इतिहासलेखनातल्या त्रुटीही मोठ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने लिहितो! तर काही माहिती - जसं की फत्तेखर्ड्याच्या लढाईसंदर्भात लिहिलेली मुबारीजखानाची दिलेली सविस्तर माहिती थक्क करून जाते! “ढालगज” या शब्दाप्रमाणे अनेक संकल्पनांचा,महितीचा घेतलेला वेध रोचक आहेच पण आपल्याला तळटीपाही काळजीपूर्वक वाचायला भाग पाडतो!

२. ईश्वरदत्त सेनानी बाजीराव :
ग्रंथाच्या या दुसर्या भागात बाजीरावाच्या मोहिमांची विस्ताराने चर्चा केली आहे. इंग्रज, पोर्तुगीज एक होऊन आंग्र्यांविरुद्ध उभे असतांना पोर्तुगीजांना करार करायला लावणारा चतुर बाजीराव, निजामाकडून “शहामतपनाह” असा किताब मिळवणारा पराक्रमी बाजीराव आपल्या मनाला भिडतो! कर्नाटकतल्या काही मोहिमाही यात आहेत. तसंच अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पालखेडची लढाई खूप विस्तृतपणे या ग्रंथात घेतली आहे. निजामाचे डावपेच आणि त्याला तहाची भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारा बाजीरावाचा अचाट पराक्रम आणि बुद्धीमत्ता.. हे सगळं पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं आहे. डभई, बुंदेलखंड, राजपुताना या अनेक लढायांसह अतिशय रोमांचकारी ठरलेली दिल्लीची मोहीम! या मोहिमेमधे बाजीरावाचे पडलेले मुक्काम, आडव्या आलेल्या शत्रूचे ठिकठिकणी केलेले पाडाव...हे सगळं ससंदर्भ लिहिण्याचं आव्हान लेखकाने यशस्वीपणे पेललेलं दिसून येतं! ठिकठिकाणी दिलेले नकाशे मोहिमांना अधिक स्पष्ट करतात! नकाशामधे सध्या असलेल्या महाराष्ट्रातल्या गावांच्या अनुषंगानेही हा इतिहास जोडून बघता येतो. वसईची मोहीम, वसईचा तह...अशा मोहिमांचं सत्रं सुरूच होतं. मात्र पुढे नासीरजंग बरोबरची लढाई आणि तह हे बाजीरावाचे शेवटचे कार्य ठरले. आयुष्यभर आकाशाच्या मोकळ्या छत्राखाली वावरलेला हा थोरला राया २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिण तीरावर रावेरखेडी इथे शांत झाला!

३ . सन त्झु आणि त्याची युद्धविषयक तत्त्वं:
ग्रंथाच्या या तिसर्या टप्प्याविषयी मनांत खूप उत्सुकता होती. प्रसिद्ध अशा सन त्झु या चीनी युद्धंतत्त्ववेत्त्याचं सखोल चिंतन या ग्रंथात क्रमवार आणि सविस्तर पद्धतीने लेखकाने मांडलेलं आहे! एक स्वतंत्र विषय म्हणूनही हे वाचनीय आहे. युद्धाचं आव्हान, नियोजन, लष्करी डावपेच, प्रत्यक्ष रचना, गुप्तहेरांचे प्रकार, त्यांचा वापर आणि इतर अनेक तत्त्वं यात आहेत. बाजीरावाच्या लढायांची चपखल उदाहरणं देऊन ही तत्त्वं त्याने प्रत्यक्षात कशी अंमलांत आणली हेही लेखकाने यशस्वीपणे पटवून सांगितलं आहे! हा या ग्रंथातला अतिशय महत्त्वाचा भाग वाटतो!
या अनुषंगाने समर्थ रामदासांनी जे “राजधर्म” आणि “क्षात्रधर्म” संगितले आहेत त्याचाही उल्लेख लेखकाने आवर्जून केला आहे! सन त्झु चं “अध्यात्म” हे तत्त्वं आणि त्याची समर्थांच्या “विवेकाशी” सांगड घालून जागतिक पातळीवरचा एकात्म भाव अधोरेखित करण्याचा लेखकाचा प्रयत्न अतिशय अभिनव आणि स्तुत्य आहे यात शंका नाही! पुढे कौटिल्याच्या अर्थशास्त्राचाही उल्लेख आहे. आशा प्रकारे समर्थ रामदास, कौटिल्य यांचे म्हणजे भारतीय चिंतनामधले दिलेले संदर्भ पुढे याप्रकारच्या संशोधनाची, लेखनाची बीजं पेरून जातात असंही म्हणणं वावगं ठरणार नाही!
भारतातल्या वीरांच्या गाथा अशा प्रकारे अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळ्यांसमोर येणं अत्यंत आशादायी आहे! मेजर जनरल शशिकांत पित्रे (नि.) सरांचा “या सम हा” आणि आता कौस्तुभचा शहामतपनाह असे बाजीरावाबद्दलचे दोन अत्यंत उपयुक्त ग्रंथ यावर्षी हातात पडले म्हणून आनंद होत आहे! फ्रेंच कवी Gautier याचं एक वाक्य इथे आठवतं, “every generation must rewrite history. New facts become available and old facts are interpreted anew.” यामुळेच शहामत पनाह बाजीराव हा ग्रंथ बाजीरावाच्या शौर्याबरोबरच इतिहासलेखनाचा एक वेगळा ध्यास आपल्यापर्यंत पोचवतो!बाजीरावची ही रोमांचकारी रणशौर्यगाथा सर्वांनी आवश्य वाचावी. अशा अधिकाधिक ग्रंथ निर्मितीसाठी कौस्तुभला Kaustubh Kasture आणि राफ्टर प्रकाशनाला मन:पूर्वक शुभेच्छा!

- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही