भारताच्या दुर्गा : २. राणी नाइकी देवी: मोहम्मद घौरीला पराभूत करणारी वीरांगना!
एकामागून एक अशा परकीय आक्रमकांना थोपवत अखेरच्या श्वासापर्यंत लढणार्या वीरांगना या मातीत जन्माला आल्या...ही खूप गर्वाची गोष्ट आहे! भारताला अजेय ठेवण्यामधे स्त्री शक्तीचा वाटा मोठाच आहे! आई म्हणून शिस्तीने योद्ध्यांना घडवत आणि त्याच वेळी राज्याची राणी म्हणून प्रत्यक्ष लढत...कधी मुघलांना, कधी पोर्तुगीजांना तर कधी ब्रिटिशांना या शक्तीने नामोहरम केलं! अत्यंत आक्रमक अशा महम्मद घौरीवर साक्षात वीज होऊन कडाडणारी गुजरातची राणी नाइकी देवी अशीच थोर वीरांगना! मातृशक्ती किती समर्थ असू शकते याची पराकाष्ठा म्हणजे नाइकी देवी!
गोव्याच्या कदंब कुळातली, महामंडलेश्वर परमाडी राजाची कन्या नाइकी ही लहानपणापासून अतिशय हुशार,धाडसी आणि घोडेस्वारी तसंच शस्त्रविद्येत पारंगत होती! तिचं लग्नं गुजरातमधल्या थोर अशा चालुक्य वंशातल्या अजयपाल सोलंकी याच्याशी झालं. तेव्हाच्या चालुक्य राज्यामधे आताच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमधला भाग समाविष्ट होता. अजयपाल ११७१ मध्ये सिंहासनावर बसला पण दुर्दैवाने ११७५ मधेच त्याचं निधन झालं! त्यावेळी त्यांचा मुलगा- मुलाराजा दुसरा हा खूपच लहान होता. त्याला नाइकी देवीने सिंहासनावर बसवलं आणि राज्याचं प्रशासन तसंच सैन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याबरोबरच ती काळानुरूप विकसित होणारी युद्धनीती आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत होती.
महमूद गझनीने १०११ साली अफगाणिस्तानमधे
घोर काबिज केलं. तेव्हा तिथली बहुतांश प्रजा जी
बुद्ध धर्मीय होती ती इस्लाममधे धर्मांतरित झाली. पुढे मुहम्मद घौरी त्याच्या भावासह ११७३ पासून घोर चा सुलतान होता. ११७५ मधे मुलतान (आत्ताच्या
पाकिस्तानचा भाग) आणि नंतर क्रमाने
आजूबाजूचा प्रदेश काबीज केल्यावर त्याने
भारताच्या वैभवशाली राज्यांना लुटण्याचा
निश्चय केला. वेगवेगळे मनसुबे आखले. ११७८ मधे मुलतान हे आपलं तळ(बेस) बनवत आत्ताच्या पाकिस्तानमधून घौरी त्याच्या प्रचंड
सैन्यासह अन्हिलवाडा (आताचं गुजरात मधलं
पाटण) या
चालुक्यांच्या राजधानीकडे निघाला.
सिंहासनावर छोटा मुलगा बसला आहे तरी त्याची आई नाइकी देवी हिच्या
नेतृत्त्वाखाली आपल्याला थोडाफार विरोध होऊ शकतो असं
त्याला वाटलं.
सतर्क
अशा गुप्तचरांकडून घौरीच्या प्रचंड ताफ्याची आणि शस्त्रबळाची बातमी मिळताच नाइकी देवीने आपल्या शेजारच्या
राज्यांना तत्काळ मदतीचा हात मागितला. ज्यांनी संमती दर्शवली त्यांना संघटित करून
तिने सेना उभी केली.मोहम्मद घौरीने
आताच्या माऊंट अबू जवळ कायदरा इथे थांबून राणी नाइकी ला संदेश पाठवला की तू तुझ्या
राज्याची संपत्ती,
स्त्रिया आणि तुझ्या मुलांसह स्वतःला माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी तुझ्या राज्यावर हल्ला करणार नाही. घौरीला माऊंट
अबूच्या डोंगरातच थोपवण्यासाठी राणीने त्याचा प्रस्ताव बिनशर्त मान्य असल्याचं त्याला कळवलं. घौरीला
अतिशय आनंद झाला!तो प्रतीक्षा करू लागला.
नाइकी
देवी आपल्या छोट्या मुलाराजला बांधून सैन्याचं नेतृत्त्वं करत घौरीच्या दिशेने झंजावातासारखी
निघाली. तिच्या सेनेने घौरीच्या सैन्याला घेराव घातला. त्यात हत्ती आणि घोडे दोन्हींचा प्रभावी समावेश
होता. बघता बघता तलवारींना तलवारी भिडल्या आणि घनघोर युद्धाला प्रारंभ झाला! डोंगरी भागात
जादुई मार्गाने प्रकट होत घौरीच्या सेनेला अक्षरश: कापून काढत सैन्याने राणीच्या
सक्षम नेतृत्त्वाखाली हा धगधगता रणसंग्राम जिंकला! आपला राणीपुढे टिकाव लागत नाही
हे ओळखून घौरी उरलेल्या सैन्यासह माघारी
फिरला, तेव्हा राणीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करत त्यांना राज्याच्या सीमेपार हाकलत पुन्हा
मुलतानकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलं! राणी नाइकी देवीचं हे चातुर्य, धाडस आणि शौर्य थक्क करणारं आहे!ती छोट्या मुलाला बरोबर घेऊन शत्रूच्या
गोटांत जाऊन लढली! तिचं हे रणचंडीचं रूप तिचा छोटा मुलगा मुलाराजा प्रत्यक्ष बघत होता!
फिरीश्ता
या पर्शियन इतिहासकाराने उल्लेख केला आहे
“how the ruler of Gujrat defeated the army of Ghauri with
great slaughter!”. जैन अभ्यासक मेरूतुंग याने त्याच्या “प्रबंध
चिंतामणी” ग्रंथात या लढाईचं आणि राणीच्या अतुलनीय शौर्याचं यथार्थ वर्णन केलं आहे!
नवरात्रीच्या
निमित्ताने घौरीसारख्या आक्रमकाला पराभूत
करणार्या राणी नाइकी या सौदामिनीला कडक मानवंदना!जय हिंद!
-
मेजर
मोहिनी गर्गे- कुलकर्णी(नि.)
या खर्या दुर्गा ! यांना त्रिवार वंदन!
ReplyDeleteतुमची भाषाशैली पराक्रमगाथा सांगण्याच्या दृष्टीने एकदम छान आहे.करिअरचा प्रभाव?
मन:पूर्वक धन्यवाद! प्रयत्न करत आहे लिखाणाचा. मी उलट म्हणेन. बोलण्याची आणि लिखाणाची शैली हा या करियरमध्ये निवड होण्यासाठी माझ्या व्यक्तिमत्त्वातला खूप strong point ठरला असावा असं मला वाटतं. आणि अर्थातच अनुभवांनी त्यात भर टाकली असावी. आपल्या प्रतिसादासाठी पुनश्च आभार!
ReplyDelete