कारगिल गर्ल सारखे चित्रपट : फलित काय?
“तुमच्या आर्मी किंवा एअर फोर्स मध्ये असंच वातावरण असतं का? तुझा काय अनुभव?”
“काय
काय दाखवलं आहे या चित्रपटात...बापरे! मी तर असं ऐकलं होतं की संरक्षण दलांमध्ये स्त्रियांना फार सन्मानाने वागवलं जातं...खोटं आहे का ते...?”
“मुलींसाठी
हा चित्रपट प्रेरणादायी आहे पण मुलांमधली एअर फोर्स मध्ये जाण्याची प्रेरणा मात्र कमी
झाली ...कारण आज मुलांनाही अशाच ठिकाणी काम करायला आवडेल जिथे स्त्रियांना अपमानास्पद
वागणूक मिळत नाही उलट बरोबरीने, सन्मानाने वागवलं जातं...!”
हे
आणि असे अनेक प्रश्न एका चित्रपटामुळे सध्या विचारण्यात येत आहेत...आणि मला सहज
आठवतात अनेक क्षण...माझ्या क्षमतेवर
विश्वास ठेऊन जेव्हा अतिशय जोखमीच्या जबाबदर्या माझ्यावर सोपवल्या गेल्या...!
आर्मी मध्ये
सुरुवातीलाच पाहिलेला तो कठीण काळ...कठीण
जागा जिथून दूरवरसुद्धा महिनोंमहिने एकही स्त्री दिसायची नाही! वादळात किंवा बर्फ
पडत असताना अंधार्या रात्री तासा तासाला जाऊन चेक केलेले पोस्ट्स...जवानांवर
विश्वास ठेऊन त्यांच्याबरोबर केलेला दीर्घ प्रवास...आम्ही हातात हात देत पार केलेल्या कठीण दर्याखोर्या...आणि
यासाठी पुरुष वरिष्ठ अधिकार्यांनी , सहकार्यांनी वेळोवेळी दिलेली हिंमत...केलेलं कौतुक!....हे सगळंच डोळ्यांसमोरून तरळून गेलं!
मी
स्वतःआणि इतर असंख्य स्त्री अधिकारी जे जे
काही चांगलं काम करू शकलो ते या सहकार्यामुळेच!
म्हणून
ओढून ताणून स्त्री पुरुष वाद दाखवणारा हा चित्रपट पाहिल्यावर सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं होतं पण...
खूप वेळेला त्यावर चर्चा होऊ लागली म्हणून हा लेखन प्रपंच!
वास्तव काय आणि चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्याची मर्यादा किती:
करगीलमध्ये 1999 साली जी लढाई झाली ती अनेक अर्थांनी विशेष आहे. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मीडियाने युद्धजन्य भागात जाऊन त्या लढाईला घराघरापर्यंत पोचवलं. अनेक पत्रकारांनी त्या काळात त्यांच्या पुढच्या करिअर साठी यशस्वी वाट तयार केली, नाव कमावलं! त्यानंतर विशेषतः आर्मी किंवा एकूणच संरक्षण दलांशी संबंधित चित्रपटांची लाटच आली! विषय सगळ्यांना प्रेरक, राष्ट्रभक्तीने भारलेला असल्याने त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. गाणीही खूप गाजली. हे असे चित्रपट आवर्जून बघितले पाहिजेत, ते राष्ट्रीय कर्तव्यच आहे...असं समजून अनेकजण त्यालाच वस्तुस्थिती समजू लागले. मीही अपवाद नाही,माझ्या महाविद्यालयीन जीवनात मीही असं केलं असावं. पण वास्तव काय आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र सगळं हास्यास्पद वाटायला लागलं!
अशा
चित्रपटांमध्ये भरपूर “कलात्मक स्वातंत्र्य” घेऊन वाट्टेल तसे युनिफॉर्म, त्यावरचे ranks,
अस्तित्त्वात नसलेल्या पद्धती, अतिशृंगारिक दृश्य वा गाणी, किंवा अपवादात्मक
बाबींचं उदात्तीकरण असे प्रकार सर्रास होत होते. तरीही त्यातले विचार प्रेरणादायी
म्हणून त्याकडे दुर्लक्षं केल्या
गेलं!काही चित्रपट चांगलेही होते. पण आता मात्र
हे कलात्मक स्वातंत्र्य वायुसेनेच्या अपमानकारक प्रतिंनिधीत्त्वापर्यंत गेलं आहे! “कारगिल गर्ल” हा
फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना(नि.) यांच्या जीवनावरचा चित्रपट सध्या अनेक गोष्टींमुळे वादाच्या भोवर्यात आहे. ज्यात भारतीय
वायुसेनेची अतिशय नकारात्मक प्रतिमा
रंगवण्यात आल्यामुळे आणि लिंग भेदाबद्दल अतिशय चुकीचं
प्रतिंनिधीत्त्व दाखवल्यामुळे वायुसेनेच्या अधिकार्यांनी धर्मा
प्रॉडक्शन, नेट फ्लिक्स आणि
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) यांना पत्रं
पाठवलं आहे. त्याचबरोबर वायुसेनेच्या अनेक सीनियर पायलट स्त्री अधिकार्यांनी सुद्धा ही बाब सर्वथा चुकीची
असून त्यांना पुरुष वरिष्ठांकडून खूप चांगला प्रतिसाद,
प्रोत्साहन मिळाल्याचं स्पष्ट सांगितलं आहे!
या
चित्रपटाचं कथानक म्हणजे लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न बघणारी गुंजन अनेक
अडचणींवर मात करून एअरफोर्समध्ये पायलट होते आणि
कारगिलच्या युद्धजन्य परिस्थितीत
विमान उडवणारी पहिली महिला पायलट ठरते.
उत्कृष्ट छायाचित्रण, उडत्या विमानामधले काही थरारक प्रसंग एवढी काही वैशिष्ट्य सोडली तर या चित्रपटात खटकणार्याच
गोष्टी जास्त आहेत! खरंतर गुंजन मॅडमच्या आठ वर्षांच्या एअरफोर्स मधल्या
कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या कामगिरी पार पडल्या आहेत, महत्त्वाचे कोर्सेस केले आहेत. त्या महत्त्वाच्या कारकीर्दीवर कुठेही प्रकाश टाकलेला नाही. मात्र एका स्त्री अधिकाऱ्याचं कर्तृत्त्व दाखवण्यासाठी क्रिएटिव्ह लायसन्स च्या नावाखाली भारतीय
वायुसेनेची प्रतिमा अतिशय खालच्या थराला जाऊन मलीन करण्यात चित्रपटाने कोणतीही कसर
सोडलेली नाही.
चित्रपटातले अनेक वादाचे मुद्दे :
यात एक स्त्री अधिकारी दाखल झाल्यावर एकूण एक पुरुष- अधिकारी तिच्या विरोधात जातो, एकही पुरुष अधिकारी तिला जराही समजून घेत नाही! तिला तिथे कपडे बदलण्याच्या
जागेसाठी, बाथरूमसाठी सुद्धा संघर्ष
करावा लागतो! हेही कमी म्हणून सगळेच्या सगळे
वायुसेनेचे पुरुष अधिकारी अगदी रोज रात्री उशिरापर्यंत हातात ग्लास घेऊन “चोली के
पीछे क्या है” गाणं मोठ्याने लावून त्यावर हिडीसपणे नाचतात! चित्रपटात एकही पुरुष अधिकारी तिच्याबरोबर केवळ ती
स्त्री आहे म्हणून फ्लाईट चालवायला तयार होत नाही आणि तसं त्याने स्पष्टपणे सांगितल्यावर सुद्धा
त्याच्या वरिष्ठ अधिकार्याला ते पटून तोही अशा अधिकार्यांना पाठीशी घालतो! ही स्त्री पायलट तिथून
निघून जाण्याच्या एकमेव उद्देशाने सगळेच तिला अतिशय अपमानास्पद वागणूक देतात... हे आणि बरंच काही ...
कशासाठी?
काही
हास्यास्पद गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने ही पायलट रजेचा कागद भिरकावून,तिची सुट्टी मान्य झाली की नाही
ह्याची पर्वा न करताच घरी पोचते! त्यानंतर कारगिलमध्ये तिचा आर्मी-अधिकारी भाऊ आणि
ही पायलट बहीण एकत्र कामही करतात!
खरंतर
गुंजन मॅडम उधमपूर मध्ये 1996 साली पोस्ट केल्या गेलेल्या एकमेव
महिला अधिकारी नव्हत्या. याविषयी सविस्तर ब्लॉग त्यांच्या सहकारी फ्लाइट
लेफ्टनंट श्रीविद्या राजन(रिटा.) यांनी लिहिला आहे कारण संपूर्ण चित्रपटामधून
त्यांना सोयीस्कर पद्धतीने वगळण्यात आलेला आहे. गुंजन मॅडमच्या आधीही भारतीय वायुसेनेत स्त्री पायलट कार्यरत होत्या
ज्यामुळे स्त्री अधिकार्यांबरोबर काम करणं हे तिथल्या पुरुष अधिकार्यांसाठी नवीन
नव्हतं. हे चित्रपटात कुठेही स्पष्ट केलेलं नाही.
Disclaimers की बेजबाबदारपणा:
चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोन disclaimers दाखवण्यात आलेले आहेत ज्यात फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
यांच्या जीवनावरती हा चित्रपट आधारित आहे एवढं एकच सत्य दाखवून बाकी कुठलीही जबाबदारी न घेता चित्रपटातल्या
इतर सगळ्या गोष्टींसाठी पूर्णपणे हात झटकले आहेत.
अशा प्रकारचे डिस्क्लेमर्स कोण वाचतं? सर्वसामान्य जनता भारतीय
वायुसेनेची पुरुषी अहंकाराने बरबटलेली संकुचित प्रतिमा डोक्यात घेणार ही शक्यता नाकरण्यात येत नाही. किंवा निदान तशा शंका तरी मनात उपस्थित झाल्या आहेतच!
यानिमित्ताने
काही महत्त्वाचे प्रश्न:
जर
चित्रपटात दाखवण्यात आलेलं बाकी सगळं हा निव्वळ
कल्पना विस्तार आहे ... तर मग कथाबीज हे
वास्तवातून घेण्याचं कारण काय? भारतीय वायुसेने सारख्या सर्वथा गुणवत्तेवर चालणाऱ्या
संस्थेला बदनाम करण्यामागे कोणता उदात्त
हेतू आहे? मुळात या स्त्री
अधिकार्याच्या गुणवत्तेविषयी,
कर्तृत्त्वाविषयी काहीही शंका नाही पण ते ठळक करण्यासाठी वायुसेनेची इतक्या
खालच्या थरावर जाऊन बदनाम करण्याची गरज
आहे का?
संरक्षण दले
आणि स्त्री-पुरुष समानता:
संरक्षण दलांमद्धे अगदी सुरुवातीच्या
स्त्री अधिकार्यांना सगळं सहज मिळालं किंवा त्यांना फारच सहज
स्वीकारलं गेलं असं नाही. इतर अनेक क्षेत्रांमद्धे पायवाट तयार करणाऱ्या स्त्रियांना जो संघर्ष
करावा लागला तो संरक्षण दलांमध्येसुद्धा करावा लागला आहे कारण इथे स्त्री पुरुष
समानतेपेक्षाही देशाची सुरक्षा हा विषय
प्राधान्याचा होता!पण त्या संघर्षाची पातळी निश्चितच
वेगळी होती. कपडे बदलण्यासाठी जागा
द्या...( चित्रपटात दाखवल्याप्रमाणे) एवढी
खालची पातळी नव्हती. पुरुष प्रधान मानसिकतेचे काही तुरळक अधिकारी दिसून येतातही.पण
म्हणून संपूर्ण संस्थाच त्या पद्धतीने विचार करते असं म्हणणं सर्वथा चूक ठरेल. सुरूवातीच्या काळात स्त्रियांना घडवणारे
पुरुष अधिकारीच होते. स्त्री अधिकार्यानी देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी
सोडली नाही, स्त्री म्हणून कोणतीही सवलत मागितली नाही. पदोपदी स्वत:च्या
मर्यादांवर मात करत त्यांनी स्वतःला
सक्षम केलं, समर्थ केलं.
पाया आणि निकष केवळ गुणवत्ता; ओळख: केवळ “भारतीय”:
मुळात
संरक्षण दलांमध्ये फक्त आणि फक्त
गुणवत्तेच्या आधारावरच मुला-मुलींची निवड करण्यात
येते. मग तिथे कोणतेही इतर निकष नाहीत - जात, पात, धर्म, लिंग...काहीही नाही! हे सगळे शब्द मनातून पुसून केवळ
“भारतीय” एवढीच ओळख रहाते. त्याची सुरुवात अगदी ट्रेनिंग पासून होते. तिथे आम्हा मुलींना तुम्ही आधी एक “अधिकारी” आहात
...स्त्री नंतर... असं बिंबवण्यात येतं.
स्त्री अधिकारी व पुरुष अधिकारी दोघेही
सारखाच गणवेश घालतात. स्त्रियांना केवळ शारीरिक शक्ती
च्या जोरावर न जोखता त्यांची
बुद्धिमत्ता,त्यांचा जोश, त्यांचे प्रयत्न
हे गुण नेहमीच कौतुकास्पद ठरतात. जवानांचं उत्तम प्रकारे नेतृत्वही स्त्री -अधिकारी
करत आलेल्या आहेत. अनेक साहसी खेळांमध्ये मग त्या आंतरराष्ट्रीय
पातळीवरच्या स्पर्धा असो वा एव्हरेस्ट सर करण्याचा धाडसी उपक्रम.. सगळीकडे स्त्री
अधिकार्यांना प्रोत्साहित करून संपूर्ण पाठिंबा देणारी ही सरांक्षण दलं आहेत!
अशा
अथक प्रयत्नामुळे प्रयत्नांमुळे कोणतीही दरी न रहता एक “अधिकारी” म्हणून
गुणवत्तेच्या वाटेवर चालत गेली अनेक वर्षे स्त्री पुरुष दोघांनीही उज्ज्वल इतिहास
निर्माण केला आहे!
भारतीय वायुसेनेमध्ये स्त्री अधिकार्यांचं प्रमाण इतर दोन
दलांपेक्षा तुलनेने सगळ्यात जास्त आहे!
2015 मध्ये वायुसेनेने combat roles
साठीसुद्धा स्त्री अधिकार्यांची निवड सुरू केली (fighter pilots)...या आणि अशा असंख्य पायवाटा वायुसेनेने मुलींसाठी तयार
केल्या..अतिशय सन्मानपूर्वक! त्यांनी रचलेला इतिहास, मिळवलेले पुरस्कार हे सगळं अतिशय
स्पष्ट आहे! जर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे परिस्थिती असती तर हा पल्ला
वायुसेना गाठू शकली असती का?
युद्धाचं बदलतं स्वरूप: तंत्रज्ञान केंद्रस्थानी:
सरंक्षण
दले आणि शारीरिक शक्ती हे समीकरण अतूट आहे, पण आजच्या युद्धात तंत्रज्ञानाची
भूमिका आत्यंतिक महत्त्वाची आहे. मग ते अत्याधुनिक शस्त्रं असो, दळणवळण, संपर्क, माहिती
पुरवठा, आणि इतर कोणत्याही बाबी असो...तंत्रद्यानामुळे खूप
सुविधा निर्माण झाल्या आहेत. आज वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक प्रकारे युद्धं लढली
जातात. या पैलूमुळे स्त्रियांना तिन्ही दलांमध्ये प्रचंड संधी निर्माण होत आहेत. असं
असताना कुणी पुरुष त्यांना पंजा लढवून
हरवत असेल आणि म्हणून कमी लेखत असेल तर त्यासारखं
हास्यास्पद दृश्य नाही!
मी मोठी की “आम्ही”:
पुन्हा
चित्रपटाकडे वळतांना आणखीन एक वादाची किंवा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चित्रपटांतल्या
वादांवर उत्तर म्हणून एक दीर्घ ब्लॉग स्वतः गुंजन मॅडम ने (NDTV) लिहिला आहे. ज्यात एकीकडे अशी कोणतीही
प्रतिकूल मानसिकता पुरुष अधिकार्यांकडून संस्थेच्या पातळीवर अनुभवली नसल्याचं त्यांनी
मान्य केलं आहे पण दुसरीकडे हा चित्रपट तयार करतांना माझ्याशी चित्रपट
दिग्दर्शकाने वेळोवेळी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, किंबहुना काही shots घेतांना त्या स्वतःही तिथे
उपस्थित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि केवळ चित्रपटाच्या कलात्मक
स्वातंत्र्याच्या कारणाने त्यातल्या गोष्टींना त्यांनी पुष्टी दिली आहे! त्यांनी यासाठी विरोध का नाही
केला किंवा वास्तव दाखवण्याचा आग्रह का नाही धरला हे त्याच सांगू शकतील!
म्हणून
सुजाण जनतेने या चित्रपटांमधून कोणताही निष्कर्ष काढू नये. प्रेक्षक मिळवण्यासाठी प्रेरणेच्या नावाखाली अवास्तव आणि चक्क देशाच्या संरक्षण दलांना बदनाम
करणारं चित्रण करत एखादा चित्रपट चुकीच्या
गोष्टीचं उदात्तीकरण करत असेल तर त्यासाठी
करायची एकमेव गोष्ट म्हणजे -त्याचा सर्वथा निषेध!जय हिंद!
- मेजर मोहिनी
गर्गे-कुलकर्णी (नि.)
अगदी वास्तव समोर मांडले आहेत
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअशा चित्रपटांमधे कल्पनारंजन करून सवंग लोकप्रियता मिळवण्यापेक्षा खर्या,वास्तव गोष्टी दाखवल्या तर असे सिनेमे खरे लोकप्रिय व प्रेरणादायी ठरतील.
ReplyDeleteअगदी खरंय तुमचं. खरं तर ही खूप मोठी संधी आहे प्रेरणादायी काही दाखवण्याची. कारण आजही चित्रपट माध्यमाचा पगडा मोठाच आहे समाज मनावर!
Deleteअशा निर्मात्या वर अब्रू नुकसानीची केस दाखल करायला हवी कारण हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
ReplyDelete२) यापुढे सत्य कथा व पात्रावर मीडिया मध्ये काहीही प्रक्षेपित होणार असेल अन् अस्तित्वात असलेल्या सरकारी वा बिगर सरकारी संस्थांचा उल्लेख असेल तर त्यांची लेखी परवानगी घेण्याचा कायदा असावा. संरक्षण किंवा तत्सम बाबतीत अधिक काटेकोर .
३) writing in the blog by Gunjan Saxena is not sufficient. तिने जाहीर माफी मागावी , जनतेची आणि एअर फोर्स ची.
4) when I watched the movie was impressed by her character at a same time was wondering , it is possible in Air force? ...do many things
5) As a branch Manager , when I was working in the , Bank , I was not allowed to leave posting destination without permission of head quarters and such a thing possible in Defence? While wanching my comments was , oh. Sheer nonsence.
6) Do Gunjan Saxena is aware, सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून ती आमच्या मनातून साफ उतरली.
Very aptly expressed mam! Thank you! व्यक्ती मोठी दाखवताना संस्थेला लहान करण्याची काहीच आवश्यकता नाही!
DeleteWe have been silent for too long
ReplyDeletevery true! high time to wake up!
Deleteमी पाहिलेला 'विजेता" हा शेवटचा युध्दपट.
ReplyDeleteआता तर पोस्टर वर सुद्धा वर्दीतील कोणी दिसला तरी मी त्या सिनेमाकडे ढुंकूनही पहात नाही.
बॉलीवूड तर" गाढवांची युनिव्हर्सिटी" आहे.
ज्या ग्रामीण महिलांच्या सहयोगाने भूज ची धावपट्टी दुरुस्त झाली त्यांना कोपर्यात टाकले आणि युद्ध सुरू असताना लग्न समारंभ आणि बेस कमांडर भांगडा करतात हे सगळे अगम्य आहे.
मला वाटते सेनेनी स्वत: युद्ध चित्रपट निर्मिती आणी प्रदर्शन संस्था सुरु करुन" वस्तुनिष्ठ" युध्दपट निर्मिती सुरु करावी आणि अफवा नावा आवा (AFWAA,NAWA,AWAA) ने एक्स सर्विस पर्सनल आणि जनतेच्या सहयोगाने बॉलीवूड ला हादरवून टाकावे.
आणि ह्या पुढे सेनेशी संबंधित सर्व चित्रपटांचे निर्मीती हक्क फक्त सशस्त्र सेनेच्या आधिन असावेत.
जर समजावून समजत नसतील तर फक्त वॉर बॉलीवूड विरुद्ध हाच एक मार्ग आहे. एक्स पर्सनल मध्ये सगळेच टॅलेंट आहेत व अगदी कुशल तंत्रज्ञ सुद्धा आहेत आणि ह्यांचा फायदा प्रपोगंडा साठी होईल व निव्वळ नफा सैनिक परिवार कल्याणासाठी वापरता येईल.
आणि भारतीय सशस्त्र सेना ही विजेता सेना आहे आणि इथे पण आपले जोहर दाखवेल.
जयहिंद.
अत्यंत स्तुत्य कल्पना आपण सांगितली! चित्रपटांतून उदात्तीकरण केल्यानं युद्धशास्त्राशी निगडित अनेक गोष्टी कमालीच्या उपेक्षित राहिल्या आहेत भारतात. त्या गोष्टी आणि वस्तुस्थिती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. आपल्या मतासाठी मन:पूर्वक धन्यवाद!
Delete