"या सम हा" - अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्त्वाची लोकविलक्षण यशोगाथा - ग्रंथपरिचय



शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युध्दे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्

गीतेच्या या श्लोकात सांगितल्याप्रमाणे शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, धैर्य, औदार्य, नेतृत्व . गुण ज्यांच्यामध्ये मूर्तिमंत झाले असे धुरंधर योद्धे भारतामध्ये होऊन गेले! यापैकी एक नाव म्हणजे थोरला बाजीराव पेशवा! बाजीरावच्या संपूर्ण कारकिर्दीला प्रभावीपणे आपल्यासमोर मांडणारा एक अभ्यासपूर्ण  ग्रंथ नुकताच वाचनात आला- 'या सम हा'. स्वतः एक कुशल योद्धा आणि रणनीतीमध्ये  निष्णात असलेल्या मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी हा ग्रंथ लिहिलेला असल्याने यात अतिशय अचूक आणि स्तिमित करणारं रणनीतीचं विश्लेषण वाचायला मिळतंबाजीरावसारख्या वीरश्रेष्ठाच्या शौर्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शेकडो वर्षं केवळ त्याच्या प्रेमविलासाचं उदात्तीकरण करणाऱ्या सगळ्यांच्याच डोळ्यांत घातलेलं हे झणझणीत अंजन आहे! हीच खंत लेखकाला  जाणवली की बाजीराव कसा मालिका, चित्रपट यांतल्या प्रेमकथेपाशीच येऊन थांबतो...तेव्हां  या अस्वस्थतेची परिणती एका ध्यासात झाली आणि  हा ग्रंथ जन्माला आला! युद्धशास्त्राची अनेक वर्षांपासून  होणारी उपेक्षा सुद्धा अशा प्रकारच्या साहित्याने नक्कीच  कमी होईल.   

बाजीरावच्या रणकर्तृत्वावरती आधारलेला हा ग्रंथ आहेस्वतःच्या परिश्रमाने पेशवेपद मिळवणाऱ्या बाळाजी विश्वनाथ भटाच्या निधनानंतर अवघ्या विसाव्या वर्षी बाजीरावला मोठ्या विश्वासाने शाहूने पेशवेपद बहाल केलं. ते पुढे बाजीरावने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सार्थ केलं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच केलेलं बाजीरावच्या व्यक्तिमत्त्वाचं  वर्णन आपल्या मनाचा ठाव घेतं आणि पुढे पूर्ण ग्रंथ वाचतांना ही त्याची रांगडी प्रतिमा डोळ्यांपुढे तरळत रहाते - "चैतन्य, ऊर्जा आणि अभिनिवेश यांचं चित्तवेधक मिश्रण म्हणजे बाजीराव!"  परिस्थिती अचूक ओळखून त्याने  स्वतः युद्धातले डावपेच आणि रणनीती निर्माण केली, युद्धयोजना आखल्या आणि अचाट शक्तीनिशी त्या यशस्वीपणे अंमलात आणल्या! शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य शाहूंच्या अधिपत्याखाली असतांना  त्याच्या स्थैर्य आणि विस्तारासाठी हा निष्णात अश्वारोही आजन्म लढला...पार दिल्लीपर्यंत धडकला! ज्याच्या नेतृत्वाचा गौरव फिल्डमार्शल मॉंटगोमेरीसारख्या पाश्चिमात्य सेनानीनेही केला!

या ग्रंथाच्या  काही  ठळक वैशिष्ट्यांचा उल्लेख करावासा वाटतो

स्वराज्याच्या पुनरुत्थानापासून झालेला आरंभ

शिवछत्रपती, संभाजी, त्यानंतर काही वर्षांनी शाहूकडे त्याचं हस्तांतरण  या संदर्भांपासून    ग्रंथाची सुरुवात झाल्याने पुढचा  इतिहास  समजायला सोपा वाटतो. एकूण मोगल साम्राज्य, स्वराज्य यांची भौगोलिक पार्श्वभूमी समजते. बाळाजीने आखलेली महसूल पद्धती, भोवतालच्या राजांचं संघटन आणि  पेशवाईचा घातलेला मजबूत पाया, अगदी लहानपणापासून बाजीराव, चिमाजी यांना असलेली साहसाची ओढ, जिद्द, निर्भयता, त्यांनी घेतलेली मेहनत हे सगळं फार सुंदर पद्धतीने आपल्याला वाचायला मिळतं.

नकाशांसह लढायांचं स्पष्टीकरण आणि बाजीरावच्या स्वयंभू लष्करी प्रतिभेचं वेधक  दर्शन:  

बाजीरावचं कार्यक्षेत्रं, त्याच्या पुढची आव्हानं तर यात सविस्तर आहेतच पण त्याने लढलेल्या लढायांचं विस्तृत विवेचन सुद्धा या ग्रंथात आहे. खांडवा, बाळापूर, फत्तेखर्डा, माळवा, गुजरात, कर्नाटक, डभई अशा अनेक यशस्वी मोहिमातसंच ठिकठिकाणी निजामाला दिलेला शह, आग्र्यातल्या सैन्याला चाहूल लागू देता त्यांच्यामधून पुढे जात दिल्लीत पोचणाऱ्या आक्रमक बाजीरावाच्या रोमांचकारी प्रवासाचं अद्भुत दर्शन घडतं. एकेक लढाई क्रमाने घेऊन ती लढण्याचा मुख्य उद्देश स्पष्ट करून तिचा आराखडा दिलेला आहे. मोहिमेआधी निरीक्षण करून, शत्रूचं वैगुण्य अचूक हेरून बाजीरावने घेतलेले महत्वाचे निर्णय, युद्धाच्या पूर्वीच्या हालचाली, लढाईच्या मैदानाचे गुणधर्म, अभिजात व्यूहरचना  आणि  प्रत्यक्ष लढाई  असं सगळं ठिकठिकाणी नकाशाच्या साहाय्याने  निःसंदिग्धपणे मांडलेलं आहेत्या एकेका लढाईचं लष्करी तत्त्वांवर मूल्यमापन आणि त्याचा तत्कालीन राजकारणावर झालेला दूरगामी परिणाम या गोष्टींचं  संदर्भासह दिलेलं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला अचंबित करतं

याचं अगदी ठळक उदाहरण द्यायचं झालं तर  पालखेडचा संग्राम - फेब्रुवारी १७२८. शिंदे, होळकरांसारख्या विश्वासू आणि कर्तबगार सरदारांना घेऊन आपल्या बुद्धी आणि बाहुबलाच्या जोरावर तीन शतकांपूर्वी बाजीरावने हा जो पालखेडचा संग्राम जिंकला त्याने काळाच्या खूप पुढे जाऊन पुढच्या पिढ्यांसाठी युद्धशास्त्राचा एक मोठाच आदर्श निर्माण केला आहे! अवजड तोफा, हत्ती, जनाना, बुणगे यांसह सुस्त चालणाऱ्या मोगल सैन्याविरुद्ध रक्तात अंगार भरून स्वयंप्रेरणेने लढणारे मराठा सैनिक आणि त्यांचा विश्वास जिंकून विजेच्या चपळाईने गतिमान होत त्यांचं नेतृत्व करणारा झपाटलेला बाजीराव आपली झोप उडवतात! फक्त आधुनिक तंत्रज्ञान वा शस्त्रांनी नव्हे तर दृढनिश्चयी मन आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर लढाई जिंकली जाते  हे त्याने दाखवून दिलं. गतीला लगाम बसेल म्हणून बाजीरावने तोफखान्याकडे   वळता घोडदळाला प्राधान्य दिलं. शत्रूला तोफांचा वापर करण्यापासून प्रवृत्त करत तो बाजी जिंकत असे. पुढे १७२९ मधे हिंदुपदपातशाहीच्या   ध्यासाने झपाटलेल्या छत्रसालाच्या हाकेला धावत महम्मदखान बंगश चा ज्या धाडसाने बाजीरावने पाडाव केला त्यालाही तोड नाही!

युद्धतत्त्वांची महत्त्वपूर्ण चर्चा आणि बाजीरावच्या उच्च युद्धमूल्यांचा अविष्कार: 

हा या ग्रंथाचा आत्मा वाटतो मला. रणनीती, डावपेच म्हणजे नक्की काय याच्या अचूक व्याख्या यात आहेतआत्तापर्यंत जगभर लढल्या गेलेल्या लढायांचं तर्कनिष्ठ विश्लेषण केलं तर त्यातून  काही चिरंतन मूल्यं मिळाली आहेत - ज्यांना युद्धाची मूलतत्त्वं ( principles of war) म्हणतात. ही कालातीत आहेत. ती सगळी बाजीरावने किती चपखलपणे आपल्या विविध लढायांमधे वापरली आहेत हे लेखकाने सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. Selection and maintenance of aim, security, mobility, offensive action, economy of force, surprise, morale, cooperation, logistics . ही तत्त्वं त्याकाळात बाजीरावने किती अचूक आणि यशस्वीपणे वापरली! याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या  warfares बद्दलसुद्धा यात माहिती आहे. अनेक युद्धशास्त्र प्रणेत्यांचे तत्त्वं संदर्भासह या ग्रंथात ठिकठिकाणी चर्चिले आहेत. उल्लेख करायचा तर सून्त्झू पिंग फा या गूढ चिनी योद्धा तत्वज्ञाने अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ- The art of war यातली - " लढताच (लढाई) जिंकणं सर्वोत्तम" तसंच "कठीण कामं ही त्यांचं स्वरूप साधं असतांनाच संपवली पाहिजेत"! अशी अनेक  प्रभावी तत्त्वं तितक्याच परिणामकारकतेने बाजीरावने प्रत्यक्ष कशी अंमलात आणली हे  वाचून आश्चर्याचा धक्काच  बसतो! याबरोबरच कार्ल फॉन क्लाऊजवित्स या जर्मन तत्त्ववेत्याची मूल्यं, सर लिडेल हार्ट ची प्रहारनीती अशा अनेक गोष्टी सुद्धा बाजीरावने चपखलपणे हाताळलेल्या दिसतात!

मराठा सैन्याची वृत्ती आणि इतर माहिती

शिवकालीन लष्कराचे प्रमुख भागत्याची रचना, त्यातले हुद्दे आणि पुढे बाजीरावच्या नेतृत्वाखाली ते कसे होते याची रोचक माहिती या ग्रंथात आहेआरमाराकडे झालेलं दुर्लक्ष तसंच "पैशांसाठी युद्ध आणि युद्धासाठी पैसा" या बाजीरावला पडलेल्या मर्यादांचा स्पष्ट उल्लेख ग्रंथात असला तरी शिवाजीराजांनी रुजवलेली मूल्यं बाजीरावच्या काळातही कशी शाश्वत होती याचं मोठं समाधान वाटतं! उल्लेख करण्याचा मोह आवरत नाही- वसुलीच्या वेळी मशीद, धार्मिक पुस्तकं, स्त्रिया यांना धक्का लावता आदरपूर्वक बघण्याचा पडलेला पायंडा पुढेही तसाच राहिला.   वसई चा किल्ला जिंकला त्यावेळी   धर्मांध  पोर्तुगीजांना  धडा शिकवतांना सुद्धा मराठ्यांनी खूप संयम आणि औदार्य दाखवलं. चिमाजीच्या नेतृत्त्वाखाली शरण आलेल्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी पोचवत मराठ्यांनी उच्च संस्कृतीचं दर्शन घडवलं! त्यांच्यात तसूभरही धर्मांधता नव्हती हे पुन्हा सिद्ध केलं! अशा अनेक हृदयस्पर्शी गोष्टी या  ग्रंथामुळे अधोरेखित होतात!

महत्त्वाचा परिणाम: छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव यांसारख्या योध्यांच्या रणनीतीचा सखोल  अभ्यास करून तो आपल्यापर्यंत पोचवण्याचा  लेखकाचा  हा  ध्यास अतिशय मोठा आहे. या युद्धनीती  संरक्षण दलांच्या अभ्यासक्रमात असल्याच पाहिजेत. सगळ्या भारतीयांना गर्व वाटेल  अशा  पराक्रमाचा हा वारसा आहे. आजही अशा शौर्याची किती आवश्यकता आहे हे या दिवसांत अधिक सांगायची गरज नाही.   मला महत्त्वाचा वाटतो तो याचा दूरगामी परिणामयांमुळे   इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रावर सुद्धा असलेला इंग्रजांचा एकूणच   प्रभाव (colonial effect)  कमी व्हायला मदत होईल. आणि दुसरं म्हणजे भारतातल्या इतर महान   प्राचीन गोष्टीही पुढच्या   पिढीपर्यंत पोचवायच्या असतील   तर त्याची नुसती  थोरवी सांगून  चालणार नाही, तर  त्या किती  अभ्यासपूर्ण, सप्रमाण सिद्ध करून आपल्याला  हा सेतू  बांधायचा आहे याची  प्रकर्षाने जाणीव  होईल

- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©


Comments

  1. खूप छान! 'या सम हा ' मी नक्की वाचेन.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! नक्कीच वाचा.book ganga वर उपलब्ध आहे.

      Delete
  2. खुप छान लिहिले आहे आपण

    ReplyDelete
  3. धन्यवाद मोहिनी खूप सध्या भाषेत महत्त्वाची माहिती सांगितलीस , पुस्तक नक्की वाचेन

    ReplyDelete
  4. मनःपूर्वक धन्यवाद पुष्कराज! अवश्य वाच. संग्रही ठेवावा असाच आहे संशोधनात्मक असा हा ग्रंथ!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही