रंगांधळेपणा - "pink" आणि "blue" चा!
आज लहान मुलांशी संबंधित काहीही...अगदी काहीही खरेदी करायला गेलं की तिथला पहिला प्रश्न...मुलासाठी घ्यायचंय की मुलीसाठी? मग आपण जे उत्तर देऊ त्यानुसारच सगळे प्रॉडक्ट्स समोर ठेवले जातील.त्या दोघांच्या कपड्यांमधला फरक मी एकवेळ समजू शकते...पण खेळणी, दप्तर, बूट, डबा, वॉटरबॅग, कंपास, पाऊच...इतकंच काय पण kinderjoy सारखे चॉकलेट्स....मुलामुलींसाठी सगळंच वेगवेगळं! "pink for girls and blue for boys ...!"
दुसरं म्हणजे त्या रंगांबरोबरच त्या त्या वस्तूवर असलेले "Cartoon characters"..! तेही ठरलेलेच! मुलींसाठी barbie ... बार्बी च हवी!... गुलाबी रंगछटा...आधुनिक पेहराव असलेली निळसर डोळ्यांची नाजूक बाहुली! हीच मुलींनी सगळीकडे बघितली पाहिजे.बरं "छोटा भीम" मधली चुटकी तरी अतिशय साधं राहणीमान असणारी आणि तल्लख बुद्धीमत्तेची आहे! पण बार्बी ची style...राहणीमान,कपडे,उंच टाचेच्या सँडल्स,इतर वस्तू, केशरचना- सोनेरी केस...सगळंच उच्चभ्रू...आणि भुरळ पडणारं! अगदी रंग भरायची पुस्तके...त्यातली चित्रं...घरातले पडदे...boxes...इथून ते अगदी आतल्या कपड्यांवर सुद्धा छापलेली असते ही बार्बी! इतका या बार्बीचा सुळसुळाट झालाय! mobile वर games सुद्धा बार्बीचे आहेतच!
बाकी सगळ्या "निळ्या" रंगाच्या वस्तू...spiderman इ. characters मुलांसाठी! मुलांच्या सगळ्या वस्तू यांनीच व्यापलेल्या..भडक आणि stylish! चुकून जरी लहान मुलामुलींनी एकमेकांच्या वस्तू दुकानात बघण्याचा प्रयत्न केला किंवा घेतल्याच तर त्यांना "pink का घेतलंस...अरे मुलगी आहेस का तू?" असं काहीही ऐकायला मिळतं.मुलींनाही. म्हणजे काहीही घेताना हा pink/blue चा चष्मा लावायलाच हवा. मुलांचे सिनेमे, TV channels, जाहिराती यावरूनही कळतं की खाण्याच्या वस्तूंची पाकिटे, handwash, पुस्तके, टोप्या , रुमाल, जेवणाची ताटे-वाट्या-चमचे, चादरी....कुठे कुठे नाहीत हे विशिष्ट रंग आणि cartoons? हल्ली मुलांच्या खोलीची एक भिंत रंगवण्याची वा तिथे wallpaper चिकटवण्याची पद्धत सुरु झाली आहे...तिथेही बहुतांशी बार्बीच निवडली जाते मुलींसाठी...सतत डोळ्यांसमोर! तिथे रंगबिरंगी फुलपाखरे सुंदर दिसू शकतात ना...किंवा मुलांनीच त्यांची खोली रंगवण्याची कल्पना किती भन्नाट आहे!
Kinderjoy चॉकलेट हे वरून pink वा blue असतं. त्यावरूनच ओळखायचं की मुलाचं की मुलीचं ते! वेगवेगळं का...चव तर तीच आहे ना! तर त्यात जी खेळणी टाकलेली असते...ती मुलामुलींसाठी वेगवेगळी असते! मुलींसाठी अपरिहार्य अशी बार्बी, एखादी परी वा प्लास्टिक चे दागिने आणि मुलांसाठी गाड्या, बंदूक असं काहीतरी असतं.मुलांना बाहुल्या, भातुकली,गुलाबी रंग छटा आवडू शकतच नाहीत का?की मुलींनी गाड्या, विमाने यांच्याशी खेळूच नये..!!!
हे सगळं तरी वाढत्या मुलांच्या बाबतीत. आणखीन कमाल म्हणजे हल्ली डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात...म्हणजे त्या बाळाच्या जन्माआधीच...हातात "pink" किंवा "blue" असे कार्ड्स हातात धरून फोटो काढण्याची पद्धत सुरु झालीये. त्यावेळची "मुलगा होईल की मुलगी" ही उत्सुकता मी समजू शकते! ... पण दोन्हींचे दोन वेगवेगळे टेबल्स सजवले जातात...फुगेही "blue" किंवा "pink" च फुगवले जातात!!!( होणाऱ्या आईची साडी मात्र हिरवीच दिसतेय बहुतांशी, blue-pink कॉम्बिनेशन होईल सुरु हळू हळू)!!!
एकीकडे आपण पालक स्वतःला बदलत आहोत...कुठलाही भेदभाव न ठेवता मुलींनाही सगळ्या क्षेत्रात मुद्दाम exposure देत आहोत...मुलींबरोबर मुलांनाही स्वयंपाक, घरातली कामे आलीच पाहिजेत असे प्रयत्न त्यांच्या लहानपणापासून करत आहोत. त्यांच्या कक्षा रुंदावत त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडत आहोत. हळू हळू मुलामुलींमधला "वेगळेपणा" त्यांना उमगेल...तो ते सहज स्वीकारतील. त्याचा आदर करायला शिकतील. त्यासाठी आपणही त्यांना मदत करूच पण असा रंगांमधून, खेळण्यांमधून कोवळ्या मनांमध्ये पसरत जाणारा भेद, प्रत्येक गोष्टीमधे त्यांच्यावर लादण्यात येणारी आवड, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रचंड क्षमता असतानाही नकळत विनाकारण ठरवलेल्या मर्यादा...कल्पनेची भरारी घेऊन कुठल्या कुठे उडायचं त्यांचं वय असताना उगाच अर्थहीन संदर्भांमध्ये अडकून त्यांना विशिष्ट चष्म्यातून बघायला शिकवणं...हेच यातून घडत आहे! याचा कुठेतरी आपण सगळे- लहान वयातील मुलांचे पालक, होणारे पालक, आजी आजोबा... विचार करणार आहोत का? आपण हे का स्वीकारत आहोत? असाही एक विचार आहेच की आज "asiatic" किंवा "globle" values चं वारं वहात असतांना आपण किती गोष्टी टाळणार?पण प्रश्न असा आहे की किती डोळसपणे हे आपण स्वीकारत आहोत! ? किंवा एखाद्या गोष्टीचा किती अतिरेक करत आहोत...हे मुलांच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. परिणामांबाबत विचार करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टी नाकारणं म्हणजे काय तर त्यांना चांगले पर्याय देण्याचं काम विचारपूर्वक करणं! हे करायला हवं!आपोआप फरक पडेल.
जसा आपण Cadbury ला पर्याय देऊ शकतो...तसाच स्वतःच्या मुलांसाठी काही घेतांना वा दुसऱ्यांसाठी भेटवस्तू निवडतांना,वाढदिवसाची भेट वा परतभेट देतांना अनेक चांगल्या गोष्टींचा पर्याय मिळू शकतो. गोष्टींची पुस्तके, चांगल्या CDs , बुद्धिला चालना देणारे खेळ, कोडी हे घेऊच शकतो. याव्यतिरिक्त एक चांगली कल्पना म्हणजे आपण चांगल्या प्रेरणास्थळांना जेव्हा भेटी देतो...तिथली मुलांना अनुरूप अशी प्रेरक स्मृतिचिन्हे (souvenirs)(जी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात), अनेक प्रदर्शनींमध्ये मिळणाऱ्या छोट्या पण अद्भुत गोष्टी, भारतातल्या एखाद्या प्रांताचं वैशिष्ट्य असणाऱ्या वा सुंदर कलाकुसरीच्या गोष्टी, विज्ञानाच्या गमती सांगणारे छोटे खेळ,वस्तू वा साधी उपकरणे...असं कितीतरी प्रकारचं वैविध्यपूर्ण सामान आपण मिळेल तेव्हा घेऊन ठेऊ शकतो मुलांना भेट द्यायला...हे त्यांच्या वयाला अनुसरूनच!त्यांना नकळत हे सांगण्यासाठी की तुमचं विश्व, फक्त cartoon आणि त्यातल्या व्यक्तिरेखा एवढंच नाही... तर त्याबाहेरही आहे. असंख्य चांगल्या गोष्टींशी त्यांचा संबंध आपण जोडून दाखवायला हवा. आवश्यकता आहे पर्याय शोधण्याची! बाजारातलं हे आक्रमण नक्कीच कमी होईल.
"pink" ..."blue" च काय पण कोणत्याही एका रंगात लहानपण बंदिस्त न करता त्याला मोकळं करूया...अनेक रंगांना पसरवणारं जादुई आकाश...स्वछ निळं...ढगांनी भरलेलं काळं...संधिप्रकाशातलं सोनेरी...नारिंगी! झाडांचे पोपटी-हिरवे- पिवळे...असे सगळेच रंग आपलेसे वाटू द्या त्यांना...जोडता येऊ शकतात अनेक सुंदर संदर्भ रंगांना! आणि काय हरकत आहे त्यांच्या writing pad वर बार्बी ऐवजी एखाद्या सुंदर पाखराचं... मोर वा मोरपिसाचं चित्र असायला! ते वापरत असलेल्या box वर, खेळण्यावर कधी आयतं cartoon छापून न आणता काढू द्या त्यांना स्वतःच एखादं चित्रं आणि रंगवू द्या वाट्टेल तस्सं!
कुठल्याही cartoon characters चं उदात्तीकरण करण्यापेक्षा शोधू द्या कुणीतरी hero त्यांना आवडत्या गोष्टीतून किंवा कवितेतून आणि रेखाटू द्या मनानेच!
अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत! त्यातून त्यांच्या आवडी-निवडी रुंदावत जातील आणि व्यापक पर्याय ते शोधू लागतील.न जाणो कुठून...कसं...त्यांच्यात काय झिरपेल! आणि त्यातूनच...Blue/pink असे सगळे संदर्भ ओलांडून...त्या पलीकडे जाऊन ते स्वतःचा शोध घेतील. कुणी प्रचंड साहसी वाटा चालेल तर कुणी कलेच्या तरल अविष्कारामध्ये रमेल! मग...सोडणार ना आपण "pink" आणि "blue" चा रंगांधळेपणा...?
- मोहिनी गर्गे-कुलकर्णी.
(22 जून 2019)
(22 जून 2019)
Comments
Post a Comment