फोटो बिटो नाहीत fb वर...तरी बरं चाललंय आमचं!
5-6 फोटोज तुझ्याकडून काढून घेईन म्हणते!
आठवडा झाला fb वर फोटोज नाहीत टाकले
लोक म्हणतील, काय हे! कुठल्या दुःखात मी बुडाले!
फोटोज टाकण्याचं कारण ...फार महत्त्वाचं नाही
सकाळ..बिस्किटं..चहा..असं चालून जातं काहीही..!
फोटोसेशन झालं, मला म्हणाली, "अरे हां, तुमचं कसं चाललंय?
फोटो बिटो टाकत नाहीस कधीच...म्हणून विचारावं लागतंय!"
नवऱ्याची नोकरी, स्वतःच्या साड्या...कधीमधी हॉटेलिंग,मुलांचं शिक्षण,
मुळीच काही टाकत नाहीस....काही बिनसलंय का पण?
मनात हसत बोलले तिला...अगदी खरंय बघ तुझं...
"happening" असं काहीच नाही...सगळं जुन्या वळणाचं!
नवऱ्याची प्रगती,कामासाठी देश विदेश...तसं बरंच फिरतो
पण..airport कुठून कुठे...टाकायला सुद्धा विसरतो!
व्यायाम,मॅरेथॉन, स्विमिंग, खेळ...काही ना काही करत असतो
जे करतो त्यातच बुडून जातो...फोटोसुद्धा काढायचा रहातॊ!
भटकंती, पाऊस,रिसॉर्ट,निसर्ग...
रूममधून दिसणारं रम्य कायकाय...
एकमेकांशीच बसतो मुक्याने बोलत...
तिथे फोटो काढायचा राहूनच जाय!
हॉटेलमध्ये डिश येते सजून धजून...गरम... वाफाळत...
फोटो काढून टाकण्याइतका दमच नाही बघ धरवत!
हां, सिनेमा, नाटक, मैफिली..असंही थोडंफार बघतो...
पण तिथून आल्यावर आपण..'आपले' कुठे असतो!
कोणतं थिएटर, खुर्ची कुठली...सोबतीला पॉपकॉर्न का कोला
जो 'माणूस' तो..भावनांच्या वळणाने..मनस्वीपणे वहात गेला!
कलाकारांना प्रत्यक्ष भेटून..माझं तर भानच हरवून जाई...
त्यांना धरून सेल्फी काढायला अजूनतरी जमलेलं नाही!
साड्या,बिड्या, एथनिक/मॉडर्न मीही नेसते अधून मधून
एकेक धागा, कलाकुसर...अन तलम स्पर्श जातो सुखावून!
सणवार,परंपरा, रांगोळी,नथ वगैरे...आठवणींचे प्रेमळ शेले
आजी,आईचा स्पर्श त्यात...अन देवघरात बाप्पा बसलेले!
फोटो बिटो कसलं काय... पटकन मला सुचतच नाही
आळस म्हण किंवा दुसरं काही, "...नारायणाय इति समर्पयामि!"
अरे हो, वाढदिवस,anniversaries...आमच्याही येतात हं नेमाने!
कुठून आलो...कुठून जायचंय...विचार करतो प्रेमाने!
तसंही I love you म्हणायला कुठे लागतं...
निमित्त...कारण...नेम ..फेम...!
नको त्यांच्यासाठी सुद्धा फेसबुक पटवून सांगतं
"Let them know that you are thinking about them!”
मुले, शाळा, भाषणं, बक्षिसं...पण प्रेक्षक नसतात हल्ली..
असतात ते असंख्य मोबाईल..!
... मी मात्र डोळे भरून बघत बसते समोर...
ईश्वराचा अंश आणि पूर्वजांची पुण्याई!
तसं बोबड्या बोलांपुढे सगळंच विरघळतं...
नशीबवान तो मोबाईलही जो सगळं सगळं पाही!
पण तान्ह्याच्या भोवतालचा तो मोहक वास..
कोणता कॅमेरा कॅच करून राही?
फोटो, व्हिडिओज हवेतच..पण आठवण म्हणून!
आईपण घ्यावं म्हणते.. खोल अंतरात साठवून!
... घर, फर्निचर,गाडी बिडी,पडदे ,सोफे,
काही म्हणून जागेवर नसतं...
आत्ता नद्यांचं बेट अन
घटक्यात टेनिस कोर्ट बनतं!
फोटोबिटो राहिला दूर... सगळं उचला घाईघाईत...
मोठेही लहान होऊन बसतात खेळत..हीच होते पंचाईत!
अश्शी आमची गत बाई... फोटो कमी अन कामेच फार
अनुभवायचं की दाखवायचं...असले प्रश्न डोक्यात चार!
क्षण-क्षण आयुष्य साठवू बघतो...थेट आत..निरंतर!
जगून घेऊ थोडं म्हणतो आधी...फोटो टाकूच की नंतर!
- मोहिनी गर्गे-कुलकर्णी.
(19 नोव्हेंबर 2019)
Comments
Post a Comment