मॅडम...एवढं कराच please!
आदरणीय मॅडम,
महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
करत असते मी प्रयत्न...माझ्या मुलीला याविषयी बरंच काही सांगण्याचा-
पण पंख पसरून पिल्लू उडतंय आता घरट्याबाहेर ...
शिक्षणासाठी दूर असतांना...प्राध्यापिका म्हणून तुम्ही अगदी प्रिय आहात विद्यार्थ्यांना तिथे...
प्रभाव आहे तुमचा माझ्या मुलीवरही...म्हणून हे पत्रं!
आणि तसंही... आईचं मन...तेही 'मुलीच्या'... कुठे स्वस्थ बसू देतं कुणाला सध्या!
मॅडम,
सगळीच 'माणसं' स्त्रियांना सन्मानाने वागवणारी नसतात,
नसतात सगळीच त्यांना समान दृष्टीने बघणारी...
हे शिकेलच माझी मुलगी कधी ना कधी.
मात्र तिला हे देखील शिकवा-
सभोवतालच्या वाईट बातम्यांमुळे खचून जाऊ नये तिने...लक्षात घ्यावं...
कोवळ्या कळ्यांनासुद्धा चिरडून टाकणारे नराधम आहेत इथे...मान्य!
पण त्याही पेक्षा जास्त आहेत पाणावलेल्या डोळ्यांनी
कन्येच्या पायांवर नतमस्तक होणारे, तिच्या पंखांमधे बळ देणारे...
उत्साहाने तिला मोकळं आकाश दाखवणारे पुरुषोत्तमही...कितीतरी रूपांमध्ये!
स्वतःच्या मुलींना गर्भातच मारणारे काही मायबाप आहेत इथे ...पण
'मुलगी झाली' हे सौभाग्य समजून स्वागत करणारे...
तिचं अभिमानाने पालन-पोषण करणारे समर्पित आई- बाबा आणि कुटुंबीयही आहेत!
आहेत मित्राच्या रूपात टपून बसलेले संधीसाधू ...पण
पार्टीनंतर आपल्या मैत्रिणीला जबाबदारीने..सुखरूप घरी पोचवणारे...
प्रसंगी तिला खंबीर करणारे...निस्वार्थी जिवलग मित्रसुद्धा आहेत!
तिला शिकवा- स्त्रीचं सामर्थ्य कशात आहे खरं -
म्हणजे तिचे जय-पराजय ती स्वतःच ठरवू शकेल!
मला माहित आहे मॅडम -
या 'बुद्धिवादी' पिढीला सगळ्या गोष्टी सांगून नाही शिकवता येत...!
तरीही जमलं तर तिच्या मनावर ठसवा आत्तापासून -
स्वतःच्या गुणवत्तेवर...सन्मानाने, मेहनतीने पार केलेली एखादी यशाची पायरी सुद्धा
चाटूगिरी करून मिळवलेल्या झटपट यश, प्रमोशन वा पैसा यापेक्षा अधिक मौल्यवान आहे!
तिला द्वेष, मत्सरापासून दूर राहायला शिकवा...आणि
नको विश्वास ठेवू म्हणावं 'स्त्रीच स्त्रीची वैरी असते यावर'-
आवश्यक असेल तिथे ego सोडून मोकळेपणाने घेतली पाहिजे मदत तिने ...
आणि स्वतःबरोबर दिला पाहिजे भक्कम आधार इतर मैत्रिणींना सुद्धा !
गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं-
त्यांना नमवणं तसं अवघड आहे ...पण अशक्य नाही !
त्यासाठी शरीराचं सामर्थ्य तर तिने वाढवावंच पण शिकावं 'माणसं' ओळखायलाही...!
सतर्क रहावं चहू बाजूंनी...रेंगाळू नये मोहाच्या भुलवणाऱ्या आणि कुठेही न नेणाऱ्या वाटांवर!
प्रसंगी सामोरी जावं धैर्याने...उपजत बुद्धिचातुर्याने...
आणि भस्मसात करावेत दुर्जनांचे मनोदय...तिच्या आत्मबळावर!
खूप प्रोत्साहित करा तिला मॅडम -
उंच भरारी घ्यायला...स्वतःच्या प्रतिभेने, कर्तृत्त्वाने...
पण शिकू द्या तिला बरोबरीने-
जमिनीवर पाय घट्ट रोवून खंबीरपणे उभं रहायला सुद्धा...!
व्यक्ती जितकी खोल रुजते...तितकी उंच पोचते!
जमेल तेवढं दाखवत चला तिला...
आपल्या संस्कृतीचं, इतिहासाचं अद्भुत वैभव!
आवर्जून सांगा तिला -
अनेक कर्तृत्त्ववतींनी आपापल्या क्षेत्रामधे जगभरात लढलेल्या लढाया...
...आणि केलेलं समर्पण, दिलेलं योगदान!
जाणवू द्या तिला महत्त्व -
त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलेल्या वाटांचं आणि मोल त्यांच्या संघर्षाचं!
मॅडम,आणखीन एक महत्त्वाचं-
झुंजू दे तिला तिच्या आघाड्यांवर समर्थपणे, स्वतंत्रपणे, अविरत ...
मात्र त्याबरोबरच मिळू दे तिच्या स्त्री-मनाला निवांतपणा...
थोडं विसावून... घेऊ देत हिंदोळे तिला...बागडू देत स्वच्छंद पणे...
भटकू देत तिची पावलं वेडी होऊन... सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला...!
आणि हेही जाणवू दे हळूवार -
किमया निसर्गाची अद्भुत... कशी दडलीये तिच्याच शरीरात...!
साऱ्या न्यूनगंडांवर मात करून प्रेम करावं तिने स्वतःवर... अगदी भरभरून!
...आणि करावा सन्मान स्वतःच्या अनमोल शरीराचा,मनाचा...अस्तित्वाचाच!
नक्की अनुभवायला शिकवा तिला-
आयुष्यातल्या सगळ्या वादळांवर मात करणारी नात्यांची ऊब!
आणि नैसर्गिक आहे त्यासाठी आपल्या ठायी समर्पित भाव असणं!
पण...प्रत्येकच स्त्रीने हेही लक्षात ठेवावं -
जर खेळू लागली आपलीच माणसं द्यूत तिला पणाला लावून...
तर मात्र वेळीच 'जागं' होऊन तिने काढायला हवा स्वतःचा मार्ग...अपूर्व हिंमतीने!
पुढे हेही सांगा तिला-
'be yourself'...स्वतःची साथ सोडू नकोस म्हणावं कधीच!
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या...अंतहीन 'फॅशन' च्या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद तिने कमवायला हवी...!
माझ्या मुलीला हे पटवता आलं तर बघा मॅडम -
आधुनिकता फक्त पेहरावात नसते...तर ती असते विचारांत, त्याप्रमाणे वागण्यात!
म्हणून वेळ पडली तर बदलून टाकावीत तिने-
तथाकथित आधुनिकतेची परिमाणंच...घालून नवा पायंडा!
आणि हो-
जे स्वतःला हवंय ते आधी दुसऱ्यांना द्यायला शिकावं तिने-
सन्मान,आदर, प्रेम, क्षमा...अगदी 'space' सुद्धा!
तिला हे विश्वासाने सांगा मॅडम-
रहावं तिने सतत प्रसन्न, आनंदी...स्वच्छ झऱ्यासारखं...
पण पराभवांची, चुकांची, आसवांचीही लाज वाटू देऊ नये तिने...
कधीही आतल्या आत घुसमटू नये...
जमेल त्या स्वरूपात आपल्या माणसांकडे वेळीच व्यक्त व्हायला शिकावं...नितळ, लख्ख मनाने!
जमलं तर तिच्या मनावर बिंबवा- स्त्री- पुरुष समानतेचे खरे निकष!
समानतेसाठी पुरुषांच्या शिव्या, सवयी, व्यसनं यांची बरोबरी करण्याची गरज नाही.
जे वाईट ते वाईटच- मग पुरुष करो वा स्त्री!
आधी 'माणूस' म्हणून बघावं स्वतःकडे तिने...
तुलना करावी कालच्या आणि आजच्या तिच्याशीच ...स्वतःला शोधत रहावं...
खूप मेहनतीने पुढे जात रहावं... तेही आपल्याच स्वतंत्र लयीमधे!
आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं करावं सोनं...
म्हणजे समाजातले इतर आईबापही धजावतील द्यायला त्यांच्या मुलींना योग्य संधी!
अनेकांना सापडू शकेल दिशा!
भावनेच्या भरात नव्हे तर विवेकाने घ्यावेत तिने स्वतःच्या आयुष्यातले सगळे निर्णय आणि हो...
घ्यावी संपूर्ण जबाबदारी सुद्धा त्या निर्णयांची हिंमतीने...तरंच त्या 'स्वातंत्र्याला'काही अर्थ आहे!
तिला हे पुरेपूर समजवा मॅडम-
पुरुषांशी बरोबरी वा स्पर्धा... अत्यावश्यक नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी...
स्वतःच घालून दिलेल्या या भ्रामक समजुतींमधून स्वतःला मोकळं करावं तिने ...
आणि ठरवायला हवं क्षेत्रं... स्वतःला चांगलं ओळखून...अगदी आतून!
कुठलीही गोष्ट 'by chance' करण्यापेक्षा 'by choice' केली...
तर वेगळीच झळाळी येईल तिच्या कर्तृत्त्वाला...!
हेच बघाना - आपली आयुष्यभराची उपासना ओंजळीत घेऊन...
एखादी नृत्यांगना साता समुद्रापार संस्कृतीचा दूत होते...
तर एखादी रणरागिणी राष्ट्राच्या सीमेवरती शत्रूवर काळ होऊन बरसते...!
कुणी अंतराळात जाते तर कुणी मुलांना घडवण्यात रमते!
....वो हर रूप में 'जीवन' हैं!
हेही कोरल्या जाऊ देत तिच्या मनावर -
घडवावं उंच कर्तृत्त्व तिने...स्वतःचं कौशल्य, बुद्धी विकून
पण कधीही विक्रय करू नये...हृदयाचा, आत्म्याचा...!
लागू नये धक्का...पडू नये 'थप्पड' कधीच...तिच्या आत्मसन्मानावरती...अगदी कोणाकडूनही!
आणि ठसवा तिच्या मनावर- जे सत्य आणि न्याय वाटतं -
त्याच्यासाठी पाय रोवून अथक लढत रहा !
तिचा निश्चय तेवढा दृढ हवा!
मॅडम, आणखीन एक विनंती-
तिला ममतेनं वागवा, पण लाडावून ठेऊ नका.
सदैव तिचा हात धरून चालवू नका तिला...
लागू दे थोड्या ठेचा...चाखू दे चव थोडी वेदनांची...
शिकू दे तिला स्वतःच्या अनुभवातून जग बघायला...आत्मविश्वासाने सामोरं जायला!
म्हणजे शिकेल ती आपोआपच दुसऱ्यांना मदत करायला!
ताऊन सुलाखून निघू देत तिला- न जाणो कोणत्या वळणावर...
कोणती अग्निपरीक्षा आजही द्यावी लागेल...तिला एकटीला!
तिचं धैर्य डगमगता कामा नये कुठेही!
अजून एक सांगत रहा तिला-
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर...
कर विशाल स्वतःला...जा पल्याड तू स्त्री- पुरुष तुलनेच्या, स्पर्धेच्या...
मुळात ही सुद्धा एक 'चाकोरीच'!
काढ मोडून ती - तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर...!
न्यायबुद्धीने वाग सगळ्याच पुरुषांशी...तोडून वलयं पूर्वग्रहांची...!
कारण समाजालाही आहे जाणीव शक्तीशिवाय शिवाच्या अपूर्णतेची!
मॅडम तुम्ही या विचारात असाल...की एवढं सगळं मुलींना सांगायचं...!
पण मुलांना कायकाय आणि कसं सांगावं!
खरंय तुमचं...मुलांना वाढवण्याची जबाबदारी जास्त मोठी होती...आणि आहे!
आवर्जून सांगा मुलांना-
स्त्रीलाही समजा एक 'माणूसच'...तुमच्यासारखं मन, शरीर, भावभावना, स्वप्नं, आकांक्षा...
सगळं तस्संच असतं म्हणा अगदी तिच्यातही!
जितकं जाणून घ्याल तितकी खोल गवसेल ती तुम्हांला-अगदी कोणत्याही रूपात!
कळकळीने सांगा त्यांना -
निदान थांबवा तिच्यावरचे अपमानास्पद विनोद आणि शरीराबद्दलच्या भयंकर...असह्य गोष्टी...
ज्याचं अक्षरशः थैमान सुरु आहे सगळीकडे!
करा संकल्प-
कोणत्याही स्वरूपात स्त्रीचा अवमान करणार नाही आणि करूही देणार नाही...कुणालाही!
जे जे शक्य ते ते सगळं करेन तत्परतेने - तिच्या सन्मानासाठी! तोच खरा पुरुषार्थ!
माफ करा मॅडम,
मी फार बोलते आहे-खूप काही मागते आहे-
पण पहा -
जमेल तेवढं आवश्य कराच,
माझी रेवा - खूपच गोड आणि मनस्वी मुलगी आहे हो ती!
आणि...मला खूप आशा आहेत मुलांकडूनही ...
खरा 'पुरुषार्थ' नक्कीच जाणतील ती!
- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©
(अब्राहाम लिंकन यांच्या 'हेडमास्तरांस पत्र' या संकल्पनेचा आधार घेऊन!)
(7 मार्च 2020)
Comments
Post a Comment