गोडबोले मॅडम...एक चिरंतन प्रेरणा!



मला नेहमीच असं वाटतं...आपण  आज कोण? तर आपल्या  आयुष्यात आलेल्या मोलाच्या माणसांनी आपल्यात  जे जे रुजवलं...ती गोळाबेरीज म्हणजे आजचे आपण! नाहीतर आयुष्य शून्यच! हीच मोलाची माणसं आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ होतात...! अशाच आपल्या गुरु- प्रा. डॉ.सौ. भाग्यश्री गोडबोले मॅडम! परवा त्या गेल्याची बातमी आली आणि

अगदी उन्मळून पडल्यासारखं झालं...मुळात त्यांच्या आजाराचीच बातमी खूप अस्वस्थ करणारी होती. त्या अस्वस्थतेमुळेच शब्दांना वाट मोकळी करून देणं अपरिहार्य झालं.

त्यांची अनेक वर्षांनी झालेली...पण शेवटची भेट मनात घर करून राहिली. काही महिन्यांपूर्वी त्यांना  कॅन्सर झाल्याची बातमी कळली आणि तेव्हा योगायोगाने औरंगाबादमध्ये असल्याने लगेच सरांना कॉल करून त्यांचं घर गाठलं. अनेक विचार येत जात होते...आणि  त्या "भेटल्या"...! मी त्यांना भेटायला गेले हे साफ खोटं ठरलं ...त्यांनीच भेटून मला शांत केलं...! एवढी  ट्रिटमेंट  सुरु असतांना सुद्धा  तोच प्रसन्न चेहरा...तो करारी आवाज..तेच डोळे...सात्त्विक व्यक्तिमत्त्व आणि विलक्षण अस मनाचा खंबीरपणा! मी म्हणाले-  "मॅम, बॉयकट मध्ये आणखीनच स्मार्ट दिसताय तुम्ही".... इतक्या खळखळून हसल्या! "कित्ती वर्षांनी भेटतोय मोहिनी आपण!" असं म्हणत त्यांनी माझा जो ताबा घेतला...मधली काही वर्षे गळून पडली. त्यांनी इतक्या उत्सुकतेने प्रश्न विचारले, मी, माझ्या पोस्टिंग्ज, लग्नं, मुली...मी सुद्धा ओसंडून वाहायला लागले त्यांच्या पुढे. 

त्या म्हणाल्या "इतकं छान वाटतंय तुला ऐकायला..मला वाटतं हे तुझे करिअर चे अनुभव आपल्या कॉलेज मध्ये सगळ्यांनी ऐकावेत, वेळ काढून ये तू तिकडे." मीही म्हणाले "तुम्ही परत जॉईन झाल्यावरच...तुम्ही नसलात तर  कॉलेज फार परकं वाटेल...मी आत जाऊच शकणार नाही. तर ते बघू नंतर.  आपण माझ्यावरंच बोलत  आहोत...तुम्ही कशा आहात?आणि काय हे सगळं असं तुमच्यामागे ...मी पार हादरलेय." मी मनातलं खरं सांगून टाकलं. तेवढ्यात स्वतः उठून स्वयंपाकघरातून गाजर हलव्याची वाटी आणून माझ्या  हातात ठेवत म्हणाल्या, " काळजी करू नको. हत्ती गेला...शेपूट राहिलंय. सुरुवातीला कळलं तेव्हा  मलाही धक्का बसलाच पण मग मी स्वीकारलं. मोहिनी, कॅन्सर ने महत्त्वाची एक गोष्ट दिली ती म्हणजे मी एवढी स्ट्रॉंग आहे याची माझी मला  दिलेली जाणीव! नाहीतर हे मला कधीच कळलंच नसतं! माझं मलाच आश्चर्य वाटतं- इतकं आत्मबळ कुठून आलं माझ्यात! ...आणि तुम्हा विद्यार्थ्यांच्या  शुभेच्छा माझ्या बरोबर आहेत याचं इतकं...इतकं मोठं समाधान आहे मला आणि गोडबोले सर दोघांना! कित्ती जण कुठून कुठून भेटायला आले...त्यांच्या  डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचं प्रेम दिसतंय. फारच समाधानी वाटतंय!" ....इतक्या मोकळेपणाने त्या व्यक्त झाल्या की मी बघतंच राहिले! 

पण हे सगळं त्यांनी कमावलेलं होतं.मला आठवतंय 12 वी नंतर जेव्हा मी ऍडमिशन घेतलं लॉ कॉलेज ला...इतकी विचित्र मनस्थिती होती...घरात वकिली ई. शी संबंधित जवळचं कुणीच नाही,  12 वी सायन्स ला कमी मार्क्स मिळाल्याने आत्मविश्वासाचा चक्काचूर झालेला,इंग्लिश बोलण्याचा कॉम्प्लेक्स...एक ना दोन कित्ती गोंधळ! मीच काय पण जास्तीत जास्त मुले-मुली याच अवस्थेतले. अशा परिस्थितीत गोडबोले मॅडम चं तिथलं अस्तित्त्व खूप आश्वासक होतं.खूप धीर दिला त्यांनी, सतत प्रेरित केलं...अभ्यासासाठी, स्पर्धांसाठी, सतत चांगलं माणूस होण्यासाठी! खरंतर सुरुवातीचा काळ, ते वातावरण फार आशादायी नव्हतं...निराशेचेच क्षण जास्त. पण एक अतिशय मोठी गोष्ट मी मॅडम कडून शिकले ती म्हणजे वातावरणाला  दोष देत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्याच  चांगल्या  कामातून स्वतःसाठी सतत ऊर्जा मिळवत राहायची! मॅडमना ना मी खूप वैतागलेलं कधीही पाहिलं नाही. सतत अभ्यासू वृत्ती, अतिशय focussed आणि नेहमी "self-motivated" असायच्या. ही शिकवण  मला माझ्या नोकरीमध्येही खूप उपयोगी ठरली. त्यांचं बोलणंही अगदी मनापासून असायचं! बरोबरीने त्यांच्या संवेदनाही शिकवण्यात दिसायच्या...रोजच्या आयुष्यातली, आजूबाजूची उदाहरणं देऊन त्या शिकवायच्या..."लॉ" विषय आपला वाटायला लागला! 

याव्यतिरिक्त एक स्त्री म्हणूनही त्या खूप प्रभावशाली होत्या. माझ्या आयुष्यात प्रथमच अशी प्राध्यापिका मी बघत होते...त्यांची साधी राहणी, आत्मविश्वासपूर्ण वावर, अभ्यासपूर्ण शिकवणं, आपलेपणा तरीही कमालीचा संयम...कितीतरी गोष्टींमधून त्या उलगडायला लागल्या. 5 वर्षे त्यानं अगदी जवळून पाहिलं. मला वाटतं  सगळ्याच मुलींसाठी आवर्जून शिकण्यासारखी  गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी,ऑफिसमध्ये  एखाद्या स्त्रीने कसं राहावं, कसं बोलावं या सगळ्यांचाच आदर्श गोडबोले मॅडम नी घालून दिला! सगळ्यांत असूनही कमल पत्राप्रमाणे निर्लेप! 

मॅडममुळेच  गोडबोले सरांशीही ओळख झाली . त्यांच्या घरी येणं-जाणं वाढलं.नेहमी आम्हा विद्यार्थ्यांचं स्वागत असायचं त्यांच्याकडे. सर, दोन गोड  मुली,सासू-सासरे, सामाजिक कार्यात सहभाग...मॅडमच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी पैलू कळले...म्हणजे 'करिअर आणि घर यांचा इतका सुरेख मेळ' हे पक्कं डोक्यात बसलं माझ्या! तसे संस्कारच झाले नकळत. वरद गणेश मंदिरात व्याख्याने, राष्ट्रीय कीर्तन ई. कार्यक्रम आयोजित करून आम्हांला आवर्जून बोलवायचा त्या! 

आज  त्यांच्या विषयी भूतकाळात लिहितांना खूप जड जातंय.काय आणि कित्ती दिलंत मॅडम तुम्ही! नुसतं पुस्तकातलं शिकवणं नव्हे तर विद्यार्थ्यांना घडवण्याचं, त्यांना दिशा देण्याचं मोठं काम  तुम्ही केलंत! चारित्र्य निर्माणाचं काम तुम्ही केलंत!  मला हक्काने कितीतरी गोष्टी तुम्ही सांगितल्या... तुमचं ऐकत गेले आणि नवीन  वाटा  सापडत गेल्या!

शेवटची भेट झाली तेव्हाही "आर्मी नंतरही तू काही स्वस्थ बसणाऱ्यातली नाहीस...ठरव आणि काहीही लागलं की सांग फोन करून"...तुमच्या शब्दांतून भरभरून ऊर्जा घेऊन मी बाहेर पडले. पण आता काहीही केलं तरी ते बघायला तुम्ही नाहीत हा सल मनात राहील. अर्थात आम्हां  सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या तुम्ही चिरंतन  रहाल...! "गुरु" म्हणून खूप खूप दीर्घायुषी व्हाल...! गोडबोले मॅडम, हीच शब्दरूपी श्रद्धांजली आणि माझा एक कडक सॅल्यूट तुम्हांला...तुमच्यातल्या गुरूला...आणि शेवटच्या श्वासापर्यंत  झुंजणाऱ्या वीरांगनेलाही!  

- मेजर  मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)©
(24 सप्टेंबर 2019)





Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही