उद्यापन...एका व्रतस्थ सेवेचं
काही शिक्षक...केवळ शिक्षक रहात नाहीत...आपल्यात इतके खोल रुजतात की आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग बनून जातात...त्यांना आपल्यातून वेगळं काढणं केवळ अशक्य! ते आपल्या आयुष्याचा भक्कम पाया होतात...ज्यावर आपली इमारत वादळांनी न डगमगता डौलाने उभी रहाते! अशाच माझ्यात खोलवर रुजलेल्या..."माझ्या" झालेल्या...सौ. संध्या नाथ्रेकर मॅडम! (संपूर्ण मराठी माध्यमांतल्या शाळांमध्ये शिक्षिकांना/ गाण्याच्या गुरूंना अतिशय आदराने 'बाई' म्हणण्याची पद्धत तेव्हाही थोडीफार टिकून होती... अशा नाथ्रेकर बाई! )...एक उत्तम शिक्षिकाच काय... पण एक कर्तव्यदक्ष स्त्री, उत्कृष्ट आई, 'न्यायप्रिय' आणि दूरदृष्टी ठेऊन आचरण करणारी शिस्तबद्ध, निर्णयक्षम प्रशासिका म्हणून...कितीतरी पैलूंनी त्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा आदर्श आहेत...! अनेक वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन मॅडम आज आमची शाळा, सरस्वती भुवन प्रशाला, जालना इथून निवृत्त होत आहेत...त्यानिमित्ताने काही रम्य आठवणी, मुद्दे आणि विचार...आपल्या सगळ्यांसाठीच!
संस्कृत विषय शिकायला मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतेच...पण त्याची सुरुवात नाथ्रेकर मॅडम कडून झाली ही तितकीच भाग्याची गोष्ट! कारण त्या जे शिकवायच्या ते फक्त शब्द किंवा भाषा नव्हती...ती होती विद्यार्थांबद्दल तळमळ, तो होता विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीचा ध्यास...त्यातून प्रकट होत होती त्यांची जीवन निष्ठा आणि अर्थातच संस्कृत वरचं, विद्येवरचं त्यांचं अथांग प्रेम! चार भितींमधे शिकवला जाणारा तो एक मर्यादित अभ्यासक्रम कधीच नव्हता...! तर पुढे जाऊन आम्हांला प्रवाहात उडी टाकण्यासाठी दिलेली प्रेरणा, शक्ती होती! तसंच कोशातून बाहेर पडून जगाला सामोरं जातांना अत्यंत उपयोगी पडणारी सदाचाराची, विवेकाची आणि संस्कारांची शस्त्रं सुद्धा होती ती! याची प्रचिती मला वारंवार माझ्या आयुष्यात येत राहिली! कितीतरी विद्यार्थ्यांना मॅडम ने समजावून योग्य मार्गावर आणत त्यांचं आयुष्य घडवलंय!
शाळेत 8 वी ते 10 वी पर्यंत संस्कृत विषय मॅडमकडूनच शिकायला मिळाला.त्यांनी 'शिकवला'... छे! रक्तात भिनवला! चांगला शिक्षक केवळ एखादा विषय शिकवतच नाही... तर त्या विषयाची गोडी निर्माण करतो, जिज्ञासा उत्पन्न करतो तसंच त्याविषयी आत्मविश्वासही देतो! त्याप्रमाणे संस्कृत हा विषय फक्त scoring subject न रहाता...माझ्या थेट आत गेला...तो मॅडम मुळेच! मी 11 वी- 12वी विज्ञान शाखा घेऊनही संस्कृत सोडलं नाही. त्यानंतर कायद्याची पदवी घेत असतांना सुद्धा टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून जमेल तसं शिकत राहिले...! मुद्दाम सांगायचं म्हणजे संस्कृत विषय आपण का शिकत राहिलो हा प्रश्न कधीच पडला नाही...! सुदृढ आरोग्यासाठी जशी जीवनसत्त्वं...तसंच चांगल्या पद्धतीने, विवेकाने जगण्यासाठी संस्कृत! किंवा भारतीय ज्ञानाशी, मानवतेशी, मूल्यांशी...जोडल्या गेलेली ती आपली नाळच आहे असं वाटत राहिलं!
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या तोंडून शिकलेली शेकडो सुभाषितं...अजूनही मनात टवटवीत आहेत! कुठून कशीही चालून येतात ही सुभाषितं आणि सावरतात...'विद्या सर्वस्य भूषणम्' म्हणून अभ्यास करायला भाग पाडतात...'आयुष: क्षण एकोSपि सर्व रत्नै: न लभ्यते' आठवून भरभरून जगायला लावतात...'अतिपरिचयाद् अवज्ञा' ओळखून कुणापासून दूर राहायला सांगतात...! ‘संपत्तौ च विपत्तौ च महतां एकरूपता' जाणवून स्थितप्रज्ञता आणतात...'सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति' हा विचार दृढ करून आस्तिक आणि व्यापकही करतात...'वचने का दरिद्रता' सांगून गोड बोलायला शिकवतात...! आठवतांना मन प्रत्येक वेळी थेट मॅडम पाशी जातं! कारण त्या शिकवायच्या ती मूल्यं आणि कृती यात फरक नसायचा!खूप काही सांगण्यासारखं आहे! (अगदी सरकारी कामकाजानिमित्त फिरतांना, अनेक गोष्टी अनुभवतांना 'को न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः' हेही आठवल्याशिवाय राहिलं नाही...!) यासाठीच मला वाटतं नाथ्रेकर मॅडम सगळ्या संस्कृत शिक्षकांचाही आदर्श आहेत...आपण ठरवलं तर ही भाषा सोपी होऊन कंठा कंठात रुजू शकते...आणि उत्तम चरित्र निर्मितीचं सामर्थ्य तिच्यात आहे हे आजही सिद्ध करू शकते. अनेक संशोधकांना देखील दिशा मिळते या भाषेच्या माध्यमातून!
शाळेच्या आठवणींमधे फेरफटका मारला की स्पष्ट आठवतं नाथ्रेकर मॅडम अतिशय शिस्तप्रिय होत्या. आमचे केस, कपडे, स्वच्छता, बोलणं, चालणं...सगळं व्यवस्थित आहे ना...हे त्या आवर्जून बघायच्या. म्हणजे प्रत्येक वेळी आम्हांला तसं सांगूनच नव्हे...तर lead by example ...त्यांच्या साध्या आणि नीटनेटक्या राहणीमानातून, शालीन आचरणातून, तेजस्वी डोळ्यांतून, सोज्ज्वळ पण खणखणीत आवाजातून हे आमच्यापर्यंत पोचायचं. आदरयुक्त भीतीने फार दरारा होता आणि आहे त्यांचा. अतिशय मेहनती स्वभाव आहे मॅडम चा. तेव्हाही त्या जीव ओतून...समरसतेने शिकवायच्या. त्यांच्या तासाला अनेकदा 'मॉनिटर गिरी' करण्यात मला खूप धन्यता वाटायची!
मॅडमकडे शाळेचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारीही होती. संगीत, नृत्य,नाटक ई. सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याची अद्भुत कला आणि प्रतिभाही त्यांच्यात आहे! त्यांचं घर आम्हां विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडं असायचं. अभ्यास असो, कशाची रिहर्सल असो ...जास्तीचा वेळ देऊन त्या सगळं यशस्वी करून दाखवायच्या...अगदी समर्पित भावनेने! त्यात दोन मुलांचं संगोपन आणि कुटुंबाच्या जवाबदाऱ्याही त्यांच्यावर होत्याच! याशिवाय गीतापठण, संस्कृत कथाकथन, संस्कृत चारित्र्य कथन...अशा आंतरशालेय स्पर्धांसाठीही आम्हांला त्या प्रेरित करायच्या, आमच्याकडून तयारी करून घ्यायच्या! व्यासपीठावर बोलण्याचे, वावरण्याचे, स्वतःला निर्विवाद सिद्ध करण्याचे हे संस्कार फार उपयोगी पडले मला नंतर. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मॅडम जेवढ्या प्रेमळ तेवढ्याच कर्तव्य कठोर आहेत! कोणत्याही स्पर्धेत केवळ आणि केवळ गुणवत्तेचा निकष असायचा त्यांचा...त्यावरच आधारित निवड! खूप विश्वास मिळवला त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांचा आणि पुढे जाऊन त्यांची ही न्यायबुद्धी आमच्यातही नकळत रुजली! तसंच विद्यार्थ्यांना उत्तम व्याख्यानं ऐकायला मिळावीत, इतर अनेक चांगल्या गोष्टी त्यांना बघायला मिळाव्यात यासाठीही त्या नेहमी प्रयत्न करत. अशी समर्पित माणसं संस्थेलाही खूप मोठं आणि समृद्ध करतात!
आज नाथ्रेकर मॅडम त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रूपाने किती दूरपर्यंत पोचल्या आहेत...अगदी देश विदेशात! कितीतरी खोलवर रुजल्या आहेत...! यापुढेही निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मॅडम ना आणि डॉ. उपेंद्र कुलकर्णी सरांना खूप खूप शुभेच्छा! I take this opportunity to offer my best wishes to Vedant and Vikrant for their bright future! मॅडम, आत्तापर्यंत च्या व्यस्ततेमुळे स्वतःसाठी ज्या गोष्टी राहून गेल्यात...त्याही आता तुम्ही आवश्य कराव्यात! आणि त्यानंतर जसं जमेल तसं मार्गदर्शनाचं अनमोल कार्य निरंतर सुरु ठेवावं हा आम्हा सर्वांतर्फे प्रेमाचा आग्रह!आणि हो...'मम हृदये वस सततं देवि याचना...' अशी पार्थनाही मी तुम्हांला करते! पृथिव्यां नास्ति द्रव्यं यद् दत्वा च अनृणी भवेत्...पृथ्वीवर असं कोणतंही द्रव्य/धन नाही जे देऊन गुरूंच्या ऋणातून मुक्त होता येतं! म्हणून आम्ही असंख्य विद्यार्थी तुमच्या ऋणात आहोत. शेवटी मला एवढंच वाटतं की गुरुंबद्दल आठवणी लिहून सगळं पूर्णत्त्वाला जात नाही तर त्यांच्या संस्कारांप्रमाणे वागण्याचा निरंतर प्रयत्न करत रहाणं..हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा! नाथ्रेकर मॅडम...तुमच्या या दीर्घ सेवेच्या यशस्वी पूर्तीसाठी तुम्हाला मनाचा मुजरा! Retirement वगैरे नाहीच...हे तर होतं तुम्ही हाती घेतलेलं विद्यादानाचं श्रेष्ठ व्रत! आता हे पूर्णत्वाला जाऊन देवी शारदेच्या चरणी समर्पित होत आहे...आज आहे या व्रतस्थ सेवेचं उद्यापन!
- तुमची एक विद्यार्थिनी!
( मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.))©
30 एप्रिल 2020.


Comments
Post a Comment